शूरसेन : प्राचीन भारतातील सोळा  महाजनपदांपैकी एक. हरिवंशपुराण, बृहत्‌संहिता इ. ग्रंथांमधील उल्लेखांनुसार उत्तर भारतातील विद्यमान मथुरा व त्याभोवतालचा प्रदेश म्हणजे शूरसेन किंवा सूरसेन होय. ग्रीक इतिहासकारांनी याचा उल्लेख सौरसेनोई असा केल्याचे आढळते. मथुरा (महुरा) ही त्याची राजधानी व महत्त्वाचे व्यापारकेंद्र होते. कौटिलीय अर्थशास्त्रात सुती वस्त्रांच्या व्यापाराचे केंद्र म्हणून याचा उल्लेख आढळतो. काशीहून पश्चिमी देशांना जाणाऱ्या व्यापारी मार्गावरील हे महत्त्वाचे केंद्र होते. मौर्यपूर्व काळापासून वेदविद्या, गुरुकुल पद्धती व सांस्कृतिक अभ्यास यांसाठी हे जनपद खूपच पुढारलेले असल्याचे उल्लेख शतपथ ब्राह्मण, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक इ. ग्रंथांमध्ये मिळतात.

इ. स. पू. आठव्या ते सहाव्या शतकांत याच्या पश्चिमेस मत्स्य, ईशान्येस कुरु, पूर्वेस पांचाल व दक्षिणेस मगध, चेदी ही महाजनपदे होती. यमुना, चर्मण्वती या नद्या व त्यांच्या उपनद्यांनी हा प्रदेश सुपीक व समृद्ध बनला होता. पुराणांतील उल्लेखांनुसार श्रीकृष्णाच्या आजोबाचे (वसुदेवाच्या वडिलांचे) नाव शूर अथवा `शूरसेन’ होते व तो या प्रदेशाचा राजा होता. त्यानेच या राज्याला शूरसेन हे नाव दिले असावे. महाभारत युद्धपूर्वकाळात हा प्रदेश यदुकुळाच्या ताब्यात होता. या भागातील लोकही `शूरसेन’ या नावाने ओळखले जात. भारतीय युद्धानंतर नंद राजाच्या कारकीर्दीपर्यंत यावर सु. तेवीस शूरसेनांची सत्ता होऊन गेल्याचे उल्लेख पुराणांत मिळतात. या प्रदेशातील प्राकृत भाषा `शौरसेनी’ नावाने प्रसिद्ध आहे.

पहा : मथुरा शौरसेनी भाषा. 

चौंडे, मा. ल.