हडसन उपसागर : कॅनडाच्या पूर्व-मध्य भागातील एक अंतर्वर्ती उपसागर. क्षेत्रफळ सु. ८,१९,७३१ चौ. किमी. हा उपसागरउत्तर अटलांटिक महासागराची शाखा आहे असे मानतात. याचा विस्तार ५२° उ. ते ६२° ५०’ उ. अक्षांश व ७६° प. ते ९५° प. रेखांश यांदरम्यान आहे. याच्या उत्तर व पश्चिमेस नॉर्थ वेस्ट टेरिटरी, दक्षिणेस मॅनिटोबा व आँटॅरिओ, पूर्वेस क्वीबेक हे कॅनडाचे प्रांत आहेत. हा उप-सागर हडसन सामुद्रधुनीने अटलांटिक महासागरास व फॉक्स खाडीने आर्क्टिक महासागरास जोडला गेला आहे. याची जेम्स बे वरील मूसोनी ते साउथॅम्प्टन बेटापर्यंतची कमाल लांबी सु. १,३७० किमी. व कमाल रुंदी सु. ९६० किमी. आहे. हा उपसागर उथळ असून याची सरासरी खोली १०० मी. व कमाल खोली २७० मी. पर्यंत आहे.

याचा किनारी भाग बहुतांशकाळ गोठलेला असतो. या उपसागराचा पूर्व-पश्चिम व दक्षिण भागातील नालेच्या आकाराचा पृष्ठभाग खडकाळव प्राचीन कठीण प्रस्तरांनी बनलेला आहे. यास ‘कॅनडाची ढाल’ असे म्हणतात. या उपसागराच्या किनाऱ्यालगत सूचीपर्णी, बर्च, विलो, ॲस्पेन इ. वृक्ष तसेच गवत, शेवाळ यांमधून वाढणारी झुडपे आढळतात.

हडसन उपसागरात आकिमिस्की, कोट्स, मॅनसेल, शार्लटन, बेलचेर, ओटावा, स्लीपर, ट्वीन ही बेटे आहेत. यास चर्चिल, नेल्सन, सेव्हर्न, आबिटिबी, मूस, हॅरिकानॉ, नॉटवे, ग्रेट व्हेल, फोर्ट जॉर्ज, ऑल्बानी, एक्वान, ॲटवापिस्कॅट, ला ग्रँड इ. नद्या मिळतात. हडसन उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचे जलवाहनक्षेत्र सु. ३.८ द. ल. चौ. किमी. असून या नद्यांद्वारे उपसागराला दर सेकंदास सु. ३०,९०० द. ल. घ. मी. पाणी मिळते. तसेच फॉक्स बेसिनद्वारे या उपसागरात आर्क्टिक महासागरातून प्रवाह येतो. येथे पाण्याचा प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रवाहित होऊन हडसन सामुद्रधुनीतून बाहेर पडून लॅब्रॅडॉर या थंड प्रवाहास मिळतो.

या उपसागराच्या पाण्याची क्षारता बाष्पीभवन, वृष्टी, उपसागरास मिळणाऱ्या नद्यांद्वारे येणारे पाणी, उपसागरात येणारे प्रवाह यांवर अवलंबून असते. याच्या पाण्याची क्षारता खोलीनुसार वाढते व पाण्याचे तापमान खोलीनुसार कमी होते. येथे जास्त खोलीवर ऑगस्टमध्ये -२° से. तर, पृष्ठभागावर सप्टेंबरमध्ये ९° से. तापमान असते.

हडसन उपसागराचे हवामान खंडीय प्रकारचे आहे. येथे जानेवारीत सरासरी तापमान २९° से., तर जुलैमध्ये सरासरी ८° से. असते. येथील वार्षिक सरासरी तापमान -१२° से. असते. हिवाळ्यातील तापमान -५१° से., तर उन्हाळ्यातील तापमान २७° से. असते. डिसेंबरनंतर येथे हिमवादळे होतात. या उपसागरात ध्रुवीय प्लेइस, कॉड, हॅलिबट, सॅमन, सील, वॉलरस, डॉल्फिन, व्हेल इ. मासे आढळतात. याच्या सभोवतालच्या परिसरात सांबर, कस्तुरी बैल, विविध प्रकारचे कृंतक इ. प्राणी आढळ-तात. येथे सु. २०० प्रकारचे विविध पक्षी असून यांमध्ये गल, आयडर, सँडपायपर, घुबड, कावळे, हंस यांचा समावेश होतो.

हेन्री हडसन या समन्वेषकाने १६१० मध्ये या उपसागराचा शोध लावला व त्याच्या नावावरूनच याचे हडसन उपसागर असे नामकरणकरण्यात आले. नंतर या उपसागराचे सर थॉमस बॅटन (१६१२), विल्यम बॅफिन (१६१५), जेन्स मंक (१६१९), लूक फॉक्स व थॉमस जेम्स (१६३१) यांनी समन्वेषण केलेले होते. या उपसागराच्या पूर्व किनाऱ्याचे नकाशे १६१२ मध्ये, तर पश्चिम किनाऱ्याचा नकाशा १८२० नंतर करण्यात आला. कॅनडियन लोकांनी या समुद्राच्या पाण्याच्या खोलीची मोजणी १९२९-३१ मध्ये प्रथम केली. इंग्रजी व्यापाऱ्यांनी येथे हडसनबे कंपनीची स्थापना केली. ही कंपनी प्रामुख्याने लोकर व्यापारी कंपनीम्हणून प्रसिद्ध होती. १६८२-१७१३ मध्ये फ्रेंचांनी येथे अंमल प्रस्थापितकेला होता. मात्र उत्रेक्तच्या तहान्वये (१७१३) फ्रेंचांकडून याचा ताबा ब्रिटिशांनी घेतला. हडसन बे कंपनीकडून येथील प्रदेश कॅनडाने १८७० मध्ये ताब्यात घेतला होता.

या उपसागराच्या उत्तर किनारी भागात एस्किमो, तर दक्षिण किनारी प्रदेशात रेड इंडियन लोकांचे वास्तव्य आहे. याच्या किनारी भागात लोकसंख्येची घनता कमी आहे. येथील लोकांचे मासेमारी व शिकार हे प्रमुख व्यवसाय असून ते बांधकाम व किरकोळ व्यापारातही गुंतलेले आहेत. या उपसागरावरील चर्चिल हे प्रमुख बंदर असून त्याशिवाय इग्लूलिगार्जुक, व्हेल कोव्ह, ॲर्व्हीअत, मूसोनी, फोर्ट सेव्हर्न, फोर्ट ऑल्बानी, सॅनिकिलुआ, पूव्हिर्निटुआ या प्रमुख ठिकाणांना व्यापाराच्या दृष्टीने महत्त्व आहे.

हडसन उपसागराच्या परिसराचा विकास १९७१ नंतर झाला. ला ग्रँड नदीवर १९७१-९६ या कालावधीत ११ धरणे व ८ विद्युत् केंद्रे बांधली आहेत. कॅनडियन सरकारने संरक्षणाच्या हेतूने हडसन उपसागर खोरे ‘क्लोज्ड सी’ म्हणून निर्देशित केले आहे.

गाडे, ना. स.