वूहू : चीनच्या आन्हवे प्रांतातील प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्र तसेच महत्त्वाचे नदीबंदर. लोकसंख्या ३,८५,८०० (१९८५ अंदाज). यांगत्सी नदीच्या त्रिभुज प्रदेशात, नदीमुख खाडीच्या उजव्या काठावर वूहू वसलेले असून भरतीच्या वेळी पाण्याची पातळी शहरापर्यंत वाढते. उत्तरेकडील ८८ किमी.वरील नानकिंगशी रेल्वेने, तर १३० किमी.वरील ताइपिंगशान या चहाच्या व्यापारकेंद्राशी कालव्याने (यातून गलबते व स्टीमर बोटींनी वाहतुक चालते) जोडलेले आहे.

इ. स. पू. सहाव्या शतकापासून येथे वसाहत असल्याचे आढळते. हान घराण्याच्या काळात ( इ. स. पू. २०६–इ. स. २२० ) सध्याच्या शहराच्या नैर्ऋत्येस सु. १५ किमी.वर वूहू या नावाने एका परगण्याची स्थापना करण्यात आली. होती. तिसऱ्या व चौथ्या शतकांत चीन राजांच्या काळात त्याला प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले होते. पाचव्या शतकात मात्र परगण्याचा दर्जा संपुष्टात येऊन वूहू समीपच्या जिल्ह्यात विलीन करण्यात आले. आठव्या व नवव्या शतकांत हा प्रदेश विकसित होऊ लागला आणि वू-हू-चेन या नावाचे, दुर्गरक्षक सेना असलेले गाव सांप्रतच्या जागी वसविण्यात आले. मिंग (१३६८–१६४४) व मांचू (१६४४–१९१२) घराण्यांच्या काळात ते ताइपिंग जिल्ह्याचा एक भाग बनले. मिंग घराण्याच्या काळात पंधराव्या शतकापासून वूहू हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र (विशॆषतः तांदूळ), नदीबंदर म्हणून विकसित झाले. ग्रेट ब्रिटनबरोबर १८७६ मध्ये झालेल्या एका व्यापारी करारामुळे वूहूचा विदेश व्यापारात शिरकाव झाला.

दुसऱ्या महायुध्दापूर्वी स्थानिक व्यापारात शांघाय व नानकिंगखालोखाल याचाच क्रमांक होता. देशाच्या एकूण विदेशी व्यापारापैकी १० टक्के व्यापार येथून चालत असे. विशेषतः जपानला तांदूळ, चहा, द्विदलधान्ये, तेलबिया, अशोधित लोखंड (१९३८–४५ या काळात जास्त प्रमाणात) यांची निर्यात येथून होत असे. दरम्यानच्या काळात रस्ते व लोहमार्गांनी हे महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडण्यात आले. आसमंतातील शेतमालाचे (तांदूळ, चहा, कापूस व गहू) हे महत्त्वाचे वितरण व प्रक्रिया केंद्र समजण्यात येते. कोळसा व लोहखनिज यांच्या सान्निध्यामुळे हे औद्योगिकदृष्ट्याही विकास पावले आहे. लोखंड व लोखंडी वस्तुनिर्मिती, पीठ, भातसडीच्या तसेच कापड, तेल इत्यादींच्या गिरण्या, अंडी-प्रक्रिया, कागद, स्वयंचलित यंत्रे यांची निर्मिती यांसारखे उद्योग येथे स्थिरावले आहेत.

वूहूमध्ये अनेक प्रसिध्द मंदिरे असून त्यांपैकी एक मंदिर थांग घराण्याच्या काळातील (६१८–९०६) ली बो या कवीच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे.            

 चौधरी, वसंत