एक्झीटर : इंग्लंडच्या नै‍र्ऋत्येकडील डेव्हन परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९५,५९८ (१९७१). इंग्लिश खाडीपासून शहर १६ किमी. एक्स नदीकाठी असून तेथपर्यंत जहाजवाहतूक चालते. याच्या परिसरात सापडलेल्या नाण्यांवरून इ. स. पू. २०० पूर्वी येथे व्यापार्‍यांची वसाहत असल्याचे दिसते. रोमनांनी याला ‘इस्काडम्‍नोनिओरम’  हे नाव दिले होते. नवव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत डॅनिश लोकांनी या शहरावर अनेक हल्ले केले. १०६८ मध्ये ते नॉर्मनांच्या ताब्यात गेले. तेव्हापासून आजतागायत येथील बाजारपेठेचे महत्त्व टिकून आहे. सतराव्या-अठराव्या शतकांत येथून लोकरीची प्रचंड निर्यात होई. दुसऱ्या महायुद्धात येथे नौदलाचे मोठे ठाणे होते. हल्ली अनेक लहान लहान कारखान्यांचे जाळेच येथे पसरले असून अनेक लोहमार्गांचे व सडकांचे नाके असल्याने इंग्लंडमधील प्रमुख वाहतूक केंद्रात एक्झीटरची गणना होते. येथे एक विद्यापीठ असून नॉर्मन कालात बांधलेल्या येथील कॅथीड्रलच्या ग्रंथालयात एक्झीटर बुक नावाचा प्राचीन अँग्लो-सॅक्सन भाषेतील काव्यसंग्रह असून तो भाषेच्या अभ्यासकांच्या दृष्टीने अनमोल मानला जातो.

ओक, द. ह.