बीवा सरोवर : जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. हे सरोवर जपानच्या होन्सू बेटावर क्योटो शहराच्या ईशान्येस सु. ९ किमी. आहे. सरोवराची कमाल दक्षिणोत्तर लांबी ६४ किमी. व पूर्व-पश्चिम रूंदी ३ ते २० किमी. असून त्याचे एकूण क्षेत्र ६७६ चौ. किमी. आहे. सरोवराच्या वायव्य भागात कमाल खोली ९५ मी. आहे. सरोवराच्या पाण्याची पातळी वसंत व शरद ऋतूंत सु. ३ मी. वाढते. ’बीवा’ नावाच्या जपानी वाद्याच्या आकारासारखे हे सरोवर असल्याने त्यास ’बीवा’ हे नाव पडले असावे.

बीवा सरोवराचा परिसर निसर्गसुंदर असून त्याच्या किनारी भागात बुद्धमंदिरे आहेत. जपानी समुद्र व जपानचा अंतर्देशीय समुद्र यांतील दुवा म्हणून या सरोवरास ऐतिहासिक महत्व आहे. मासेमारीच्या दृष्टीनेही ते उपयुक्त असून सरोवरातील ट्राउट, कार्प हे मासे किंमती मानले जातात. एका प्रकल्पाद्वारे या सरोवरातून क्योटोपर्यंत कालवा काढलेला असून तेथेच विद्युत्‍निर्मिती करून क्योटो शहरास वीजपुरवठा करण्यात येतो.

सरोवराचा निसर्गसुंदर परिसर, बुद्धमंदिरे व क्योटो या इतिहासप्रसिद्ध शहराचे सान्निध्य यांमुळे येथे पर्यटकांची गर्दी असते.

ओक, द. ह.