आखात : समुद्राचा किनाऱ्यापासून जमिनीकडे आत घुसलेला, सामान्यत: खोल, चिंचोळा भाग. हा उपसागराच्या मानाने लहान असतो. उपसागर हा लहानसा समुद्रच असतो. तो बराचसा रुंद असतो. उदा., कच्छचे, खंबायतचे किंवा मानारचे आखात व बंगालचा उपसागर. तथापि मेक्सिकोचे आखात व फंडीचा उपसागर यांच्या बाबतीत हे अर्थ उलट झालेले दिसतात. कारण इंग्रजीतील ‘गल्फ’ (आखात) याचा अर्थ ‘समुद्राचा जमिनीत गेलेला मोठा भाग’ आणि ‘बे’ (उपसागर) याचा अर्थ ‘लहान भाग’ असा आहे. यामुळे इराणचे आखात, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेचे कार्पेंटेरियाचे आखात, गिनीचे आखात, अलास्काचे आखात, मार्ताबानचे आखात, सयामचे आखात इ. आखाते समुद्राचे विस्तृत भागच आहेत. तथापि गल्फ आणि बे यांतील हा फरकही निश्चित स्वरूपाचा दिसत नाही कारण हडसनचा उपसागर, बॅफिनचा उपसागर, बिस्केचा उपसागर हेसुद्धा समुद्राचे मोठमोठे विभागच आहेत आणि कॅलिफोर्नियाचे आखात, सुएझचे आखात, अकाबाचे आखात हे मात्र सुरुवातीस दिलेल्या ‘आखात’ याच्या अर्थाशी जुळणारे समुद्रविभाग आहेत.

भारतात कच्छच्या आखातावर गुजरातची मांडवी, कांडला व ओखा ही प्रसिद्ध बंदरे आहेत. मार्च ते ऑक्टोबर या काळात पुष्कळदा येथील पाणी कच्छच्या छोट्या रणात शिरते. खंबायतच्या आखातावर खंबायत व भावनगर ही प्रसिद्ध बंदरे असून नर्मदेच्या मुखाजवळ भडोच व तापीच्या मुखाजवळ सुरत ही प्रसिद्ध शहरे आहेत. साबरमती व मही या नद्याही याच आखाताला मिळतात. अंकलेश्वरजवळ तेल सापडले आहे व या आखातातही तेलाचे संशोधन चालू आहे. मानारच्या आखातावर तमिळनाडूची तिरुचेंडूर व तुतिकोरिन ही प्रसिद्ध बंदरे, रामेश्वरम् व धनुष्कोडी ही धार्मिक महत्त्वाची स्थळे, रामाचा सेतू, श्रीलंकेची तलाईमानार व पुट्टालम् ही बंदरे आहेत. या आखातात मोत्याचे शिंपले सापडतात. काही आखाते विशिष्ट गोष्ठींसाठी प्रसिद्ध असतात. उदा.,मेक्सिकोच्या आखाताला अमेरिकेची सर्वांत मोठी नदी मिसिसिपी मिळते व तिच्या मुखाशी न्यू ऑर्लीअन्स हे मोठे बंदर आहे. या आखातामुळे तेथून जाणाऱ्या उष्ण समुद्रप्रवाहाला ‘गल्फस्ट्रीम’ हे नाव मिळाले. माराकायव्होच्या आखातात मिळणारे तेल व्हेनेझुएलाची प्रमुख निर्यात आहे. गिनीच्या आखातावर आयव्हरी कोस्टपासून गाबाँपर्यंत आठ देश असून ॲक्रा व लागोस ही प्रसिद्ध बंदरे आहेत. सुएझच्या आखातापासून सुएझ कालव्याने भूमध्य समुद्रात जाता येते. इराणचे आखात इराण, इराक, कुवेत, कॉटार इ. तेलसंपन्न प्रदेशांनी वेढलेले आहे. फिनलंजवडळील बॉथनियाचे आखात सर्वांत कमी क्षारतेच्या (२ ‰) पाण्याबद्दल प्रसिद्ध आहे, तर अकाबाचे आखात अरब व इझ्राएल यांचे संघर्षक्षेत्र बनले आहे.

कुमठेकर, ज. व.