मंडी : हिमाचल प्रदेश राज्याच्या मंडी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. पूर्वीच्या मंडी संस्थानची राजधानी. लोकसंख्या १८,६३१ (१९८१). हे सिमल्याच्या उत्तर-ईशान्येस १४१.६ किमी. अंतरावर बिआस नदीकाठी वसलेले आहे. मंडीचा राजा अजबर सेन याने १५२७ मध्ये हे वसविले. आसमंतातील शेतमालाची आणि लाकडाची मोठी बाजारपेठ म्हणून हे विशेष प्रसिद्ध आहे. सिमला व इतर मोठ्या शहरांशी हे रस्त्यांनी जोडलेले असून रेशीम उत्पादन, हातमागाचे कापड व इतर हस्तव्यवसाय हे येथील प्रमुख व्यवसाय होत. येथून तिबेटशीही व्यापार चालतो. येथे अनेक प्राचीन मंदिरे असून पर्यटकांचे ते एक आकर्षण ठरले आहे.

गाडे, ना. स.