अल्ताई : रशिया, चीन व मंगोलिया यांच्या सीमेवर ४८° ते ५३° उ. अक्षांश व ८१° ते ९०° पू. रेखांश यांच्या दरम्यान पसरलेली मध्य अशियातील महत्त्वाची पर्वतश्रेणी. सर्वसामान्य उंची सु. ३,३५० ते ४,५७५ मी. हिला ‘सुवर्णपर्वत’ या अर्थाचे ‘अल्ताईन उला’ असे मंगोलियन नाव आहे.  हिचा बहुतेक भाग गॉर्नो अल्ताई या रशियन प्रदेशात आहे. या पर्वताच्या ईशान्येस खाकास, वायव्येस अल्ताई क्राई व पश्चिमेस पूर्व कझाकस्तान हे रशियन ‘ओब्लास्ट’ विभाग असून दक्षिणेस चीनचा सिक्यांग उईगुर व आग्नेयीस औटर मंगोलियाचा पश्चिम भाग आहे. याच्या चार उपश्रेणी पश्चिमेस दक्षिण अल्ताई, वायव्येस मध्य अल्ताई, ईशान्येस पूर्व अल्ताई व आग्नेयीस मंगोलियन अल्ताई अशा आहेत. दक्षिण अल्ताई हा इर्तिश व बुखतर्मा नद्यांमधील जलविभाजक सु. ३,८७० मी. उंच असून त्यांच्या दक्षिण उतारावर मार्काकुल सरोवर आहे. मध्य अल्ताईच्या समांतर रांगा वायव्येकडे गेलेल्या असून त्यांत हिमाच्छादित शिखरे आहेत. ‘काटून आल्स’ नावाच्या रांगेत मौंट बेलुखा हे ४,६२० मी. उंचीचे रशियाच्या भागातील सर्वोच्च शिखर आहे. पूर्व अल्ताई हा ओब व येनिसे या नद्यांमधील जलविभाजक आहे. याच्या पश्चिम उतारावर ट्यिल्येट्‌स्कय हे ३२५ मी. खोल पर्वतीय सरोवर आहे तसेच उबसा-नॉर हे ७२२ मी. आणि कोब्डो-नॉर १,१७० मी. उंचीवरील सरोवरे आहेत. किरगीझ-नॉर, दुर्गा-नॉर इ. लहान-मोठी सरोवरे याच भागात आहेत. टाबुन बोग्डो हा ४,६५३ मी. उंचीचा अल्ताईचा सर्वांत उंच जटिल डोंगराळ भाग मंगोलियन हद्दीत आहे. तेथून सिल्यूजेम ही ४,२३५ मी. उंचीची रांग उत्तरेकडे जाऊन पश्चिम सेयान्स रांगेला मिळते. मंगोलियन अल्ताई ही रांग आग्नेयीस औटर मंगोलियात सु. १,४५० किमी. जाते व नंतर तिच्या लहानलहान रांगा गोबी वाळवंटापर्यंत जातात. या रांगेत मुंकू खैरखान हे सु. ४,२१० मी. उंच शिखर आहे. गोबी अल्ताईच्या समांतर रांगांत इखे बोग्दो याची उंची ३,९६२ मी. आहे. अल्ताईमध्ये उत्तरेकडे चापचन-दाबान (३,२१७ मी.) व दक्षिणेकडे उलान-दाबान (२,८२७ मी.) यांसारख्या उंच व दुर्गम खिंडी आहेत.

अल्ताईच्या नैर्ऋत्येकडील रुडनी हा खनिजयुक्त भाग पूर्व पुराजीव महाकल्पात तयार झाला. ईशान्येकडील मुख्य भागात उत्तर पुराजीव महाकल्पात फार मोठ्या प्रमाणात वलीकरण झाले. या भागातील पुराजीवकालीन शैल पूर्व डेव्होनियन काळापर्यंतचे आहेत. क्षरणामुळे या भागाला अनेक वेळा स्थलीप्राय स्वरूप प्राप्त झाले आणि अनेक वेळा सागराचे आक्रमण व प्रदेशाचे पुनरुत्थान येथे घडून आले. रुडनी भागात उत्तर कार्बोनिफेरस काळातील सागरी अवशेष सापडले आहेत. तृतीय युगाच्या प्रारंभी मोठ्या प्रमाणावरील विभंगक्रियेमुळे सध्याचा अल्ताई पर्वत तयार झाला. यामुळे येथे २,३७५ मी. उंचीचे उकोक, चुया (१,८३० मी.), केंडिक्टी (२,५००), काक (२,५२०), सुऔक (२,५९०), जुबले-कुल (२,४००) यांसारखी जवळजवळ सारख्या उंचीची अत्यंत सपाट पठारे आढळतात.

अल्ताई पर्वतात ओबच्या उगमाकडील प्रवाह काटून व बिया, इर्तिशची उपनदी बुखतर्मा, औटर मंगोलियाची नदी कोबोदो या प्रमुख नद्या उगम पावतात. येथे उन्हाळ्यात वायव्येकडून व पश्चिमेकडून अटलांटिकवरून आर्द्र वारे येतात. त्यामुळे पश्चिम अल्ताई भागात मुख्यतः जुलै-ऑगस्ट महिन्यांत सु. १०० सेंमी. वृष्टी होते. वातपराङ्‌मुख बाजूची दऱ्याखोरी अगदी कोरडी असतात. आर्द्र उतारांवर हिमरेषा सु. २,४०० मी. उंचीवर असते, तर कोरड्या उतारांवर ती २,००० मी. उंचीच्याही वर असते. उंच भागात पुष्कळ हिमनद्या असल्या तरी हिमानीक्रिया झालेला प्रदेश मर्यादितच आहे. हा प्रदेश आशियाच्या मध्य भागी समुद्रापासून दूर असल्यामुळे येथील हवामान विशेषत्वाने खंडांतर्गत स्वरूपाचे, विषम आहे.

अल्ताईच्या स्टेप प्रदेशात १,००० मी. उंचीपर्यंत शेती होऊ शकते. तेथे गहू, सूर्यफूल, बीट इ. पिके होतात. २,४०० मी. उंचीपर्यंत दाट अरण्ये आहेत. त्यांत लार्च, स्टोनपाईन, फर, स्प्रूस यांसारखे सूचीपर्णी व बर्च, ॲस्पेन, डोंगरी ॲश हे पानझडी वृक्ष होतात. यापेक्षा जास्त उंचीवर खुरटी झुडपे व त्यानंतर अल्पाईन गवताची कुरणे आहेत.

या प्रदेशाला जरी ‘सुवर्णपर्वत’ म्हणून ओळखत असले, तरी येथे सुवर्ण सापडत नाही. परंतु चांदी, शिसे, जस्त, कथील, टंग्स्टन, पारा व क्वचित ठिकाणी तांबे आढळते. कुझनेट्स्क हा प्रदेश कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच स्टालीन्स्कच्या दक्षिणेला लोहधातू सापडतो. लेनिनगॉर्स्क आणि झिरियानोव्हस्क येथील चांदी, शिसे आणि जस्त यांच्या खाणी आणि छगन-उझून येथील पाऱ्याच्या खाणी विशेष प्रसिद्ध आहेत. तुर्को-अल्ताईक जमाती या प्रदेशात शिकार, गुरे पाळणे, आणि हरणे पाळणे वगैरे व्यवसाय करतात. शेतीच्या व खाणींच्या प्रदेशात लोहमार्गाचे फाटे नेलेले आहेत. डोंगराळ भागात राजरस्तेही तयार केलेले आहेत.

बुखतर्मा नदीचे खोरे मात्र अठराव्या शतकापासून रशियन शेतकऱ्यांच्या स्थलांतरामुळे भरभराटीस येत आहे. विशेषतः १८६९ नंतर सरकारच्या मदतीने या खेड्यांचा विशेष विकास झाला. उत्तरेकडील उंच दऱ्यांचा प्रदेश (सायल्येंगेम) अद्याप अविकसितच आहे. फक्त किरगीझ जमाती मेंढपाळीसाठी तेथे जातात.

अलीकडेच रशियन गिर्यारोहकांचे या पर्वतश्रेणीकडे लक्ष गेले आहे. बेलुखा शिखरावर चढण्याचा प्रयत्‍न प्रथम १९०० साली सोपाझनीकॉफ याने व नंतर १९०३ साली टर्नर या इंग्रज गिर्यारोहकाने केला. कार्ल व्हॉन लेदेबूरने एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी आणि स्वेन हेडीन, सर ऑरेल स्टाइन या दोघांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी या प्रदेशाचे समन्वेषण केले.

खातु, कृ. का.