नॉइब्रांडेनबुर्क : पूर्व जर्मनीतील याच नावाच्या जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या ४५,६०१ (१९७१). हे बर्लिनच्या उत्तरेस १३४ किमी. व स्ट्रालसुंडच्या दक्षिणेस ८० किमी. वर टॉलन्झ सरोवरच्या उत्तर टोकाजवळ टॉलन्झ नदीकाठी वसले आहे. हे लोहमार्ग व सडकांचे केंद्र आहे. शहराची स्थापना १२४८ मध्ये ब्रांडेनबुर्कच्या सरदाराने केली. ब्रांडेनबुर्कच्या सरदाराकडून ते मेक्लनबुर्कच्या ताब्यात १२९२ मध्ये गेले. दुसऱ्या महायुद्धात शहर मोठ्या प्रमाणात उद्‌ध्वस्त झाले होते. येथे यंत्रे, रसायने, कागद, कातडी सामान, इमारत-बांधणीचे साहित्य यांचे कारखाने आहेत. चौदाव्या शतकातील चर्च, अठराव्या शतकातील राजवाडा, नगरभवन इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत.

सावंत, प्र. रा.

Close Menu
Skip to content