व्यापारी मार्ग : व्यापाराच्या उद्देशाने वस्तूंच्या अथवा मालाच्या वाहतुकीसाठी सातत्याने वापरात असणारा मार्ग. प्राचीन काळापासून सडकांचा किंवा रस्त्यांचा, तसेच सागरी व नदीप्रवाहातील जलमार्गांचा उपयोग जगभराचे महत्त्वाकांक्षी व्यापारी व उद्योजक करीत आले आहेत. पूर्वी दूरवरच्या प्रदेशांतील लोकांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करण्याचे काम व्यापारी तांडे करीत, या तांड्यांत प्रवासीही असत. या व्यापारी तांड्यांचे मार्गही ठरलेले असत. हे मार्ग प्रामुख्याने खुश्कीचे म्हणजे जमिनीवरील होते. प्रदेश-वैशिष्ट्यांनुसार व्यापारी तांडे वाहतुकीसाठी घोडा, गाढव, उंट, लामा, बैल इत्यादींचा वापर करीत [→ व्यापारी तांडा]. जमिनीवरील मार्गांवर लुटालूट व इतर अनेक प्रकारचे अडथळे येत. त्यामुळे सागरी जलमार्गांचे शोध घेण्यास चालना मिळाली. प्राचीन काळातील फिनिशियन, ग्रीक, रोमन, तसेच मध्ययुगीन काळातील अनेक युरोपीय लोक व अरब यांनी वापरलेल्या सागरी मार्गांचा मोठा इतिहास आहे. त्यातील भौगोलिक, राजकीय व आर्थिक घटकांचा प्रभावही महत्त्वाचा आहे.

प्राचीन व मध्ययगीन व्यापारी मार्ग 

भूमध्य समुद्रातील क्रीट बेटावरील मिनोअन लोक समुद्रमार्गे ईजिप्त व ग्रीसशी व्यापार करीत (इ. स. पू. २५००–१५००). फिनिशियन व्यापारी खुश्कीच्या मार्गाने दूरवरच्या प्रदेशात व्यापारी दळणवळण करीत. प्राचीन युरोपातील अंबर मार्ग इ. स. पू. १९०० ते इ. स. पू. ३०० या काळात इटुस्कन व ग्रीक व्यापारी वाहतुकीसाठी वापरत. त्यांत चार रस्ते होते. ग्रीक सत्ताकाळात पश्चिमी देशांचे मध्य आशिया व भारताशी व्यापारी दळणवळण वाढले. रोमन राज्यकर्त्यांनी पश्चिम युरोपभर सुंदर रस्ते बांधले, तसेच पहिल्यांदाच फरसबंदी व्यापारी सडका तयार केल्या.

प्राचीन काळातील सुमेरियन लोकांचे व्यापारी तांडे पश्चिम आशियातून भूमध्य सागरी प्रदेशापर्यंत ये-जा करीत. फिनिशियन लोकांनी ईजिप्त, ग्रीस, आशिया मायनर, इटली व ब्रिटिश बेटांशी जलमार्गांनी मोठ्या प्रमाणावर व्यापार केला. आशियाई देश व युरोप यांच्यातील देवाण-घेवाण प्रामुख्याने तीन व्यापारी मार्गांनी होत असे. त्यांपैकी उत्तरेकडील मार्ग किंवा ‘बडा रेशीम रस्ता’ (ग्रेट सिल्क रूट) म्हणून ओळखला जाणारा मार्ग चीनपासून मध्य आशियामार्गे कॅस्पियन व काळ्या समुद्राकडे बिझँटिअम (सांप्रतचे इस्तंबूल) पर्यंत गेला होता. परंतु हा खुश्कीचा व्यापारी मार्ग बराच खर्चिक व धोकादायक होता. दुसरा मध्यवर्ती मार्ग पर्शियन (इराण) आखातातूनच युफ्रेटिस नदीखोऱ्यातून काळ्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत किंवा सिरियातील दमास्कस शहरापर्यंत जात असे. तिसरा दक्षिणेकडील व्यापारी मार्ग चीनपासून भारताच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तांबड्या समुद्रापर्यंत जलमार्गाने, तर तेथून पुढे नाईल नदी व उत्तर ईजिप्तपर्यंत खुश्कीच्या मार्गाने जात होता.

प्राचीन रोमन रस्ते आल्प्स पर्वत पार करून उपमार्गांनी फ्रान्स व जर्मनीपर्यंत नेण्यात आले होते. युरोपीय व्यापारी वाहतुकीसाठी पश्चिम युरोपातील सेन, र्हारईन व डॅन्यूब नद्यांचा तर पूर्व यूरोपातील व्होल्गा व डॉन नद्यांचा उपयोग करीत असत. मध्ययुगीन काळात पूर्वेकडे जाणारा एक प्रमुख व्यापारी मार्ग कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) या शहरातून जात होता. मध्ययुगात अतिपूर्वेकडील प्रदेशांतून जहाजांनी व्यापारी माल आणला जाई. त्यानंतर इटालियन गलबतांच्या ताफ्यांद्वारे हा माल स्पेन, इंग्लंड येथे व फ्लँडर्सच्या बंदरात आणला जाई. इतर व्यापारी माल इटलीमधून खुश्कीच्या मार्गाने आल्प्स पर्वत ओलांडून फ्रान्स व जर्मनीमधील र्हा ईन व डॅन्यूब नद्यांच्या काठांवरील शहरांत आणला जाई. तुर्कांनी १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल काबीज केल्यानंतर पूर्वेकडे जाणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग बंद झाले. त्यामुळे पर्यायी वाटांचा, विशेषत: सागरी मार्गांचा, शोध घेण्यास युरोपात मोठीच चालना मिळाली. कोलंबसने लावलेला अमेरिकेचा शोध, मॅगेलनची पहिली पृथ्वी-प्रदक्षिणा, जॉन कॅबटने उत्तर अटलांटिक पार करून न्यू फाउंडलंडजवळील ग्रँड बँक या जगप्रसिद्ध मत्स्यक्षेत्राचा लावलेला शोध, वास्को-द-गामाचे आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतीय भूमीवर पोचणे, युरोपियांनी उत्तर अमेरिकेत स्थापन केलेल्या वसाहती इत्यादींमुळे अटलांटिक महासागरातील व्यापारी मार्गांचा विकास होत गेला. उत्तर अटलांटिक महासागर तर आज जगातील सर्वांत गजबजलेले सागरी मार्ग-संकुल आहे.


व्यापारावरील ताबा, अधिकार व नियमनासाठी युरोपीय देशांनी व्यापारी कंपन्यांची स्थापना केली [→ ईस्ट इंडिया कंपन्या]. एकोणिसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापारात फार मोठे बदल झाले. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनात प्रचंड वाढ होऊन वाहतुकीच्या नवीन साधनांचा विकास झाला. मोठमोठे लोहमार्ग बांधण्यात आले. विसाव्या शतकात तर जागतिक दळणवळण व देवाणघेवाण प्रचंड प्रमाणात वाढत गेली. विसाव्या शतकात सर्व प्रकारचे भू-मार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग व्यापारासाठी खुले असून आंतरजालावरील (इंटरनेटवरील) व्यापाराचीही नवी वाट उपलब्ध झाली आहे.

भारतातील व्यापारी मार्ग : ख्रिस्तपूर्व पहिल्या सहस्रकात भारत व पश्चिम आशियाई प्रदेश यांच्यात व्यापारी संबंध असल्याचे पुरावे मिळतात. ऋतुनुसार विशिष्ट दिशेने नियमित वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या शोधामुळे भारत-पश्चिम आशिया यांदरम्यान अरबी समुद्रामधून व्यापारी जहाजांची ये-जा वाढली. रोमन साम्राज्य काळातही त्या प्रदेशांशी उत्तर भारताचा खुश्कीच्या मार्गाने, तर दक्षिण भारताचा सागरी मार्गाने व्यापार चालत असे. व्यापारी जहाजे प्रथम भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येत असत व तो माल भूमार्गे पूर्व किनाऱ्यावरील प्रदेशात पाठविला जात असे. तत्कालीन सागरी व्यापारी मार्ग प्रामुख्याने भारतीय बंदरांपासून पर्शियन (इराणचे) आखात व तांबड्या समुद्रापर्यंत आणि तेथून जमिनीवरून भूमध्य सागराच्या पूर्वेकडील प्रदेश व ईजिप्तपर्यंत जात असत. भारतीय व्यापारी मार्ग आग्नेय आशियातही पोचले होते. नद्यांची खोरी व मौर्यकालीन रस्ते हे भारतातील प्रमुख व्यापारी मार्ग होते. तक्षशिला-पाटलीपुत्र यांना जोडणारा व पुढे ताम्रलिप्तीपर्यंत (गंगेच्या त्रिभुज प प्रदेशातील प्रमुख बंदर) गेलेला शाही महामार्ग मौर्यांनी बांधला असल्याचे ग्रीक संदर्भांवरून आढळते. पश्चिम किनाऱ्यावरील भरुकच्छ किंवा भृगुकच्छ (सांप्रतचे भडोच) बंदर राजस्थानमार्गे व उज्जैनमार्गे गंगेच्या खोर्यारशी जोडले होते. नर्मदा खोऱ्यापासून दख्खनच्या पठाराच्या वायव्य भागाकडे व तेथून पठारावरील पूर्ववाहिनी नद्यांना अनुसरून जाणारे रस्ते काढण्यात आले होते. या मार्गांवरून बैल व गाढवांच्या तांड्यांमार्फत उन्हाळ्यात व हिवाळ्यात वाहतूक केली जाई, पावसाळ्यात वाहतूक शक्य होत नसे. जेथे शक्य आहे, तेथे सागरकिनारी किंवा नदीतून जलवाहतूक केली जात असे.

उत्तरेकडे तक्षशिलेपासून काबूल-कंदाहारपर्यंत रस्ता काढला होता आणि तेथून त्याचे फाटे विविध दिशांना गेलेले होते. पर्शिया (इराण) पासून काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील बंदरांना जोडणाऱ्या व तेथून भूमध्य सागराच्या पूर्वेकडील प्रदेशाला जोडणाऱ्या रस्त्यांना हे रस्ते जोडले होते.

चीनपासून मध्य आशियामार्गे बॅक्ट्रियापर्यंत जाणारा रस्ताच पुढे जुना रेशीम रस्ता (ओल्ड सिल्क रूट) म्हणून प्रसिद्ध झाला. या रस्त्याने कॅश्गार, यार्कंद, खोतान, कूच, काराशर व तुर्फान ही खारकच्छे जोडलेली होती. या प्रत्येक ठिकाणी व्यापारी ठाणी स्थापण्याच्या कामी भारतीय व्यापाऱ्यांचा सहभाग होता. मध्य आशियाई मार्गाने मोठ्या प्रमाणावर चिनी वस्तू भारतीय व पश्चिम आशियायी बाजारपेठांत आणल्या जात असत.

आजचे व्यापारी मार्ग : आज जगात अगणित व्यापारी मार्ग असून त्यांनी संपूर्ण जग व्यापले आहे. काही आंतरखंडीय महामार्ग व लोहमार्ग निर्माण करण्यात आले आहेत. हवाई वाहतुकीने पृथ्वीवरील दूरवरची ठिकाणे एकमेकांना जोडली गेली आहेत. जहाजांद्वारे जगातील सागरी व जलमार्ग यांनी मालवाहतूक केली जाते. उत्तर अटलांटिक महासागर, सुएझ कालवा मार्ग, केप मार्ग, पनामा कालवा मार्ग, पॅसिफिक मार्ग हे जगातील प्रमुख सागरी मार्ग आहेत.

पहा : जलवाहतूक रस्ते रेल्वे हवाई वाहतूक.

चौधरी, वसंत