इद्रीसी, अल् : (१०९९/११००–११६६?). प्रसिद्ध अरबी भूगोलज्ञ, प्रवासी आणि कवी. जन्म मोरोक्कोच्या उत्तर किनाऱ्यावरील स्पेनच्या ताब्यातील स्यूता या शहरी झाला. मोरोक्कोचा सुलतान इद्रीसी (पैगंबराचा जावई अली याचा नातू) आणि स्पेनमधील मालागा राज्याची राजकन्या हमूदबानू यांचा वंशज म्हणून याला शरीफ म्हणत. याचे संपूर्ण नाव अबू अब्दुल्ला मुहंमद इब्‍न मुहंमद अश्शरीफ अल् इद्रीसी असे होते. स्पेनमधील कॉर्दोव्हाच्या अरब विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्याने स्पेन, आफ्रिका आणि आशिया येथील प्रदेशांत खूप प्रवास केला. ११३९ मध्ये सिसिलीचा राजा रॉजर याने त्याचा मानसन्मान करून आपल्या दरबारात ठेवले व त्याला तत्कालीन ज्ञात पृथ्वीचे वर्णन लिहिण्यास सांगितले. अचूक माहिती लिहिण्याकरिता इद्रीसीने देशोदेशी माणसे पाठवून माहिती जमा केली टॉलेमी, ओरोझिअस, अल् मसूदी वगैरे ग्रीक व अरब विद्वानांची लिखाणे व प्रवासवर्णने अभ्यासिली व ११५४ मध्ये त्याने नुजहत अल् मुश्ताक फिक्तिराक अल् आफ्ताक् (जगाचे विभाग पादाक्रांत करू इच्छिणाऱ्याचा आनंद) या नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला किताब रूजार (रॉजरचे पुस्तक) असेही नाव आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडील थंड निर्मनुष्य प्रदेशापर्यंत जगाची हवामानाप्रमाणे सात भागांत ग्रीकांनी विभागणी केली होती. त्यांची कल्पना इद्रीसीने घेऊन आपल्या पुस्तकाची सात भागांत विभागणी करून प्रत्येक भागाचे वर्णन केले आहे. प्रत्येक हवामानाचा विभाग त्याने दक्षिणोत्तर दहा रेघांनी विभागून त्याप्रमाणे जगाचे नकाशे काढले आहेत. अर्थात त्यावेळच्या उपलब्ध असलेल्या अपुऱ्या साधनांमुळे त्याच्या पुस्तकात बऱ्याच चुका आढळतात. लेखनाची घाईगर्दी झालेली प्रत्ययास येते. ऐकीव कथा घेतलेल्या दिसून येतात. माहितीच्या व गणितीय चुका तर असंख्य आहेत. त्याच्या माहितीतील प्रदेश नकाशांत ठळकपणे दिल्याने नकाशांचे प्रमाण बिघडले आहे. त्याच्या पुस्तकातील गावांची नावे प्रचलित स्वरूपात दिल्याने शोधून काढणे अवघड जाते. त्याने सिसिलीचे वर्णन सर्वांत जास्त दिले आहे. फ्रान्सची थोडीबहुत माहिती तो देतो. आयर्लंडचे वर्णन देतो पण ब्रिटनचा लंडनपलीकडचा भाग त्याला फारसा माहित नसावा असे दिसते. टेम्सशिवाय एकही ब्रिटीश नदी त्याला माहीत नाही. अटलांटिक महासागरातील एकदोन बेटांचा तो उल्लेख करतो व उत्तर आफ्रिकेचे वर्णन देतो. आफ्रिका खंडाचा विस्तार पूर्वेला असावा व हिंदी महासागरापर्यंत दक्षिणेची सीमा असावी या टॉलेमीच्या कल्पनेप्रमाणे इद्रीसीची कल्पना होती. हे पुस्तक त्याच्या चाहत्यानी पुढे १५९२ मध्ये रोमला छापून घेतले. त्याचे लॅटिन भाषांतर १६१९ मध्ये झाले. या पुस्तकाशिवाय इद्रीसीने रॉजरकरिता चांदीचा पृथ्वीचा गोल व तारामंडळ बनवून घेतले. यावरून पृथ्वी गोल असल्याची त्याची कल्पना स्पष्ट होते. याव्यतिरिक्त त्याने लिहिलेल्या कविता तसेच वनस्पतीशास्त्र व वैद्यकशास्त्र ह्यांवर लिहिलेली बाडे इस्तंबूलच्या संग्रहालयात जपून ठेवलेली आहेत. ११६१ मध्ये सिसिलीत झालेल्या मुसलमानविरोधी बंडाळीनंतर तो तेथे राहिला नसावा. परंतु तो कोठे गेला व केव्हा मरण पावला याची निश्चित माहिती मिळत नाही.

शाह, र. रू.