फ्रान्स :  रिप ‌ ब्लिका फ्रांकेसी .  प ‌‌ श्चि म यूरोपातील एक अग्रगण्य प्रजासत्ताक देश .  लोकसंख्या ५ , ३१ , ९६ , ०००  ( १९७८ अंदाज ).  क्षेत्रफळ ५ , ४७ , ०२६ चौ . किमी .  यूरोपात क्षेत्रफळाच्या दृ ष्टीने यूरोपीय रशि याच्या खालोखाल याचा क्रमांक लागतो .  ४२० २०’ उ .  ते ५१० ५’ उ .  अक्षांश आणि ८० १० ‘  पू .  ते ५० ५५ ‘  प .  रेखांश यांदरम्यान फ्रान्सचा विस्तार आहे .  देशा च्या उत्तरेस इंग् लि श खडी ईशान्येस बेल्जियम ,  ल क्सें बर्ग व प . जमनी  पूर्वेस स्वित्झर्लंड ,  आग्नेयीस इटली व भूमध्य समुद्र  दक्षि णेस भूमध्य समुद्र व स्पेन आणि पश्चि मेला  अ टलांटिक महासागर  ( बि ‌ स्के उपसागर )  आहे .  भूमध्य समुद्रातील इटलीच्या पश्चि मेस व सार्डिनियाच्या उत्तरेस आणि फ्रान्सपासून १६० किमी .  असलेल्या कॉर्सिका बेटाचा  ( क्षेत्र .  ७ , ८२२ चौ .  किमी .)  समावेशही फ्रान्समध्येच होतो .  याशिवाय मार्तीनीक ,  ग्वादलूप ,  रेयून्यों ,  फ्रेंच गियाना हे त्याचे सागरपार विभाग  ( डिपार्टमेंट )  होत .  फ्रेंच पॉलिनीशिया ,  न्यू कॅलेडोनिया ,  सेट पीएर आणि मिकलॉन तसेच वालिस व फूटूना बेटे यांचा फ्रान्सच्या सागरपार प्रांतांत समावेश होतो .  यांशिवाय न्यू हेब्रिडीझ बेटांवर फ्रान्स व ग्रेट ब्रिटन यांचा २९ जुलै १९८० पर्यंत संयुक्त अंमल होता .  २९ जुलै १९८० च्या मध्यरात्री  ‘ व्हानू – आटू प्रजासत्ताक ’  या नावाने ही बेटे स्वतंत्र झाली .  पॅरीस ही देशाची राजधानी  ( लोक ,  २३ , १७ , २२७ – १९७५ )  होय .

  भूवर्णन :  फ्रान्समधील भूप्रदेशाची निर्मिती आ र्मो रि ‌ कन ,  ह र्सी नि ‌ यन व अल्पा इ न या पर्वतनिर्मि तीच्या काळांत झाली .  या देशाच्या भूप्रदेशाची घडण होत असताना प्रथम कठीण खडकांचे उंचवट्या चे प्रदेश निर्माण झाले . देशाच्या मध्यवर्ती असलेला उंचवट्या चा प्रदेश हे या निर्मितीचे केंद्रस्थान आहे .  अल्पाइन काळात या भागात भूरचनात्मक बऱ्याच घडामोडी झाल्या .  या काळातच टणक ,  मजबूत अशा मध्यवर्ती उंचवट्याच्या पूर्वेस आल्प्स जुरा आणि दक्षि णेस पिरेनीज पर्वत निर्माण झाले .  या पर्वतनिर्मितीच्या काळात मध्यवर्ती पठाराची उंचीही वाढत गेली .  याच वेळी लाव्हारसाचे भू पृष्ठावर थराव र थर साचत गेले .  या सर्व घडामोडींमुळे पॅरिस व ॲक्वि टेन खोऱ्‍यांचा पूर्वी समुद्राच्या पाण्याखाली असणारा भाग उंचावला जाऊन जमीन निर्माण झाली .  नंतरच्या काळात नद्यांच्या व सागरी लाटांच्या भरण – क्षरण कार्यामुळे या प्रदेशाच्या स्वरुपात  ‌ बदल घडून ऱ्‍ होन नदीचा त्रिभुज प्रदेश ,  लँड प्रांतातील समुद्राकाठचे मैदान ,  ईशान्येकडील ५० हजार चौ .  किमी .  पेक्षा मोठा असलेला लोएस मातीचा सखल प्रदेश व उत्तरेस इंग्लिश खाडीच्या काठचा भाग इत्यादींची निमीती झाली .

फ्रान्सचा ६२ %  भुप्रदेश स .  स .  पासून २५० मी . पर्यंत उंच आहे  तर फक्त ७ %  प्रदेशच १ , ००६ मी .  पेक्षा अधिक उंच आहे . भूरचनेच्या दृष्टीने फ्रान्सचे तीन प्रमुख विभाग पडतात  :  ( १ )  पर्वतीय प्रदेश , ( २ )  प्राचीन पठारी प्रदेश,  ( ३ )  सखल मैदानी प्रदेश .

( १ )  पर्वतीय प्रदेश : देशाच्या दक्षि ण –  मध्य भागांत मासीफ सेंट्रल ,  वायव्य भागात आर्मोरिकन मासीफ आणि सरह द्दीं च्या भागात  पि रेनीज  ( दक्षि ण सीमा )  आल्प्स ,  जुरा , व्होज , आर्देन  ( आग्नेय , पूर्व व उत्तर सीमा )  इ .  उंचवट्याचे प्रदेश आहेत . यांपैकी  पिरेनिज आणि आल्प्स या दोनच मोठ्या व उंच  पर्वतरांगा  आहेत. पिरेनीज पर्वतरांग फ्रान्स व स्पेन यांच्या स रहद्दी व र असून उंच ,  अवघड व तुरळक खिंडींची आहे . आग्नेयीकडील आल्प्स पर्वतरांग इटली तसेच स्वित्झर्लंड यांच्या सरह द्दीं वरुन उत्तरेस जिनीव्हा सरोवरापर्यंत व पुढे प ‌ श्चि मेस ऱ्‍हो न नदीपर्यंत पसरली आहे .  या पर्वतरांगेतील दऱ्या हिमनद्यांमुळे रुंद व खोलवर झिजलेल्या आढळतात .  प श्चि म यूरोपातील सवोच्च शि ‌ खर माँ ब्ला  ( ४ , ८१० मी .)  हे याच पर्वतरांगेत आहे .  पिरेनीज पर्वतरांगेतील खिंडींच्या तुलनेने पर्वतरांगेत खिंडींची संख्या जास्त असून त्या अधिक सुगम आहे त .  खनिज साठ्या च्या दृ ष्टीने या पर्वतरांगा महत्त्वाच्या नसल्या ,  तरी त्यांची उंची व भरपू र पा ऊ स यांमुळे जलविद्युत् निर्मितीसाठी त्याचा  ( विशेषतः आल्प्स पर्वतरांग )  फार उपयोग होतो .  याशिवाय दऱ्याखोऱ्यांतील जंगले व कुरणे यांचाही देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे .

( २ )  प्राचीन पठारी प्रदेश : मासीफ सेंट्रल हे पठार देशाच्या दक्षिण भा गात आहे ,  फ्रान्सच्या प्राकृतिक घडणीच्या बाबतीत हा प्रदेश केंद्रीभूत होता .  उत्तरेस ल्वार न दी ,  पूर्वेस ऱ्‍होन नदी , दक्षिण व पश्चिमेस गारॉन नदी व बिस्के उपसागर यां दरम्यान हा पठारी प्रदेश आहे .  याची निर्मिती आल्प्सप्रमाणेच भूपृष्ठाला वळ्या पडून झाली असून येथील कठीण खडकांमुळे त्याला भेगा पडून त्यांतून लाव्हारस बाहेर पडला व त्याचे पृष्ठभागावर थर साचले .  या पठारावरील प्राचीन कठीण खडकांत काही ठिकाणी कोळशाचे साठे सापडतात .  पठाराच्या आग्नेय सीमेवर सेव्हेन डोंगररांगेत काही मृत ज्वालामुखी शिखरे आहेत .  या उंच पठारी प्रदेशाच्या दोन शाखा एकमेकींना काटकोन करून पसरलेल्या आहेत .  त्यांपैकी आर्मो रिकन मासीफ म्हणून ओळखली जाणरी एक शाखा ल्वार प्रांतातून वायव्येस नॉर्मंडी व ब्रिटनी पठारांकडे जाते .  दुसरी हर्सीनियन शाखा ईशान्येस व्होज प्रदेशातून हॅन्सरुक व आर्देन पर्वतांत विलीन होते .  या दोन शाखांद रम्या नचा प्रदेश इंग्रजी  ‘ व्ही ’  अ क्षरा सारखा बनला आहे .  प्रदेशातच पॅरिसची द्रोणी आहे .  व्होज डोंगरारांगेमुळे ऱ्‍हा ईनचे खोरे मात्र फ्रान्सच्या इतर भागांपासून वेगळे झाले आहे .

( ३ )  मैदानी प्रदेश : उत्तरेकडील पॅरिस द्रोणी , नैर्ऋ त्य भागातील ॲ ‌ क्वीटेन खोरे आणि आग्नेय कोप ऱ्‍या तील ऱ्‍होन – सोन नद्यांच्या खोऱ्यांतील छोटी मैदाने हे फ्रान्समधील प्रमुख सखल प्रदेश होत .  पॅरिसची द्रोणी चुनखडक , वालुकाश्म ,  शेल यांसारख्या स्तरित खडकांची बनली असून या सर्व खडकांचा उतार मध्यभागाकडे असल्याने त्याला द्रोणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे .  खडकरचना एकावर एक ठेवलेल्या बशांप्रमाणे आहे .  द्रोणीचा मध्यभाग अर्वाचीन खडकांचा ,  तर कडा जुन्या खडकांची ,  गोलाकार कटकांची  ( रिज् ‌ )  बनलेली आहे .  फ्रान्सचा हा प्रदेश पूर्वीपासून सर्व बाबतींत आघाडीवर राहिला आहे .

ॲक्वि ‌ टेन खोरे पिरेनीजच्या पायथ्याशी असून या खोऱ्यातील मृदा सर्वसाधारण सुपीक आहे .  याच भागातील लोअर गारॉन नदीच्या नै ऋ त्येकडील त्रिको नी प्रदेशात मात्र त्यामानाने कमी सुपीक व वाळुमिश्रित मृदा आढळते . त्यामुळे या प्रदेशात बऱ्याच भागांत सूचिपर्णी वृक्षां ची जंगले लावण्यात आली आहेत .  या प्राकृतिक विभागांशिवाय ब्रिटनी ,  रिव्हिएरा  ( फ्रान्सचा आग्नेय किनारी प्रदेश ),  ॲल्सेस – लॉरेन ,  लील इ .  प्रदेशही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत .

फ्रान्सच्या उत्तर ,  पश्चिम व आग्नेय दिशांना विस्तृत सागरी किनारा लाभला आहे .  ह्या किनारपट्टीला लागूनच देशतील काही उंचवट्यांचे प्रदेश आढळून येतात .  इंग्लिश खाडीच्या किना ऱ्‍या जवळ आर् ‌ त्वा हा टेकड्यांचा प्रदेश असून या किनाऱ्यावर वाळूच्या टेकड्याची आढळतात .  पश्चिम किनाऱ्यालगतच पूर्व नॉर्मंडी व पिकार्डी या खडूच्या पठारांचा प्रदेश आहे .  त्यांतील पांढऱ्या खडूचे कडे शोभिवंत दिसतात .  देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आग्नेय किनारा  ( भूमध्य समुद्र )  महत्त्वाचा समजला जातो .  हाच प्रदेश  ‘ रिव्हिएरा ’  म्हणून विख्यात आहे .  यालाच फ्रान्समध्ये  ‘ कोत दाझूर ’  म्हण्तात .  हा प्रदेश श्रीमंतांचे आणि हौशी प्रवाशांचे नंदनवन समजला जातो .  यातील कॅन व नीस ही शहरे विशेष प्रसिद्ध आहेत .


 नद्या : ल्वार ,  सेन ,  गारॉन व ऱ्‍होन या देशातील प्रमुख नद्या होत .  ल्वार ही सर्वांत लांब नदी  ( १ , ०२० किमी .)  असून ती मासीफ सेंट्रल डोंगररांगेत उगम पावते .  प्रथम ती दक्षिणोत्तर वाहत जाऊन पॅरिस द्रोणीच्या दक्षिण भागातून पुढे पश्चिमवाहिनी बनून नॅंट् ‌ सजवळ अटलांटिक महासागराला मिळते .  हिचा प्रवाह अनियमित आणि कमीजास्त उताराचा असून तिला वारंवार पूर येतात .  शिवाय वाळूच्या संचयनामुळे तिचा नौवहनासाठी उपयोग होत नाही .  सेन नही पॅरिस द्रोणीच्या  आ ग्नेय भागात लॅंग्रा पठारातून उगम पावून आग्नेय – वायव्य दिशेने पॅरिसच्या द्रोणीतून वाहत जाऊन ल हाव्रजवळ अटलांटिक महासागराला  ( इंग्लिश खाडीमध्ये )  मिळते .  ही नदी नौवहनास योग्य असल्याने व इतर नद्यांशी कालव्यांनी जोडलेली असल्याने वाहतुकीसाठी तिचा वर्षभर उपयोग होतो .  गारॉन नदी पिरेनीज पर्वतात उगम पावून ॲक्वी ‌ टेन खोऱ्यातून वाहत जाऊन पुढे बॉर्दो शहराजवळ अटलांटिक महासागराला मिळते .  या नदीलाही वारंवार पूर येतात .  ऱ्‍होन नदी स्वित्झर्लंडमध्ये उगम पावून जिनीव्हा सरोवरातून बाहेर पडल्यावर दक्षिणवाहिनी बनते  आणि फ्रान्सच्या आग्नेय भागातून पुढे दक्षिणेस मार्से शहराजवळ भूम ध्य समुद्रास मिळते .  सोन ही तिची प्रमुख उपनदी .  ऱ्‍होन अत्यंत अवखळ व शीघ्रवाही असल्याने तिचा नौवहनासाठी उपयोग होत नाही .  परंतु जलविद्युत् निर्मितीच्या दृष्टीने ती अत्यंत उपयुक्त आहे .  देशाच्या पूर्व व ईशान्य सरहद्दींवरून ऱ्‍हाईन नदी वाहते .  या प्रमुख नद्यांशिवाय आल्वे, दॉरदॉन्यू ,  लॉट ,  टॉर्न ,  म्यूज ,  मोझेल इ .  नद्याही महत्त्वाच्या आहेत .  फ्रान्समधील बहुतेक नद्या एकमेकींशी व विशेषतः ऱ्‍हाईन नदीशी कालव्यांनी जोडलेल्या असल्याने ,  देशाच्या पूर्व भागात कालव्यां चे जाळे पसरले आहे .  अंतर्गत जलवाहतुकीचा प्रदेश म्हणून हा भाग यूरोपात प्रसिद्ध आहे .  देशाच्या पूर्व सरहद्दीवर जिनीव्हा हे सरोवर आहे .

  हवामान : हा देश उत्तर धुववृत्त आणि कर्कवृत्त यांदरम्यानच्या मध्य अक्षवृत्तां वर असल्याने येथील हवामान सर्वसामान्यतः सौम्य असते .  पश्चिमेस सागरप्रदेश ,  पूर्वेस भूखंड व दक्षिणेस भूमध्य समुद्र यांमुळे तीनही  ( सागरी , खंडीय व भूमध्ये सामुद्रिक )  प्रकारचे हवामान येथे आढळते .  हिवाळ्यात अटलांटिक महासागरावरून उबदार व दमट ,  तर उन्हाळ्यात थंड वारे वाहतात .  त्यामुळे देशाच्या प श्चि मेकडील मैदानी प्रदेशातील हवामान सम आहे . मध्यवर्ती पठार आणि आल्स्प पर्वतरांग यांच्या अडथळ्यांमुळे भूमध्य सामु ‌ द्रिक हवामानाचा परिणाम दक्षि ण भागापुरताच मर्यादीत राहतो .  फ्रान्सच्या पूर्व भागातील हवामान प श्चि म भागाकडील हावामानापेक्षा अधि ‌ क थंड आणि ‌  विषम असते .

देशाच्या प श्चि मेकडील प्रदेशात सागरी वाऱ्यांचा परिणाम विशेषत्वाने जाणवतो .  या भागातील तपमानात समुद्रसान्नीध्यामुळे फारसा फरक पडत नाही .  उन्हाळे थंड तर हिवाळे  सौम्य असतात .  ब्रे स्त येथे जानेवारीतील सरासरी तपमान ७० से .  असते ,  तर जुलैमध्ये ते १७० से . पर्यंत जाते .  या भागात दहि ‌ वर पडत नसले ,  तरी पा ऊ स मात्र वर्षातून सु .  २००  ‌ दि ‌ वस पडतो .  बऱ्याच वेळा आकाश मे घाच्छादित असते .  परंतु हिमतुषार किंवा वृष्टी  ‌ क्वचितच होते .  वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८४ सेंमी .  आहे .

पूर्वेकडून येणाऱ्या खं डीय वाऱ्यांमुळे मात्र देशाचे हवामान ,  विशेषतः मध्य आणि ‌  पूर्व भागांत ,  साधारणतः कोरडे आढळते .  ऱ्‍ हाईन नदी काठावरील स्ट्रॅस्‌ बर्गचे हिवाळ्यातील तपमान  ( जानेवारीत ) – १० से .  असते . हिवाळ्यातील सु .  ८० दिवस या प्रदेशतील तपमान गोठणबिंदूच्याही खाली असते .  याउलट उन्हाळ्यात मात्र तपमान खूपच वाढते .  जुलैमध्ये ते १९० से . पर्यंत जाते .  याच कालावधीत येथे वादळी स्वरूपाचा  ( आवर्त )  पा ऊ स पडतो .

द .  फ्रान्समध्ये मात्र भूमध्य सामुद्रिक हवामानाचा परिणाम किनाऱ्यापासू न सु .  १६० किमी . पर्यंत आढळतो .  येथील पर्वतरांगांमुळे हिवाळ्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे किनारपट्टीतील मैदानांपर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणूनच हिवाळा सौम्य असून सरासरी तापमान ७० से .  असते .  उन्हा ळा मात्र बराच  ‌ तीव्र असून तापमान २२० से .  असते .  त्यावेळी आकाश निरभ्र असून स्वच्छ सूर्यप्रकाश असतो .  ॲक्वि टेन खोऱ्यातील हवामानही जवळजवळ भूमध्य सामुद्रिक हवामानाप्रमाणेच असते .  येथील हिवाळे सौम्य व उन्हाळे कडक असतात .  पाऊस वर्ष भर व जास्त प्रमाणात पडतो .  या प्रदेशाप्रमाणेच पॅरिस द्रोणीचे हवामानही सागरी – खंडीय अशा प्रकारचे आहे . पॅरिसचे वार्षि क सरासरी तपमान १२० से .  असते .  तपमानाप्रमाणेच पर्जन्यही बेताचाच  ( ६२ सें मी . )  पडतो .  देशातील पर्वतशि ‌ खरे वर्ष भर हिमाच्छादि ‌ त असतात .  फ्रान्समधील हवामान वनस्पती ,  पिके आणि प्राणी यांच्या वाढीस अनुकूल आहे .  काही अपवा द वगळता येथील हवामान मनुष्यास बौ द्धि क आणि शारी रि क दृ ष्ट्या कार्यप्रवण करणारे आहे .

वनस्पती व प्राणी :  येथील नैसर्गि क वन संप त्ती व प्राणि ‌ जीवन हवामानानुसार वेगळेवेगळ्या प्रकारचे आढळून येते .  उत्तर आणि ‌  मध्य फ्रान्समधील पर्वतीय प्रदेशां त ओक ,  बीच यांची अरण्ये असून पाइन बर्च ,  पॉप्ल र , बिलो इ.  वृक्षही आढळतात .  मासीफ सेंट्रलमध्ये चेस्टनट ,  बीच तर उप – अल्पाइन विभागात  ‌  जूनि ‌ पर ,  ड्‌ वार्फ पाइन इ .  वृक्षप्रकार अधिक आहेत .  दक्षिणेकडे पाइन वृक्षांची अरण्ये असून ओकचेही काही प्रकार आढळतात . भूमध्य समुद्राच्या बाजूस ऑलिव्ह ,  मलबेरा ,  अंजीर इ .  वनस्पती आहेत .  डोंगर – उतारांवर वनरेषेच्या वरच्या भागात मेंढ्यां साठी व गुरांसाठी राखीव  ‌ कुरणे आहेत .  देशातील सखल भाग मात्र जास्तीत जास्त शेतीसाठी वापरण्यात येत असून निकृष्ट जमिनीच्या भागातच फक्त जंगलवाढ करण्यात आली आहे .  भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर मात्र विविध प्रकारच्या वनस्पती दृ ष्टीस पडतात .  त्यांपैकी ऑलिव्ह ,  कॉर्क ओ ‌ क आणि ‌  ॲलेप्पो पाइन इ .  वनस्पती प्रमुख आहेत .

देशाच्या विवि ‌ ध भागांत प्राणि जीवनही विवि ध प्रकारचे आहे .  पिरेनीज व आल्प्स पर्वतरांगा तपकिरी अस्वल ,  शॅमॉय ,  मार्मोंट ,  अल्पाइन ससा इ .  प्राण्यांमध्ये पोलकॅट ,  मार्टेन ,  रानडुक्कर आणि अनेक प्रकारची हरणे आढळतात .  साळिंदर ,  चिचुंद्री ,  वीझल ,  वटवाघूळ ,  खार ,  बिजू ,  ससा ,  उंदीर ,  उद मांजर ,  बीव्हर इ .  प्राणी सर्वत्र आढळतात .

पक्ष्यांपैकी वॉर्ब्‌लर ,  कस्तूर ,  मॅग् ‌ पाय ,  तीसा आणि गल  ( कुरव )  हे पक्षी सर्वत्र दिसून येतात .  ॲल्सेस – लॉरेन प्रदेशात बलाक तर गरुड आणि ससाणा हे पर्वतीय प्रदेशात आढळतात .  भूमध्य सागरी प्रदेशात फ्लेमिंगो , कुररी ,  बटिंग ,  बक ,  बगळा  तर दक्षिणेकडील इतर भागांत प्रामुख्याने फेझंट ,  तितर दिसतात .  नद्या व सागरी भागांत पाइक ,  पर्च ,  कार्प ,  रोश ,  सामन ,  ट्राउट ,  कोळंबी ,  क्रे – फिश इ .  प्रकारचे मासे सापडतात .

प्रादेशिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये  : एक म्हणजे  ‘ पेई ’  या नावाने प्रसिद्ध असलेले फ्रान्समधील छोटे परिसर किंवा प्रदेश .  फ्रेंच लोकांना या निकटच्या परिसराबद्दल देशइतकेच प्रेम वाटते ,  त्याबद्दल लळा असतो .  पेई म्हणजे फ्रेंचांची अन्नदात्री भूमी .  अनेक शतकांचे सांस्कृतिक संस्कार तिच्याशी निगडित असतात .  अनेक निकटच्या पेई एकत्र येऊनच फ्रान्समध्ये अनेक भौगालिक प्रदेश बनलेले आहेत .

दुसरे म्हणजे फ्रान्समधील प्रत्येक प्रदेशाचे काहीएक खास वैशिष्ट्य दिसून येते .  उदा ., ‘ ब्रिटनी ’  हा प्रदेश मासेमारीसाठी ,  तर  ‘ रिव्हिएरा ’  हा प्रदेश श्रीमंतांचे व हौशी पर्यटकांचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे .  ॲल्सेस – लॉरेनचा प्रदेश म्हणजे फ्रान्स – जर्मनीमधील एकेकाळची रणभूमी ,  तर लील हा औद्योगिक विकासाचा पट्टा होय .  पॅरिस व पॅरिसची द्रोणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजकीय ,  कालवा ङ् मयीन ,  सांस्कृतिक स्वरुपाचे केंद्र मानली जाते .  संबंध देशांवर सर्वच बाबतींत पॅरिसची जी दृढ पकड आहे ,  तिच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न फ्रान्समधील प्रत्येक प्रदेश करीत असतो .  फ्रान्सच्या भौगोलिक – सांस्कृतिक जीवनाचे रहस्य पॅरिस व इतर प्रदेश यांच्यातील द्वंद्वात्मक संबंधात आहे .  पॅरिसची  अ भिकेंद्रीय ओढ व अन्य प्रदेशांची अपकें द्रीय प्रवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण द्वंद्व अनेक भूगोलवेत्त्यां ना एक प्रकारचे आव्हानच ठरले आहे .


फ्रान्समध्ये पॅरिस आणि इतर प्रदेश यांच्यामध्ये तीव्र असा असमतोल दिसून येतो .  आर्थिक दृष्टीने पाहता उत्तरपूर्व प्रदेश बरेच संपन्न आहेत ,  तर मध्य भागातील व पश्चिम किनारी प्रदेश मागासलेले दिसून येतात .  १९४७ साली फ्रान्समधील प्रादेशिक नियोजनाचे अनेक पर्याय भूगोलवेत्ते ,  अर्थशा स्त्रज्ञ ,  प्रादेशिक नियोजनाचे तज्ञ व शासकीय अधिकारी यांनी तयार केले. फ्रान्सच्या सहाव्या राष्ट्रीय योजनेत आठ नियोजन – प्रदेश अंतर्भू त आहेत . तथापि फ्रान्समधील शासकीय विभाग  ( डिपार्टमेंट )  व संकल्पित नियोजन विभाग यांच्यात संघर्षच दिसून येतो .  पॅरिसची वाढ रोखण्यासाठी सेन नदीच्या दोन्ही काठांवर दोन मोठे आणि विस्तृत असे नगरपट्टे बसविण्याचा प्रयत्न जारी आहे .  यांत नवीन उद्योगधंदे व शहरे यांच्या वाढीस उत्तेजन देण्यात येत आहे .

देशपांडे, चं. धुं. फडके, वि. शं.

इतिहास : आद्य अश्मयुगीन काळातील म्हणजे सु .  पाच लाख वर्षापू र्वीच्या फ्रान्सविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही  तथापि आधुनिक फ्रान्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भूप्रदेशात पू र्व  पुराणा श्मयुगात  ( सु .  पाच लाख ते दीड लाख वर्षापू र्वींचा कालखंड )  मानवी वस्ती होती ,  असे द .  फ्रा न्समधील व्हॉलोनत गुहेतील दगड – गोटे व गारगोटींची हत्यारे यांच्या अवशेषांवरून दिसून येते .  विसाव्या शतकात फ्रान्समध्ये विस्तृत प्रमाणात पुरातत्त्वी य उत्खनने झाली .  त्यांत शा रें त भागातील फॉन्तेशेव्हेद या स्थळी इ.स.पू. ५०००० वर्षांपूर्वीच्या  होमो सॅपियन मानवाचे अवशेष त्याच्या गारगोटींच्या हत्यारांसह उपलब्ध झाले .  त्यानंतर ले मूस्त्ये येथील गुहेत इ . स . पू .  ५५००० ते ३०००० या दरम्यान वावरणाऱ्या निअँडरथल मानवाचे अवशेष मिळाले .  या काळात मृतांना पुरत असल्याचा पुरावा मिळाला आहे .  त्यानंतरच्या शा तेलपेरॉनियन  ( इ . स . पू .  ३५००० – २५००० ),  ऑरिग्नेशियन ( इ . स . पू .  ३५००० – २५००० )  व मॅग्डेलियन  ( इ . स . पू .  २०००० – ८००० )  या कालखंडां तील मानव ला फेरासी येथील गुहेत आढळलेल्या कलाकुसरीवरून अधिक प्रगत अवस्थेत असल्याचे दिसले .  यानंतरच्या काळातील फाँ – द – गोम , ले कोंबारेल .  लॅस्को इ .  गुहांतील आदिम चित्रकला अधिक कलात्मक आढळते .  त्या गुहांतून सु .  पंधरा हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीच्या आंतराश्मयुगात अन्नसंकलन ,  शिकार व मच्छीमारी करणा रे भटके लोक फ्रान्समध्ये असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत .  नवाश्मयुगातील  ( इ . स . पू .  ८००० ते इ . स . पू .  २००० )  मानव शेती आणि पशुपालन करीत असावा .  या काळातील मेनहिर  ( वीरगळ ),  डॉलमेन ,  पूर्वा श्मकालीन कबरी इ .  सर्वत्र आढळतात .  लोहयुगात फ्रान्समध्ये इ . स . पू .  आठव्या श त कात धातूचा वापर सु रू झाला .  याच काळा त यूरोपवर परकीयांची आक्रमणे झाली आणि हालश्टाट संस्कृतीचा उदय झाला .  तिने फ्रान्सचा सु . तीन – चतुर्थांश प्रदेश व्यापला .  या काळातील ब्राँ झच्या चौकोनी कु ऱ्‍हा डी तत्कालीन पशुपालक व सैनिक वापरत असावेत .  आशिया मायनरच्या आयोनीय ,  ग्रीक इ .  साहसी दर्यावर्दीच्या वृत्तां तां तून इ . स . पू .  सातव्या शतकातील काही वसाहतींचा उल्लेख आढळतो .  त्यांपैकी मार्से ही वसाहत प्रमुख असून इतर काही लहान वसाहतीही होत्या .

पश्चिम आशिया मायनरमधील ग्रीक लोकांनी मार्से येथे इ . स . पू .  ६०० च्या सुमारास वसाहत स्थापिली .  ती फ्रान्स या नावाने पुढे ओळखल्या जाणा ऱ्या देशाच्या इतिहासाची पहिली निश्चित तारीख होय .  या प्र देशाच्या लोकांपैकी बहुसंख्य लोक केल्ट  ( सेल्ट )  होते .  या लोकांना ⇨ गॉल म्हणत .  त्यांनी वांशिक नाती सांभाळली होती, तरी त्यांचे अनेक लोकगट झाले व त्यांमध्ये कधीही राजकीय ऐक्य नांदू शकले नाही .  ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात रोमन लोकांनी या प्रदेशाचा रोमन प्रांत बनविला .  पुढे जर् ‌ मॅनिक टोळ्यांनी आक्रमण केले .  त्यापासून रोमन सैन्यानेच गॉलचे रक्षण केले .  ⇨  ज्यूलिअस सीझर  ( इ . स . पू .  १०२ – ४४ )  याने गॉल लोकांवर विजय मिळविला ( इ . स . पू .  ५८ – ५१ ).  जर्‌ मॅनिक प्रदेशात शिरून रोमन लोकांनी आपली सत्ता एल्ब नदीपर्यंत नेलेली होती  परंतु तिसऱ्या शतकात रोमन लोकांना ऱ्‍हा ईन नदीपर्यंत मागे यावे लागले .

पुढे रानटी टोळ्यांनी गॉलवर हल्ले केले  परंतु त्यांना रोमन सत्तेबद्दल आदर होता व त्यांच्या अस्तित्वाला रोमची संमती घेत असत .  गॉलच्या लोकांनी लॅटिन भा षा आत्मसात केली व रोमन विधिसंहिता स्वीकारली .  या प्रदेशात गॅलो – रोमन ही संमिश्र संस्कृती उदयास आली .  इसवी सनाच्या पहिल्या शतकात गॉलमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रवेश झाला .  व्हिसीगॉथ टोळीचा प्रमुख मूरिक  ( कार .  ४६६ – ८४ )  याने नकली रोमन सार्वभौमत्व ४७३ मध्ये झुगारून दिले आणि ल्वारच्या दक्षिणेकडील सर्व गॉल प्रांत आपल्या अ धि पत्याखाली आणला  परंतु याच वेळी फ्रॅंक लोक ऱ्‍हाईन नही ओलांडून इतर प्रदेशात पसरू लागले होते .  गॉल लोकांच्या बिशपने व्हिसीगॉथ टोळीऐवजी फ्रँक लोकांना त्यांचा राजा क्लोव्हिस  ( कार.  ४८१  –  ५११ )  याने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याबरोबर पाठिंबा देण्याचे ठरविले .  क्लोव्हिस याने ४८१ पासून आपल्या सत्तेचा विस्तार केला .  ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्याला कॅथलिक बिशप धर्मरक्षक मानू लागले .  इ . स .  ५११ मध्ये क्लो व्हिस याने मरोव्हिं जिअन वंशाची स्थापना केली आणि गॉलमध्ये फ्रॅंक राज्य स्थापले .  त्याचेच पुढे फ्रान्स या प्रदेशात रूपांतर झाले .

क्लोव्हिसच्या मृत्यूनंतर  ( इ .  स .  ५११ )  आलेले राजे त्याच्या इतके समर्थ किंवा बलवान नव्हते .  रोमन विधिसंहिता आणि ख्रिस्ती धर्म हे राज्याचे ऐक्य टिकवू शकण्याइतके समर्थ नव्हते .  राजाची सत्ता दुबळी झाली होती . सरदार व बिशप यांचे हाती सत्ता वाढली .  लष्करी लोकांना महत्त्व आले .  अंतस्थ कलहामुळे सत्ता फार काळ टिकली नाही .

पेपिन द शॉर्ट  ( कार .  ७१४ – ६८ )  याने मेरोव्हिंजिअन राजाला पदच्युत करून पोपची संमती मिळविली आणि आपल्या घराण्याची  ( कॅरोलिंजिअन )  सत्ता दृढमूल केली  ( इ .  स .  ७५१ – ५२ ).  त्याचा मुलगा ⇨  शार्लमेन  ( कार. ७६८ – ८१४ )  याने राज्यविस्तार करून मोठे साम्राज्य प्रस्थापित केले .  त्याने या प्रदेशाची सर्वांगीण प्रगती केली .  शार्लमेननंतरच्या कॅरोलिंजिअन राजांनी आर्थिक ,  सामाजिक व राजकीय क्षेत्रांत विशेष असे काही केले नाही . परिणमतः त्यांचे साम्राज्य टिकू शकले नाही .  तत्कालीन दळणवळणाची साधने लक्षात घेता .  हे साम्राज्य अतिविस्तृत होते .  नौका व सैन्य यांच्या अभावी ते ते असुरक्षितही होते  शिवाय आपापसांतील विभाजनामुळे त्याचे तुकडे झाले .  राजाचे सार्वभौमत्व नाममात्र राहिले व खरी सत्ता सधन सरदारवर्गाच्या हाती गेली .  फ्रान्समधील ॲक्वि टेन ,  बर्गंडी आणि फ्लॅंडर्स या परगण्यांचे सरदार फारच प्रबळ झाले होते .  एका दृष्टीने ही मध्ययुगाच्या सुरुवातीची नांदीच होय .  राजाला मूर्धाभिषेक करण्याचा अधिकार पोप व धार्मिक गुरूंकडे असल्यामुळे चर्चचे हाती राजकीय सत्ता आली .  लष्करी व भूधारी अभिजनवर्गाचा उदय हे दुसरे वैशिष्ट्यही दिसू लागले .  भूधारी सैनिकांचा जो वर्ग उदयास उदयास आला, त्यातूनच पुढे सरंजामदारवर्गाची वाढ झाली. सतत लढाई  करणे व घराण्याची प्रतिष्ठा जपणे ,  या दोन गोष्टींवरच या वर्गाची मदार होती .

फ्रान्सचा ह्यू कॅपेट  ( कार .  ९८७ – ९६ )  या ड्यूकची राजा म्हणून निवड करण्यात आली  (९८७ ).  चर्चच्या पाठिं ब्यामुळे राजसत्तेची प्रतिष्ठा बरीच वाढली .  सरदारांनी राजाचे विरोधात कृती   केली नाही .  नंतरच्या कापे स्यँ राजांत सहावा लूई  (कार .  ११०८ – ३७ )  याची कारकीर्द मध्यवर्ती सत्ता दृढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. सातव्या लूईने  (कार .  ११३७ – ८० )  थोडाचा राज्यविस्तार केला .  त्याचा मुलगा फिलीप ऑगस्टस (कार. ११८०-१२२३) याने हे धोरण पुढे चालविले. ऑगस्टस याने ब्रिटनी ,  नॉर्मंडी ,  आंजू ,  टोरेन वगैरे प्रदेशांतून इंग्रजांना हाकलून दिले .  प्रशा सनात सुधारणा केल्या .  आर्थिक बाबींचे महत्त्व ओळखून फ्रेंच व्यापाऱ्यांना परदेशा तील पत परत मिळवून देण्यास त्याने पुष्कळ साहाय्य केले .  पैसा ,  प्रशासन आणि सैनिक ही शासनाची तीन साधने त्याने राज्याला उपलब्ध करून घेतली .  अभिलेखा गारही त्याने स्थापन केले .  शहराच्या सुधारणेवरही त्यांने बरेच लक्ष दिले .  पॅरिस येथे विद्यापीठ स्थापन केले .

ऑगस्टसनंतर तीन वर्षे आठव्या लूईची कारकीर्द झाली .  त्यानंतर नववा लूई  ( कार .  १२२६ – ७० )  हा न्यायी आणि धर्मपरायण राजा गादीवर आला .  त्याने फ्रान्सच्या राज्यव्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले .  न्यायदानासाठी पॅरिस येथे त्याने कायम न्यायालयाची  ( पार्लमेंट )  स्थापना केली .  त्याच्या कारकीर्दीत प्रशासन लोकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असे .  त्याचे निधनसमयी फ्रान्सची अर्थव्यवस्था सुदृढ अवस्थेत होती .  फ्रान्सची प्रतिष्ठाही इतर देशांत वाढली होती .  बऱ्याच बाबतींत त्याने फिलिप ऑगस्टसचे धोरण पुढे चालविले होते .  संरजामदारवर्गाबद्दल आदर बाळगावयाचा  पण त्याचे दोष सहन करावयाचे नाहीत ,  हे त्याचे धोरण होते . आचरणामध्ये  ऋ षितुल्य विशुद्धतेवर त्याचा भर असल्यामुळे त्याला सॉ लूई असे संबोधण्यात येई .  त्याच्या वारसांचा हक्क केवळ विनातक्रार मान्य करण्यात आला  एवढेच नव्हे तर ईश्वराचा प्रत्यक्ष प्रतिनिधी म्हणून लोक त्याच्याकडे पाहू लागले. स्वाभाविकच या कारकीर्दीत सर्वं क ष राजसत्तेची वाढ होत गेली .

पुढील जवळजवळ एक शतकभर पाच सहा राजांच्या कारकीर्दीमध्ये फ्रान्समध्ये अनागोंदी माजली होती. वाढत्या खर्चाला (राज्यविस्ताराच्या धोरणामुळे होणाऱ्या) पाठिबां मिळविण्यासाठी स्टेट्‌स जनरलची पहिली सभा १३०८ मध्ये बोलाविण्यात आली. ही सभा फक्त राजाचे म्हणणे ऐकून घेई, त्याला संमती देत असे. व्हाल्वा घराण्यातील सहावा फिलीप (कार. १३२८–५०) हा राजा गादीवर आला तेव्हा इंग्लंडच्या तिसऱ्या एडवर्डने फिलिपच्या हक्काला हरकत घेतली आणि स्वतःला फ्रान्सचा राजा म्हणून जाहीर केले. यामधूनच यूरोपातील ⇨शतवार्षिक युद्ध उद्‌भवले. वारसाहक्काशिवाय अनेक वादग्रस्त विषय यावेळी पुढे आले. त्यांमध्ये वारसाहक्काशिवाय फ्लॅंडर्समधील यादवी सरंजामशाही व्यवस्थेतील तंटे व साम्राज्यासाठी युद्ध यांचा समावेश होता. शतवार्षिक युद्धामुळे राजसत्ता अस्थिर झाली. पाचव्या चार्ल्‌सने (कार. १३६४ – ८०) हुशारीने इंग्लंडला फ्रेंच प्रदेश सोडून जाण्यास लावले पण त्याचा मुलगा सहावा चार्ल्‌स (कार. १३८० – १४२२) याला वेड लागल्यामुळे पुन्हा गादीविषयी तंटा निर्माण झाला. इंग्लंडच्या पाचव्या हेन्रीने फ्रान्सवरील हक्क प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा संघर्ष सुरू केला आणि फ्रान्सच्या सरदारांचा पराभव करून फ्रान्सची परिस्थिती केविलवाणी करून टाकली. १४२२ मध्ये पाचवा हेन्री व सहावा चार्ल्‌स हे दोघेही निधन पावले. सातवा चार्ल्‌स (कार. १४२२–६१) हा कमकुवत होता पण फ्रेंच जनतेने त्याला पाठिंबा दिला. या परिस्थितीत ⇨ जोन ऑफ आर्क या महिलेने इंग्लंडच्या आक्रमणाला पराक्रमाने तोंड देऊन ऑर्लेआंचा वेढा उठविला. नॉर्मंडीचा प्रदेशही फ्रेंचांना परत मिळाला. सातवा चार्ल्‌स हा स्वतः कमकुवत असला, तरी त्याच्या कारकीर्दीत फ्रान्स संतुष्ट राहिले. तेव्हापासून फ्रेंच सत्ताही वाढीस लागली. पुढे अकरावा लूई (कार. १४६१–८३) याने सरंजामदारांचा पराभव करून केंद्रसत्ता दृढमूल केली पॅरिस येथील स्टेट्स जनरलला उत्तेजन दिले. अशा प्रकारच्या सभा इतर शहरांमधूनही भरविल्या जात. त्याने उद्योगधंद्यांना उत्तेजन दिले. याच काळात छापखाने निर्माण झाले आणि वाङ्‌मय प्रसिद्ध होऊ लागले. यानंतर आठवा चार्ल्‌स (कार. १४८३–९८) याने ब्रिटनी प्रांत आपल्या राज्यास जोडला.

पहिल्या फ्रा‌‌न्सिस (कार. १५१५–४७) राजापासून बूँर्वा घराण्याची कारकीर्द सुरू झाली. हा राजा महत्त्वाकांक्षी होता. त्याने इटलीवर स्वारी करून स्विस व मीलानेस लोकांचा मेलेन्यानॉ येथे पराभव केला (१५१५). त्यामुळे फ्रान्सला मिलानची प्राप्ती झाली. स्विस कॅंटनबरोबर कायमची शांतता स्थापन झाली आणि पोपबरोबर समझोता झाला. या समझोत्यामुळे पोप आणि राजा या दोघांनाही पुष्कळसे उत्पन्न मिळाले. एरवी ते फ्रेंच चर्चला मिळाले असते. हा समझोता फ्रेंच राज्यक्रांती होऊन जाईपर्यंत टिकला, त्यामुळेच ल्यूथर व जॉन कॅल्व्हिन यांच्या धर्मसुधारणा आंदोलनाची फ्रान्समध्ये डाळ शिजली नाही. या समझोत्यामुळे फ्रेंच चर्चचे संरक्षण झाले पण ते सामाजिक सत्तेला दुययम झाले. त्याचा परिणाम सतराव्या शतकात राजाची अनिर्बंध सत्ता आणि अठराव्या शतकात चर्चविरोधी भावना निर्माण करण्यात झाला.

पुढील २५–३० वर्षे फ्रान्समध्ये गादीवर आलेल्या राजांच्या कारकीर्दीत प्रॉटेस्टंट व कॅथलिक या दोन धर्मपंथांत झगडे झाले. पुढे नाव्हाराचा हेन्री (१५५३–१६१०) या प्रॉटेस्टंट पुढाऱ्याने स्वतः कॅथलिक होऊन तडजोड केली व चौथा हेन्री हे नाव धारण करून तो फ्रान्सच्या गादीवर आला. त्याने नान्तचे फर्मान काढून (१५९८) ह्यूगनॉत्स यांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आणि सोळाव्या शतकात निर्दयपणे लढल्या गेलेल्या या धर्मयुद्धाचा शेवट केला. एका कॅथलिक देशाचा प्रॉटेस्टंट राजा या दृष्टीने चौथ्या हेन्रीपुढील कार्य कष्टमय होते परंतु फ्रेंच लोकांना खूष करण्याचे कौशल्य त्याच्याजवळ होते. त्याच्या पुढे सबंध फ्रेंच राष्ट्राचे ऐक्य साधणे हा उद्देश होता आणि हे ऐक्य विवेक आणि दया यांच्या साहाय्याने साधण्याचा त्याचा प्रयत्न होता. स्वतः शूर व कुशल सैनिक असल्यामुळे तो फ्रेंच जनतेला संतुष्ट करू शकला. रंगेल असूनही राजा या नात्याने त्याने आपला रंगेलपणा नियंत्रित ठेवला होता. स्वतःची धार्मिक मते हटवादीपणे न मांडता तो ती सोयीस्करपणे मांडत असे. याचा परिणाम त्याची लोकप्रियता वाढण्यामध्ये झाला. आपला विश्वासू सहकारी द्यूक द स्थूली याच्या मार्फत चौथ्या हेन्रीने प्रशासनामध्ये खूपच सुधारणा केल्या. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीतील दशक हे सुवर्णयुग म्हणून ओळखले जाऊ लागले. दहा पिढ्या उलटून गेल्यानंतरही शार्लमेन, जोन ऑफ आर्क, सॉ लूई यांप्रमाणेच आजही चौथा हेन्री ही फ्रान्समध्ये एक विभूती मानली जाते. धार्मिक भेद असले, तरी लोकांत राष्ट्रीय भावना जागृत करण्यात राजसत्तेचा वाटा मोठा आहे, हे चौथा हेन्री जाणून होता.

चौथ्या हेन्रीनंतर तेरावा लूई (कार १६१०–४३) गादीवर आला. त्याचा मुख्य प्रधान ⇨ आर्मा झां द्यू प्लेसी रीशल्य याचे उद्दिष्ट राजाचे श्रेष्ठत्व आणि राज्यांचे वर्चस्व स्थापण्याचे होते व ते त्याला क्रमाक्रमाने साधावयाचे होते. प्रथम त्याने प्रॉटेस्टंट लोकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली आणि ह्यूगनॉत्स लोकांचे सैन्यदल ही राजाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी बाब त्याने नष्ट करविली. तसेच मोठमोठ्या सरदारांच्या लष्करी दलांत कपात केली. रीशल्यच्या मते शासनाचा हेतू लोकांचे कल्याण साधणे हा नसून राज्याची सुरक्षितता राखणे हा होता. त्याला युद्ध टाळून शक्यतो वास्तववादी परराष्ट्रीय संबंध जोपासण्याचा प्रयत्न करावयाचा होता पण ऑस्ट्रियाला पायबंद घालण्यासाठी जर्मन प्रॉटेस्टंटांच्या साहाय्यास जाणे राष्ट्रहिताचे असल्यामुळे रीशल्यने ऑस्ट्रियाविरूद्ध युद्ध पुकारले. त्याने फ्रान्सची सत्ता निर्वेध केली.

तेराव्या लूईनंतर ⇨ चौदावा लूई (कार. १६४३–१७१५) गादीवर आला. मध्ययुगातील हा फ्रान्सचा सर्वश्रेष्ठ राजा मानला जातो. त्याच्या कारकीर्दीत फ्रान्स अनेक युद्धांत गुंतला होता, तरी ॲल्सेससारखे काही प्रांत फ्रान्सला मिळाले व राज्यविस्तार होऊन फ्रान्सची प्रतिष्ठा वाढली. आपण स्वतः राज्यसंस्था आहोत (आय एम द स्टेट), असे तो मानत असे. त्याच्या कारकीर्दीत फ्रान्सला यूरोपच्या राजकारणात व सांस्कृतिक जीवनात पहिल्या दर्जाचे स्थान प्राप्त झाले. यूरोपच्या सामाजिक जीवनातील संकेत आणि चालीरीती या चौदाव्या लूईच्या दरबारातून निर्माण झाल्या, असे मानले जाते. त्याच्या कारकीर्दीत स्टेट्स जनरल (संसद) एकदाही बोलावली गेली नाही. मंत्री हे मुख्यतः कारकून बनले. स्टेट्स जनरल केवळ न्यायपालिकेचे काम करू लागली परंतु राज्यातील चालीरीती व राजाची सम्यकबुद्धी यांमुळे राजाच्या सर्वंकष सत्तेचे दडपणशाहीत रूपांतर झाले नाही.

चौदाव्या लूईनंतर आलेल्या राजांत पंधरावा लूई (कार. १७१५–७४) व सोळावा लूई (कार. १७७४ – ८९) हे विशेष कर्तृत्ववान नव्हते. शिवाय या काळात यूरोपातील ⇨ ऑस्ट्रियन वारसा युद्ध (१७४०–४८) व ⇨ सप्तवार्षिक युद्ध (१७५६–६३) यांनी फ्रान्सचे अतोनात आर्थिक नुकसान केले. ब्रिटिशांबरोबर झालेल्या पॅरिसच्या तहात (१७६३) फ्रान्सला आपली कॅनडा व हिंदुस्तान यांमधील साम्राज्ये सोडून द्यावी लागली. सोळावा लूई व त्याची पत्नी राणी ⇨ मारी आंत्वानेत ही विशेष कर्तबगार नसून विलासी होती. राज्याची सर्व सूत्रे मारी आंत्वानेत चालवीत असे. राजा लोकांचे भले करू इच्छित होता परंतु शासन आणि राजकारण यांमध्ये त्याला विशेष आस्था नव्हती. आन रॉबेअर झाक त्यूर्गो हा नवीन मंत्री नेमण्यात आला होता. त्याने चतुराईने कारभार सुरू केला आणि आर्थिक सुधारणाही घडवून आणण्याचा तो प्रयत्न करीत होता पण संसदेने त्यूर्गोच्या सुधारणांच्या योजना फेटाळून लावल्या. शेवटी त्याला राजीनामा देणे भाग पडले.


आर्थिक ‌‌स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी फ्रान्सला शांतता आवश्यक होती परंतु सप्तवा‌र्षिक युद्धातील पराभवाबद्दल इंग्लंडवर कुरघोडी करण्याची खुमखुमी फ्रान्सच्या नेत्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी अमेरिकन वसाहतींना स्वातंत्र्ययुद्धात पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारले आणि अमेरिकेचा फ्रान्समधील दूत बेंजामिन फ्रॅंक्लिन याचे महत्त्व वाढविले. लूईने अमेरिकन वसाहतींच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली आणि त्यांच्याबरोबर दोस्तीचा तह केला. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाला पाठिंबा दिल्यामुळे फ्रान्स व अमेरिका यांच्या दरम्यान सौहार्दाचे संबंध प्रस्थापित झाले. यूरोपमध्ये फ्रान्सचा दबदबा वाढला पण त्याचबरोबर फ्रान्सचे आर्थिक नष्टचर्य अटळ झाले. संसद कोणत्याही आर्थिक सुधारणेला पाठिंबा देण्यास किंवा शासनाचा खर्च कमी करण्यास राजी नव्हती. त्यामुळे राजाला शिष्टजनांचे मंडळ बोलावणे भाग पडले. आर्थिक सुधारणेच्या कोणत्याही योजनेमध्ये लोकांच्या प्रस्थापित हितसंबंधाना बाधा आणणारे उपाय अपरिहार्य झाल्यामुळे शेवटी गोंधळ झाला. स्टेट्‌स जनरलची बैठक बोलावण्यात आली आणि यातूनच ⇨ फ्रेंच राज्यक्रांतीचा स्फोट झाला.

फ्रान्स हे १७८८ मध्ये युरोपातील एक बलिष्ठ राष्ट्र होते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडचा पराभव झाल्यामुळे अमेरिकेला साहाय्य करणाऱ्या फ्रान्सची प्रतिष्ठा वाढलेली होती. फ्रेंच कलावंत व तत्त्वज्ञ यांचा प्रभाव सर्व यूरोपभर पसरला होता. त्यामुळे फ्रेंच राजपद संकटात आहे, अशी शंकाही येण्याचे कारण नव्हते. कायद्यानुसार राजाचा अधिकार अनियंत्रित होता. फ्रान्समध्ये तो उदार नेत्यांकडून वापरला जात होता परंतु फ्रान्समध्ये असंतोष खदखदत होता आणि फ्रेंच शासनाची अब्रू नष्ट होत आली होती. याचे मुख्य कारण फ्रान्सचे प्राचीन संविधान कार्यवाहीत राहिले नव्हते. राजाला संसदेची बैठक केव्हाही बोलाविता येत असे परंतु प्रत्यक्षात १६१४ पासून त्याने ती एकदाही बोलाविली नव्हती. राजा हा फ्रान्सच्या एकात्मकतेचे प्रतीक होता. त्यानेच सरदारांच्या दुष्कृत्यांना आळा घालून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले होते. लोक राजाला पाठिंबा देण्यास तयार होते फक्त त्याने देशाचे हित संरक्षावे, एवढीच त्यांची अपेक्षा होती. सरदारवर्ग हा देशाच्या प्रगतीला अडसर असल्यामुळे त्याच्यावर राजाने नियंत्रण ठेवावे, अशी लोकांची अपेक्षा होती. या वेळेला सरदार आणि अमीर-उमराव शासनाकडून कर माफीसारख्या सवलती उपभोगत होते मात्र त्यांच्या मोबदल्यात कोणतेही काम (संरक्षणासारखे) करीत नव्हते. फ्रेंच समाजामध्ये वर्गभेद तीव्रतेने जाणवत होता. याशिवाय धार्मिक व्यवस्थाही अन्यायाची झाली होती. लोक त्यांच्या जुन्या चर्चशी एकनिष्ठ होते परंतु धर्मगुरू व पाद्री मोठमोठ्या सवलती व उत्पन्नांचे फायदे घेत होते. त्यांचे वर्तनही अनेक दृष्ट्या गर्हणीय असे. सामान्य जनता कॅथलिक राहिली परंतु धर्मपीठांच्या बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध असंतोष वाढत होता. अशा परिस्थितीत फ्रान्सला मोठे बदल अपेक्षित होते. मोठ्या लोकांचे हक्क राजाने नियंत्रित करावेत आणि राजाला लोकमताने नियंत्रणात ठेवावे, अशीचा लोकांची सर्वसाधारण भावना होती. यापूर्वींही कित्येक वेळा राजाने ज्याप्रमाणे समाजाच्या निरनिराळ्या गटांना न्याय देऊन सुव्यवस्था प्रस्थापित केली होती, त्याचप्रमाणे आताही होईल अशी अपेक्षा होती. फ्रान्समध्ये नवा मध्यमवर्ग निर्माण झाला होता. त्याला जुन्या उमराववर्गांचे जागी स्थान हवे होते. संसदेच्या बैठकीचे आयोजन, ज्यामधून फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रादुर्भाव झाला, हे त्या क्रांतीचे कारण नसून तिचे सूचक चिन्ह होते.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या सुरुवातीच्या अवस्थेत तिचे नेतृत्व नेमस्त पुढाऱ्यांकडे होते परंतु क्रांतीच्या गोधळात शेवटी झुंडशाही विजयी ठरली व १६ जानेवारी १७९३ रोजी सोळावा लूई याचा शिरच्छेद करण्यात आला. यूरोपातील इतर राष्ट्रांनी फ्रान्सविरुद्ध संघटित होण्यास सुरुवात केली होती. त्याला तोंड देण्यासाठी क्रांतिकारकांनी पावले उचलणे जरूर होते. या क्रांतीमध्ये सरदारवर्गाचे अवशेष नष्ट झाले. मानवी हक्कांची सनद घोषित करण्यात आली. स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व याचा उद्‌गोष तेव्हापासून सर्वत्र पसरला. संसदेचे राष्ट्रीय सभेत रूपांतर करण्यात आले. क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात नियंत्रित राजेशाही अस्तित्वात येईल असे वाटले परंतु इंग्लंडप्रमाणे अशा व्यवस्थेला पोषक परिस्थिती आणि अनुकूल विचारसरणी यांचा फ्रान्समध्ये अभाव असल्यामुळे ती चालू शकली नाही. राजाचा शिरच्छेद झाल्यानंतर क्रांतीकारकांनी राजसत्तेशी संबंध असलेल्या सर्व व्यक्तींना शासन केले. फ्रान्समध्ये प्रजासत्ताक स्थापन झाले. क्रांतीपासूनचा धोका यूरोपमधल्या राजांनी ओळखला व ते फ्रान्सविरुद्ध कारवाईस ‌सिद्ध झाले.

क्रांतीनंतर काही काळ ⇨ माक्सीमील्यँ रोब्झपीअर हा नेता बनून अधिकार गाजवू लागला. त्याने अंतर्गत बेशिस्तीवर ताबा ठेवून सुव्यवस्था प्रस्थापित केली परंतु आपल्याशिवाय दुसरे सर्व कःपदार्थ अशी त्याची वृत्ती असल्यामुळे व त्याने सर्वांविरुद्ध संहारास्त्र वापरल्यामुळे लोक त्याविरुद्ध संतापले होते. फ्रेंच लोकसत्ताकाचे सैन्य यावेळी सर्वत्र विजयी होत होते व त्याची प्रतिष्ठा वाढत होती. शेवटी रोब्झपीअरला पकडण्यात येऊन ठार करण्यात आले. यातून जॅकबिन्झ पक्ष सत्तेवर आला पण १७९७ च्या निवडणुकीमध्ये त्या सर्वांचा पराभव झाला. फ्रान्समधील संचालक मंडळाने फ्रेंच सैन्याचा सेनापती ⇨ पहिला नेपोलियन बोनापार्ट (१७६९–१८२१) याची मदत घेतली. अशा रीतीने नेपोलियन कॉन्सल म्हणून फ्रान्समध्ये अधिकारावर आला. फ्रेंच लोक बेशिस्त आणि अशांतता याला कंटाळल्यामुळे त्यांनी सार्वमताने नेपोलियनला पहिला कॉन्सल म्हणून मान्यता दिली.

नेपोलियनने आपल्या कारकीर्दीत (१७९९–१८१५) फ्रान्सच्या तत्कालीन गरजा पूर्ण करून देशात स्थिर व भक्कम शासन स्थापण्यात यश मिळविले. त्याने अंतर्गत प्रशासनातही अनेक सुधारणा केल्या. त्यांपैकी नेपोलियनची विधिसंहिता, इन्स्तित्यूत द फ्रान्स ही शिक्षणसंस्था इ. प्रसिद्ध आहेत. नेपोलियनच्या पहिल्या कॉन्सलपदाची ही कारकीर्द म्हणजे फ्रान्सचा ऐक्य व सुबत्ता यांचा काळ होता. १८०१ मध्ये प्रचंड बहुमताने लोकांनी नेपोलियनला तहहयात कॉन्सलपद देण्यास संमती दिली. या लोकप्रियतेचा फायदा घेऊन नेपोलियनने आपले अधिकार वाढविण्यास सुरुवात केली आणि राजपदाची प्रतीके क्रमाक्रमाने घेण्यास सुरुवात केली. २ डिसेंबर १८०४ या दिवशी फ्रान्सचा बादशाह या नात्याने पोपने मुकूट त्याचे मस्तकी ठेवला. लष्करी नेतृत्व प्रभावी असल्यामुळे नेपोलियनने थोड्याच अवधीत यूरोपातील इतर देशांना नमविले. ऑस्ट्रिया, प्रशिया आणि रशिया यांचा नेपोलियनने पराभव केला. इंग्लंडला मात्र नाविक दलाचे अभावी तो नमवू शकला नाही. स्पेन व रशियामधील मोहिमांमध्ये त्याचे अतोनात नुकसान झाले. लाइपसिकच्या लढाईत पराभूत झाल्यावर त्याला एल्बा बेटावर कैदेत ठेवण्यात आले. तेथून निसटून तो परत आला पण वॉटर्लूच्या लढाईत पराभूत झाला. शेवटी सेंट हेलीना बेटावर त्याला ठेवण्यात आले. तेथेच तो पुढे मरण पावला.


⇨ बॅस्तीलचा पाडाव ही यूरोपच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना मानली जाते कारण सरदार किंवा धनिकवर्गाचे विशेषाधिकार नष्ट करण्याच्या कार्यक्रमाचा पाया फ्रान्समध्ये या घटनेमुळे घातला गेला, तो पुढे सर्वत्र पसरला. समतेचा नारा इतर देशांतही जाऊन पोहोचला. यूरोपीय समाजातील धर्मनिरपेक्षतेचे श्रेयही फ्रेंच राज्यक्रांतीलाच दिले पाहिजे. धर्मस्वातंत्र्य आणि राज्याची धार्मिक नियंत्रणपासून मुक्तता, या गोष्टी फ्रेंच राज्यकांतीपासून वाढीस लागल्या. फ्रान्सची ऐक्याची भावना राज्यक्रांतीपासून बळावली. अनेक राज्यांचा संघ हे पूर्वीचे स्वरूप जाऊन एक राष्ट्र या नात्याने फ्रान्सचा उदय झाला. नेपोलियनच्या रूपाने लष्कराने क्रांतीची धुरा पतकरली पण त्याने तिची बरीचशी फलितेही संरक्षिली. कालबाह्य ठरलेल्या संस्था क्रांतीमध्ये झाडून बाजूला टाकल्या गेल्या. नेपोलियनला नव्या शासनाची बांधणी करावयाची होती. नेपोलियनचा स्वातंत्र्यावर विश्वास नसल्यामुळे कला व वाङ्‌मय यांना उत्तेजन दिले गेले नाही. फ्रेंच इतिहासाला नेपोलियनच्या कारकीर्दीची दखल एक तेजस्वी कारकीर्द म्हणूनच घ्यावी लागेल. [⟶ फ्रेंच राज्यक्रांति].

फ्रान्समध्ये अठरावा लूई परत १८१४ मध्ये गादीवर आला. त्याच्या राजपदाला अधिमान्यता होती परंतु फ्रेंच जनतेचा पाठिंबा टिकविणे महत्त्वाचे होते व त्यासाठी नव्याने लोकांचे हक्क मान्य करावेत, असा पेरीगॉर तालेरां या प्रधानाने सल्ला दिला. लूईने सत्ता पुन्हा घेताना हे हक्क आपण दिले, असे घोषित केले. युद्धोत्तर वाटाघाटीसाठी व्हिएन्ना येथे यूरोपीय राष्ट्रांची बैठक झाली आणि ⇨व्हिएन्ना काँग्रेसने एकोणिसाव्या शतकातील यूरोपच्या राजकीय संबंधांचा पाया घातला.

क्रांतीनंतरच्या काळात कोणत्याही कारकीर्दीस फ्रान्समध्ये सर्वसामान्य अधिमान्यता मिळू शकली नाही. फ्रान्सच्या राजकीय नेत्यांमध्ये इष्ट राजकीय संस्थांबाबत कधीही एकमत होऊ शकले नाही. क्रांतीनंतरच्या काळात फ्रान्समध्ये खालीलप्रमाणे कारकीर्दी झाल्या :

पहिले प्रजासत्ताक (१७९२–९९) कॉन्सलेटचा कालखंड (१७९९–१८०४) पहिले साम्राज्य (१८०४–१४) बूर्बाँ राजवटीचे पुरागमन (१८१४–३०) जुलै राजेशाही-आर्लेआं घटनावाद (१८३०–४८) दुसरे प्रजासत्ताक (१८४८–५२) दुसरे साम्राज्य (१८५२–७०) तिसरे प्रजासत्ताक (१८७०–१९४०) व्हिशी राजवट (१९४०–४४) द गॉलची अंतरिम राजवट (१९४४–४६) चौथे प्रजासत्ताक (१९४६–५८) आणि १९५८ पासून पाचवे प्रजासत्ताक.

पुनरागमनानंतर राजेशाही फ्रान्समध्ये फार काळ टिकू शकली नाही. १८३० मध्ये पुन्हा क्रांती होऊन बूर्बाँ घराण्याची सत्ता संपुष्टात आली. ड्यूक ऑफ आर्लेआं याने लूई ‌फिलिप या नावाने राजसूत्रे स्वीकारली. त्याच्या कारकीर्दीत भांडवलदारांचे प्रस्थ पुन्हा बोकाळले व भ्रष्टाचार वाढला. शेवटी १८४८ मध्ये पुन्हा क्रांती होऊन नेपोलियन बोनापार्टचा पुतण्या लूई हा अध्यक्ष म्हणून निवडून आला ‌आणि पुढे ⇨तिसरा नेपोलियन (कार. १८५२–७०) या नावाने सम्राट झाला. १८४८ च्या क्रांतीचे प्रतिसादही यूरोपभर उमटले. समाजवादी व राष्ट्रवादी चळवळी फोफावल्या परंतु नेपोलियनच्या परराष्ट्रीय धोरणामुळे इटलीचा विरोध ओढविला. देशातील कॅथलिक जनता पोपला साहाय्य न केल्याबद्दल रुष्ट होतीच शिवाय त्याच्या खुल्या व्यापाराच्या धोरणमुळे फ्रान्समधील रुढिप्रिय लोकही असंतुष्ट होते. फ्रान्समधील उद्योगपती संतापले होते. त्यामुळे नेपोलियनला पाठिंबा राहिला नाही. त्याचे परराष्ट्रीय धोरण अयशस्वी ठरून जर्मनीशी झालेल्या ⇨फ्रॅंको–प्रशियन (जर्मन) युद्धात (१८७०-७१) फ्रान्सचा दारुण पराभव झाला व साम्राज्याची इतिश्री झाली आणि बादशाह तिसरा नेपोलियन यालाही कैद करण्यात आले. जानेवारी १८७१ मध्ये प्रशियाच्या राजास जर्मनीचा बादशाह म्हणून घोषित करण्यात आले. त्याच वर्षी फ्रेंच संसदेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये राजाच्या पक्षाच्या लोकांना बहुमत मिळाले आणि जर्मनीबरोबर तह करण्यास मान्यता देण्यात आली. ल्वी अदॉल्फ त्येअर यास पंतप्रधान निवडण्यात आले. फ्रॅंकफुर्टचा तह मान्य करण्यात आला. फ्रान्सने जर्मनीला खंडणी म्हणून ५०० कोटी फ्रॅंक आणि फ्रान्समधील जर्मनीच्या सैन्याचा खर्च द्यावा ॲल्सेस–लॉरेन प्रांत जर्मनीला द्यावा आणि जर्मन सैन्याने पॅरिसमधून विजयी मोर्चा काढावा असे ठरले. ॲल्सेस-लॉरेन प्रांताबद्दलच्या अटीमुळे पुढील सर्व फ्रेंच पिढी जर्मनीवर सूडभवनेने पेटत होती आणि पॅरिसमधील विजयी मोर्चामुळे पॅरिसची जनता पॅरिस कम्यूनला उद्युक्त झाली.

पॅरिसमधील जनता फ्रॅंकफुर्टच्या तहामुळे असंतुष्ट होती. कनिष्ठ गृहात राजाच्या अनुयायांचे बहुमत असल्यामुळे ते राजाला परंतु निमंत्रित करतील, अशी भीती पॅरिसच्या नागरिकांना वाटली. त्यांनी १७९३ च्या परंपरेची आठवण करून दिली परंतु हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही आणि दडपशाहीला तोंड द्यावे लागले. दरम्यान त्येअरने अंतरिम समस्या झपाट्याने सोडविल्या. खंडणीची भरपाई करण्यासाठी त्याने कर्ज उभारले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दाने वर्षांत खंडणीची भरपाई करून पॅरिसवरील जर्मन सैन्याला निघून जाणे भाग पडले. फ्रान्समधील अर्थव्यवस्थेने विस्तारावस्थेमध्ये संक्रमण केल्यामुळे आर्थिक भरभराट झाली, आयातनिर्यात व्यापार वाढला, औद्योगिक उत्पादनास चालना मिळाली. पुनर्घटनेमुळे लष्करी सामर्थ्य वाढले. प्रजासत्ताकवाद्यांची शक्ती संघटित होऊन राजाच्या अनुयायांची विभागणी झाली. १८७५ च्या संविधानात तिसऱ्या प्रजासत्तकाच्या बाजूने कौल पडला.

तिसरे प्रजासत्ताक १९४० पर्यंत म्हणजे बरीच वर्षे टिकले परंतु फ्रान्सला अंतर्गत राजकीय स्थिरता लाभली नाही. याचे कारण कोणत्या राजकीय संस्था फ्रान्सला स्थैर्य देतील व फ्रान्सची प्रगती घडवून आणू शकतील, यांबद्दल फ्रेंच जनतेमध्ये कधीच एकमत होऊ शकले नाही. क्रांतीपासूनच्या कालखंडात दोन ठळक विचारप्रवाह फ्रान्स मध्ये वाहत असलेले दिसतात. एक, ज्यांची प्रतिष्ठा जन्मानुसार ठरते व प्रवृत्ती अधिकारशाहीची असते असे राजशाहीचे पारंपरिक पुरस्कर्ते. यांना लोकांची निष्ठा लादावी लागत नाही. हा गट तिसऱ्‍या प्रजासत्ताकात उघडउघड राजेशाहीचा पुरस्कार करीत नव्हता पण लोकसत्ताकाला विरोधी होता. दोन, फ्रेंच लोकसत्तावादी हे अधिकारशाहीचे विरोध असून समतेच्या तत्त्वाचे पुरस्कर्ते होते. ते लोकांचा सार्वभौम हक्क मांडणारे, चर्च व राज्य यांची क्षेत्र भिन्न ठेवून धर्माला कोणतेही विशेष अधिकार देण्यास विरोध करणारे होते. मात्र हे दोन्ही गट केंद्रीय शासनाच्या अधिकाराला विरोध करण्यामध्ये सहमत होते. अंतर्गत प्रश्नांबद्दल मतभेद असल्यामुळे तिसऱ्‍या प्रजासत्ताकाच्या कालखंडात सतत राजकीय अस्थैर्य व मतभेद जाणवत असे.

तिसऱ्या प्रजासत्ताकाच्या काळात झॉर्झ बूलांझे व त्यांचे पाठीराखे यांची पनामा कंपनीचे प्रकरण (१८९३), ड्रायफस प्रकरण (१८९४–९५) इत्यादींमुळे प्रजासत्ताकाला हादरे बसले परंतु त्या सर्वांतून ते बचावले. परराष्ट्रीय संबंधांमध्ये प्रशिया, ऑस्ट्रिया आणि इटली यांनी ट्रिपल अलायन्स (१८९१) हा करार करून यूरोपातील इतर राष्ट्रांना धोका निर्माण केला. त्याचा परिणाम फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामधील वितुष्ट संपुष्टात येऊन फ्रान्सने रशिया व इंग्लंड यांच्या बरोबर ट्रिपल एंतात हा प्रतिकारार केला (१९०४). यामधून पहिल्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.

ड्रायफस प्रकरणाच्या वेळी पोप लिओ याने आपल्या अनुयायांना राजवटीचे नियम पाळण्याचा संदेश दिला. त्यामुळे चर्च आणि राजसत्ता यांमधील वितुष्ट काही काळ शमले. पुढे जर्मनीच्या संकटामुळे फ्रान्समधील अंतर्गत वादंगही कमी झाले.

तिसऱ्या प्रजासत्ताकाच्या कारकीर्दीत फ्रेंच राजकारणात आणि कायदेमंडळाच्या सदस्यांमध्ये दिसून येणारी चंचलता दिखाऊ असल्यासारखी वाटे कारण प्रत्यक्ष फ्रेंच नागरिकांच्या जीवनामध्ये त्या चंचलतेचे प्रतिबिंब दिसत नसे. फ्रेंच शासन स्थिर होते व त्यामध्ये मोठे हेलकावे बसत नव्हते (चौथ्या प्रजासत्ताकाच्या कालखंडात वेळी ही परिस्थिती थोडीबहुत अशीच होती) मात्र तिसऱ्‍या प्रजासत्ताकाच्या कालखंडात फ्रान्सच्या आर्थिक व सामाजिक व्यवस्थेमध्ये मोठे बदल घडून येत होते. औद्योगिक क्रांतीचे परिणाम फ्रान्समध्ये या सुमारास जाणवू लागले. शहरांची वाढ होत होती. कामगारवर्ग उदयास येत होता. आर्थिक घटक आकाराने मोठे होऊन कामाचा व्याप विस्तृत करीत होते. समाज जास्त जटिल होत होता. त्यामुळे नवनव्या सामाजिक प्रश्नांना तोंड देण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांवर पडत होती परंतु फ्रान्समध्ये शासनाबद्दल परंपरागत आशंकेची भावना असल्यामुळे या नव्या जबाबदाऱ्या पेलण्याइतपत कार्यक्षम राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तयार होत नव्हते. नव्या व बदलत्या सामाजिक गरजांच्या संदर्भात राजकारणामध्ये जो फरक होणे आवश्यक होते, तो करण्यास प्रतिनिधी तयार होत नव्हते. ग्रामीण समाजाच्या प्रतिनिधींचे प्राबल्य असलेले कनिष्ठ गृह नव्या उद्योगप्रधान शहरी समाजाला अभिप्रेत असणारी समर्थ शासनव्यवस्था निर्माण करू शकत नव्हते.


तिसऱ्या प्रजासत्ताकाच्या काळात ज्या शक्तींचा फ्रान्सच्या राजकारणामध्ये प्रभावी प्रवेश झाला, त्यांमध्ये (१) फ्रान्सच्या बाहेरील वसाहती व त्यामुळे प्रजासत्ताकाला होत असलेल्या राजाच्या अनुयायांच्या विरोधाची धार बोथट करण्याचे श्रेय दिले पाहिजे. (२) तसेच मजूर संघटना व त्यांचा राजकारणावरील प्रभाव वाढत होता. १८८६ मध्ये मजूर संघटनांची पहिली राष्ट्रीय काँग्रेस भरली होती. (३) धर्माधिकारी वर्गाच्या प्रभावाचा पुन्हा प्रादुर्भाव झाला. १८७० मध्ये पोप नववा पायस याच्या मृत्यूनंतर तेराव्या लिओने समजूतदार भूमिका घेतली होती पण फ्रान्समधील प्रजासत्ताक व चर्च यांमधील वितुष्टाची परंपरा आणि शिक्षणक्षेत्रावरील धर्माधिकाऱ्‍यांचा प्रभाव व अधिकार यांमुळे या दोहोंमधील वितुष्ट कायम राहिले.

पहिल्या महायुद्धात जर्मनीने बेल्जियमचा पाडाव करून फ्रान्सवर आक्रमण केले परंतु मॉर्न नदीचे काठी दोस्तांच्या फौजांनी जर्मनीला थोपविले आणि त्याच्या पुढे जर्मन फौजा सरकू शकल्या नाहीत. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जर्मन सैन्याला शरणागती पतकरावी लागली. फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड आदी दोस्तांचा विजय झाला. पॅरिस येथे झॉर्झ क्लेमान्सोच्या अध्यक्षतेखाली शांतता परिषद होऊन तह झाला (१९१९). फ्रान्सला ॲल्सेस–लॉरेन प्रांत मिळाला परंतु या युद्धात फ्रान्सची मनुष्यहानी व वित्तहानी पुष्कळच झाली. इंग्लंड–फ्रान्सचे संबंध युद्धोत्तर काळात सलोख्याचे राहिले. फ्रान्समधील राजकीय पक्षांच्या रचनेमुळे व वि‌शिष्ट राज्यघटनेमुळे तेथे मंत्रिमंडळाचे स्थैर्य राहू शकले नाही. युद्धोत्तर परिस्थितीमुळे फ्रान्सला मोठ्या आर्थिक समस्यांना तोड द्यावे लागले. फ्रेंच चलनाचे आंतरराष्ट्रीय मूल्य कमी झाले. अमेरिका राष्ट्रसंघात सामील झाला नाही त्यामुळे फ्रान्सच्या पूर्वसरहद्दीसंबंधीच्या तहामधील मोठीच शक्ती नाहीशी झाली. लोकार्नो करारासारखे काही करार करून फ्रान्सने सुरक्षाव्यवस्था दृढ करण्याचे प्रयत्न केले परंतु जर्मनीमधील वाढत्य हुकूमशाही शक्तीपुढे हे सर्व प्रयत्न तकालादू ठरू लागले. लेआँ ब्लूमच्या नेतृत्वाखाली समाजवादी व साम्यवादी यांच्या पाठिंब्याने फ्रान्समध्ये पॉप्युलर फ्रंटचे सरकार अधिकारावर आले. त्यांनी काही मजूरविषयक व सामाजिक सुधारणाही अंमलात आणल्या परंतु ते फार दिवस टिकू शकले नाही. हिटलर जर्मनीचा नेता बनल्यापासून जर्मनीने व्हर्सायच्या तहाविरुद्ध कृती सुरू केलीच होती. युद्धाचा धोका टाळण्यासाठी फ्रेंच पंतप्रधान एद्‌वार दलादिऄ व इंग्लंडचा पंतप्रधान आर्थर चेंबरलिन यांनी म्यूनिक येथे हिटलर-मुसोलिनीबरोबर करार करून हिटलरची सूडेटन लँडसंबंधीची मागणी मान्य केली (१९३८). पुढे पोलंडवर हिटलरने आक्रमण केले (१९४१). त्यामुळे इंग्लंड व फ्रान्स यांनी जर्मनीविरुद्ध १९३९ च्या सप्टेंबरमध्ये युद्ध पुकारले. दलादि‌ऄच्या जागी पॉल रेनाँ फ्रान्सचा पंतप्रधान झाला. मे-जून १९४० मध्ये हिटलरने बेल्जियममधून आक्रमण करून फ्रान्सविरुद्ध चढाई सुरू केली आणि बराच मुलूख व्यापला. शेवटी जुलै १९४० मध्ये रेनाँ याने राजीनामा दिला. मार्शल पेतॅं पंतप्रधान झाला व त्याने जर्मनीशी शस्त्रसंधी केला. फ्रान्सचा तीन चतुर्थांश भाग जर्मनीने व्यापला. उर्वरित भाग व्हिशी शासनाकडे राहू दिला. व्हिशी शासनाचा कारभार एप्रिल १९४५ पर्यंत चालू असेतो मार्शल पेतॅं अध्यक्ष राहिला. दोस्तांच्या फौजांनी नॉर्मंडीमध्ये सैन्य उतरवून फ्रान्समध्ये दुसरी आघाडी उघडली आणि थोड्याच दिवसांत ⇨ द गॉल याच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांचे तात्पुरते सरकार पॅरिसमध्ये स्थापन झाले. फ्रान्स हिटलरला शरण गेला. त्या वेळेपासूनच द गॉल याने आफ्रिकेतील फ्रेंच वसाहतींमधून हिटलरशी युद्ध चालू ठेवले होते व अल्जिअर्समध्ये तात्पुरते सरकार स्थापन केले होते. तेच सरकार पॅरिस मुक्त झाल्यावर पॅरिसमध्ये आले.

युद्धसमाप्तीनंतर १९४६ मध्ये फ्रान्सचे चौथे प्रजासत्ताक स्थापन झाले. प्रजासत्ताकाच्या स्थापनेच्या वेळेस संविधान समितीची निवड करताना जी पद्धती स्वीकारण्यात आली. तीमुळे प्रजासत्ताकाचे स्वरूप ठरल्यासारखे झाले. वैयक्तिक उमेदवाराला मत देण्याऐवजी बहुप्रातिनिधिक मतदारसंघासाठी एका यादीला प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचे तत्त्वावर मते द्यावीत, असे ठरले. त्यामुळे मोठमोठ्या पक्षांचा बचाव दृढ झाला आणि त्यांना निर्वाचित उमेदवारांवर नियंत्रणाचे अधिकार प्राप्त झाले. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांचे उमेदवारावरील नियंत्रण नाममात्र राहिले. पहिल्या निवडणुकीमध्ये कॉम्युनिस्त, संयुक्त सोस्यालिस्त आणि मुव्हमाँ रेप्युब्लिकॅं पॉप्युलर (एम्‌आर्‌पी) व पूर्वीच्या क्रीस्त्यां देमोक्रात पक्षालाच जवळ असलेली कॅथलिक चळवळ यांना जवळजवळ सारखी मते मिळाली. फ्रान्सपुढे अभूतपूर्व समस्या होत्या. फ्रान्सची गरज औद्योगिक साधनसामग्रीची होती. फ्रान्सजवळ मनुष्यबळ कमी होते. उर्जा कमी होती कच्चा मालही अपुरा होता परंतु फ्रेंच लोक उद्योगशील होते आणि फ्रान्सजवळ मोठी परंपरा होती. त्यामुळे इतर देशांपेक्षा फ्रान्सला पुढे जाणे शक्य झाले होते. इतर देशांत फ्रान्सची प्रतिष्ठा श्रेष्ठ होती. फ्रान्सचे प्रश्न मुख्यत्वे राजकीय होते.

द गॉल आणि संविधान समिती यांचे सुरुवातीपासून जमेना. साम्यवादी, समाजवादी व एम्आर्‌पी यांना अभिप्रेत असलेले नियोजन आणि राष्ट्रीयीकरण करण्याचे धोरण द गॉल यास अमान्य होते, असे नव्हते. खाणी, बँका, विमा कंपन्या इत्यादींचे राष्ट्रीयीकरण झालेले होते पण द गॉल हा वित्तपुरवठा व अर्थव्यवस्था यांपेक्षा फ्रान्सचा मोठेपणा व जागतिक स्थान यांबद्दल सचिंत होता. लष्करी पतपुरवठ्याच्या प्रश्नावर संसदेशी मतभेद होऊन द गॉलने राजीनामा दिला आणि त्यानंतर राजकीय पक्षांचा खांदेपालटून राजवट चालविण्याचा खेळ सुरू झाला. दुसऱ्‍या सार्वमताने कौन्सिल ऑफ द रिपब्लिक या दुसऱ्या सदनाची निर्मिती झाली. चौथ्या प्रजासत्ताकातील महत्त्वाच्या जागा सुरुवातीला तिसऱ्या प्रजासत्ताकातील मुत्सद्यांनाच ‌मिळाल्या. द गॉल याने अध्यक्षीय शासनव्यवस्थेच्या दिशेने संविधानामध्ये बदल करावा, ही मागणी चालू ठेवली होती आणि त्यासाठी रासाँब्लमाँ द्यु पप्ल फ्राँसॅ ’ (आर्‌पीएफ्‌) याची स्थापना केली. तोच पुढे गॉलिस्ट पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.

चौथ्या प्रजासत्ताकाचा जन्म अतिशय कठीण परिस्थितीत झाला. ज्यांना अध्यक्षीय शासन अभिप्रेत होते, असे लोक आणि ज्यांना शासनाची सर्व सूत्रे संसदेकडे हवी होती, असे लोक यांच्या मतांमध्ये संविधान समितीचा कल दोलायमान होत होता. या दोन्ही पद्धतींचे दोष चौथ्या प्रजासत्ताकाच्या संविधानात आढळतात. मंत्रिमंडळाच्या अध्यक्षाची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांचा होता पण अधिकाराचा स्वीकार मात्र संसदेच्या पूर्ण बहुमतावर अवलंबून असे. हे बहुमत मिळविणे सहजासहजी शक्य नव्हते. परिणामी चौथ्या प्रजासत्तांकात मंत्रिमंडाळातील फेरबदल ही नित्याची गोष्ट झाली. चौदा वर्षांच्या काळात २५ पंतप्रधान होऊन गेले. सुरुवातीला कम्युनिस्ट संमिश्र मंत्रिमंडळात होते पण १९४७ अखेर सर्वच पक्षांचे धोरण त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे झाले. कम्युनिस्टांनीही पगार गोठविण्याचे धोरण सोडून संपाचे व हिंसाचाराचे धोरण सुरू केले. त्यामुळे अस्थिरतेबरोबर अशांतताही माजली तथापि चौथ्या प्रजासत्ताकाने पुष्कळसे भरीव काम केले. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाबरोबरच निरनिराळ्या पक्षांची युती करण्यास परवानगी देण्यात आली आणि त्याचा परिणाम कम्युनिस्ट व गॉलिस्ट यांच्या मतांच्या प्रमाणात त्यांना जागा मिळू शकल्या नाहीत व मतभेदाचे अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आणि समाजवाद्यांमध्येही फूट पडली. फ्रान्सची आर्थिक स्थिती फारशी आशादायक नव्हती. नवे कर न बसविता खर्च वाढविण्याकडे संसदेची प्रवृत्ती होती. फ्रेंच वसाहतींमध्ये नवे प्रश्न निर्माण होत होते. फ्रान्सच्या अंतर्गत घडामोडींमुळे या इतर प्रश्नांकडे लक्ष देण्यास फ्रेंच शासनाला स्वस्थता मिळाली नव्हती. आशिया व आफ्रिका खंडांत नवजागृतीमुळे वसाहतवादविरोधी नव्या राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रादुर्भाव होत होता. ट्युनिस, मोरोक्को येथे अंतर्गत बंडाळी होती, तर इंडोचीनमध्ये व्हिएटनामी लोकांच्या बंडाळीने बराच प्रदेश व्यापलेला होता. अमेरिकेच्या आग्रहामुळे बाओ दायच्या बचावासाठी द्येनब्येनफूचा लढा लढविला गेला पण तेथील पराभवामुळे इंडोचीनमधून फ्रान्सला काढता पाय घ्यावा लागला. लानिए सरकारने राजीनामा दिला व पियॅर माँदॅस फ्रान्स याची पंतप्रधानपदी नेमणूक झाली (१९५४). त्याला संसदेने बहुमताने पाठिंबा दिला. इंडोचीनमध्ये युद्धबंदी मान्य झाली. ट्युनिशियाला स्वातंत्र्य देण्याच्या योजनेसही संसदेने पाठिंबा दिला. फक्त यूरोपच्या पुनर्रचनेबद्दल मात्र फ्रान्समध्ये मतभेद होते. यूरोपीयन कोल अँड स्टील कम्युनिटी फ्रान्सने मंजूर केली पण यूरोपीयन डिफेन्स कम्युनिटीची योजना फेटाळून लावली. उत्तर आफ्रिकेबाबतच्या धोरणावर सरकारचा पराभव झाला. थोड्याबहुत फरकाने अशीच परिस्थिती चौथ्या प्रजासत्ताकात चालू राहिली. मंत्रिमंडळाची कायम अस्थि‌रता पाहता, फ्रेंच जनतेला संविधानामध्ये संशोधन करून जास्त स्थिर राजवट आणण्याची गरज वाढत्या प्रमाणावर भासू लागली आणि अल्जिअर्स येथील फ्रेंच सैन्याने राज्याची मुख्य सत्ता काबीज करण्याची तयारी केल्यामुळे द गॉल याला परत बोलवावे लागले. द गॉलने सत्ता स्वीकारली आणि मीशेल दब्रे याच्या साहाय्याने नवे संविधान तयार केले. त्यामध्ये अध्यक्षीय पद्धतीच्या शासनव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्यांवर सार्वमत घेण्यात आले. त्यामध्ये जवळजवळ ८० टक्के लोकांनी नव्या संविधानास पाठिंबा दर्शविला व पाचवे प्रजासत्ताक स्थापन झाले (१९५८).


नव्या निवडणुकांमध्ये द गॉल याला अनुकूल असलेल्या पक्षांना बहुमत मिळाले. राष्ट्राध्यक्षाची अप्रत्यक्षरीत्या निवडमंडळाकडून निवड व्हावयाची होती. द गॉल हा या पदी निवडला गेला. त्याने संविधानामध्ये दुरुस्ती करवून घेतली. १९६२ मध्ये संविधानात दुरुस्ती करण्यावर सार्वमत घेण्यात येऊन अध्यक्ष प्रत्यक्ष निवडणुकीने निवडावा आणि अध्यक्षाची निवड ७ वर्षासाठी व्हावी, असे ठरले.

द गॉल याने अध्यक्षपदाची सूत्रे जानेवारी १९५९ मध्ये घेतली आणि एप्रिल १९६९ मध्ये त्याने पुरस्कारलेल्या संविधानाच्या संशोधनावरील सार्वमतामध्ये पराभव झाल्यामुळे राजीनामा दिला. या एका दशकात फ्रान्सने अनेक प्रगतीचे टप्पे गाठले. अल्जीरियाला १९६२ मध्ये स्वातंत्र्य देण्यात आले. एक स्वतंत्र आथिर्क आणि लष्करी सत्ता म्हणून फ्रान्सची प्रतिष्ठा स्थापन होऊ लागली. परराष्ट्रीय धोरणात स्वतंत्र धोरणाचा पुरस्कार होऊ लागला. साम्यवादी चीनला मान्यता आणि व्हिएटनामबद्दलच्या अमेरिकन धोरणाला विरोध, ही त्याची ठळक उदाहरणे होत. यूरोपीय सामायिक बाजारपेठेचा फ्रान्स हा महत्त्वाचा सदस्य आहे. अणुबाँबची निर्मिती करून (१९६०) फ्रान्सने आपली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढविली. उत्तर अटलांटिक करारामधून फ्रेंच सैन्स १९६६ मध्ये काढून घेण्यात आले.

फ्रान्समध्ये राष्ट्रीय स्वरूपाचा पेचप्रसंग मे-जून १९६८ मध्ये निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षणपद्धतीबद्दलचा असंतोष व्यक्त केला तेव्हापासून सुरू झालेल्या पेचप्रसंगाचे स्वरूप राष्ट्रव्यापी सार्वत्रिक संप आणि डाव्या पक्षांनी सत्ता बळकावण्यासाठी केलेला उघड प्रयत्न यांमुळे फारच भयंकर झाले. द गॉल याने संसदेचे कनिष्ठ गृह बरखास्त केले आणि फेरनिवडणुका घेतल्या. त्यामध्ये अनपेक्षितपणे गॉलिस्टांना विजय मिळाला (४८७ पैकी २९२). डाव्या पक्षांची सभासद संख्या कमी झाली (१२१ ची ५७). सहभागित्वाच्या तत्त्वावर आधारलेल्या अंतर्गत आर्थिक आणि सामाजिक सुधारणांचा कार्यक्रम नव्या पंतप्रधानामार्फत पुरस्कारण्यात आला. शैक्षणिक सुधारणा आणि शिक्षणसंस्थांना स्वायत्तता देणाऱ्या विधेयकाला कनिष्ठ गृहात एकमुखी पाठिंबा मिळाला (१९६८). फ्रेंच चलनाचे अवमूल्यन करण्यास द गॉलने केलेला विरोध आणि फ्रेंच अर्थव्यवस्थेची पुन्हा उपलब्धी (१९६८–६९), यांमुळे द गॉलची प्रतिष्ठा खूपच वाढलेली होती.

या सामाजिक व आर्थिक पुनर्रचनेच्या कार्यक्रमांबरोबरच संविधानमध्ये संशोधन करण्याचे दोन-तीन प्रस्ताव लोकांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येऊन त्यांवर सार्वमत घेण्यात आले. त्यामध्ये मुख्य प्रस्ताव वरिष्ठ गृहाची पुनर्घटना करून त्यास मर्यादित आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार द्यावेत असा होता. बहुमताने हे प्रस्ताव फेटाळण्यात आल्यामुळे द गॉल याने एप्रिल १९६९ मध्ये राजीनामा दिला. द गॉलच्या कारकीर्दीमध्ये फ्रान्सची प्रतिष्ठा वाढली आणि आर्थिक व सामाजिक स्थैर्यही प्रस्थापित झाले.

द गॉलनंतर झॉर्झ पाँपिदू अध्यक्ष म्हणून निवडून आला. त्याने द गॉलकालीन धोरणात महत्त्वाचे बदल केले. फ्रॅंकचे अवमूल्यन करून आर्थिक टंचाईचे धोरण टाळले आणि परराष्ट्रीय संबंधामध्ये ब्रिटनशी थोडे जुळवून घेण्याचे धोरण अवलंबिले. पाँपिदू १९७४ मध्ये निधन पावला. मे १९७४ मध्ये पुन्हा निवडणूक होऊन व्हालेरी जिस्कार देस्तॅं हा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार गॉलिस्ट व मध्यममार्गी पक्षांच्या पाठिंब्याने निवडून आला. मात्र त्याच्या सात वर्षांच्या कारकीर्दीनंतर ९ मे १९८१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात फ्रान्स्वा मीत्तरां हा डाव्यांच्या सहकार्याने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला.

पाचव्या प्रजासत्ताकामध्ये फ्रान्सचे परराष्ट्रीय धोरण स्वत्व राखण्याचे व स्वतंत्र राहिले आहे. द गॉलचे मुख्य लक्ष फ्रान्स ही बडी सत्ता आहे, हे ठसविण्यावर व राष्ट्राच्या प्रतिष्ठेवर होते. फ्रान्स ही एक अण्वस्त्रधारी शक्ती बनली आणि नाटोमधून बाहेर पडली. पाँपिदूने तेच धोरण पुढे चालविले. मात्र द गॉलचा इंग्लंड-अमेरिकाविरोध त्याला मान्य नव्हता. देस्तँ याने अमेरिकेबरोबर संबंध जुळवून घेतले पण फ्रान्सची अण्वस्त्रधारी प्रतिबंधक शक्ती स्वतंत्रतेने वाढविण्याकडे त्याचे धोरण होते. यूरोपीय सामायिक बाजारपेठेचा फ्रान्स हा एक महत्त्वाचा संस्थापक-सदस्य आहे. फ्रान्सने बहुतेक वसाहतींना स्वातंत्र्य दिले आहे. बऱ्याच वसाहतींचे फ्रान्सबरोबरचे आर्थिक व राजकीय संबंध मैत्रीचे आहेत.

देशपांडे, ना. र.

राजकीय स्थिती : वारंवार होणारे बदल हे फ्रेंच शासनाचे एक वैशिष्ट्य आहे. फ्रान्समध्ये १७८९ मधील राज्यक्रांतीपासून पुढील प्रमाणेप्रयोग (तीन नियंत्रित राजेशाह्या, दोन साम्राज्ये, पाच प्रजासत्ताक राजवटी व एक नाझीप्रणीत हुकूमशाही) राजकीय क्षेत्रात झाले : (१) नियंत्रित राजेशाही (१७८९–९२), (२) पहिले प्रजासत्ताक व नेपोलियनचे कॉन्सलपद (१७९२–१८०४), (३) नेपोलियनचे साम्राज्य (१८०४–१४), (४) बूर्बाँ राजेशाही (१८१४–३०), (५) आर्लेआं राजेशाही (१८३०–४८), (६) दुसरे प्रजासत्ताक (१८४८– ५२), (७) तिसऱ्या नेपोलयिनचे साम्राज्य (१८५२–७०), (८) तिसरे प्रजासत्ताक (१८७०–१९४०), (९) नाझीप्रणीत राजवट (१९४०–४४), (१०) द गॉलचे अंतरिम शासन (१९४४–४६), (११) चौथे प्रजासत्ताक (१९४६–५८), (१२) पाचवे प्रजासत्ताक–१९५८ पासूनचा पुढील काळ. यांतील काही फेरबदल युद्धजन्य आहेत तर काहींचे मूळ फ्रान्समधील क्रांतिकारी परंपरेत आणि मित्र सामाजिक-राजकीय गटांच्या भक्कम अस्तित्वास आहे. प्रत्येक राजवटीत त्या आधीच्या राजवटीस एकनिष्ठ असणाऱ्या व नव्या राजवटीची स्वप्ने पाहणाऱ्या, अशा दोघांच्याही विरोधास तोंड द्यावे लागले. या संपूर्ण कालखंडात फ्रेंच जनतेमध्ये एकंदर राज्यव्यवस्थेचे स्वरूप, राजकीय संस्था व त्यांची कार्यपद्धती यांबद्दल तीव्र मतभेद असल्याचे दिसून येते. एकोणिसाव्या शतकात फ्रान्समध्ये स्वल्पतंत्रवादी व लोकसत्तावादी या दोन विचारप्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणात झगडा चाललेला दिसून येतो. स्थूलमानाने स्वल्पतंत्र विचारप्रणालीत उच्च कुलोत्पन्नता, श्रेणीबद्ध समाजरचना, राजनिष्ठा व चर्चला मिळणारी राजकीय मान्यता यांना महत्त्व होते. या विचारप्रणालीत राजनिष्ठा हळूहळू मंदावत गेली परंतु इतर प्रेरणा मात्र टिकून राहिल्या. याउलट लोकशाही परंपरेत समता, निर्वाचित नेतृत्व, जनतेचा सार्वभौम अ‌धिकार व धर्मनिरपेक्ष राजकारण यांवर भर दिलेला दिसून येतो. या दोन्ही प्रणाली प्रबळ केंद्रसत्तेस विरोधी होत्या परंतु त्यांत केंद्रसत्तेचा उपयोग विधायक कार्यासाठी करावा, या मताचे समर्थकही होते. त्यांतील स्वल्पतंत्रवाद्यांस ‘बोनापार्टिस्ट’, तर लोकसत्तावादी व लोकशाही पंथास ‘जॅकबिन्झ’ असे संबोधिले जाई.


फ्रेंच राज्यक्रांती (१७८९), औद्योगिक क्रांती (एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थांशापासून) व रशियन राज्यक्रांती (१९१७) या तिन्ही घटनांचा फ्रान्सच्या राजकीय विकासावर परिणाम झालेला दिसतो. फ्रेंच राज्यक्रांतीतून तीन प्रश्न पुढे आले : (१) राज्यव्यवस्थेचे स्वरूप कसे असावे, (२) चर्च व सरकार यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असावेत व (३) समाजरचना कशी असावी. ज्यांना लोकशाही राज्यव्यवस्था इष्ट वाटत होती, त्यांच्या प्रेरणेनेच तिसरे प्रजासत्ताक राज्य उभे राहिले (१८७० ते १९४०). त्यांना विरोध करणाऱ्या राजेशाहीवादी, बूर्बाँ वंश व लूई फिलिप (कार. १८३०–४८) यास निष्ठा वाहणारे किंवा बोनापार्टिस्ट लोकांत एकमत नव्हते. या विरोधकांचे संसदेत फारसे प्रतिनिधी नसले, तरी एकंदर जनतेत त्यांना काही प्रमाणात पाठिंबा होता. लोकशाहीवाद्यांत वा लोकसत्तावाद्यांतही आर्थिक व चर्च-राज्यसंबंध या प्रश्नपरत्वे वेगवेगळे पंथ होते. तात्त्विक दृष्ट्या चर्चच्या प्रभावाला प्रबोधनापासून सुरुवात झाली. प्रबोधनामुळे बुद्धी व विवेक यांना श्रद्धेपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले आणि कोणत्याही श्रद्धेय मताच्या प्रभावापासून मत मोकळे ठेवण्यावर भर दिल्यामुळे फ्रेंच लोकशाहीमध्ये टीकेच्या स्वातंत्र्यास महत्त्व आहे आणि चर्चमुळे या स्वातंत्र्यावर बंधन येते, म्हणून चर्चबद्दल लोकसत्तावादी टीका करतात. लोकसत्तावादी व चर्चसमर्थक यांतील विरोधाची मुळे खोलवर रूजलेली होती. क्रांतिपूर्व काळात चर्च व राजेशाही यांची भूमिका एकमेकांस पूरक होती. त्यामुळे राजेशाही उलथणारे लोक व त्यांचे प्रजासत्ताकवादी वारस हे आपलेही शत्रू आहेत, असे चर्चच्या समर्थकांना वाटल्यास नवल नाही. एकोणिसाव्या शतकातील राजकीय आणि सामाजिक उद्दिष्टांच्या संघर्षात चर्चने नेहमी राजेशाहीवाद्यांना पाठिंबा दिला. क्रांतीमध्ये चर्चला असलेले अनेक अधिकार व सोयी काढून घेण्यात आल्या. तिसऱ्या प्रजासत्ताकाविषयी त्यांच्या मनात अढी होती. याउलट लोकसत्तावाद्यांनी चर्चवर आघात करण्याची एकही संधी गमावली नाही. १८९२ पर्यंत कॅथलिक चर्चने तिसऱ्या प्रजासत्ताकाची अधिमान्यता मान्य केलेली नव्हती. चर्च हे एकाधिकार आणि अंधश्रद्धा यांचे प्रतीक आहे, असे त्यांना वाटे. ते स्वतःला बुद्धिवादी व लोकसत्तेचे समर्थक समजत. चर्चचा प्रश्न विसाव्या शतकात शिक्षणाचे रूपाने पुढे आला. सुरुवातीस चर्चने चालविलेल्या शाळांतून धार्मिक शिक्षण देणे बंद करावे, असा लोकसत्तावाद्यांनी आग्रह धरला. अशा शाळांना सरकारी अनुदान देताना अनेक जाचक अटी घालण्यात आल्या (१९७१). खरे तर, असे अर्थसाहाय्य देण्यासच त्यांचा विरोध होता. फ्रेंच जनतेच्या राजकीय वर्तनावर परिणाम करणाऱ्या घटकांत धर्म हा एक प्रमुख घटक आहे, हे कदापि विसरता येणार नाही. अजूनही चर्च व धार्मिक पीठे यांना राजकीय महत्त्व आहे. धर्मनिरपेक्षतावादी लोक धर्माधिकारविरोधी भूमिका घेतात. १९६५ च्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये धर्म हा एक महत्त्वाचा प्रश्न होता.

औद्यागकि क्रांतीची प्रक्रिया इंग्लंडच्या मानाने फ्रान्समध्ये बरीच उशिरा सुरू झाली. फ्रान्सच्या अर्थकारणात लहान शेती व लघुउद्योग यांना महत्त्वाचे स्थान रहिले. त्यांत गुंतलेले लोक मतदारांमध्ये बहुसंख्य असत तथापि त्यांची शासनाकडून फार मोठी अपेक्षा नसे. लोकप्रतिनिधीने नोकरशाहीपासून आपल्या हिताचे रक्षण करावे, एवढीच त्यांची अपेक्षा असे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या मंत्रिमंडळांतील बदलांचा त्यांच्या जीवनावर फारसा परिणाम होत नसे. अशा या दुर्बल राजवटीसमोर १९३० नंतरच्या दशकात जागतिक आर्थिक मंदी तसेच साम्यवादी व नाझी सत्तांचा धोका, अशी नवी आव्हाने एकदमच उभी ठाकली. विसाव्या शतकात नागरिकीकरणास व औद्योगीकीकरणास थोडा वेग आला आणि नागरी लोकांची व मजुरांची संख्या हळूहळू वाढत गेली. त्यांतून नवे प्रश्न निर्माण झाले. या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी स्थिर व खंबीर शासनाची आवश्यकता होती. असे शासन निर्माण होणे, तिसऱ्या प्रजासत्ताकात कठीण होते. त्यामुळे या राजवटीवर परंपरावादी व नाझीसमर्थकांप्रमाणेच समाजवाद्यांनीही हल्ला केला. फ्रान्सचे औद्योगिकीकरण झाले असले, तरी ते‌थील शेती ही मध्यम व लहान शेतकऱ्‍यांच्या हाती आहे उद्योगही लहान असून ते कुटुंबाच्या हाती आहेत. तिसऱ्या (१८७०–१९४०) व चौथ्या (१९४६–१९५८) प्रजासत्ताकांच्या कालखंडात सत्ताधारी पक्ष अशा लोकांच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांनी या प्रकारच्या अर्थव्यवस्थेस साहाय्य केले. इंग्लंड, जर्मनी, हॉलंड इ. यूरोपीय देशांच्या मानाने फ्रान्स औद्योगिक दृष्ट्या मागासला राहण्याचे हे एक कारण आहे.

दुसऱ्या महायुद्धकाळात फ्रान्सची पीछेहाट होत असताना मार्शल ⇨ फिलिप पेतॅं याच्या हाती सत्ता सोपविण्यात आली. त्याने जर्मनीशी तह करून नवे संविधान अंमलात आणले. ही राजवट नाझी हुकूमशाही नमुन्यावर आधारलेली होती (१९४०–१९४४). महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यावर गनिमी प्रतिकारकाचा नेता द गॉल याने नवे संविधान तयार होईपर्यंत सत्ता सांभाळली (१९४४–१९४६). फ्रान्सचे युद्धोत्तर संविधान हे समाजवादी पक्ष व क्रिस्त्यां देमोक्रात यांच्यातील देवाणघेवाणीतून आकारले व चौथ्या प्रजासत्ताकाचा कालखंड (१९४६–१९५८) सुरू झाला. त्यात अध्यक्षाचे स्थान प्रबळ करण्याऐवजी संसदेच्या अधिकारांवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला फारसे यश मिळाले नाही. या नव्या राजवटीत सर्व राजकीय पक्षांनी साम्यवादी पक्षास जवळजवळ वाळीत टाकले. स्वल्पतंत्रसत्तावादी पक्षांचा तर या राजवटीस विरोध होताच. यामुळे काही मध्यममार्गी पक्षांतूनच आघाडीचे सरकार बनविणे भाग पडे. अतिरेकी डाव्या व उजव्या पक्षांच्या कायम विरोधी गटांस मध्यममार्गी पक्षांतील काही असंतुष्ट गट मिळाले की सरकार कोसळे. चौथ्या प्रजासत्ताकाच्या काळात देशांतर्गत व परराष्ट्रनीतीसंबंधी अनेक प्रश्नांना तोंड देण्यात यश आले तरी अल्जीरिया या फ्रेंच वसाहतीस स्वातंत्र्य देण्याच्या प्रश्नावरून पेचप्रसंग निर्माण होऊन यादवी युद्धाचा धोका निर्माण झाला. अल्जीरियात वास्तव्य असलेले फ्रेंच लोक व सैनिक नेते यांचा अल्जीरियास स्वातंत्र्य देण्यास विरोध होता. यादवी युद्धाचा धोका टाळण्यासाठी द गॉल याला पाचारण करण्यात आले व चौथ्या प्रजासत्ताकाचा शेवट झाला (१९५८). द गॉल याने मीशेल दब्रे याच्या साहाय्याने नव्या संविधानाचा मसुदा तयार केला. त्यावर सार्वमत घेण्यात आले. २८ ‌सप्टेंबर १९५८ रोजी ७९% मतदारांनी त्यास संमती दर्शविली. १७८९ नंतरच्या फ्रान्सच्या राजकीय इतिहासात सर्वांत जास्त लोकांच्या संमतीवर आधारलेले हे संविधान होय. हे संविधान त्याच्या विरोधकांना अनेकदा निवडणुका व लोकमत यांच्या रूपाने राज्यकारभाराची संधी मिळूनही टिकून राहिले. १९५८ नंतर चौदा वेळा (तीन अध्यक्षीय व सहा संसदेच्या निवडणुका आणि ६ सार्वमते) लोकमताने संविधानाच्या समर्थकांस पाठींबा दिला आहे, तर फक्त एकदा (१९६९) वरिष्ठ गृहाच्या पुनर्घटनेच्या आणि प्रादेशिक प्रशासकीय सुधारणेच्या प्रश्नावर त्याच्या समर्थकांचा पराभव झाला होता. १९६८ व १९६९ मधील राजकीय पेचप्रसंग व द गॉल याचा राजीनामा यानंतरही ते टिकून राहिले आहे.

या संविधानानुसार अस्तित्वात असलेल्या शासनव्यवस्थेचे वर्णन अध्यक्षीय नेतृत्व असलेली संसदीय पद्धती असे करता येईल. संसदेच्या रूपाने व्यक्त होणारे जनतेचे सार्वभौमत्व आणि परिणामकारक राजकीय नेतृत्वाची निकड यांच्यातील द्वंद्व तिसऱ्या व चौथ्या प्रजासत्ताकांच्या कालखंडांत सोडविता आले नव्हते. राष्ट्राच्या धोरणाची आखणी व निदेशन करण्याचे काम शासनाचे होते. संविधानाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे, हे पाहण्याची जवाबदारी अध्यक्षाची होती. पाचव्या लोकसत्ताकामध्ये अध्यक्षानेच धोरण आखण्याची जबाबदारी पतकरली. यामुळे शासनाच्या या दोन अंगांत असमतोल निर्माण झाला. संसद ही पक्षीय स्पर्धेचा आखाडा बनली. मंत्रिमंडळे अल्पायुषी ठरली व राजकीय अस्थैर्य वाढले. तिसऱ्या प्रजासत्ताकाच्या कालखंडात ९९ वेळा मंत्रिमंडळे बदलली व ४४ पंतप्रधानांनी अधिकारपदे सांभाळली. चौथ्या प्रजासत्ताकाच्या १२ वर्षाच्या कारकीर्दीत २५ मंत्रिमंडळे अस्तित्वात आली आणि १९ व्यक्तींनी पंतप्रधानपद भूषविले. या दोन्ही कालखंडांत कार्यकारिणीपेक्षा संसदेस प्राधान्य मिळाले होते आणि मंत्रिमंडळांवर तिचा वरचष्मा असे. विद्यमान संविधानानुसार ही स्थिती पालटली आणि संसदेस दुय्यम स्थान मिळाले आहे. परिणामतः १९५८ नंतरच्या दोन दशकांत फक्त तीन राष्ट्राध्यक्ष व सात पंतप्रधानांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली.


पाचव्या प्रजासत्ताक राजवटीत राष्ट्राध्यक्ष व मंत्रिमंडळ यांना प्रमुख स्थान आहे. मंत्रिमंडळ आणि संसद यांचे संबंध तपशीलवार निश्चित करण्यात आले. सुरुवातीस अध्यक्षाची निवड अप्रत्यक्षपणे होत असे. १९६२ मध्ये सार्वमत घेऊन ही पद्धत बदलण्यात आली. आता त्याची निवड दर सात वर्षांनी जनतेकडून प्रत्यक्ष मतदानाने हाते. यामुळे संसदेच्या तुलनेत त्याचे स्थान जास्त प्रतिष्ठेचे होऊन त्याच्या धोरणांना अधिक मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे. पहिल्या फेरीत जर एकंदर मतदानाच्या अर्ध्याहून अधिक मते कोणास मिळाली नाहीत, तर सर्वाधिक मते मिळविणाऱ्या व निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पहिल्या दोन उमेदवारांतून निवड करण्यासाठी दोन आठवड्यांनंतर पुन्हा दुसऱ्या फेरीचे मतदान घेण्यात येते. राष्ट्राध्यक्षास पंतप्रधान व दोन्ही सभागृहांच्या सभापतीच्या सल्ल्याने कनिष्ठ गृह (नॅशनल असेंब्ली) बरखास्त करता येते. फक्त आणीबाणीच्या काळात व कनिष्ठ गृहाच्या पहिल्या वर्षात हे करता येत नाही. लोकशाहीस तसेच देशाच्या स्वातंत्र्यास व सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास पंतप्रधान व दोन्ही सभापती यांच्या सल्ल्याने राष्ट्राध्यक्ष आणीबाणी जाहीर करून आपल्या परमाधिकारांचा वापर करू शकतो. १९६१ मधील वसाहतींमधील लष्करी उठावास तोंड देण्यासाठी या तरतुदीचा वापर करण्यात आला होता. एखाद्या विवाद्य प्रश्नावर सार्वमत घेण्याचे अधिकारही राष्ट्राध्यक्षास देण्यात आले आहेत. १९८० पर्यंत सहा वेळा असे सार्वमत घेण्यात आले आहे.

पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांची नेमणूक राष्ट्राध्यक्ष करतो. नेमणूक झाल्याबरोबर आपले धोरण आणि कार्यक्रम संसदेचा विश्वास संपादनासाठी पंतप्रधानास सादर करावा लागतो. राष्ट्राध्यक्ष आणि मं‌त्रिमंडळ यांच्या कार्यक्षेत्राविषयी बराच काळ अनिश्चितता होती. धोरण ठरविण्याचे काम पंतप्रधानाने करावे आणि शासनव्यवस्था सुरळीतपणे कार्य करते की नाही हे फक्त राष्ट्राध्यक्षाने पहावे, असा एक मतप्रवाह होता. त्यानुसार फक्त पेचप्रसंग निर्माण झाल्यासच राष्ट्राध्यक्षाने लवादाची भूमिका पार पाडावी. दैनंदिन राज्यकारभाराची दखल घेऊ नये. झाक शांबा-देल्मा (कार. १९६९–१९७२) या पंतप्रधानाने राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यातील कामाची वाटणी कशी असावी, हे सांगताना परदेशनीती, संरक्षणव्यवस्था आणि फ्रेंच वसाहतींशी असलेले संबंध या प्रश्नांबाबत राष्ट्राध्यक्षांची खास जबाबदारी असावी आणि इतर सर्व क्षेत्रे मंत्रिमंडळाकडे म्हणजे पर्यायाने पंतप्रधानाकडे असावीत, असे म्हटले आहे. द गॉलला मात्र ही भूमिका मान्य नव्हती असे दिसते. त्याने आपल्या आठवणीत नमूद केले आहे, ‘‘की कोणतेही विशिष्ट क्षेत्र त्याच्यासाठी असे राखून ठेवलेले नव्हते तसेच कोणत्याही प्रश्नाकडे त्याने दुर्लक्षही केले नाही’’. अल्जीरियाच्या स्वातंत्र्यासारख्या प्रश्नावर त्याने लक्ष केंद्रित केले खरे परंतु चर्चने चालविलेल्या शाळा, कृषिविषयक धोरण, अंदाजपत्रक इ. विषयांतही त्याने रस घेतला. तो अनेक धोरणाविषयक निर्णय आपल्या भाषणांतून किंवा पत्रकारपरिषदांतून जाहीर करी. तसेच इतर देशांच्या नेत्यांशीही वाटाघाटी करी. राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्राचा सर्वोच्च नेता मानला जावा, यासाठी त्याने संविधानात दुरुस्ती करून, तो जनतेकडून प्रत्यक्षपणे निवडला जावा अशी योजना केली. एकंदरीत राष्ट्राध्यक्षाने सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यात सहभागी व्हावे, तसेच शासनाचे नेतृत्व करावे, असे त्याचे मत होते. राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख तर आहेच पण प्रत्यक्षात शासनाचा प्रमुखही आहे. द गॉलनंतरच्या दोन राष्ट्राध्यक्षांनीही हीच परंपरा पाळली. उदा., कनिष्ठ गृहात विश्वासदर्शक विजय मिळवूनही राष्ट्राध्यक्ष झॉर्झ पाँपिदूने पंतप्रधान शाबां-देल्मा यास राजीनामा देण्यास भाग पाडले होते (१९७२).

मंत्री हे संसदेस सर्वसाधारणपणे जबाबदार असतात परंतु ते संसद सदस्य राहू शकत नाहीत. संसदेला मंत्रिमंडळाविरुद्ध निंदाव्यंजक ठराव करता येतो किंवा विश्वास नाकारता येतो. एखाद्या खासदाराची मं‌त्रिपदावर नेमणूक झालीच, तर त्यास ३० दिवसांच्या आत संसद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिपदाच्या मोहापायी खासदारांनी मंत्रिमंडळे पाडू नयेत, असा उद्देश या मागे आहे. बहुपक्ष पद्धतीमुळे मंत्रिमंडळ अनेक पक्षांचे वा गटांचे मिळून होते परंतु मंत्र्यांनी सांघिक भावनेने काम करावे, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात वेगवेगळ्या पक्षांच्या मंत्र्यांत धोरणविषयक मतभेद व पक्षीय अभिनिवेश दिसून येतातच. सुरुवातीस बरेच मंत्री हे सनदी सेवेतील अधिकाऱ्‍यांतून निवडले जात परंतु पाँपिदू पंतप्रधान झाल्यावर (कार. १९६२–६८) पुन्हा राजकीय नेत्यांची मंत्रिपदी नेमणूक होऊ लागली आणि १९६७-६८ नंतर खासदारांतून मंत्री निवडले जाऊ लागले. तरीही १९५८ नंतरचे अनेक पंतप्रधान सनदी सेवेतील नोकर होते, ही गोष्ट लक्षणीय आहे.

आज फ्रान्समध्ये जी राज्यपद्धती अस्तित्वात आहे, ती अध्यक्षीय-संसदीय आहे व काही अंशी प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीचीही आहे. राष्ट्राध्यक्ष हा केवळ लवादाची भूमिका पार पाडत नाही किंवा त्याच्यासाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रापुरताच कारभार पाहत नाही. तो नेता आहे, धोरण निर्माता आहे, सरकारच्या धोरणाला व कारभाराला दिशा व गती देणारा आहे. द गॉल याने आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत हे दाखविले आहे परंतु संविधानाप्रमाणे धोरण ठरविण्याची जबाबदारी सरकारची असून अध्यक्षाच्या निणर्यावर मंत्र्यांची सही लागते आणि मंत्री संसदेला जबाबदार आहेत. संसद बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहे पण तो अधिकार पंतप्रधान आणि दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष यांच्या संमतीनेच वापरण्यात येतो. अशा प्रकारे ही व्यवस्था संसदीय आहे. याशिवाय सार्वमत घेण्याची योजना असल्यामुळे काही अंशी प्रत्यक्ष लोकशाहीची तरतूद आहे. द गॉल याच्या कारकीर्दीत त्याने राष्ट्राध्यक्षाला असलेले सर्व अधिकार वापरले. दुसऱ्या कोणालाही ते त्याच स्वरूपात वापरता येतील असे नाही. देशातील परिस्थिती आणि राजकीय पक्षसंघटनांमधील मतप्रवाह यांवर ते अवलंबून राहील. फ्रेंच संसदेची परंपरा आपल्या हक्कांना जपण्याची असल्यामुळे सबळ कारणांशिवाय संसद सदस्य आपले हक्क राष्ट्राध्यक्षाचे स्वाधीन होऊ देणार नाहीत.

संविधान समितीचे अधिकार पाचव्या प्रजासत्ताकामध्ये काही प्रमाणात वाढले आहेत. त्यामध्ये भूतपूर्व राष्ट्राध्यक्षाशिवाय राष्ट्राध्यक्ष व कनिष्ठ गृह आणि वरिष्ठ गृह यांचे अध्यक्ष यांनी नेमलेले प्रत्येकी तीन असे नऊ सदस्य नऊ वर्षांसाठी असतात. दर तीन वर्षांनी त्यांपैकी एक तृतीयांश निवृत्त होतात. या मंडळाचा अध्यक्ष राष्ट्राध्यक्षाकडून नेमला जातो. त्याची कार्ये खालीलप्रमाणे : अध्यक्षीय निवडणुकीची देखरेख, संसदीय निवडणुका आणि सार्वमत यांसंबंधीचे वाद सोडविणे कायदे (संविधानात्मक व इतर) संसदीय कामकाज पद्धतीचे नियम आंतरराष्ट्रीय करार शासन व संसदेमधील वाद इत्यादींच्या संवैधानिकतेबद्दल सल्ला देणे अध्यक्षाला त्याचे संकटकालीन अधिकाराबद्दल आणि तो योजू इच्छित असलेल्या उपायांबद्दल सल्ला देणे. याचे निर्णय बंधनकारक असतात. संविधानमध्ये करावयाच्या दुरुस्त्या संसदेच्या दोन्ही गृहांमध्ये मंजूर व्हाव्या लागतात. संविधान समितीने त्याची संवैधानिकता मंजूर केल्यानंतरच ती दुरुस्ती कार्यवाहीत येते. त्याबाबतचा पुढाकार पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून राष्ट्राध्यक्ष आणि संसदेचे सदस्य घेतात. सार्वमतामध्ये मंजुरी मिळाल्यानंतरच दुरुस्ती अंतिम होते परंतु सार्वमताऐवजी दुरूस्तीचे विधेयक संसदेच्या संयुक्त अधिवेशनापुढे राष्ट्राध्यक्ष ठेवू शकतो. मात्र अशा वेळी संसदेमध्ये तीन पंचमांश मतांनी ते मंजूर व्हावे लागते. प्रजासत्ताकपद्धती ही संशोधनाचाच विषय होऊ शकत नाही. तसेच देशाच्या ऐक्याला विघातक अशी कोणतीही सूचना विचारात घेतली जात नाही.


पाचव्या प्रजासत्ताकात संसदेच्या स्थानाचे व अधिकारांचे अवमूल्यन झाले आहे. संसदेत कनिष्ठ व वरिष्ठ अशी दोन गृहे आहेत. कनिष्ठ गृहाचे एकूण सभासद ४९१ असून ते प्रतयक्ष मतदानाने निवडले जातात. एकसदस्य मतदारसंघातून ४७४ उमेदवार तर १२ सभासद फ्रेंच वसाहती आणि ५ सभासद फ्रेंच परदेशीय भूप्रदेशांतून निवडले जातात. उमेदवारांपैकी सर्वांत जास्त मते मिळविणारा उमेदवार निवडला जाते मात्र त्याला नोंदलेल्या मतदारांपैकी किमान २५ टक्के मते मिळाली पाहिजेत. पहिल्या फेरीत कोणासही बहुमत मिळाले नाही, तर एक आठवड्यानंतर पुन्हा मतदान होऊन सर्वाधिक मते मिळविणारा निवडून येतो. कनिष्ठ गृहाची मुदत पाच वर्षाची असते. वरिष्ठ गृहामध्ये २७७ सभासद असून त्यांपैकी १२ फ्रेंच वसाहती व ६ फ्रेंच भूप्रदेश यांतील असून उरलेले फ्रान्सच्या मतदार संघातून निवडले जातात. दर तीन वर्षांनी कनिष्ठ गृहातील एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात व तेवढ्याच सभासदांची निवड होते. प्रत्येक विभागातील (डिपार्टमेंटमधील) विभागीय परिषद सदस्य, विभागातील नगरसेवक व विभागांतून निवडलेले कनिष्ठ गृहाचे सदस्य यांच्यातून वरिष्ठ गृहाचे सभासद ९ वर्षासाठी निवडले जातात. चारहून अधिक सदस्य निवडणाऱ्या विभागात प्रमाणशीर पद्धतीने मतदान होते. वरिष्ठ गृहामध्ये ग्रामीण भागास थोडे अधिक प्रतिनिधत्व मिळाले आहे. सर्वसाधारणपणे दोन्ही गृहांस समान कायदेविषयक अधिकार आहेत. दोन्ही गृहांत मतभेद निर्माण झाल्यास आणि मंत्रिमंडळाची इच्छा असल्यास तडजोड घडवून आणण्यासाठी संयुक्तसमिती स्थापन करण्यात येते. समितीने सुचविलेली तडजोड अमान्य झाल्यास सभेचा निर्णय ग्राह्य मानण्यात येतो. वरिष्ठ गृहामध्ये गॉलिस्टविरोधी पक्षांना बहुमत मिळत गेल्याने असे प्रसंग वारंवार येत होते. वरिष्ठ गृहामध्ये १९६७ मध्ये फक्त ११% तर १९७० मध्ये १३% सभासद गॉलिस्ट होते. याच काळात कनिष्ठ गृहामध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४०% व ६०% असे होते. वरिष्ठ गृहाने गॉलिस्ट शासनाशी असहकाराची भूमिका स्वीकारली, तर मंत्रिमंडळांनी वरिष्ठ गृहाकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अंगीकारले. वरिष्ठ गृहाच्या या असहकारी धोरणाच्या अनुभवामुळे १९६९ मध्ये द गॉलने वरिष्ठ गृहाची पुनर्रचना करून त्यास फक्त सल्लागाराची भूमिका देण्याचा प्रयत्न केला तथापि त्यासाठी योजलेल्या संविधान संशोधनावर घेतलेल्या सार्वमतात ही योजना फेटाळण्यात आली आणि द गॉलने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला (२८ एप्रिल १९६९). संविधानने संसदेचे विधिविषयक अधिकार मर्यादित केले. संसदेने केलेल्या कायद्याचा तपशील मंत्रिमंडळ ठरवू शकते, एवढेच नव्हे, तर संसदेस नेमून दिलेल्या क्षेत्राबाहेरील विषयांवर स्वतः नियम बनवू शकते. एखादा विषय कोणाच्या अधिकारात येतो, याविषयीचा निर्णय संविधान समिती देते.

संसद काही काळासाठी आपला कायदा करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाकडे सुपूर्द करू शकते. मुदत संपण्यापूर्वी असे वटहुकूम संसदेने मान्य केल्यास ते कायम होतात. असे वटहूकूम काढण्यापूर्वी कौन्सिल ऑफ स्टेटचा (फ्रान्समधील सर्वोच्च प्रशासकीय न्यायालय) सल्ला घेतला जातो. १९६७ पर्यंत नऊ वेळा असा अधिकार मंत्रिमंडळास देण्यात आला. विशेषतः विद्यार्थ्यांच्या मागणीने सुरू झालेल्या १९६७-६८ च्या शैक्षणिक सुधारणांच्या राष्ट्रीय पेचप्रसंगास तोंड देण्यासाठी बऱ्याच मोठ्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रास लागू पडणारे वटहुकूम काढण्याचा अधिकार मंत्रिमंडळाने मागून घेतला होता कारण प्रत्येक विधेयकास संसदेची संमती मिळेल, याची त्यास खात्री नव्हती.

कनिष्ठ गृहाला शासनाविरूद्ध अविश्वासदर्शक किंवा निंदाव्यंजक प्रस्ताव मंजूर करता येतो. पंतप्रधान एखाद्या धोरणावर कनिष्ठ गृहाची विश्वासदर्शक संमती मागू शकतो. एखादे विधेयक किंवा निर्णय हा प्रतिष्ठेचा आहे, असे तो जाहीर करू शकतो. त्यावर २४ तासांचे आत विरोधी खसदारांनी (सभासदसंख्येच्या संमतीने) निंदाव्यंजक ठराव मांडून तो ४८ तासानंतर एकंदर सभासदसंख्येच्या बहुमताने मंजूर झाल्यास पंतप्रधानास राजीनामा द्यावा लागतो. असा ठराव मांडण्यात आला नाही वा तो केवळ हजर असलेल्या सभासदांतील बहुमताने मंजूर झाला, तर शासनाचा निर्णय किंवा विधेयक मंजूर झाले, असे मानण्यात येते. असा ठराव कनिष्ठ गृहाच्या सभासदास स्वतः होऊनही अधिवेशनात एकदा मांडता येतो. प्रत्यक्षात १९५८ ते १९७२ दरम्यान असे १९ ठराव (त्यांपैकी आठ वेळा पंतप्रधानांच्या मागणीवरून) मांडण्यात आले. काही वेळा (१९६०, १९६२ व १९६६) हे ठराव राष्ट्राध्यक्षाच्या धोरणास आव्हान देण्यासाठीही मांडण्यात आले होते. १९६२ मध्ये अशा प्रकारे मांडलेला ठराव मंजूरही झाला व पंतप्रधानाने राजीनामा सादर केला परंतु तो न स्वीकारता द गॉलने सभा बरखास्त केली. पाचव्या प्रजासत्ताकामध्ये शासनाचा अधिकार रक्षिण्यासाठी या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

संसदेच्या दैनंदिन कामकाजाच्या बाबतीतही मंत्रिमंडळास बरेच अधिकार आहेत. संसदेची कार्यक्रमप‌त्रिका मंत्रिमंडळ ठरविते. अर्थातच शासनाच्या कामकाजास त्यात अग्रकम मिळतो. मंजूर होणाऱ्या विधेयकांपैकी ऐंशी टक्के विधेयके मंत्रिमंडळाने किंवा त्याच्या संमतीने मांडलेली असतात. एखाद्या विधेयकावर कलमवार मतदान न घेता संपूर्ण विधेयक मतदानास टाकण्याचा अधिकार मंत्रिमंडळास आहे. यामुळे अशा विधेयकाच्या तपशीलात सभासदांना फेरबदल करता येत नाही. खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात व त्यांवर चर्चाही होऊ शकते पंरतु मंत्रिमंडळाच्या संमतीशिवाय कोणत्याही विषयावर ठराव करता येत नाही. वित्तीय विधेयक मंत्रीच मांडू शकतात. असे विधेयक ७० दिवसांत मंजूर झाले नाही तर मंत्रिमंडळ वटहुकूम काढून ते अंमलात आणू शकते.

संसद एकंदर सभासद संख्येच्या बहुमताने राष्ट्राध्यक्षावर देशद्रोहाचा आरोप ठेवू शकते परंतु त्याची सुनावणी व निर्णय सर्वोच्च ‌न्यायालय (हायकोर्ट ऑफ जस्टिस) करते. या न्यायालयात प्रत्येक सभागृहाचे समान प्रतिनिधी निवडलेले असतात.

दुभंगलेली कार्यकारिणी आणि प्रभावशाली राष्ट्राध्यक्ष ही पाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. द गॉलची राष्ट्राध्यक्षाच्या भूमिकेबद्दलची विचारसरणी आणि तो सत्तेवर येण्यास कारणीभूत झालेली परिस्थिती, यांमुळे ही व्यवस्था अस्तित्वात आली. १९६२ मधील राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसंबंधीच्या दुरुस्तीने वरील विचारसरणीस अधिमान्यता प्राप्त झाली परंतु त्यामुळे सार्वभौम लोकमत व्यक्त करणाऱ्या दोन (वेगवेगळ्या कालमर्यादांसाठी निवडलेल्या) संस्था अस्तित्वात आल्या. १९७० पासूनच्या शतकात बराचसा एकात्म व शिस्तपालक असा पक्ष वा पक्षांची युती राष्ट्राध्यक्षांच्या पाठीशी असल्यामुळे फारशा अडचणी निर्माण झाल्या नाहीत. राजकीय स्थैर्य व वाढते राहणीमान हे या राजवटीमुळेच शक्य झाले आहे, अशी जनधारणा आहे. संसदीय पद्धती टिकल्यामुळे डावे पक्ष, तर राष्ट्राध्यक्षासारख्या एका व्यक्तीच्या हाती सत्ता एकवटल्यामुळे उजवे पक्ष काहीसे समाधानी आहेत. १९६५ व १९७४ च्या निवडणुकांत मिळालेले यश पाहता आपल्या मताचा राष्ट्राध्यक्ष निवडून आणणे अशक्य नाही, असेही डाव्या पक्षांना वाटत असावे तथापि आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात डाव्या पक्षांनी संविधान दुरुस्तीस महत्त्वाचे स्थान दिले आहे, तेव्हा या राजवटीच्या कसोटीची वेळ अद्याप यावयाची आहे, असे म्हणावे लागते.


पक्षपद्धती : फ्रान्समधील पक्षपद्धती निरीक्षकाला गोंधळात टाकणारी आहे. या पद्धतीची सुरुवात एकोणिसाव्या शतकात झाली असली, तरी अद्याप पक्षसंघटना नियमितपणे संघटित, शिस्तबद्ध व दृढ झालेली नाही. याला अपवाद फक्त साम्यवादी पक्षाचाच म्हणावा लागेल. बाकीचे बहुतेक पक्ष सुरुवातीप्रमाणेच आजही सांगाडेवजा आहेत. वेळोवेळी अनेक नवे पक्ष उदयास येत असतात, तर काही अस्तंगत होतात. जुना पक्ष फुटून नवे पक्ष निर्माण होतात, तर काही वेळा जुने पक्ष एका नव्या छत्राखाली एकत्र येऊन काम करतात. फ्रान्समध्ये निरनिराळ्या प्रश्नांच्या किंवा घटनांच्या संदर्भात पक्ष निर्माण झाले आहेत. काही पक्षांनी मात्र त्यांची नावे बदलली असली, तरी जुना इतिहास आहे.

संसदीय निवडणुकीच्या वेळी फ्रेंच नागरिक ज्या पक्षांना मते देतात, त्यांचे संसदेबाहेर म्हणण्यासारखे काहीच कार्य नसते. पक्षांची राष्ट्रीय अधिवेशने होत असली, तरी त्यांचे कार्य बव्हंशी विधिमंडळामध्येच होत असते. निवडणुकीचे वेळी पक्षाच्या उमेदवारांना पक्षसंघटनेकडून आर्थिक साहाय्य मिळत नाही. साहजिकच पक्षसंघटनेच्या शिस्तीची किंवा नियंत्रणाची बांधीलकी पक्षसदस्य मानीत नाहीत. याची ठिकाणी साम्यवादी पक्षाचा अपवाद मानला पाहिजे. पक्षांची सभासदनोंदणी नेहमीच कमी राहिली आहे. १९७० मध्ये नोंदलेल्या १·९ कोटी मतदारांपैकी ५ लाखांपेक्षा जास्त मतदार कोणत्याही पक्षाचे सभासद नव्हते. एकूण मतदारांत ३ लाख साम्यवादी पक्षाचे सभासद होते. फ्रान्समधील पक्ष संघटनेमध्ये दुर्बल, व्यक्तीभोवती बांधलेले, विस्तार वाढवू पाहणारे पण शिस्तीचे बंधन विशेष न पाळणारे, इतरांपासून फरक दाखविण्यासाठी आपापले कार्यक्रम दृढ मतप्रणालीच्या स्वरूपात मांडणारे आणि अर्थशून्य पक्षांची नावे धारण करणारे, असेही पक्ष आहेत.

ऐतिहासिक परिस्थितीमुळे राजकीय पक्षांना आणि त्यांच्यामधील ध्रुवीकरणाला समर्थन प्राप्त होते. डावे आणि उजवे या संज्ञा फ्रेंच राजकारणाबाबत विशेषत्वाने वापरल्या जातात. ज्यांना राज्याने व्यक्ती आणि समाज यांच्या जीवनामध्ये नियोजनपूर्वक नियंत्रण करून आर्थिक व सामाजिक विषमता कमी करावी, सामाजिक सुरक्षा व कल्याण यांसाठी व्यक्तिस्वातंत्र्यावर जरूर तर मर्यादा घालावी, धर्म व राज्य यांची क्षेत्रे परस्परांपासून जरूर तर मर्यादा घालावी, धर्म व राज्य यांची क्षेत्रे परस्परांपासून वेगळी असल्यामुळे धर्मनिरपेक्ष राजकीय सत्तेचे क्षेत्र धर्माच्या बंधनापलीकडे असावे, एवढेच नव्हे तर जरूर तेथे धार्मिक क्षेत्राचे नियंत्रण करण्याचा अधिकारही राज्याला असावा (उदा., धर्मपीठांमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांचे नियंत्रण) असे वाटते ते ‘डावे’ समजले जातात. याउलट व्यक्ती आणि समाज यांचे जीवन राज्याच्या नियंत्रणापासून मुक्त असावे, व्यक्तिस्वातंत्र्याचे क्षेत्र जास्तीतजास्त व्यापक असावे, राज्य हे प्रतिबंधक आवश्यक कर्तव्ये करण्यापुरतेच असते आणि धर्माच्या क्षेत्रात राज्याची ढवळाढवळ चालू नये, अर्थव्यवस्थेवरही राज्याने नियोजन, नियंत्रणादी बंधने लावू नयेत, असे ज्यांना वाटते ते ‘उजवे’ समजले जातात. ढोबळमानाने समाजवादी, साम्यवादी, जहाल (काही गट) यांची ‘डाव्या’त गणना होते तर पुराणमतवादी, राजेशाहीवादी, मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारे व नियोजन-नियंत्रणाला विरोध करणारे, धर्मपीठांचा अधिकार व त्यांचे क्षेत्र स्वायत्त ठेवण्याचा आग्रह धरणारे, अशांची ‘उजव्या’ त गणना होते. फ्रान्समध्ये डावे व उजवे यांमधील फरक कधीच स्पष्ट झाला नाही. द गॉल याने अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, त्यास पाठिंबा देणाऱ्‍यांत उजवे होते तसेच डावेही होते आणि त्यानंतरही त्याचे अनुयायी असलेले काही डावे व काही उजवे होते. याचा परिणाम असा झाला की फ्रान्समध्ये राजवटीचे स्वरूप कधीच केवळ ‘डाव्या’ पक्षांचे किंवा केवळ ‘उजव्या’ पक्षांचे असे न राहता बहुतेक वेळा मध्यममार्गी राहिलेले आहे.

गॉलिस्ट पक्ष पाचव्या प्रजासत्ताक नवा परंतु संसदेच्या निवडणुकीत इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त पाठिंबा मिळालेला पक्ष होता. पूर्वी युनिआँ पुर ला नुव्हॅल रेप्युब्लिक (यूएनआर्‌) या नावाने ओळखला जाणारा हा पक्ष नंतर युनिआँ दे देमोक्रात पुर ला सॅंकिएम रेप्युब्लिक (यूडीआर्‌) या नावाने ओळखला जाऊ लागला. १९५८ पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत याला इतरांपेक्षा जास्त आणि पूर्वीपेक्षा अधिक मते मिळाली. गॉलिस्ट पक्षाने संसदेबाहेर संघटना बांधली नसली, तरी संसदेमध्ये साम्यवादी पक्षासारखीच शिस्त पाळण्याची कोशीस केली. सुरुवातीला उजव्या पक्षांचा पाठिंबा असलेल्या या पक्षाचे स्वरूप उत्तरोत्तर राष्ट्रीय होत गेले. कामगारवर्गामध्ये या पक्षाने पाठिंबा मिळविला. द गॉल सत्तेवर असेतोपर्यंत त्याला व्यक्तीशः पाठिंबा देणे व त्याने पुरस्कारलेले धोरण उचलून धरणे, हे या पक्षाचे मुख्य सूत्र होते. द गॉलच्या राजीनाम्यापूर्वी झॉर्झ पाँपिदू याने पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्याने द गॉलनंतरच्या काळात पक्षाचे संग्राहक स्वरूप कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.

गॉलिस्टांशिवाय सहकार्य करणाऱ्या गटांमध्ये फेदेरासियाँ नास्यॉनाल दे रेप्युब्लिकॅं अँदेपाँदाँ (आर्‌आय्‌) व साँत्र देमोक्रात हे प्रमुख होत. आर्‌आय्‌ हे पक्षरहित निवडून आलेले राजकारणी लोक होत. त्यांचा दृष्टिकोन नेमस्त पुराणमतवादी होता. त्यांनी गॉलिस्टांबरोबर सहकार्य करून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रवेश केला होता. साँत्र देमोक्रात लोक हे पूर्वीच्या मुव्हमाँ रेप्युब्लिकॅं पॉप्युलरचे वारस होत. दुसऱ्या महायुद्धानंतर एम्‌आर्‌पी हा पक्ष उदार कॅथलिक लोकांचा सुसंघटित पक्ष होता व यूरोपच्या एकीकरणावर त्याचा भर होता. गॉलिस्टांच्या परराष्ट्रीय धोरणास विरोध करण्याचे ठरविल्यावर या पक्षाचे पाठबळ कमी झाले. वरिष्ठ गृहाचा अध्यक्ष अलँ पोहे हा या गटाचा प्रमुख नेता होता. द गॉलविरुद्ध १९६५ च्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये फ्रान्स्वा मीत्तरां हा जहाल व समाजवादी, यांच्या निवडणूक समझोत्याच्या पाठिंब्यावर उभा होता. फेदेरासियाँ द ला गोश देमोक्रात ए सोस्यालिस्त (एफ्‌जीडीएस्‌) या नावाने हा समझोता झाला. जहाल हे तिसऱ्या प्रजासत्ताकामध्ये विशेष पुढे होते. मध्यमवर्गाचा हा पक्ष कॅथलिक देशांमध्ये चर्च आणि राज्य यांचे कार्यक्षेत्र भिन्न असावे, असे वाटत असल्यामुळे ते ‘डाव्या’ बाजूच्या पक्षांत सामावले गेले. अतिडाव्या आणि अतिउजव्या टीकाकारांपासून प्रजासत्ताकाच्या तत्वांचे संरक्षण करणे, हे त्यांचे मुख्य कार्य होते.

समाजवादी गट भांडवलशाही समाजाऐवजी समाजवादी राष्ट्रकुटुंबाची स्थापना चाहतो. यूरोपीय समाजवादी पक्षांशी तुलना करता फ्रेंच समाजवाद्यांना कामगारवर्गाचा विशेष पाठिंबा नाही. फ्रान्सच्या काही भागात या पक्षाची संघटना मजबूत असून आपल्या उमेदवारांमध्ये मतदानाची शिस्त हा पक्ष राखू शकला.

गॉलिस्ट राजवटीला विरोध आणि मतदारांच्या पाठिंब्यातील घसरण यांमुळे १९६८ मधील निवडणुकीच्या वेळी रिपब्लिकन व समाजवादी या पक्षांना एकत्र यावयास लावले. त्यांना सर्व भागांत पाठिंबा मिळाला पण एकूण मते १६ टक्केच पडली. परराष्ट्रीय धोरणामध्ये फेदेरासियाँ द ला गोश देमोक्रात ए सोस्यालिस्त यांचा कल यूरोपीय एकीकरणाचे धोरण दक्षतेने कार्यवाहीत आणण्याचा आहे.

दुसऱ्या महायुद्धापासूनच्या काळात पार्ती कॉम्युनिस्त फ्राँसॅ (पीसीएफ्‌) या फ्रेंच साम्यवादी पक्षास २० टक्क्यांपेक्षा कमी मते फक्त एकदाच (१९५८) मिळाली होती. सर्वसाधारणपणे मतदारसंघाच्या चौथा हिस्सा मते या पक्षाला पडली होती. त्याच्या पाठिंब्याचे मुख्य क्षेत्र पॅरिस सभोवतालचा संघटित कामगारवर्ग हे होते. मागासलेल्या ग्रामीण भागातही या पक्षाने पाठिंबा मिळविलेला आहे. बुद्धिवादी विचारवंतांवर या पक्षाचा प्रभाव आहे. १९४६ नंतरच्या कोणत्याही राजवटीत या पक्षाला सत्तेमध्ये सहभागी करण्यात आले नाही परंतु फ्रान्समधील काही नगरपालिका या पक्षाच्या अधिकाराखाली असून त्याने कार्यक्षम प्रशासनाबद्दल नाव मिळविले आहे. बरीच वर्षे रशियाच्या तंत्राने चालण्याचे सूत्र या पक्षाने स्वीकारले होते. त्यामुळे फ्रान्समधील इतर राजकीय पक्ष साम्यवादी पक्षाबरोबर सहकार्य करण्यास तयार नव्हते परंतु १९६५ पासून साम्यवादी पक्षाच्या धोरणात काही बदल दिसू लागला आहे. त्याने फेदेरासियाँ द ला गोश देमोक्रात ए सोस्यालिस्त या पक्षाबरोबर निवडणूक समझोता केला होता. ही युती १९६७ व १९७२ या निवडणुकांच्या वेळी अस्तित्वात होती परंतु १९७७ मध्ये ही युती मोडली. अतिजहाल भूमिका घेतली तर इतर पक्षाशी युती करता येत नाही व युती केल्यापशिवाय संसदेच्या आणि राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत यश मिळत नाही, अशा द्विधा मनोवस्थेत साम्यवादी पक्ष होता.

मार्च १९७८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय विधानसभेच्या निवडणुकीत पक्षोपपक्षांचे बळ पुढीलप्रमाणे होते :

पक्षाचे नाव मिळालेल्या मतांची टक्केवारी मिळालेल्या जागा
पार्ती कॉम्युनिस्त फ्राँसॅ

(पीसीएफ्)

१८·६२ % ८६
समाजवादी

(एस्एफ्‌डीओ)

२८·३१ % ११३
जहाल २·३४
रासाँब्लमाँ पुर ला

रेप्युब्लिक गॉलिस्ट

(आर्‌पीआर्)

२६·११ १५४
युनिआँ पुर ला

देमाक्रासी फ्राँसॅझ

(यूडीएफ्)

२३·१९ १२४
इतर १·४ १४
एकूण ४९१

न्यायव्यवस्था : फ्रेंच न्यायव्यवस्थेत दोन प्रकारची न्यायालये आहेत : (१) खाजगी, दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांसाठी आणि (२) प्रशासनाविरुद्ध नागरिकांच्या गाऱ्‍हाण्यांसाठी असलेली प्रशासकीय न्यायालये. पहिल्या प्रकारच्या न्यायालयात न्यायाधिशांकडून संहिताबद्ध संकलित (कोडिफाइड) कायद्यानुसार न्याय दिला जातो. हे न्यायाधीश स्वतंत्र व निःपक्षपाती असावेत, यासाठी त्यांची निवड स्पर्धात्मक परीक्षांतून केली जाते. पॅरिस येथे कोर्ट ऑफ सेसेशन असून त्याखाली प्रत्येक विभागासाठी एक किंवा दोन आणि प्रत्येक कौंटीसाठी काही प्रथम सुनावणीची न्यायालये असतात. गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्यात कायद्याचा योग्य अर्थ लावण्यासाठी तर दिवाणी खटल्यात वस्तुस्थितीची शहानिशा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत अपील (दाद) करता येते.

प्रशासकीय न्यायालयात कौन्सिल ऑफ स्टेट हे सर्वांत प्रमुख होय. हे शासनाचे विधिविषयक सल्लागारही असते. त्याचे अनेक विभाग असतात. त्यातील न्याय देणारे हे सरकारी अधिकारीच असतात. त्यांची पदोन्नती किंवा बदली ही इतर प्रशासकीय अधिकाऱ्‍यांच्या प्रमाणे व त्यांचेबरोबर होते. प्रशासनाशी त्यांचा सतत संपर्क असल्यामुळे प्रशासनातील उणिवांची त्यांना जास्त कल्पना असते. याचे निर्णय हे न्यायतत्त्वाच्या व आधीच्या दाखल्याच्या आधारे दिले जातात. त्यामुळे न्यायप्रक्रियेत बराच लवचिकपणा असतो. अनेकदा लोकपालांप्रमाणे हे नागरिकांच्या गाऱ्‍हाण्यांसंबंधीची चौकशी स्वतःच करतात. सरकारी हुकूम किंवा निर्णय हे कायदेशीर आहेत की नाहीत, हे ते ठरवितात. न्यायाधिकरणातून मिळणारा न्याय हा कमी खर्चाचा, विनाविलंब व निःपक्षपाती असतो, अशी ख्याती आहे. या न्यायालयाने दिलेला सल्ला बंधनकारक नसतो.

मोरखंडीकर, रा. शा.

संरक्षणव्यवस्था : जगातील अण्वस्त्रसज्ज असलेल्या पाच राष्ट्रांपैकी फ्रान्स हे चौथ्या क्रमांकाचे राष्ट्र आहे. त्यातील अमेरिका, रशिया, चीन व ब्रिटन ही इतर राष्ट्रे होत. ब्रिटन हे अण्वीय अस्त्रांसाठी अमेरिकेवर अवलंबून आहे. इतर पश्चिम यूरोपीय राष्ट्रांमध्ये परराष्ट्रीय धोरण, संबंध आणि संरक्षणनीती या बाबतीत फ्रान्स वैशिष्ट्यपूर्ण आहे.

दुसऱ्या महायुद्धातील अनपेक्षित पराभवामुळे फ्रान्सच्या जागतिक राष्ट्रश्रेणीतील पारंपरिक स्थानास व संरक्षणयंत्रणेस धक्का बसला. आग्नेय आशियामधील इंडोचायनातून [व्हिएटनाम, कंबोडिया (कांपूचिया), लाओस] नामुष्कीने घ्यावा लागलेला काढता पाय, अल्जीरियाच्या स्वातंत्र्यामुळे (३ जुलै १९६२) फ्रेंच संरक्षणदलात उत्पन्न झालेला असंतोष व राजकीय नेतृत्वावरील अविश्वास या घटनांचा परिणाम होऊन फ्रान्सच्या संरक्षणव्यवस्थेची आमूलाग्र पुनर्रचना करणे अत्यावश्यक ठरले. हे अवघड काम ⇨चार्ल्‌स गॉल फ्रान्सचा राष्ट्रपती (१९५८–६९) याने हाती घेतले. गॉलच्या धोरणाची काही सूत्रे पुढीलप्रमाणे होती : (१) संरक्षणशक्ती जनतेला न्याय देते व तिची नियती निश्चित करते (२) संरक्षणदृष्ट्या फ्रान्सला आत्मनिर्भर करण्यासाठी अण्वस्त्रे संपादित करणे (३) पश्चिम यूरोपातील अमेरिकेचा प्रभाव कमी करणे आणि (४) बहुराष्ट्रीय अशा कोणत्याही संरक्षणव्यवस्थेत शक्य तो सामील न होणे. या सूत्रांना अनुसरूनच फ्रान्सने पुढील गोष्टी केल्या : (१) आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र-प्रसारबंदी, अणुचाचणी-बंदी या करारांना मान्यता दिलेली नाही (२) फ्रान्स नाटो संघटनेतून बाहेर पडला (३) फ्रान्सच्या उद्दिष्टांना आणि हितसंबंधांना बाधक ठरणाऱ्या अमेरिकेच्या धोरणाला फ्रान्सने वेळोवेळी विरोध केला उदा., पश्चिम आशियातील अरब-इझ्राएल संघर्ष व (४) विकसनशील राष्ट्रांना शस्त्रास्त्रे व अणुउर्जानिर्मितिसाधने पुरविण्याचे धोरण फ्रान्सने कायम राखले. फ्रान्सचे एकेकाळचे साम्राज्य जरी नष्ट झाले असले, तरी आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट (७ ऑगस्ट १९६०), दाहोमी (बेनिन प्रजासत्ताक – १ ऑगस्ट १९६०), मादागास्कर (१४ ऑक्टोबर १९५८), मॉरिटेनिया (२८ नोव्हेंबर १९६०), नायजर (३ ऑगस्ट १९६०), सेनेगल (२० ऑगस्ट १९६०), चॅड (११ ऑगस्ट १९६०), टोगो (२७ एप्रिल १९६०), व गाबाँ (१७ ऑगस्ट १९६०) इ. देशांशी तसेच झाईरे या नवस्वतंत्र राष्ट्राशी फ्रान्सने करार करून अंतर्गत उठाव व परकीय आक्रमण यांपासून त्यांचे संरक्षण करण्याची हमी घेतली आहे. त्याप्रमाणे फेब्रुवारी १९६४ मध्ये गाबाँ व १९७८ मध्ये झाईरे, चॅड आणि आफ्रिकेतील अन्य राष्ट्रांना फ्रान्सने सैनिकी मदत केली होती.

फ्रान्समधील शस्त्रास्त्रनिर्मितिकार्याला पोषक होण्यासाठी आणि तिसऱ्या जगात मान्यता मिळविण्यासाठी फ्रान्स मोठ्या प्रमाणावर आधुनिक शस्त्रास्त्रे विकत असतो. त्याने भारताला ए.एम्‌.एक्स. रणगाडे (१९५७ – ५८), लढाऊ विमाने (१९५३–५७), ⇨ क्षेपणास्त्रे आणि ⇨ हेलिकॉप्टर (१९६०–६२) पुरविली. हेलिकॉप्टरचा कारखाना भारतात उभारण्यास (१९७०–७२) फ्रान्सची मदत झाली आहे. १९८० च्या अखेरीस ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांच्या खरेदी – उत्पादनाबाबत भारताने फ्रान्सशी बोलणी सुरू केली आहेत. पाकिस्तानला मिराज लढाऊ विमाने व विमानविरोधी प्रक्षेपणास्त्रे पुरविली आहेत. १९५० ते १९७२ या काळात भारतीय उपखंडातील राष्ट्रांना सु. तीस कोटी रुपये किंमतीची तसेच पश्चिम आशियाई व द. अमेरिकन राष्ट्रांना १ अब्ज २६ कोटी डॉलर्स किंमतीची रणसामग्री विकली. १९७५ पर्यंत पाकिस्तानला ‘डॉफ्ने’ पाणबुड्या व हेलिकॉप्टरही विकली. जनरल द गॉल राष्ट्रपती होण्यापूर्वी फ्रान्स नाटो संघटनेत सामील झाला होता परंतु गॉल हा राष्ट्रपती झाल्यावर १९६६ साली नाटो संघटनेतून त्याने फ्रेंच सैन्य परत घेतले व १९६७ साली नाटोची कार्यालये, भांडारगृहे, दळणवळण केंद्रे इ. फ्रान्समधून हलविण्यास भाग पाडले. भूराजनैतिक व सैनिकी कारवायांच्या दृष्टीने यूरोपात फ्रान्सचे हे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. फ्रान्स नाटोतून बाहेर पडल्यामुळे पश्चिम जर्मनी व दक्षिण यूरोप यांमध्ये एक मोठे अनिष्ट युद्धक्षेत्र निर्माण झाले. संरक्षणाच्या दृष्टीने जर्मनीचा पाडाव झाल्यावरच किंवा भूमध्य समुद्रातील नाटोच्या नाविक दलाचा पराभव झाल्यानंतरच फ्रान्सवर हल्ला होणे शक्य आहे हे खरे असले, तरी नाटोच्या मदतीशिवाय फ्रान्सला रशियाच्या लढाईस तोंड देता येणार नाही, हेही खरे आहे. कादारूस व प्येर्लांट येथे अणुउर्जा तसेच अणुउर्जानिर्मितीला लागणारे युरेनियम यांचे उत्पादन केले जाते. सबंध राष्ट्रात उपलब्ध संशोधक व वैज्ञानिक यांच्यापैकी अनुक्रमे सु. ५० टक्के संशोधक आणि ६० टक्के वैज्ञानिक, सैनिकी संशोधन व शस्त्रास्त्र-उत्पादन यांत गुंतलेले आहेत. फ्रान्समध्येच युरेनियमच्या खाणी आहेत. शिवाय गाबाँ व मादागास्कर ही राष्ट्रे त्याला युरेनियम पुरवितात. फ्रान्सच्या एअरोस्पेशिअल व डॅसॉल्ट या कारखान्यांत विमानांचे उत्पादन होते. प्रक्षेपणास्त्रे, रणगाडे [⟶ रणगाडा] हेलिकॉप्टर इत्यादींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. १९७५ पर्यंत दरवर्षी ८८ कोटी पौंड किंमतीची शस्त्रसामग्री फ्रान्स विकत असे. संरक्षण-उत्पादन कारखान्यांत सु. २,७०,००० कामगार होते.

फ्रेंच अण्वस्त्रे शत्रूच्या शहरांवर टाकून त्याला दहशत बसविण्यापुरती समर्थ आहेत. रशियाचे किंवा त्याच्या जोडीच्या इतर राष्ट्रांचे अण्वस्त्रतळ अण्वस्त्रबलाने नष्ट करण्याचे सामर्थ्य फ्रान्समध्ये नाही. त्यांचा उपयोग अल्प संरक्षणासाठीच किंवा वचक ठेवण्यासाठी संभवतो. फ्रान्सची मिराज बाँबफेकी विमाने आक्रमणाच्या दृष्टीने कालबाह्य झाली आहेत. त्याच्या अण्वीय पाणबुड्याच काय त्या वचक ठेवू शकतील. पारंपरिक सेनांचे स्वरूपही संरक्षणात्मक असल्यामुळे फ्रान्सला नाटो संघटनेचे सहाय्य घ्यावे लागेल, असे दिसते.

फ्रेंच सेनादलासंबंधीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे (१९७८ सालअखेर) : सैनिकसंख्या ५,०२,८०० राष्ट्रीय उत्पादन ३७४·८ बिलीयन डॉलर संरक्षणखर्च १७·५२ बिलीयन डॉलर. (१) दूरपरिणामी सेनाबळ (स्ट्रॅटेजिक फोर्स) : (अ) अण्वस्त्रयुक्त पाणबुड्या ४ (प्रत्येकी १६ अण्वस्त्रे), (आ) मध्यम पल्ल्याची अणू प्रक्षेपणास्त्रे १८ (इ) बाँबफेकी विमाने–मिराज ४९ (२) भूसेना : सैनिकसंख्या ३,२४,४०० (अ) रणगाडा डिव्हिजन ४, पायदळ व यंत्रचलित डिव्हिजन ७ (आ) छत्रीधारी डिव्हिजन १, लढाऊ गाड्या व मोटारयुक्त रेजिमेंट ९, (इ) वायुदल : विमान व हेलिकॉप्टर ६८६ (ई) रणगाडे १,५०० चिलखती गाड्या ५१०, (उ) तोफा (स्वयंचलित, वगैरे) ५७३ (१०५, १५५ व १६५ मिमी.) (उ) उखळीतोफाक्षेपक २६५ (१२० व १०५ मिमी.), (ए) विमानविरोधी तोफा (४०, ३० मिमी.) संख्या उपलब्ध नाही (ऐ) हॉक, रोलॅंड, हॉट एंटॅक इ. विमान व रणगाडाविरोधी प्रक्षेपणास्त्रे. (३) नौसेना : नाविक संख्या ६८,२००, पाणबुड्या २१, विमानवाहू नौका २, हेलिकॉप्टर नौका १, क्रूझर १, फ्रिगेट ५, विनाशिका १४, काफिला संरक्षक २३, सुरंग ३५, गस्ती व प्रक्षेपणास्त्रे लघुनौका २१, भूस्थन कार्य नौका ५०, नाविक वायुदल, हल्लेखोर, पाणबुडीविरोधी, टेहळणी विमाने व हेलिकॉप्टर ३०९, वाहतुकी व दळणवळण विमाने आणि हेलिकॉप्टर स्क्वॅड्रन १३. (४) वायुसेना : वायुसैनिक १,००,८०० (अ) हवाई संरक्षण-स्क्वॅड्रन ८ : विमाने १२० (मिराज), प्रक्षेपणास्त्र पलटणी १०. (आ) लढाऊ दल–स्क्वॅड्रन १७ : विमाने २४० (मिराज व जॅग्वार) हलकी बाँबफेकी स्क्वॅड्रन २ : विमाने १६, (व्हांटूर) टेहळणी स्क्वॅड्रन ३ : विमाने ५५ (मिराज वगैरे), (इ) वाहतूक दळ–स्क्वॅड्रन ११ : विमाने २१७. (ई) शिक्षण दळ : विमाने ४५० (मिराज, जॅग्वार वगैरे). (उ) संपर्क व दळणवळण दळ : विमाने ११२ (मॅजिस्टर मिस्टेअर इ.) संरक्षण सेनासदृश सैनिक ८३,३००.

जर्मनी व बर्लिन, जिबूती, सेनेगल, आयव्हरी कोस्ट, गाबाँ, न्यू कॅलेडोनिया, पॉलिनीशिया इ. ठिकाणी फ्रान्सने वायुसेना, भूसेना व नाविक दले ठेवली असून फ्रान्सची नौदले हिंदी महासागरात संचार करतात.

दीक्षित, हे. वि.

आर्थिक स्थिती : समुद्रसान्निध्य, सौम्य सागरी हवा, सुपीक जमीन व अंतर्गत दळणवळणाच्या उत्तम सोयी ह्या अनुकूल घटकांमुळे फ्रेंच अर्थव्यवस्थेच्या विकासास चांगलीच मदत झाली.

रोमन काळी गॉल प्रांतातील लागवडीखालील जमीन पुढील शतकांत वाढत गेली आणि अकराव्या व चौदाव्या शतकांच्या दरम्यान फ्रान्समधील इतर कितीतरी विभागांत कृषिवसाहती अस्तित्वात आल्या. वाढती लोकसंख्या, जमीनदारांनी दिलेले प्रोत्साहन यांमुळे जंगले व दलदली साफ करण्यात येऊन लागवडीखालील क्षेत्रात भरपूर भर टाकली गेली. त्यानंतरच्या शतकांत प्लेग व लढाया यांमुळे बरीचशी खेडी ओसाड पडली व बव्हंशी शेतजमीन पुन्हा निरुपयोगी झाली. ही परिस्थिती हळूहळू सुधारत जाऊन सतराव्या शतकात समर्थ केंद्रसत्ता स्थापन झाल्यानंतर शेतीमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या.

नवीन पिकांची लागवड होऊ लागली व डच स्थापत्यविशारदांच्या मदतीने दलदलीचा प्रदेश पुन्हा लागवडीखाली आणण्याची यशस्वी प्रयत्न झाले. रीशल्य (१५८५–१६४२) व कॉलबेअर (१६१९–८३) यांनी फ्रेंच आरमाराची स्थापना केली आणि वसाहतीत भर टाकून फ्रान्सच्या परराष्ट्रीय व्यापारविकासास अनुकूल असे धोरण अंमलात आणले. विशेषतः कॉलबेअरने औद्योगिक उत्पादनवाढीस व अंतर्गत दळणवळण सुधारण्यास बरीच मदत केल्याने फ्रान्समधील रस्तेवाहतूक व जलवाहतूक यांचा बराच विकास झाला.

सतराव्या व अठराव्या शतकांत फ्रान्सच्या निर्यातव्यापारास मदत करणारे उद्योग मुख्यतः लोकरीचे कापड व रेशीम उद्योग हे होत. अठराव्या शतकाच्या मध्यास फ्रान्स हे लोकसंख्येच्या बाबतीत पश्चिम यूरोपमधील सर्वांत मोठे राष्ट्र होते. तेथील कृषिउत्पादन जनतेच्या गरजा सहज भागवू शकत असे आणि त्याचे औद्योगिक उत्पादन जरी विखुरलेल्या खाणप्रदेशांतून व लघुउद्योगांद्वाराच होत असले, तरी इतर राष्ट्रांच्या मानाने ते भरपूर होते. फ्रान्सचा परराष्ट्रीय व्यापार ग्रेट ब्रिटनच्या बरोबरीचा होता आणि किनारी सागरी वाहतूक व नद्यांवरील जलवाहतूक यांमुळे अंतर्गत व्यापाराचीही भरभराट झाली होती. ग्रेट ब्रिटनमधील औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मात्र पश्चिम यूरोपातील फ्रान्सचे अग्रेसरत्व नाहीसे झाले. फ्रेंच राज्यक्रांती व नेपोलियनने केलेल्या लढाया यांचा फ्रान्सवर परिणाम होऊन त्याला इतरत्र होणाऱ्या तांत्रिक सुधारणा अंमलात आणणे जमले नाही. शिवाय औद्योगिक क्रांतीसाठी प्रारंभीच्या काळात कोळशाची अत्यावश्यकता व त्याची फ्रान्समधील उणीव ह्यांमुळे औद्योगिक विकास अल्पकाळात साधणे फ्रेंच लोकांना शक्य झाले नाही. त्यातच ग्रेट ब्रिटनसारख्या राष्ट्राशी कराव्या लागलेल्या चढाओढीत आपल्या परकीय वसाहती आणि यूरोपमधील जिंकलेले प्रदेश १७६३ पर्यंत फ्रान्स गमावून बसला होता. एकोणिसाव्या शतकात फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेत काही इष्ट बदल घडून आले परंतु त्यांच्यामुळे फ्रान्समध्ये औद्योगिक क्रांती घडून आली असे म्हणता येत नाही. अर्थात कोळशाची विशेष टंचाई जाणवल्याने फ्रान्सने जलविद्युत्‌ शक्तीचा विकास करण्यात पुढाकार घेतला. नंतर घडून आलेल्या औद्योगिक विकासामुळे फ्रान्सचे शहरीकरण होण्यास मदत झाली असली, तरी लाखाहून अधिक वस्ती असलेल्या फ्रान्सच्या ३२ शहरांपैकी फक्त सहासात शहरांनाच औद्योगिक शहरे असे संबोधता येईल. ग्रामीण वस्तीची वाढ न होता प्रांतीय गावांचीच शहरे बनली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या पंचवीस वर्षात सभोवारच्या इतर राष्ट्रांशी तुलना करता फ्रान्सची पीछेहाट झाल्याचे दिसते. १८७० मध्ये फ्रान्सचे औद्योगिक उत्पादन जागतिक उत्पादनाच्या १०·३ टक्के होते, ते १९१३ पर्यंत ६·४ टक्क्यांपर्यंत खालावले. १९०० मध्ये फ्रान्सचे दरडोई उत्पन्न जर्मनीपेक्षा २५ टक्क्यांनी व ग्रेट ब्रिटनपेक्षा २७ टक्क्यांनी कमी होते. शेतकरीवर्गास असलेली शेतीची आवड, कृषिव्यवसायास सरकारने दिलेले संरक्षण आणि मदत इ. कारणांमुळे कृषिव्यवसायाखेरीज औद्योगिक किंवा अन्य व्यवसायांत जाण्यास लोक प्रवृत्त होत नसत. त्यामुळे साहजिकच इतर राष्ट्रांच्या मानाने फ्रान्स उद्योगक्षेत्रात मागे राहिला.

फ्रँको–जर्मन युद्धामुळे (१८७०) फ्रान्सला ॲल्सेस व लॉरेन हे आपले दोन समृद्ध प्रांत गमवावे लागले आणि जर्मनीला बरीच मोठी युद्धखंडणीही द्यावी लागली. त्यामुळे फ्रान्सला आयातीवर निर्बध घालून आपल्या वसाहतींच्या विकासाकडे विशेष लक्ष पुरवावे लागले. पहिल्या जागतिक महायुद्धामुळे तर फ्रान्सच्या आर्थिक प्रगतीत आणखी एक विघ्न निर्माण झाले. ह्या महायुद्धात फ्रेंच मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली, प्राणहानीही बरीच झाली व फ्रान्सला दोस्त राष्ट्रांकडून भरपूर कर्ज काढावे लागले परंतु ॲल्सेस व लॉरेन हे प्रांत जर्मनीकडून फ्रान्सला परत मिळाल्याने यूरोपातील महत्त्वाचे लोह-उत्पादन फ्रान्सच्या ताब्यात आले व काही काळापर्यंत झार या जर्मन प्रांतातील कोळसाही फ्रान्सला उपलब्ध झाला. कृषिक्षेत्राचे सामर्थ्य, लघुउद्योगांनी केलेली प्रगती व परराष्ट्रीय व्यापारावर कमी प्रमाणात विसंबण्याचे धोरण इ. कारणांमुळे जरी फ्रान्सला १९२९ मधील जागतिक मंदीकाळास तोंड देणे शक्य झाले, तरी १९४० मधील जर्मनीच्या भीषण हल्ल्याचा प्रतिकार करण्याइतके आर्थिक किंवा राजकीय सामर्थ्य फ्रान्सजवळ नव्हते. कॅनडाप्रमाणे फ्रान्सला स्वस्त गहू पिकविता येत नसे. फ्रान्सची औद्योगिक यंत्रसामग्रीही जुनाट झाली होती. प्रचंड उद्योगांऐवजी लघुउद्योगांवरच फ्रान्सला विसंबावे लागत होते. जगातील प्रमुख औद्योगिक राष्ट्रांशी स्पर्धा करण्याचे सामर्थ्य फ्रान्सजवळ नव्हते. जर्मन सैन्यास समर्थपणे टक्कर देण्यास आवश्यक असलेले औद्योगिक उत्पादन फ्रान्सला साधण अशक्यच होते.


दुसऱ्या महायुद्धाअखेरची म्हणजे १९४५ मधील फ्रान्सची आर्थिक स्थिती तर याहूनही हलाखीची होती. या महायुद्धात फ्रान्सची ४,४०,००० घरे पूर्णपणे उद्‌ध्वस्त झालेली, तरी १३,४४,००० घरांची मोडतोड झाली होती ५५,००० हून अधिक व्यापारी व औद्योगिक इमारतींचाही नाश झाला होता व १,३५,००० शेतांवरील घरे अंशतः किंवा पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली होती. ८० टक्के रेल्वे-एंजिने व ६६ टक्के मालगाड्यांच्या वाघिणी नष्ट झाल्या. सोन्याचा राखीव साठा १९३२ मध्ये ५,००० टन होता, तो १९४८ मध्ये ४८७ टनांपर्यंत घसरला होता. फ्रान्समधील विचारवंत राष्ट्राच्या या बिकट आर्थिक परिस्थितीबद्दल विचार करू लागले. फ्रान्सला पूर्वीप्रमाणे स्थिरतेचा आधार घेऊन चालणार नाही असे काहींचे मत पडले. राष्ट्राला विसाव्या शतकात खेचून नेले नाही, तर त्याचा कायमचा नाश होईल, असे मॉनेचे म्हणणे होते. त्याच्या मते केवळ कृषिविकासावर भर न देता फ्रान्सने औद्योगिक विकासाची कास धरणे आवश्यक होते. सर्वसाधारण योजना आयोगाचा प्रमुख म्हणून मॉनेची नेमणूक झाली व त्याने आपल्या योजनेमध्ये कृषीला अग्रक्रम न देता पोलाद, यंत्रे, मोटारी, वाहतूक व विद्युत्‌शक्ती यांच्या विकासावर विशेष भर दिला. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाने भांडवल-गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक होते. महायुद्ध व चलनवाढ यांमुळे पॅरिसमधील भांडवल बाजार मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध करण्यास असमर्थ होता. महायुद्ध संपताच फ्रान्समध्ये राष्ट्रीयीकरणाची एक लाटच उसळली आर्थिक आवश्यकतेपेक्षा भांडवलशाहीप्रमुखांना असलेला राजकीय विरोध हाच होता. १९३० पूर्वीच रेल्वे, विमानोत्पादन आणि दारुगोळा कारखाने शासनाने ताब्यात घेतले होते. महायुद्धानंतर बॅंक ऑफ फ्रान्स ही मध्यवर्ती बँक, चार प्रमुख व्यापारी बॅंका, प्रमुख विमाकंपन्या, कोळसा, गॅस व वीजनिर्मितीउद्योग आणि रेनॉल्ट मोटार कंपनी या सर्वांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. इतर उद्योग खाजगी क्षेत्रातच राहिले व त्यांच्या नफ्यातून औद्योगिक विकासासाठी थोडेसे भांडवल जरी उपलब्ध झाले, तरी राष्ट्रीयीकृत उद्योगांच्या विकासासाठी फ्रान्सला मुख्यतः अमेरिकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीवरच विसंबून राहावे लागते.

शेतीव्यवसायास अग्रक्रम दिल्यामुळे औद्योगिक उत्पादनाकडे झालेले मोठे दुर्लक्ष व औद्योगिकीकरणातील मागासलेपणा ही १९४० मध्ये जर्मनीने केलेल्या फ्रान्सच्या पराभवाची मुख्य कारणे होती. अर्थव्यवस्थेमधील कृषी व उद्योग ह्यांच्यामधील हे असंतुलन नाहीसे करण्याचा फ्रान्सने महायुद्धानंतर दृढ निश्चय केला व औद्योगिक उत्पादन बरेच वाढविले. त्यासाठी मॉनेने आखलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. अशा रीतीने फ्रान्सने केवळ औद्योगिक क्रांतीच नव्हे, तर एक चमत्कार घडवून आणला, असे मानले जाते. ह्या योजनांचा परिणाम पुढील तक्त्यावरुन स्पष्ट होतो :

फ्रान्सच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील विविध व्यवसायांची शेकडेवारी
१९०८–१० १९६५
कृषिव्यवसाय ३५
उद्योग ३६ ५३
सेवा व्यवसाय २९ ३८

फ्रान्सचे राष्ट्रीय उत्पन्न १९७० च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या तुलनेत सव्वादोन पटींनी वाढले असून ग्रेट ब्रिटनपेक्षा फक्त ७ टक्क्यांनी कमी होते. दरडोई उत्पन्न फ्रान्समध्ये ग्रेट ब्रिटनपेक्षा अधिक व पश्चिम जर्मनीपेक्षा थोडेसेच कमी होते.

फ्रान्सने केलेल्या ह्या आर्थिक प्रगतीच्या मुळाशी विविध उद्योगांत करण्यात आलेली मोठ्या प्रमाणावरील भांडवल-गुंतवणूक होती. या गुंतवणुकीमुळे नवीन उत्पादन-तंत्राचा अवलंब करणे सोपे झाले आणि पर्याप्त आकाराच्या उद्योगसंस्था अस्तित्वात आल्या. त्यामुळे पूर्वीच्या लघुउद्योगांच्या उत्पादनापेक्षा कमी परिव्ययात उत्पादन करणे शक्य झाले. चालू उत्पादनापासून होणाऱ्या उत्पन्नातून बचत करून उद्योगांच्या विकासासाठी त्या बचतीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे, याची फ्रेंच लोकांना जाणीव झाली. त्यामुळे राष्ट्रीयीकृत उद्योगांमध्ये भांडवल गुंतविणे शासनास सोपे झाले. अमेरिकेच्या मार्शल योजनेनुसार अमेरिकेचे भांडवल योग्य वेळीच फ्रान्सला उपलब्ध झाले व भांडवल-गुंतवणूक शासकीय नियंत्रणाखाली होत असल्याने परकीय खाजगी भांडवलही फ्रान्सला मिळत गेले. अर्थात परकीय भांडवलास फ्रान्समध्ये मिळू शकणाऱ्या समाधानकारक नफ्याचे प्रमाण हे एक प्रमुख आकर्षण होते. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सच्या लोकसंख्येची वाढ जलद गतीने झाली. १८८६ मधील ३८२ लक्ष लोकसंख्या, १९११ मध्ये ३९६ लक्ष, १९४६ मध्ये ४०५ लक्ष व १९७० मध्ये ५०० लक्षांपर्यंत वाढली. ही वाढ विशेष जलद गतीने झाल्यामुळे विविध वस्तूंच्या मागणीत एकदम भर पडली व साहजिकच उद्योगांच्या विकासास उत्तेजन मिळाले.

कृषी : अठराव्या शतकाच्या मध्यातील पश्चिम यूरोपातील फ्रान्सचे अग्रेसरत्व कृषिउत्पादनाच्या पायावर आधारलेले होते. आर्थिक दृष्ट्या विकसित राष्ट्रांमध्ये आजसुद्धा फ्रान्सची अर्थव्यवस्था सर्वांत जास्त ‘मिश्र’ स्वरूपाची आहे. सांप्रतही फ्रान्स हे प. यूरोपमधील श्रमिक आघाडीचे कृषिक राष्ट्र गणले जात असून सु. ३२० लक्ष हे. जमीन (एकूण क्षेत्राच्या सु. ६०% क्षेत्र) लागवडीखाली आहे. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात कृषिउत्पादन प्रतिवर्षी २% नी वाढले, तर कृषिउद्योगात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण एकूण श्रमबळाच्या १५% वरून (१९६८) १०% वर घटले (१९७६). ४०% धारण जमिनींचे क्षेत्र २० हे. वर आहे.

फ्रान्समपावसाचे प्रमाण भरपूर असून तेथील हवा सौम्य आहे. जमीनही सुपीक असून निरनिराळ्या विभागांतील हवामानात विविधता आढळते. साहजिकच लिंबूवर्गीय फळांखेरीज इतर सर्व महत्त्वाची व्यापारी पिके फ्रान्समध्ये मुबलक होतात. मूलभूत अन्नपदार्थांच्या बाबतीत सर्वस्वी स्वयंपूर्ण असलेले फ्रान्स हे पश्चिम यूरोपमधील एकमेव राष्ट्र आहे. कृषिपदार्थांच्या निर्यातीमध्ये ते यूरोपमधील अग्रणी राष्ट्रांपैकी एक आहे. नॉर्मंडी व ब्रिटनी या भागांत जमीन तितकीशी सुपीक नसली, तरी तेथील भरपूर पावसामुळे तिचा चराईसाठी उपयोग होतो. १९७६ मध्ये फ्रान्सच्या ५४५·९२ लक्ष हे. जमिनीपैकी १७१·३९ लक्ष हे. जमीन लागवडीखाली, १५·९१ लक्ष हे. जमीन कायम पिकांखाली, १३३·३७ लक्ष हे. चराऊ कुरणांकरिता, १४५·७६ लक्ष हे. जमीन जंगलांखाली, ७९·४९ हे. ही इतर जमीन असून, २·११ लक्ष हे. जमीन नद्या, सरोवरे, तलाव इत्यादींनी व्यापलेली आहे.

फ्रान्समधील धारणजमिनी लहान आकाराच्या व म्हणून यंत्राच्या वापरास गैरसोईच्या होत्या. त्यामुळे फ्रान्सचे कृषिउत्पादन जागतिक अन्नधान्य बाजारात यशस्वीरीत्या स्पर्धा करू शकत नसे. महायुद्धानंतर या परिस्थितीत बराच फरक झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून धारणजमिनींचे एकत्रीकरण आवश्यक असल्याची जाणीव झाल्यामुळे फ्रेंच शेतकरी अशा एकत्रीकरणास अनुकूल झाले.

जमिनीची रचना पॅरिस द्रोणी, उत्तर फ्रान्स, ल्वॉर, गारॉन नदी खोरी यांमधील गाळाची मृदा ॲल्सेस, उत्तर ब्रिटनी यांसारख्या भागातील लोएस प्रकारची मृदा आणि देशाचे सौम्य हवामान या गोष्टी फ्रेंच कृषिव्यवसायाला सर्वसाधारणतः अतिशय अनुकूल आहेत. म्हणूनच फ्रान्सच्या कृषिउत्पादनात गव्हासारखी मध्य-अक्षवृत्तीय पिके तर होतातच, त्याशिवाय भातासारखी उष्ण कटिबंधीय पिके आणि मद्यासारखे उपोष्ण कटिबंधीय पदार्थाचे उत्पादनही होते. १९६० च्या पुढील काळात देशातील एकूण शेतजमिनीपैकी सु. ३१% क्षेत्रामध्ये २० हे. हूनही कमी आकारमानाची शेते आढळतात ३७·५% क्षेत्रामध्ये मध्यम आकारमानाची शेते (२० ते ५० हे.), तर ३२% क्षेत्रामध्ये ५० हे. हून अधिक आकारमानाची शेते आढळतात. मोठ्या व मध्यम आकारमानाच्या शेतांकरिता शासनाने कृषिबॅंकेमार्फत मोठ्या प्रमाणावर कृषिकर्जे दिली आहेत याशिवाय वीज, पाणीपुरवठा, ग्रामीण रस्त्यांमध्ये सुधारणा, साठवण सुविधा इत्यादींमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. रासायनिक खतांच्या पुरवठ्यातही १९४८ मधील १० लक्ष मे. टनांवरून १९७१ मधील ४६ लक्ष मे. टन अशी प्रचंड वाढ करण्यात आली. यामुळे गव्हाच्या पैदाशीमध्ये विशेषत्वाने वाढ झाल्याचे दिसून येते. सरतेशेवटी कृषियंत्रावजारांमध्येही लक्षणीय वाढ करण्यात आली. उदा., १९४८ मधील १,०८,००० ट्रॅक्टरवरून १९७१ मध्ये त्यांची संख्या १२·४० लक्षांवर गेली त्याचप्रमाणे कापणी-मळणी यंत्रांची संख्याही १९५० मधील ५,००० वरून १९७१ मधील १,३१,३०० वर गेली. परिणामी मनुष्यबळातही साहजिकच घट झाली. फ्रान्समधील कृषिव्यवसायावर यांत्रिकीकरणाचा मोठा प्रभाव पडल्याचे जाणवते. कृषिव्यवसायास सहकारी संस्थांचीही चांगली मदत होते. सहकारी संस्थांना व शेतकरी संघांना फ्रान्सच्या राजकारणात अतिशय महत्त्व आहे.

शेतमालामध्ये तृणधान्ये (गहू, बार्ली, ओट), औद्योगिक पिके (साखर बीट, फ्लॅक्स), कंदमुळे (बटाटे) आणि मद्ये ही अतिशय महत्त्वाची होत. लागवड-क्षेत्र, एकूण उत्पादन व हेक्टरी उत्पादन या तिहींच्या दृष्टीने गहू हे सर्वांत महत्त्वाचे तृणधान्य-पीक असून ते फ्रान्सच्या सर्व भागांत घेतले जाते. पश्चिम यूरोपमधील सर्व देशांत फ्रान्स हा गहू आणि साखर बीट यांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. फ्रेंचांच्या आहारात पावाला बरेच महत्त्व असल्याने गव्हाला नेहमीच अंतर्गत मागणी असते. युद्धकाळात शासनाने गहूउत्पादनाला संरक्षण देण्याचे धोरण अवलंबिले. संरक्षित गव्हाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील गव्हाच्या किंमतीहून अधिक असल्याने फ्रान्सला गव्हाची निर्यात शक्य असूनही करता येत नाही.

देशातील १९७७ मधील प्रमुख पिके पुढीलप्रमाणे होती (उत्पादन क्षेत्र आणि उत्पादन अनुक्रमे लक्ष हेक्टर व लक्ष मे. टनांमध्ये) : गहू ४१·२५, १७४·५० बार्ली २०·१०, १०२·९० मका १६·२७, ८६·१४ ओट ६·२५, १९·२८ साखर बीट ५·४९, २४५·० बटाटे २·९८, ८१·९० शिरसू बी २·७३, ४·०० मद्ये ५२४·० हेक्टोलिटर बीर २२६·०० हे.लि. (१९७५). फळांच्या उत्पादनाबाबत फ्रान्स अतिशय समृद्ध देश आहे. १९७७ मधील फळांचे व भाज्यांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे हजार मे.टनांत) : द्राक्षे ८,१०० सफरचंदे २,१९० पीच ३१९ पिअर २७६, टोमॅटो ६२५ आलुबुखार १०० जरदाळू ७२ कोबी २४९ गाजर ४०० फुलवर ४४० टरबूज १५४ वाटाणे ५८४.

फ्रान्स हा इटलीप्रमाणेच जगातील सर्वांत मोठा मद्योत्पादक देश समजला जातो. लँग्वेडॉक भागातील द्राक्षमळ्यांतून हलक्या दर्जांची परंतु मोठ्या प्रमाणात मद्यनिर्मिती होते विशिष्ट भागांतील द्राक्षमळ्यांमधून उच्च प्रतीचे मद्य उत्पादन होते–रीग्झच्या दक्षिणेला शांपेन, दीझॉ व मेकॉन यांमधील भागात बर्गंडी आणि गारॉन नदीखोऱ्यात बॉर्दो असे उंची मद्यप्रकार उत्पादन केले जातात. इतर उंची मद्यांची निर्मिती ऱ्‍होन खोरे, ल्वार खोरे आणि ॲल्सेस प्रदेश येथून करण्यात येते. मांस पदार्थ व दूधदुभत्याचे पदार्थ यांना वाढत्या प्रमाणात येणारी वाढणाऱ्या शहरी भागांतील नागरिकांची मागणी विचारात घेतल्यास, पशुउत्पादनामध्ये जलद वाढ करण्याची प्रवृत्ती गती घेत असल्याचे दिसून येते. प. फ्रान्स (ब्रिटनी, प.नॉर्मंडी व व्हेन्दाँ) आणि पर्वतीय भागात (मासीफ सेंट्रल आल्प्स व पिरेनीज) पशुउत्पादनाने मोठ्या प्रमाणात वेग घेतला आहे. १९७६ मधील पशुधन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षांत) : गाई-गुरे २३८·९८ डुकरे ११६·३८ मेंढ्या १०९·१५ बकरे १०१·२ घोडे ३·७५ गाढवे ०·२५ खेचरे ०·२५. पशुजन्य पदार्थांचे १९७७ मधील उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष मे.टनांत) : मांस १६·५१९ मटन १·४२ डुकराचे मांस १६·०५ कोंबड्यांचे मांस ९·०२ दूध ३०१ शेळीचे दूध ८·९२ लोणी ५·४५ चीज १०·०३ संघनित दूध १·५० दूध पावडर ७·५६ अंडी ७·४४. चीजच्या उत्पादनात फ्रान्सचा सबंध जगात दुसरा क्रम लागतो. यांत्रिकीकरणाच्या अभावी व लहान शेततुकड्यांच्या योगे फ्रान्समधील कुक्कुटपालन उद्योग परराष्ट्रीय बाजारपेठांत स्पर्धा करू शकत नाही. देशातील मेंढपाळव्यवसायही फारसा प्रगत नाही व त्याच्या परिव्ययाचे प्रमाण मोठे आहे.

सामान्यतः सामायिक बाजरपेठेच्या स्थापनेमुळे फ्रेंच कृषी व्यवसायाला निश्चितच फायदा झाल्याचे आढळून येते. बड्या गहू उत्पादक शेतकऱ्‍यांना तसेच साखर बीट, मद्ये, दुग्धशाळापदार्थ व चीज यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्‍यांना वाढते भाव मिळत गेले आहेत.


मच्छीमारी : फ्रान्सच्या सु. २,८९७ किमी. लांबीच्या किनाऱ्यावर बरीच लहान बंदरे असून मच्छीमारीचीही चांगली वाढ झाली आहे. सुमारे १४,००० मच्छीमारी बोटींतून जवळजवळ ३१,००० मच्छीमार मासे पकडीत असतात. १९७७ मध्ये एकूण मत्स्योत्पादन सु. ४·९४ लक्ष मे.टन झाले व त्याची एकूण किंमत सु. २०·१० लक्ष फ्रँक होती. ब्रिटनीचा किनारी भाग आणि बूलोन, कोंकार्नो, लॉरींझा, द्वार्नानेझ व ला रॉशेल या पाच बंदरांमधून ५०% वर एकूण मासे उत्पादन होत असते. त्यामध्ये कॉड, हेरिंग, हॅलिबट, सार्डीन, मॅकॅरेल व ट्यूना हे प्रमुख मासे पकडले जातात. बिस्के किनारी भागातील खारकच्छांमधून ऑयस्टर जातीच्या कालवांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन केले जाते. १९७७ मध्ये ५·६३ लक्ष फ्रँक किंमतीचे ९३·९ हजार मे.टन ऑयस्टर उत्पादन झाले.

जंगल संपत्ती : फ्रान्सची अरण्ये म्हणजे फ्रेंच अर्थव्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. कापीव लाकडाचे उत्पादन यूरोपमधील फिनलंड व स्वीडन या देशांच्या खालोखाल सर्वांत अधिक आहे. १९६० च्या पुढील काळात प्रतिवर्षी हे उत्पादन सु. ४४९ लक्ष घ.मी. झाले होते. एकूण जंगलव्याप्त जमिनीपैकी ७० टक्के जमिनीत ओक, बीच, पॉप्लर वृक्षांचे आधिक्य असून ३० टक्के जमिनीत रेझिन जातीचे वृक्ष आहेत. १९७६ मध्ये १४५·७६ लक्ष हे. जमीन जंगलांनी व्यापलेली असून त्याच सालचे अनुक्रमे मऊ व कठीण लाकडांचे उत्पादन १३५·९८ लक्ष घ.मी. व १५३·२९ लक्ष घ.मी. झाले. या लाकडांचा उपयोग मुख्यतः इमारती व घरे बांधणे, रेल्वे स्लीपर, खाणकाम, कागदलगदा, औद्योगिक क्षेत्र व इंधन इ. विविध कार्याकरिता होतो.

सरकारच्या व जनसमूहाच्या मालकीची ३५% अरण्ये आहेत. १९६४ साली स्थापण्यात आलेला राष्ट्रीय वन विभाग आणि राष्ट्रीय वननिधी (१९४६) या दोहोंकरवी शासकीय अरण्यांचे नियंत्रण व पुनर्वनीकरण (पुनर्वनरोपण) केले जाते. राष्ट्रीय वननिधी या संस्थेने स्थापनेपासून १० लक्ष हेक्टरांहून अधिक जमिनीत पुनर्वनरोपण केले आहे. यामुळे इमारती लाकूड व औद्योगिक लाकूड यांचे प्रतिवर्षी ४५ लक्ष घ.मी. उत्पादन होऊ शकेल, अशी अरण्यांची उत्पादनक्षमता वाढविण्यात आली आहे.

खनिज संपत्ती : फ्रान्स हा जगामध्ये कच्चे लोखंड व कोळसा यांच्या बाबतीत अनुक्रमे चौथ्या व नवव्या क्रमांकावरील उत्पादक देश आहे. यांशिवाय अँटिमनी, बॉक्साइट, मॅग्नेशियम, पायराइट, टंगस्टन तसेच काही किरणोत्सर्गी खनिजे इत्यादींचे देशात मोठे साठे आहेत. खनिज मीठ, पोटॅश व फ्ल्यूओरस्पार या खनिजांबाबत तो स्वयंपूर्ण आहे. शिसे व जस्त यांचे देशात मर्यादित साठे असल्याने या दोन खनिजांची त्याला एकूण गरजेच्या २०% आयात करावी लागते. देशातील कोळसा खणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले असून देशाच्या उत्तर भागात व लॉरेन प्रांतात मुख्यतः कोळसा खाणी आहेत. कोळशाचे साठे अंदाजे, सु. १,००० कोटी टन आहेत तर लिग्नाइटचे साठे ४,००० लक्ष टन आहेत. कोळशाचे साठे नॉर्ड व पास द कॅले खोरे यांमध्ये तसेच लॉरेन येथे असून तेथील कोळसा उत्पादन फार खर्चिक आहे. यामुळे बराचसा कोळसा प्रतिवर्षी (सु. ६० लक्ष मे. टन) फ्रान्सला अमेरिकेची संयुक्त संस्थाने, पोलंड व सोव्हिएट रशिया या देशांकडून आयात करावा लागतो. फ्रान्समध्ये कच्च्या लोखंडाचे सु. ९,००० कोटी मे.टन साठे असून जगामधील कच्च्या लोखंडाचे उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये फ्रान्सचा रशिया, अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर चौथा क्रमांक लागतो. लॉरेनमधील नॅन्सी व लाँगवी या भागांतील जुरासिक साठ्यांमधून सु. ९५% कच्चे लोखंड उत्पादित केले जाते. दक्षिण फ्रान्समधील व्हार व सेते या भागांत बॉक्साइटचे सु. ६०० लक्ष मे. टन साठे असून यूरोपमध्ये बॉक्साइट उत्पादनात फ्रान्स हा आघाडीचा देश असून जगात त्याचा तिसरा क्रमांक लागतो. दक्षिण फ्रान्समधील ‘ले बो’ (Les Baux) या प्रांतात १८२१ साली प्रथम बॉक्साइटचा शोध लागला व बॉक्साइट हे नावही या प्रांतावरुनच पडले. प्रतिवर्षी सरासरी ३३ लक्ष मे. टन बॉक्साइटचे उत्पादन देशात होत असल्याने, फ्रान्सला आपली अंतर्गत गरज भागवून बॉक्साइट अथवा ॲल्युमिनियम यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करता येते. १९७७ मधील प्रमुख खनिजांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे लक्ष मे. टनांत) : कठीण कोळसा २१२·९३ लिग्नाइट व तपकिरी कोळसा ३०·८० कच्चे लोखंड ३६६·३० बॉक्साइट १९·६६ अशुद्ध खनिज तेल १०·३७ पोटॅश सॉल्ट १७·१९ गंधक १९·११ शुद्ध खनिज मीठ ५७·७२ नैसर्गिक वायू ७६·९५० लक्ष घनमीटर. अशुद्ध खनिज तेलाचे साठे नगण्य आहेत. ३०० लक्ष मे.टन साठे सापडले असून १९७२ मध्ये १५ लक्ष मे. टन एवढे खनिज तेलाचे उत्पादन झाले. फ्रान्सला जवळजवळ सर्व अशुद्ध खनिज तेल आयात करावे लागते. कोळशापेक्षाही खनिज तेलाच्या बाबतीत फ्रान्सला परदेशांवर अधिक अवलंबून रहावे लागते.

शक्तिसाधने : पिरेनीज पर्वताच्या पायथ्याशी लाक या गावाच्या आसमंतात नैसर्गिक वायूचे २०,००० कोटी घ.मी.पर्यंतचे साठे असून १९७२ पर्यंत प्रतिवर्षी सु. ७४० कोटी घ.मी. उत्पादन झाले. लाक परिसरातील साठे १९८५ पर्यंत संपण्याची शक्यता असल्याने फ्रान्सला खनिज तेलाप्रमाणे नैसर्गिक वायूबाबतही परदेशांवर, विशेषतः नेदर्लंड्सवर, अवलंबून रहावे लागण्याची शक्यता दिसते. कोळसा व अशुद्ध खनिज तेलाच्या अनियमित पुरवठ्यामुळे फ्रान्सला वीजउत्पादनासाठी जलशक्तीवर विशेषेकरून अवलंबून रहावे लागले आहे. फ्रान्सचे हवामान व भूस्वरुप या दोहोंमुळे फ्रान्सला विपुल जलसंपत्तीचे वरदान लाभले आहे. दुसऱ्या महायुद्धापासून जलविद्युत् शक्तिनिर्मितीमध्ये जलद वाढ होत गेली आहे. सेन, ऱ्‍होन, सोन, गारॉन, ल्वार या मोठ्या नद्यांमुळे तसेच मासफ सेंट्रल, दक्षिण व दक्षिण-मध्य फ्रान्स, पिरेनीज आणि आल्प्स यांमधील डोंगराळ प्रदेशांमुळे सुप्त जलविद्युत्‌निर्मितिक्षमता प्रचंड आहे. १९६९ च्या सुमारास देशात १,६४० जलविद्युत्‌निर्मितिकेंद्रे होती. वीजउत्पादन व वितरणकार्य शासकीय वीज निगमाद्वारे पाहिले जाते. देशातील एकूण वीजउत्पादनापैकी ४०% उत्पादन जलविद्युत्‌निर्मितिकेंद्रांद्वारा केले जाते. अणुशक्तीच्या निर्मितीवरही शासनाचे नियंत्रण आहे. तीन अणुशक्तिनिर्मितिकेंद्रे कार्यवाहीत असून आणखी तीन केंद्रे १९७० मध्ये कार्यान्वित झाली आहेत. ब्रिटनीच्या किनारी भागात, रांस नदीवर लाटांपासून वीज निर्माण करणारे जगातील पहिले केंद्र १९६६ मध्ये कार्यान्वित झाले. १९७७ मधील एकूण वीजउत्पादन २०,२३० कोटी किंवॉ. ता. होते. एकंदरीत शक्तिउत्पादन व सेवन या दोहोंच्या बाबतीत फ्रान्स इतर यूरोपीय राष्ट्रांच्या तुलनेने निश्चितच मागे आहे. अंतर्गत वीजउत्पादन व आयात केलेली वीज ही दोन्ही मिळूनही फ्रान्सला ग्रेट ब्रिटन वा प. जर्मनी यांच्या मानाने ६० टक्केच शक्तिसाधनांचे सेवन करता येते. ही बाब ब्रिटिश वा प. जर्मन उद्योगांच्या मानाने फ्रेंच उद्योगांच्या कमकुवतपणाची निदर्शक आहे.

उद्योग : ग्रेट ब्रिटन, जर्मनी व बेल्जियम यांपेक्षा फ्रान्सचे औद्योगिकीकरण फार उशिरा झाले. याला अनेक कारणे आहेत. एक तर, कोकसाठी लागणाऱ्या कोळशाची फ्रान्समध्ये उणीव होती. शिवाय भांडवल गुंतवणूक करण्याची फ्रेंच लोकांची प्रथमतः प्रवृत्ती नव्हती. संयुक्त भांडवल कंपन्यांचा विकासही फ्रान्समध्ये विशेष झपाट्याने झाला नाही. उपभोग्य व प्रमाणीकृत वस्तूंना फ्रान्समध्ये मागणीही मर्यादितच असे. यामुळे बऱ्याच काळपर्यंत जर्मन उद्योगव्यवसायाच्या तुलनेत फ्रान्सच्या उद्योगांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा कितीतरी कमी होता. फ्रान्समधील उद्योगसंस्था लहान आकाराच्या असत व त्यांची यंत्रसामग्रीही आधुनिक नसे. द्वितीय महायुद्धोत्तर काळात केलेल्या एका पाहणीत असे आढळून आले की, फ्रेंच कारखान्यांतील यंत्रांचे सरासरी वय १९ वर्षे होते, तर जर्मनीमध्ये ते फक्त ८·५ वर्षे इतकेच होते.

पहिल्या महायुद्धानंतर व विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात फ्रान्सचे औद्योगिक चित्र पुष्कळच बदलले आहे. अलीकडच्या काही वर्षांत फ्रान्सने केलेल्या भांडवलगुंतवणुकीचे राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण अखिल यूरोपमध्ये सर्वांत जास्त आहे. कंपन्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. प्रामाणिक उपभोग्य वस्तूंची आवड फ्रेंच लोकांत उत्पन्न झाली असल्याने प्रशीतके व मोटारी यांसारख्या वस्तूंना फ्रान्समध्ये जोरदार मागणी आहे. तेथील व्यवस्थापनतज्ञसुद्धा इतर विकसित राष्ट्रांतील व्यवस्थापकांप्रमाणे आधुनिकीकरणास व तंत्रविद्येचा भरपूर वापर करण्यास उद्युक्त झाले आहेत. लहानलहान कारखान्यांतील औद्योगिक उत्पादनावरील भर कमी होत जाऊन प्रचंड कारखान्यांची संख्या फ्रान्समध्ये अलीकडच्या काही वर्षात बरीच वाढली आहे. एकूण औद्योगिक कामगारसंख्येपैकी निम्म्याहून अधिक कामगार प्रत्येकी शंभरांहून अधिक कामगार असलेल्या कारखान्यांतून काम करीत आहेत. १९७० च्या सुमारास औद्योगिक उत्पादन १९३८ च्या उत्पादनाच्या तिपटीहून अधिक झाले आहे. नैसर्गिक वायूचे उत्पादन व खनिज तेलशुद्धीकरण कारखाने यांच्या विकासामुळे खनिज तेल रसायनोद्योगाची भरपूर वाढ अलीकडे झाली आहे. अभियांत्रिकी, खनिज तेल, रसायनोद्योग यांप्रमाणेच कागद व पुठ्ठा यांचे उत्पादन करणारे कारखानेही बरेच निघाले आहेत. त्यांखालोखाल झपाट्याने वाढ झालेले उद्योग म्हणजे काचकारखाने, छापखाने, विजेची उपकरणे निर्माण करणारे कारखाने व धातुशुद्धीकरण आणि खाणकाम. सर्वांत कमी वेगाने प्रगती झालेले उद्योग म्हणजे कोळसा, बांधकाम, कापड, चर्मोद्योग, चरबीउत्पादन व तंबाखूचे पदार्थ तयार करणारे कारखाने. नैसर्गिक वायूचे भरपूर उत्पादन होऊ लागल्याने फ्रान्सची कोळशाची आयात कमी झाले आहे व प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, कृत्रिम खते व सिमेंट या उद्योगांना भक्कम पाया मिळाला. अभियांत्रिकीचा विकास झाल्याने मोटारी व ट्रॅक्टर यांच्या उत्पादनात विशेष वाढ झाली. तसेच घड्याळांचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले.

उद्योगांचे विकेंद्रीकरण : प्रारंभापासूनच फ्रान्समधील औद्योगिक उत्पादन पॅरिससभोवार केंद्रित झाले होते. त्याच्या विकेंद्रीकरणाचे प्रयत्न करण्यात आले. आज फ्रान्समधील उद्योग बऱ्याच अंशी विखुरले असून निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या उद्योगांचे विशिष्टीकरण झाले आहे. सर्वांत जास्त उद्योग पॅरिस-रुएन भागात आहेत. धातूंवर आधारलेले उद्योग, मोटारींचे कारखाने, यंत्रे व अवजारे, रंग आणि रासायनिके, स्त्रियांचे पोशाख, अस्तरे इत्यादींचे कारखाने याच भागात आहेत. लॉरेन प्रांतात कोळसा, लोखंड यांच्या खाणी व लोखंड शुद्ध करण्याचे कारखाने आहेत. पोलादापासून रुळ, बांधकामाचे पोलाद, तारा इत्यादींचे उत्पादन तेथेच होते. ईशान्य भागात कोळशाचे, लोखंडी व पोलादी वस्तूंचे आणि कापडाचे उत्पादन होते. कृषियंत्रे, रेल्वेएंजिने व वाघिणी तयार करणारे कारखानेही याच भागात आहेत. लीआँ व ऱ्‍होन नदीच्या खोऱ्‍यांत खनिज तेल शुद्धीकरण, ट्रक उत्पादन, रासायनिके विजेची उपकरणे रेशीम व कृत्रिम धागे यांचे उत्पादन होते. मार्सेच्या आसपास तेलशुद्धीकरण, साबण व खाद्यतेले यांचे करखाने असून तूलूझ हे विमान-बांधणी उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. ॲल्सेसमध्ये कापड गिरण्या असून लोकरीचे कापड तयार करणारे कारखाने सर्वत्र पसरले आहेत.

फ्रान्सचा लोह-अभियांत्रिकी उद्योग हा यूरोपीय देशांमधील अग्रेसर उद्योगांपैकी एक समजला जातो. आघाडीच्या पोलाद उत्पादक देशांमध्ये फ्रान्सचा क्रमांक फार वरचा लागतो. फ्रान्सच्या एकूण मोटार-उत्पादनापैकी सु. ३३% उत्पादन राष्ट्रीयीकृत ‘रेनॉल्ट’ मोटारकंपनीद्वारा केले जाते. फ्रान्सचा विमाननिर्मिती उद्योग हा जरी प्रचंड प्रमाणावर विमानांचे उत्पादन करणारा उद्योग नसला, तरी अभिकल्प व प्रायोगिक विकास यांच्या दृष्टिकोनातून पाहता तो जगातील विमानउत्पादक उद्योगांमध्ये चौथ्या क्रमांकावरील समजला जातो. ‘कॅराव्हेल’ व ‘मिराज-फोर’ यांसारखी फ्रेंच विमाने पन्नासांहून अधिक देश वापरीत आहेत. बांधकाम उद्योग हादेखील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग मानतात. फ्रान्समधील अतिशय वेगाने वाढत जाणाऱ्या उद्योगांपैकी अत्तरांपासून गंधकाम्लापर्यंत उत्पादन करणारा रसायनोद्योग हा एक आघाडीचा उद्योग होय. यांत्रिकीय, विद्युत् व इलेक्ट्रॉनीय उद्योगही फार महत्त्व पावले आहेत. कापडउद्योग हा सर्वांत महत्त्वाचा ग्राहकोपयोगी वस्तुउद्योग असून त्यामध्ये सु. ४·७५ लक्ष कामगार गुंतलेले आहेत. वस्त्रोद्योगात, विशेषतः स्त्रियांच्या कपडे निर्मितिउद्योगात, (सबंध युरोपमध्ये पहिल्यापासून प्रसिद्ध असलेल्या उद्योगात) सु. ३·६३ लक्ष कामगार गुंतलेले आहेत.

पॅरिस व आसमंत, उत्तर फ्रान्समधील कोळसा खाणक्षेत्र, ॲल्सेस व लॉरेन, लीआँ आणि क्लेरमाँ-फेरँ यांच्या परिसरात फ्रेंच उद्योगधंद्यांचे मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाल्याचे दिसून येते. सर्वसाधारणतः फ्रेंच उद्योगांबाबत शोधकबुद्धी, उच्च दर्जाच्या वस्तूंची लहान प्रमाणावर निर्मिती करणे, तसेच प्रचंड उत्पादनाच्या आधुनिक पद्धती स्वीकारण्याविषयी उदासीनता ही वैशिष्ट्ये आढळतात. औद्योगिक स्थानांतर, आधुनिकीकरण इत्यादींसाठी फ्रेंच शासन उद्योजकांना उपदाने, सवलतीच्या दरांत कर्जे देते.

सामाईक बाजारपेठेच्या स्थापनेमुळे फ्रेंच उद्योग हे अधिक स्पर्धाशील बनले असले, तरी बरेच औद्योगिक विभाग मागासलेलेच आहेत. म्हणूनच उद्योगांचे पुनर्निर्माण व सुनियोजन यांना अद्यापि बराच वाव आहे. इतर अनेक यूरोपीय देशांच्या मानाने, फ्रान्समध्ये मोठ्या आकाराच्या फार थोड्या उत्पादनसंस्था आहेत. सर्वांत मोठ्या दहा उत्पादनसंस्थांपैकी, तीन सरकारी मालकीच्या, तर दोन आंतरराष्ट्रीय तेलकंपन्यांच्या दुय्यम कंपन्या आहेत म्हणजेच खाजगी फ्रेंच भांडवलाचे कार्य बरेचसे मर्यादित आहे. फ्रेंच शासन उद्योगधंद्यांच्या विलीनीकरणास सक्रिय उत्तेजन देते. यामुळेच पारंपरिक उद्योगधंद्यांप्रमाणेच रसायनोद्योग व संगणक उद्योग यांसारख्या नवीन व गतिमान उद्योगधंद्यांत संकेंद्रीकरण प्रकर्षाने आढळते. उदा., १९७० मध्ये ‘पेशिनी’ व ‘यूझीन-कूह्‌ल्‌मान’ या दोन उद्योगांच्या विलीनीकरणामुळे अलोह-धातू उद्योगामध्ये फ्रान्सला एक जागतिक कीर्तीची अशी उत्पादनसंस्था लाभली आणि सबंध यूरोपमध्येही या उद्योगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांत तिचा पाचवा क्रम लागला. पोलाद उद्योगात ‘उसिनॉर-लॉरेन-एस्कॉत’ व ‘वेंडेल-सिदेलॉर’ हे दोन उद्योगसमूह देशातील ७०% पोलाद-उत्पादन करतात. मोटार उद्योगात ‘रेनॉल्ट’ व ‘प्यूगॉट’ या दोन कंपन्या एकत्रितपणे कार्य करतात. त्याचप्रमाणे इटालियन मोटार कंपनी ‘फियाट’ व फ्रान्सची मोटार कंपनी ‘सिट्रोएन’ या दोन्ही कंपन्यांनी जर्मन ‘फोक्सवागान’ मोटारकंपनीला तोंड देण्याकरिता संयुक्त प्रकल्प हाती घेतला आहे.

फ्रान्स हा औद्योगिक देशांमध्ये प. जर्मनीनंतर चौथ्या क्रमांकावर आहे. सबंध जगामध्ये रासायनिक वस्तूंच्या निर्यातीमध्ये फ्रान्सचा चौथा क्रम लागतो. फ्रान्समधील प्रमुख उद्योगांचे १९७७ साली पुढीलप्रमाणे उत्पादन झाले (आकडे लक्ष मे. टनांत) : कापूस धागा : २·३७५ सुती कापड : १·८५५ लोकरीचे कापड : ०·६२२ रासायनिक लाकूड लगदा : १२·४६ वृत्तपत्री कागद : २·६४ छपाईचा व लेखनाचा कागद : १७·२७ इतर कागद व पेपर बोर्ड : २७·९९ संश्लिष्ट रबर : ४·८०५ रबर टायर : ४६५·९ लक्ष नग गंधक अम्ल : ४५·०१ इंधनासाठीचा गॅस : २७·६० पेट्रोल : १७५·४६ अस्फाल्ट : ३३·८५ कोक : १०७·७ सिमेंट : २८९·५५ अशुद्ध लोखंड व फेरोॲलॉइज : १८२·५१ अशुद्ध पोलाद : २२०·९४ वेल्लित पोलाद वस्तू : १८६·०४ ॲल्युमिनियम : ३·९९ शोधित तांबे : ०·४४ शिसे : १·२६ जस्त : २·३८ मोटरगाड्या : ३५·५९ लक्ष नग वीजउत्पादन २,०२३ कोटी किंवॉ. ता. देशात १९७५ मध्ये श्रमबलाचे उद्योगवार विभाजन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षांत) : कृषी, मृगया, वनउद्योग व मच्छीमारी : २३·५०६ खाणकाम : १·७९ निर्मितिउद्योग : ५७·८४८ वीज, गॅस व पाणी पुरवठा : १·७८ बांधकाम : १८·८०९ व्यापार, हॉटेले आणि रेस्टॉरंट : ३४·३८२ दळणवळण व साठवण : ११·७१ अर्थकारण, विमा, सेवाउद्योग : ११·९४६ समुदाय, सामाजिक सेवाउद्योग : ४८·६१७ सक्तीची सैन्यभरती २·९३८ एकूण २१३·३२९ लक्ष. बेकार ५·०१ लक्ष. १९७७ मधील आर्थिक दृष्ट्या कामकरी लोकांची संख्या अंदाजे २२६·२३५ लक्ष असून त्यांपैकी २१४·७७८ लक्ष लोक (पुरुष ६१·१% व स्त्रिया ३८·९%) कामात गुंतलेले होते.

फ्रान्स हे औद्योगिक उत्पादनसंस्थांच्या संख्याबलात जगामध्ये पाचव्या क्रमांकावरचे राष्ट्र असून त्याच्यानंतर ग्रेट ब्रिटनचा, परंतु त्याअगोदर प. जर्मनी, जपान, सोव्हिएट रशिया व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्रांचा क्रम लागतो. तथापि फ्रान्समधील उद्योगधंद्यांची विषम प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. फार मोठ्या औद्योगिक निगमांचे देशातील प्रमाण इतर औद्योगिक राष्ट्रांच्या मानाने कमी आहे. फार थोड्या मोठ्या कंपन्या वगळता, बहुतेक औद्योगिकीकरणाचा सूर हा भौगोलिक दृष्ट्या पसरलेला आढळतो.

फ्रान्सचे अग्रेसर उद्योग म्हणजे पोलाद, मोटरगाड्या, विमाने, कापड व वस्त्रे, रसायने यांची निर्मिती करणारे उद्योग व यांत्रिकीय व विद्युत् अभियांत्रिकीय उद्योग हे होत. खाद्यान्नउद्योग हाही फ्रेंच अर्थव्यवस्थेला महत्त्वाचा वाटणारा उद्योग आहे. यंत्रसामग्री व वाहतूक सामग्री यांची विषम प्रमाणात वाढ झाली आहे. मोटारगाडी उत्पादक देशांमध्ये फ्रान्सचा जगात ग्रेट ब्रिटन, प. जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यानंतर पाचवा क्रमांक लागतो. तथापि यंत्रे व यंत्रावजारे, विमाने, जहाजे या निर्मितिउद्योगांची पुरेशा प्रमाणात वाढ झालेली नाही. यामुळे या उद्योगांच्या महत्त्वाच्या भागांची फ्रान्सला परदेशांकडून आयात करावी लागते. रसायन उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विविधांगी विस्तार होत आहे.

फ्रान्समधील औद्योगिक स्वरुपाचे दुसरे वैशिष्ट्य हे की, देशात लहान व मध्यम आकाराचे औद्योगिक निगमांचे फार मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. अनेक फ्रेंच कंपन्यांची स्थापना श्रीमंत व धनिक कुटुंबांनी केली असल्याने, त्यांचे वंशजही परंपरेने आलेला जुना वारसाच तसाच पुढे चालू ठेवू पाहतात त्यांमध्ये बाहेरुन भांडवल घेऊन विस्तार करू पाहत नाहीत. याशिवाय ग्राहकही प्रचंड प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे पदार्थ घेण्यापेक्षा कमी प्रमाणित आणि अधिक जिव्हाळ्याच्या अशा जुन्या व छोट्या उद्योगांकडून अशा वस्तू विकत घेण्याचे पसंत करतात. उच्च दर्जाच्या चैनीच्या वस्तूंची निर्मिती लहान प्रमाणात करणाऱ्या छोट्या कंपन्या फ्रान्समध्ये प्रकर्षाने आढळून येतात. अर्थातच बाहेरून गुंतवणूक करून उद्योगाचा विस्तार करण्याची प्रवृत्ती देशात मोठ्या प्रमाणावर मूळ धरू शकली नाही.

यामुळेच फ्रान्समध्ये प. जर्मनीप्रमाणे इतर औद्योगिक राष्ट्रांच्या मानाने १०० कोटी डॉलरांहून अधिक वार्षिक विक्री दाखविणाऱ्या उद्योगांचे प्रमाणे अत्यल्प आहे. सर्वांत मोठ्या फ्रेंच औद्योगिक निगमांमध्ये, ऱ्‍होन-पूलेंक हा रसायन निर्मिती करणारा निगम व शासकीय मालकीचा मोटारगाड्यांचे उत्पादन करणारा ‘रेनॉल्ट’ हा निगम यांचा समावेश होतो. इतर औद्योगिक राष्ट्रांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर संकेंद्रीकरण झालेले फ्रान्समधील उद्योग म्हणजे मोटारगाडीनिर्मितीउद्योग, अशुद्ध तेल शुद्धीकरण उद्योग व ॲल्युमिनियम उद्योग हे होत. इतर फ्रेंच उद्योगधंद्यांतील सर्वांत मोठे औद्योगिक निगम हेही प. जर्मनी, बेल्जियम किंवा नेदर्लड्समधील याच प्रकारच्या औद्योगिक निगमांपेक्षा लहान असतात. उदा., ‘उसिनॉर’ या विलीनीकरणानंतर बनलेल्या फ्रान्समधील सर्वांत मोठ्या पोलाद कंपनीचे विक्रीचे आकडे हे प. जर्मनीच्या आघाडीच्या ‘थायसेन’ या पोलाद कंपनीप्रमाणेच ३६% नी मोठे असल्याचे आढळून आले आहे. आघाडीच्या फ्रेंच मोटारकंपनीचे विक्रीचे आकडे हे प. जर्मनीच्या फोक्सवागान या मोटारकंपनीच्या विक्री आकड्यांहून ५०% नी कमी आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील औद्योगिक संकेंद्रीकरणाशी तुलना करता फ्रेंच उद्योग फारच मागे असल्याचे आढळते. ‘युनायटेड स्टेट्स स्टील’ (यू.एस्.स्टील) या अमेरिकन पोलाद निगमाच्या एकूण विक्रीच्या १/७ विक्रीचे आकडे ‘उसिनॉर’ या फ्रेंच पोलाद कंपनीचे होतात. आघाडीच्या अमेरिकन इलेक्ट्रॉनिकी निगमाची वार्षिक विक्रीची उलाढाल मोठ्या फ्रेंच इलेक्ट्रॉनिकी कंपनीच्या विक्रीपेक्षा दहा पटींनी अधिक असते आणि एकट्या ‘जनरल मोटर्स’ या कंपनीचे विक्रीचे आकडे म्हणजे सबंध फ्रान्सचा अर्थसंकल्प, अशी वस्तुस्थिती आहे.

फ्रान्सच्या उद्योगांचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे हे उद्योग प. जर्मनी वा ग्रेट ब्रिटन या राष्ट्रांतील उद्योगांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर सर्वत्र संकेंद्रित झाल्याचे आढळत नाही. पॅरिस व त्याचा परिसर यांच्यानंतर लील ह्या उत्तर फ्रान्समधील शहरात व त्याच्या परिसरात औद्योगिक केंद्रीकरण झालेले आहे. अर्थातच कोळसा खाणींचे सान्निध्य व परंपरेने (मध्ययुगापासून) चालत आलेला लील, रूबे, टूर्‌क्की या शहरांच्या परिसरातील कापडउद्योग ही याची महत्त्वाची कारणे होत. लीलच्या परिसरात कोळशावर आधारित पुढील अवजड उद्योगांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे : डर्नी, व्हालेन्सिएंझ, डंकर्क या ठिकाणी विकास पावलेला पोलाद उद्योग खते, डामर, बेंझिन, प्लॅस्टिके यांचे निर्मितिउद्योग सिमेंट, तापविद्युत् निर्मिती, तसेच यांत्रिक व अभियांत्रिकीय उद्योग. फ्रान्समधील दुसरा मोठा औद्योगिक प्रदेश म्हणजे लॉरेन प्रांताचा मध्य व उत्तर भाग हे होत. सु. ६६% अशुद्ध लोखंड व पोलाद उत्पादन या औद्योगिक पट्ट्यात होते. इतर औद्योगिक प्रदेश हे अटलांटिक किनाऱ्यावरील मोठ्या नदीमुखखाड्यांच्या परिसरात आढळतात. ल हाव्र, रूआन, नँट्स, सँ नाझेर, बॉर्दो, मार्से यांसारख्या मोठ्या बंदरांच्या परिसरात खनिज तेल शुद्धीकरण, खनिज तेल रसायनांची निर्मिती, खते, पीठ गिरण्या व जहाजनिर्मिती यांसारखे मोठे उद्योग भरभराटीस आले आहेत.

पॅरिस शहर व त्याचा परिसर म्हणजे औद्योगिक संकेंद्रीकरणाच्या दृष्टीने अतिशय विलक्षण प्रदेश मानावा लागतो कारण पॅरिसमधील व त्याच्या आसमंतातील औद्योगिकीरणाचा पाया खरे तर प्रचंड लोकसंख्या हाच आहे कारण हिच्यातूनच उद्योगचक्रांच्या भ्रमणाला लागणारा श्रमबलाचा मोठा साठा व ग्राहकोपयोगी वस्तूंचे सेवन करणारी प्रचंड बाजारपेठ या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध होतात. म्हणूनच पॅरिस व त्याचा आसमंत विशेषतः ग्राहकोपयोगी वस्तुनिर्मितिउद्योगांचे प्रचंड औद्योगिक केंद्र आहे असे म्हटले जाते या परिसरातील सु. ९० लक्ष लोकांच्या गरजा भागविणाऱ्या उद्योगांमधून सु. १५ लक्ष लोक गुंतलेले असल्यामुळे येथील उद्योगांच्या आकाराचीही कल्पना येऊ शकते.

फ्रान्समध्ये रस्ते व लोहमार्ग या महत्त्वाच्या दळणवळण साधनांच्या आधारावरही औद्योगिक पट्टे निर्माण झाले आहेत. लीआँ व त्याचा परिसर यांमध्ये मुख्यतः उच्च दर्जाचा रेशीम उद्योग, यांत्रिक उद्योग, संश्लिष्ट धागा निर्मिती-उद्योगांसारख्या मोठ्या रासायनिक उद्योगांचा समावेश झालेला आहे. अर्थात कोळसा व कच्चे लोखंड, मोठी बंदरे, दाट लोकवस्ती आणि दळणवळणाची साधने या चार प्रकारांवर आधारित उद्योगधंद्यांमुळे एकूण फ्रेंच उद्योगाच्या ५०% उत्पादनच होऊ शकते. याचे कारण सबंध फ्रान्समध्येच पसरलेले लहान आणि मध्यम उद्योगधंद्यांचे जाळे, हे होय.

देशात कामाचे प्रमाणित तास दर आठवड्यास ४० असतात. जास्त काम करणाऱ्‍यांना अतिकालिक भत्ता मिळतो. वेतनाचे प्रमाण पूर्वी ब्रिटिश व जर्मन वेतनांपेक्षा काहीसे खालच्या पातळीवर असे परंतु १९६८ पासून वेतनवाढ झाल्याने आता फारसा फरक राहिलेला नाही. कामगारांना समाजकल्याणाच्या सोयी भरपूर प्रमाणावर उपलब्ध आहेत. एकापेक्षा अधिक मूल असलेल्या कामगार कुटुंबांना कुटुंबभत्तेही मिळतात. त्यांसाठी मालकांकडून पैसे गोळा केले जातात. मालक व उच्च व्यवस्थापक वर्गाची संख्या एकूण कामगारांच्या १·२५ टक्के इतकीच आहे. व्यवस्थापनशास्त्र संस्थांमधून प्रशिक्षित झालेल्या तरुण व्यवस्थापकांची संख्या आता वाढत आहे.

फ्रान्समध्ये संप फारसे घडून येत नाहीत. अर्थात याला अपवाद फक्त मे १९६८ मध्ये घडून आलेल्या सार्वत्रिक संपाचा. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात संबंध यूरोपमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणावर अन्यत्र कोठे संप झाला नाही. या सार्वत्रिक संपात ९० लक्ष कामगारांनी भाग घेतला होता. संप जर घडून आलेच, तर ते अल्पजीवी असतात. एकूण फ्रेंच कामगारांपैकी २०% कामगार संघटनांचे सदस्य असतात. कामगार संघटना राजकीय व तात्त्विक मतभिन्नतेमुळे सलोखा राखू शकत नाहीत. प्रारंभी फ्रान्समधील कामगार संघटना उद्योगनिहाय न बनता, भौगोलिक प्रदेशावरुन उभारल्या जात. तथापि आता रसायने, खनिज तेल, गॅस व वीज यांसारख्या मोठ्या उद्योगांत कामगार संघटना प्रभावीपणे कार्य करीत आहेत. देशातील सर्वांत मोठे कामगार महासंघ तीन असून ते पुढीलप्रमाणे : (१) कॉन्फेडरेशन जनरल द ट्रॅव्हेल (सीजीटी–कम्युनिस्टप्रणीत व त्यांच्याकडे झुकणारा, स्था. १८९५). या महासंघाची सदस्यसंख्या सु. २४ लक्ष असून तो १९४५ पासून ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ (डब्ल्यूएफ्टीयु) या आंतरराष्ट्रीय महासंघाचा सदस्य आहे. (२) द कॉन्फेडरेशन फ्रँकेस डेमॉक्रॅटिक द ट्रॅव्हेल (सीएफ्‌डीटी–कॅथलिकांच्या बाजूला झुकलेला, स्था. १९१९). ४,४३० कामगार संघटना, १०२ विभागीय कामगार संघटना आणि ३० संलग्न व्यावसायिक महासंघ या सर्वांचे संयोजन करतो. १९७८ मधील या महासंघाची सदस्यसंख्या सु. ११ लक्ष होती. सीएफ्‌डीटी हा कामगार महासंघ ‘यूरोपीय ट्रेड युनियन कॉन्फेडरेशन’शी संलग्न आहे. (३) फोर्स ओव्ह्‌रिएर (एफ्ओ–सोशालिस्टांचा, स्था. १९४७). ‘सीजीटी’ मधून फुटून निघालेला महासंघ. यांची सदस्यसंख्या सु. ८·५ लक्ष असून तो ‘आयसीएफ्टीयु’ या आंतरराष्ट्रीय महासंघाचा सदस्य आहे. यांशिवाय देशात बुद्धिजीवी लोकांचाही ‘कॉन्फेडरेशन जनरल दे कॅडेर्स’ (सीजीसी) या नावाचा एक महासंघ आहे. तो १९४४ मध्ये स्थापन करण्यात आला असून त्याची २·५ लक्षांवर सदस्यसंख्या आहे. कामगार संघटनांप्रमाणेच देशातील मालकांचीही एक मोठी संघटना असून ती ९ लक्ष उत्पादनसंस्थांचे (सु. ८० लक्ष कामगार) प्रतिनिधित्व करते. प्रदेशनिहाय व उद्योगनिहाय अशी तिची उभारणी करण्यात आली आहे. सरकारी व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांतील उद्योगधंद्यांसाठी सांघिक सौदा पद्धती (सामुदायिक वाटाघाट पद्धती) वापरली जात असली, तरी सरकारीही प्रत्यक्ष वाटाघाटींमध्ये भाग घेऊ शकते. १९६८ च्या सार्वत्रिक संपाच्या वेळी शासनाने प्रत्यक्ष वाटाघाटींमध्ये भाग घेतला होता. अशा अनेक वाटाघाटी व वेतनविषयक करार करण्यात शासन यशस्वी ठरले आहे.

व्यापार : अंतर्गत : फ्रान्सचा अंतर्गत व्यापार हा राष्ट्रीय उत्पन्न, कौटुंबिक अंदाजपत्रके आणि वितरणपद्धतीचे स्वरूप या तीन प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते : ६४·५% खाजगी खर्च १२% सार्वजनिक खर्च २३% भांडवल उभारणी व ०·५% निर्यात. कौटुंबिक अंदाजपत्रकातील वाटणी पुढीलप्रमाणे असते : ३३% खर्च अन्न व पेये यांसाठी–हे प्रमाण फ्रान्स संपन्न होईल त्या प्रमाणात घटत आहे ११·७% खर्च कपड्यांसाठी १७·३% खर्च गृहनिवसनार्थ १२% आरोग्याकरिता ८·७% प्रवास व संदेशवहन–हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे ७% सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम आणि १०·३% हॉटेले, रेस्टॉरंट इत्यादींसाठी.

फ्रॉन्सच्या अंतर्गत व्यापाराचे ठळक वैशिष्ट्य हे की, लहान प्रमाणावर विक्रीची उलाढाल चालू ठेवणारे आणि एका कुटुंबाने चालविलेले असे छोटेसे दुकान, हे होय. अलीकडे किरकोळ व्यापाराचे स्वरूप बदलत असून पूर्वीच्या एकछत्री दुकानांऐवजी विभागीय भांडारे, सुपरबाजार, साखळी दुकाने, सहकारी दुकाने व मोठाली विशेष प्रकारची दुकाने यांचे प्रमाण वाढत आहे. टपाल विक्री व्यवसाय अत्यंत मर्यादित स्वरूपाचा असून कारखान्यांतून ग्राहकाकडे माल पाठविण्याच्या पद्धतीसही म्हणावा तसा प्रतिसाद नाही. सामान्यतः फ्रान्सचा अंतर्गत व्यापार (किरकोळ व घाऊक) मोठ्या परिव्यायाचा असून त्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. सर्वांत मोठ्या पन्नास विभागीय भांडारांमध्ये ‘प्रिंटेंप्स’, ‘गॅलरीएस लाफाएत’ यांचा अंतर्भाव होतो. अंतर्गत व्यापार दिवसा ९ ते १२ व दुपारी २ ते ६ पर्यंत चालतो. बहुतेक बँका शनिवारी बंद असतात. ऑगस्टमध्ये बहुतेक व्यापारी संस्था तीन ते चार आठवड्यांची सुटी घेतात. जाहिरातदारीचा प्रसार वृत्तपत्रे, मासिके यांमधून मोठ्या प्रमाणावर, तर नभोवाणी व दूरचित्रवाणी या शासकीय माध्यमांद्वारे थोड्या प्रमाणात झाला आहे. पॅरिस व इतर मोठ्या शहरांतून व्यापारी जत्रा नियमितपणे भरतात.

परदेशी : कच्च्या मालाच्या बाबतीत निर्यातीपेक्षा आयात जास्त, तर निर्मिती वस्तूंच्या बाबतीत आयातीपेक्षा निर्यात अधिक, असे फ्रान्सच्या विदेशी व्यापाराचे स्वरुप आहे. निर्यातीपैकी ७५% माल निर्मित वस्तूंचा असून त्यापैकी उपभोग्य वस्तूंचे प्रमाणे ३४% आहे. निर्यातीमधील प्रमुख हिस्सा निर्मित वस्तूंचा व भांडवली वस्तूंचा असून (यंत्रे, अवजड विद्युत् उपकरणे, वाहतूक सामग्री व साधने, विमाने व जहाजे), त्यांखालोखाल उपभोग्य वस्तू (मोटारगाड्या, कापड व वस्त्रे आणि कातडी वस्तू), अर्धनिर्मित पदार्थ (मुख्यतः रसायने, लोखंड व पोलाद) आणि शेतमाल यांचा क्रम लागतो. आयात मालामध्ये मुख्यतः भांडवली वस्तू २५% उपभोग्य वस्तू १५%, अर्धनिर्मित वस्तू व पदार्थ, कच्चा माल आणि इंधने यांचा समावेश होतो.

फ्रान्सचा बहुतेक परदेशी व्यापार यूरोपशी चालतो. यूरोपीय आर्थिक संघाचा फ्रान्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. फ्रान्सचा सु. ७५% व्यापार प. यूरोपमधील बेल्जियम, प. जर्मनी, लक्सेंबर्ग, इटली, स्वित्झर्लंड, नेदर्लंड्स व ग्रेट ब्रिटन यांच्याशी होतो. त्याखालोखाल कॅनडा, द. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याशीही थोडा व्यापार चालतो. फ्रँक विभागातील राष्ट्रांबरोबर फ्रान्सचे विशेष महत्त्वाचे व्यापारी संबंध आहेत.

गेल्या काही वर्षांत फ्रान्सने आपला निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणात वाढविला आहे. १९७२ पासून फ्रान्स हा जगाती चौथ्या क्रमांकाचा निर्यातक देश म्हणून ओळखला जातो. उदार शासकीय धोरणामुळे फ्रान्सला मध्यपूर्वेकडील देशांबरोबरच्या निर्यात व्यापारात लक्षणीय वाढ करणे शक्य झाले आहे. शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमध्ये सबंध जगात फ्रान्सचा तिसरा क्रम लागतो.


इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून रहावे लागत असल्यामुळे १९७३ पासून उद्‌भवलेल्या जागतिक इंधन समस्येला फ्रान्सला मोठ्या कष्टाने तोंड द्यावे लागले. १९७४ मध्ये चलनवाढीचे प्रमाण १५% पर्यंत वाढले १,६०० कोटी फ्रँकची व्यापारतूट फ्रान्सला सहन करावी लागली. स्थूल राष्ट्रीय उत्पादन १९७७ मध्ये फक्त २·२ टक्क्यांनीच वाढले. अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांत मंदीचे प्रमाण वाढले १९७६ व १९७७ या दोन्ही वर्षी व्यापारघट झाली. १९७६ मध्ये चलनवाढीचे प्रमाणे ९·९% होते. १९७७ मध्ये ते ९% वर आले. शासनातर्फे बेकारी भत्त्यांची योजना कार्यवाहीत आणली जाऊनही १९७७ मध्ये बेकारी १० लाखांवर गेली. ऑक्टोबर १९७८ मध्ये तर हा आकडा १३,४४,००० वर गेला. तथापि पंतप्रधान रेमंड बार यांनी कार्यवाहीत आणलेल्या आर्थिक धोरणांचे अनुकूल परिणाम १९७८ पासून दिसू लागले. त्याच वर्षीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात आधिक्य आले चलनवाढीचे प्रमाणही खाली आले. १९७७ मधील फ्रान्सचा निर्यात व आयात व्यापार अनुक्रमे ३१,१५५ कोटी व ३४,६२० कोटी फ्रँकचा होता.

अर्थकारण : अर्थसंकल्पात येणारी तूट ही फ्रान्सची वारंवार उद्‌भवणारी डोकेदुखी आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत आणि त्यानंतरच्या काळात सरकारी खर्च महसुली उत्पन्नापेक्षा कितीतरी वाढल्यामुळे या तुटीच्या प्रमाणात भरच पडत गेली. चलनवाढ भयंकर प्रमाणात झाल्याने किंमतीही भरमसाट वाढल्या. फ्रँकचे १७·५ टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात येऊन १९६० मध्ये १०० जुन्या फ्रँकबरोबर मूल्य असलेला एक नवा फ्रँक हे चलन चालू करण्यात आले. फ्रँक हे देशाचे अधिकृत चलन असून त्याचे १०० ‘सेंटिंम’मध्ये समान भाग करण्यात आले आहेत. १, ५, १०, २० व ५० सेंटिंमची नाणी, तर १, २, ५ व १० फ्रँकची नाणी आणि १०, ५०, १०० व ५०० फ्रँकच्या कागदी नोटा प्रचारात आहेत. ऑक्टोबर १९७८ मधील विदेश विनिमय दर ८·३८५ फ्रँक १ = स्टर्लिंग पौंड आणि ३·९८९ फ्रँक = १ अमेरिकन डॉलर म्हणजेच १०० फ्रेंच फ्रँक = ११·९३ स्टर्लिंग पौंड = २५·०७ अमेरिकन डॉलर असा होता.

फ्रान्सच्या १९७८ च्या अर्थसंकल्पात महसूल व खर्च यांचे आकडे अनुक्रमे ४०,१०१·८ कोटी व ४१,२२४.१ कोटी फ्रँक एवढे होते.

संतुलित अर्थसंकल्प ही काही फ्रान्सची परंपरा नाही तथापि जनरल द गॉलच्या अध्यक्षीय कारकीर्दीत (१९५९–६९) अर्थसंकल्पीय तूट शक्यतो कमी ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आणि काही वर्षांच्या अर्थसंकल्पांत वाढावा वा शिल्लकही आढळून येई. कित्येक यूरोपीय राष्ट्रांमध्ये अर्थसंकल्प हे अर्थनीतीचे प्रमुख साधन समजले जात असले, तरी फ्रान्समध्ये तशी परिस्थिती नाही कारण फ्रान्समधील अर्थसंकल्प सादर केला जाण्याअगोदर सहा महिने तयार करण्यात येतो आणि त्यामुळे व्यापारचक्रासारख्या अरिष्टाला तोंड द्यावयाला अशा अर्थसंकल्पाचा प्रभावी उपयोग होत नाही. फ्रान्समधील कंपन्यांना भराव्या लागणाऱ्या कराचे प्रमाणे त्यांना मिळणाऱ्या नफ्याच्या ५०% असून, काही भांडवली नफ्यांबाबत हे करप्रमाण कमी करण्यात येते.

व्यक्तिगत प्राप्तिकर उद्‌गामी दरांनी आकारला जात असून कुटुंबाचे आकारमान व अवलंबी व्यक्ती यांचाही अशा आकारणीच्या वेळी विचार केला जातो. प्राप्तीकरभार हा प्राप्तीचा उगम व प्रकार यांनुसार बदलत असतो आणि या दृष्टीने पाहता प्राप्तिकर आकारणीच्या बारांवर पद्धती आहेत. सांप्रत फ्रान्समध्ये ‘कमवा व भरा’ (पे ॲज यू अर्न) अशी वेतनाच्या मुळाशी कर आकारणीची पद्धत प्रचलित नसल्यामुळे, सर्व प्रकारच्या प्राप्तींवरील कर चुकवेगिरीचे प्रमाण देशभर पसरले आहे. वस्तुतः फ्रान्समधील कुटुंबापैकी जवळजवळ निम्मी कुटुंबे प्रत्यक्ष कर भरतच नाहीत आणि एकूण करांपासून मिळणाऱ्‍या महसुलापैकी सु. ६६% महसूल अप्रत्यक्ष करांपासून जमत असल्याने फ्रेंच करपद्धती ही सबंध यूरापमध्ये सर्वांत विषमन्यायी (अयोग्य) असल्याचे मानले जाते. १९७० च्या पुढे करपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने काही उपाय कार्यवाहीत आणले गेल्याने अप्रत्यक्ष करांचे ओझे कमी होईल, त्याचप्रमाणे व्यक्तिगत प्राप्तिकरांबाबतही आढळून येणाऱ्या काही गैरवाजवी गोष्टी दूर होतील अशी अपेक्षा आहे. जवळजवळ सर्व आयात शुल्क हे मूल्यनुसारी आकारले जातात. आयातींबाबत सवलत देणाऱ्या अन्य राष्ट्रांनाही फ्रान्स किमान आयातशुल्क आकारतो. सामाईक बाजारपेठेच्या सदस्य राष्ट्रांना ही सवलत दिली जाते.

बँक ऑफ फ्रान्स ही फ्रान्सची मध्यवर्ती बँक १३ फेब्रुवारी १८०० मध्ये नेपोलियनने स्थापिली. प्रारंभी ती खाजगी संस्था होती. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच शासनाने १ जानेवारी १९४६ रोजी तिचे व अन्य चार प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. (क्रेडिट लीआँनेस, सोसिएट जनरल, नॅशनल बँक ऑफ कॉमर्स ॲड इंडस्ट्री व अन्य एक बँक) (शेवटच्या दोन बँकांचे ‘बँक नॅशनल दी पॅरिस’-मध्ये विलीनीकरण झाले). बँक ऑफ फ्रान्सचे भांडवल २५ कोटी फ्रँक (१९६३) असून तिच्या देशभर २३५ शाखा आहेत.

बँकिंग व अर्थकारण या दोन्ही क्षेत्रांवर फ्रेंच शासनाचा मोठा प्रभाव आहे. जरी देशात वित्तसंस्थांची संख्या मोठी असली, तरी इतर प्रगत यूरोपीय देशांप्रमाणे फ्रान्समधील नाणेबाजार व भांडवलबाजार यांचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. सर्व फ्रेंच बँकांच्या एकंदर भत्ता व दायित्वे यांच्या ५०% भत्ता व दायित्वे वरील बँकांची आहेत. सु. ३०० बँकांपैकी जवळजवळ निम्म्या बँका स्थानिक आहेत. व्यापारी बँकांशिवाय देशात विशेष प्रकारच्या पतसंस्था कार्य करतात. ‘क्रेडिट नॅशनल’ ही पतसंस्था दीर्घ मुदती कर्जाप्रमाणेच उद्योगांना मध्यम मुदतीचीही कर्जे पुरविते. ‘क्रेडिट फाँसियर’ ही पतसंस्था मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे देते. ‘बँक फ्रँकेस इ कॉमर्स एक्स्टीरिअर’ ही बँक आयात-निर्यात व्यापारात गुंतलेली आहे. ‘क्रेडिट ॲग्रिकोल’ ही कृषिकर्जे उपलब्ध करते. ९४ स्थानिक सदस्यसंस्थांची ही सर्वोच्च संस्था आहे. ३२५ फ्रेंच बँका (यांमध्ये परदेशी बँकशाखा अंतर्भूत) सबंध देशभर आपल्या सु. ३,००० शाखांद्वारा बँकिंग कार्य करतात. देशात सु. ४९ खाजगी विनियोग बँका असून त्यांपैकी ‘बँक द पॅरिस’, ‘बँक द एल् युनियन’, ‘रॉथ्सचाइल्ड फ्रेरेस’ या प्रसिद्ध विनियोग बँका आहेत. देशातील ५०० च्या वर वित्तकंपन्यांपैकी सु. १६० कंपन्या हप्तेबंदी पत उपलब्ध करीत असून २०० कंपन्या रोखे-व्यवहार करतात.

शासनाच्या १९६६ व १९६७ च्या प्रशासकीय व वैधिक उपाययोजनांच्या कार्यवाहीमुळे अद्ययावतता व स्पर्धाशीलता या दोन्ही दृष्टींनी फ्रेंच बँकिंग व्यवस्थेत सुधारणा घडून आल्याचे आढळते. युनिट ट्रस्ट संस्थांची वाढ होत आहे.

जानेवारी १९६२ मध्ये पॅरिसमधील दोन शेअरबाजारांचे विलीनीकरण करण्यात आले. तथापि इतर यूरोपीय देशांतील शेअरबाजारांप्रमाणे, पॅरिस शेअरबाजार हा औद्योगिक भांडवल उभारणीच्या कार्यात प्रभावी कामगिरी अद्यापि बजावू शकत नाही. बॉर्दो, लील, लीआँ, मार्से, नॅन्सी व नँट्स या ठिकाणी शेअरबाजार आहेत. देशातील विमा व्यवसाय शासनाच्या विमा संचालनालयातर्फे नियंत्रित केला जातो. देशात ५१० वर विमा कंपन्या असून ३५० हून अधिक फ्रेंच कंपन्या, तर उर्वरित परदेशी विमा कंपन्या आहेत. बहुतेक विमा कंपन्या विमा व पुनर्विमा असे दोन्ही विमाप्रकार हाताळतात. १९४६ मध्ये ३२ मोठ्या विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात येऊन केंद्रीय पुनर्विमा संस्था स्थापन करण्यात आली.

आर्थिक धोरण : फ्रान्समध्ये इतर पश्चिमी प्रगत देशांपेक्षा अधिक प्रमाणात अर्थव्यवस्थेवर शासनाचा अतिशय मोठा प्रभाव आढळतो. नाणेबाजार, विमाव्यवसाय यांच्यावर तसेच खासगी क्षेत्रीय गुंतवणुकीवर एकंदरीत शासनाचे कडक नियंत्रण असते. फ्रेंच अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला सरकारी क्षेत्रापेक्षा दुय्यम स्थान आहे. देशातील सर्वांत मोठ्या दहा औद्योगिक कंपन्यांपैकी तीन शासनाच्या मालकीच्या, तर दोन आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांच्या दुय्यम कंपन्या आहेत. देशातील एकूण वार्षिक गुंतवणुकीपैकी ५० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सरकारी क्षेत्रात केली जाते. सरकारी क्षेत्रामध्ये कोळसा, वीज, गॅस, रेल्वे, रेनॉल्ट मोटारकंपनी आणि तंबाखू उद्योग यांचा अंतर्भाव होतो.

दुसऱ्या महायुद्धानंतर कार्यवाहीत आणलेल्या फ्रेंच नियोजन पद्धतीमध्ये सरकारी व खाजगी क्षेत्रांतील उद्योगांसाठीची लक्ष्ये निर्धारित केली जातात आणि ही सर्व यंत्रणा ‘कमिसारिएट जनरल टू प्लान’ म्हणजेच ‘नियोजन कार्यालया’मार्फत नियंत्रित व समन्वित केली जाते. प्रत्येक योजना ही पाच वर्षांची असून ती अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक महत्त्वाच्या विभागातील उत्पादन व मागणी यांच्या अपेक्षित वाढीचे अंदाजित व अपेक्षित आकडे आणि ह्या लक्ष्यांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या गुंतवणुकीचे आकडे यांवरून तयार करण्यात येते. फ्रान्सच्या पंचवार्षिक योजना या बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरल्याचे आढळते. उदा., चौथ्या पंचवार्षिक योजनेत (१९६२–६५) वार्षिक विकासदर ५·५% ठरविण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात तो ४·८% साध्य झाला. पाचव्या योजनाकाळात (१९६६–७०) वार्षिक विकासदराचे लक्ष्य ५% ठरविण्यात आले होते, प्रत्यक्षात विकासदर ५% वर गेल्याचे आढळून आले आहे. फ्रान्सच्या पंचवार्षिक योजनांचे एक मूलभूत उद्दिष्ट फ्रेंच उद्योगांची आंतरराष्ट्रीय स्पर्धाशीलता वाढविणे हे असल्यामुळे, या योजनांनी फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे मान उंचावण्यात मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. अर्थव्यवस्थेमधील विविध विभागांना आणि क्षेत्रांना त्यांच्या निर्णयांचे परिणाम काय होतील याची व त्यांवरून एकंदर अर्थव्यवस्थेतील अपेक्षित घडामोडींची माहिती करून देऊन फ्रेंच नियोजन कार्यालयाने अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा व घटकांचा समन्वय साधण्यात यश मिळविले आहे आणि म्हणूनच फ्रान्सच्या योजना म्हणजे जगामधील मुक्त अर्थव्यवस्था प्रचलित असणाऱ्या राष्ट्रांना आदर्श नमुना ठरल्या आहेत. फ्रान्सच्या पाचव्या पंचवार्षिक योजनेतील (१९६६–७०) फ्रेंच उद्योगांची आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता वाढविण्याचे प्रधान उद्दिष्ट पुढील सहाव्या योजनेतही (१९७१–७५) पुढे चालविण्यात आले.

युद्धोत्तर पुनर्रचनेसाठी व त्यानंतर आर्थिक प्रगतीसाठी फ्रान्सने अनेक योजना राबविल्या आणि अर्थव्यवस्थेवर अधिकाधिक शासकीय नियंत्रण बसविले. पहिल्या आधुनिकीकरण योजनेचा (१९४७–५३) उद्देश युद्धपूर्व कुंठित झालेल्या व युद्धामुळे मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेस चालना देण्याचा होता. त्या योजनेत कोळसा, पोलाद, सिमेंट, कृषियंत्रसामग्री व वाहतूक यांचा प्रामुख्याने विस्तार करण्यात आला आणि त्यांची उत्पादकता उद्दिष्टांहूनही अधिक प्रमाणात वाढविण्यात फ्रान्सला यश मिळाले. दुसऱ्या योजनेत (१९५४–५७) सर्वच उत्पादक क्षेत्रांत समावेश करण्यात आला आणि कृषिपदार्थांवर प्रक्रिया करणारे उद्योग, गृहबांधणी व समुद्रपार होणारे उत्पादन यांची वाढ करण्यावर विशेष भर दिला गेला. वीज, मोटारी व रासायनिके यांच्या उत्पादनात ठळक प्रगती झाली परंतु फ्रान्सचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव लागला नाही. अधिदान शेषही फ्रान्सला प्रतिकूल होत गेला व १९५८ मध्ये फ्रान्सपुढे अनर्थ उभा राहिला. अंदाजपत्रकीय तूट भरून काढण्यासाठी शासनाला अर्थसाहाय्यात कपात करावी लागली आणि कोळसा, गॅस, वीज यांच्या किंमती व रेल्वेभाडे यांत वाढ करणे भाग पडले. तिसऱ्या योजनेचे (१९५८–६१) उद्दिष्ट स्थिरतेसह भरपूर आर्थिक विकास साधण्याचे व २० टक्क्यांनी उत्पादन वाढविण्याचे होते. सुरुवातीच्या दोन वर्षांत ही वाढ फक्त प्रतिवर्षी २·५ टक्केच झाली परंतु १९६० मध्ये वाढीचा वेग ६·३% व १९६१ मध्ये ५·०% इतका करण्यात योजनेस यश आले. चौथ्या योजनेत (१९६२–६५) विकासाचा अपेक्षित वेग प्रतिवर्षी ५ ते ६% होता व उपभोगात २३% वाढ अपेक्षित होती. शिवाय कृषीखेरीज इतर क्षेत्रांत १० लक्ष लोकांना रोजगार पुरवून पूर्ण रोजगार प्रत्यक्षात आणण्याचेही उद्दिष्ट होते. या योजनाकाळात आर्थिक विकास प्रतिवर्षी ६ टक्क्यांनी करण्यात फ्रान्स यशस्वी झाला. पाचव्या योजनेत (१९६६–७०) प्रतिवर्षी ५% वाढ आणि खाजगी उपभोगात २५% वाढ व्हावी, अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य व पूर्ण रोजगार टिकून राहतील, असेही योजिले होते. अंतःसंरचनेत (शाळा, इस्पितळे, समाजविकास, वाहतूक व दळणवळण यांची) ५५% व बांधकामखर्चात ३५% वाढ करावयाची अशी योजनेत तरतूद होती. सहाव्या योजनेत (१९७१–७५) प्रतिवार्षिक वाढ ६% अपेक्षित असून उपभोग्य वस्तूंची किंमतवाढ मात्र प्रतिवर्षी २·५ टक्क्यांनीच व्हावी, अशी व्यवस्था केली होती. सरकारी क्षेत्रातील गुंतवणुकीत योजनाकाळात ५० ते ६०% वाढ करण्याचे योजिले असून जून १९७० पर्यंत स्थिरतेचे उद्दिष्ट जवळजवळ हाती आले होते. आंतरराष्ट्रीय व्यवहारात संतुलन साधले होते, चलनबाजारात फ्रँकमध्ये विश्‍वास निर्माण झाला होता व परकीय चलनातील अल्पमुदतीच्या कर्जांची पूर्णपणे फेड करण्यात आली होती. अंतर्गत पतपुरवठ्यातील नियंत्रण मात्र कायम होते.

वाहतूक व संदेशवहन : फ्रेंच वाहतूकव्यवस्था ही यूरोपातील उत्तम वाहतूकव्यवस्थांपैकी एक आहे. फ्रेंच रेल्वेचे दुसऱ्या महायुद्धापूर्वीच (१९३७) राष्ट्रीयीकरण झाले. फ्रेंच रेल्वेची माल व प्रवासी वाहतूक पश्चिम जर्मनीतील वाहतुकीपेक्षा थोड्या अधिक प्रमाणावर होते. आर्थिक प्रगती व्हावी म्हणून सरकारने मालवाहतुकीचे दर कमी ठेवले आहेत. गरिबांची रेल्वेप्रवासाची सोय व्हावी म्हणून रेल्वेभाडेही माफक असते. शिवाय सरकारने लोहमार्गांच्या विद्युतीकरणाचे विशेष प्रयत्न केल्याने जवळजवळ २५% रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले असून आणखी ३७% रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण हाती घेण्यात आले आहे. १९७६ मध्ये ३४,७०० किमी. लोहमार्गांपैकी ९,३७४ किमी, रेल्वे व मालमोटारींनी मालाची एकात्मीकृत वाहतूक करण्याची व्यवस्थाही रेल्वेने केली आहे. एस्एन्‌सीएफ् या शासकीय रेल्वे मंडळाकडून एकूण नियंत्रण केले जाते. हे रेल्वेमंडळ पाच यंत्रणांत विभागलेले असून त्यांचे पुढे २५ क्षेत्रीय विभाग बनविण्यात आले आहेत. १९७७ मध्ये एकूण लोहमार्गांची लांबी ३७,१४३ किमी. होती. फ्रेंच आगगाड्यांनी वेगाबाबत जागतिक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. पॅरिस येथे भुयारी रेल्वेमार्ग १९४९ मध्ये कार्यान्वित झाला. अशा प्रकारच्या भुयारी रेल्वेमार्गांचे बांधकाम मार्से, लीआँ व लील या तीन मोठ्या शहरांमध्ये चालू आहे. अवजड मालाची वाहतूक अंतर्गत जलमार्गांद्वारे केली जाते. कालव्यांतून व नद्यांतून होणारी मालवाहतूक एकूण रेल्वेने होणाऱ्या मालवाहतुकीच्या २०% इतकी आहे. एकूण रेल्वेवाहतुकीपैकी ७५% वाहतूक विजेच्या एंजिनांकडून १५% डीझेल एंजिनांकडून व १०% वाफेच्या एंजिनांचा वापर करून होत असते. १९७२ नंतर वाफेच्या एंजिनांचा वापर बंद करण्याचे ठरविण्यात आले.

यूरोपमधील इतर सर्व राष्ट्रांपेक्षा फ्रान्समधील नोंदलेल्या मोटारगाड्यांची संख्या अधिक असून ती जवळजवळ १५९ लक्षांच्या आसपास आहे (१९७६). मालमोटारींनी होणारी मालवाहतूक अंतर्गत जलवाहतुकीच्या सु. दुप्पट आहे. असे असूनही मोठमोठे नवीन रस्ते बांधण्याकडे फ्रान्सने विशेष लक्ष पुरविलेले दिसत नाही. अलीकडे मात्र मोटारवाहतुकीस अनुकूल असे मोठे रस्ते बांधण्यास सुरुवात झाली आहे. १९७७ मध्ये एकूण १५,२०,८०५ किमी. लांबीचे रस्ते असून ४,४०४ किमी. लांबीचे मोटाररस्ते होते. त्याच वर्षी देशात १५९ लक्ष मोटारगाड्या, ३८·२१ लक्ष मालमोटारी, ९७,००० बसगाड्या, ५·३० लक्ष मोटारसायकली व स्कूटर आणि ५२ लक्ष मोपेड अशी वाहने होती. १९७७ मध्ये फ्रेंच व्यापारी जहाजवाहतूक सेवा ही सबंध जगात चौथ्या क्रमांकावर होती. देशात अंतर्गत कालवेवाहतूक पसरलेली आहे (१९७७ मधील अंतर्गत जलवाहतूक ८,६२३ किमी. लांबीची होती). १९७८ मध्ये फ्रेंच व्यापारी जहाजांच्या ताफ्यांचा एकूण टनभार ११२·३४७ लक्ष टन एवढा होता. सात मोठे अंतर्गत विमानतळ आहेत. ‘एअर फ्रान्स’ ही शासकीय विमान वाहतूक कंपनी जगातील प्रमुख हवाई वाहतूक कंपन्यांपैकी एक असून तिचा यूरोपमध्ये पहिला व सबंध जगात तिसरा क्रमांक लागतो.

अंतर्गत दळणवळण सरकारी खात्यामार्फत केले जाते. तारखात्याचा विस्तार मोठा आहे परंतु दूरध्वनींचे प्रमाण इतर राष्ट्रांच्या मानाने कमी आहे. दर शंभर लोकांमागे फ्रान्समध्ये ११·७ दूरध्वनी आहेत. दूरध्वनींची संख्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ४५·९, ब्रिटनमध्ये १८·३ व पश्चिम जर्मनीत १३·९ अशी आहे. अलीकडे फ्रान्समधील दूरध्वनींची संख्या झपाट्याने वाढविण्यात येत आहे. रेडिओ व दूरचित्रवाणीच्या बाबतीत सरकारची मक्तेदारी आहे. १९७५ साली फ्रान्समध्ये सु.१७० लक्ष रेडिओ व १३७ लक्ष दूरचित्रवाणीसंच होते. दूरध्वनींची संख्या १३८·३३ लक्ष होती. १९७५ साली फ्रान्समध्ये दैनिकांचा खप १०५·७६ लक्ष एवढा होता.

पर्यटन : सर्व जगामधून पर्यटक फ्रान्सकडे आकृष्ट होत असतात. फ्रान्समधील पर्यटक उद्योग हा वाढता व महत्त्वाचा उद्योग आहे. १९७५ मध्ये फ्रान्सला १३०·६४ लक्ष पर्यटकांनी भेट दिली. १९७६ मध्ये पर्यटनउद्योगामुळे फ्रान्सला ३,६१३ लक्ष अमेरिकी डॉलर एवढे उत्पन्न मिळाले. १९७७ च्या अंदाजाप्रमाणे पर्यटनउद्योगामुळे ९·३७ लक्ष लोकांना रोजगार मिळाला.

धोंगडे, ए. रा.; गद्रे, वि. रा.

लोक व समाजजीवन : फ्रेंच संस्कृती म्हणजे यूरोपची संस्कृती, असे समीकरण एकोणिसाव्या शतकापर्यंत सर्वमान्य होते. ललित कला, साहित्य, सामाजिक शिष्टाचार, फॅशन या सर्वच क्षेत्रांत फ्रेंच समाजाचा प्रभाव यूरोपभर दिसून येई. फ्रेंच राज्यक्रांतीतून जगभर पसरलेली स्वातंत्र्य, समाज व बंधुता ही मूल्ये आणि व्यक्तिनिष्ठता, विवेकवाद यांसारखी तत्त्वे फ्रेंच समाजाचीच आधुनिक जगाला देणगी होय. विविधतापूर्ण रुचकर खाद्यपदार्थ, ते ठेवण्याची, मांडण्याची वा वाढण्याची कलात्मक पद्धती आणि या सर्वच बाबतींत दिसून येणारी रसिक व चोखंदळ वृत्ती, ही फ्रेंच पाककलेची वैशिष्ट्ये अजूनही श्रेष्ठ मानली जातात. हजरजबाबीपणा, विनोदवृत्ती, चोखंदळ अभिरुची, रसिकता, व्यवहारबुद्धी, सहिष्णुता, लॅटिन परंपरेतील डौल व आनंदी वृत्ती हे फ्रेंच लोकांचे गुण नेहमीच उल्लेखिले जातात. फ्रेंचांना लॅटिन वारशाचा विशेष अभिमान आहे. उत्तर फ्रान्समधील लोकांत हे विशेषत्वाने दिसून येते.

फ्रेंच समाज हा इतर आधुनिक समाजांप्रमाणेच वांशिक मिश्रणातून तयार झाला. फ्रेंच भूमीवर प्रथम गॉल लोक स्थायिक झाले. केल्टिक, जर्‌मॅनिक, नॉर्स, बास्क इत्यादींच्या वंशधारा मिसळून फ्रेंच समाज घडत गेला. उत्तर फ्रान्समधील लॅटिन परंपरा या घडणीत महत्त्वाची आहे. यूरोप व आफ्रिकेच्या इतर भागांतूनही फ्रान्समध्ये वेळोवेळी बेल्जियन, इटालियन, पोल आणि स्पॅनिश इ. लोक आल्याचे दिसते. शारीरिक लक्षणांच्या बाबतीत प्रदेशविशिष्ट भिन्नता दिसून येते आणि ती वांशिक वर्गीकरणाने दाखविण्याचा प्रयत्नही करण्यात येतो. तथापि एकूण फ्रेंच स्त्रीपुरुष सामान्यतः उंचेपुरे, सुदृढ आणि निकोप असल्याचे दिसून येते. आपण एका वंशाचे आहोत व एका राष्ट्राचे आहोत, ही भावना फ्रेंच लोकांमध्ये तीव्र असल्याचे दिसून येते.

फ्रान्समधील ९०% लोक हे खास फ्रेंच भूमीत जन्मलेले असून इटालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज, पोल आणि मुस्लिम यांसारख्या परदेशांत जन्मलेल्या, पण फ्रेंच नागरिक असलेल्या लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १०% आहे.

फ्रान्स हे १८०१ मध्ये यूरोपातील सर्वांत जास्त लोकसंख्येचे राष्ट्र होते पण नंतरच्या काळात जननप्रमाणाची सतत घटच होत गेली व त्यामुळे लोकसंख्या कमीकमी होत गेली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रभावापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत अनेक राजकीय, सामाजिक, लष्करी, आर्थिक कारणांमुळे ही घट होत गेल्याचे दिसून येते. १९३८ साली कुटुंबाच्या संदर्भात कायदा करण्यात येऊन जननप्रमाण वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आला. परिणामतः १९४६ ते ६८ यांदरम्यान लोकसंख्येत एक कोटीने भर पडली. मृत्युप्रमाणातील घट आणि मोरोक्को, अल्जीरिया, इंडोचायना या फ्रेंच वसाहतींतील सु.१० लक्ष फ्रेंच लोकांचे मायभूमीत झालेले पुनरागमन हीदेखील लोकसंख्येतील वाढीची इतर कारणे होत.


फ्रान्समधील जननप्रमाण व मृत्यूप्रमाण दर हजारी अनुक्रमे १४ व १०·१ (१९७७) होते. बालमृत्युप्रमाण दर हजारी ११·५ होते. फ्रान्समधील स्त्री-पुरुषप्रमाण अनुक्रमे १,०४७ व १,००० असे आहे. वृद्ध आणि तरुण यांचे लोकसंख्येतील प्रमाण मोठे आहे. फ्रान्समध्ये बाहेरून येणाऱ्या म्हणजे आप्रवासी लोकांची संख्या मोठी आहे. त्यामानाने देशाबाहेर जाणाऱ्या म्हणजे उत्प्रवाशांची संख्या कमी आहे. फ्रान्समधील एकूणच स्वतंत्रतेचे व उदारमतवादाचे वातावरण आप्रवाशंची वाढ होण्यास कारणीभूत ठरले आहे.

खेड्याकडून शहराकडे जाणाऱ्या लोकांचे प्रमाणही वाढत आहे. १९७१ च्या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येच्या दोन-तृतीयांशाहून अधिक लोक शहरवासी असल्याचे दिसते. शहराकडची धाव ही पहिल्या महायुद्धापासूनच सुरू झाली. छोटी नगरे व मोठी शहरे यांतून दाट लोकवस्ती आढळते. मोठ्या नगरांतील व शहरांतील पुष्कळसे कामगार हे आसपासच्या परिसरात राहतात व तेथून दररोज कामासाठी ये-जा करतात. या नित्य प्रवाशांत श्रमजीवींची संख्या पांढरपेशा लोकांपेक्षा अधिक आहे.

शासन आणि चर्च १९०५ साली अलग करण्यात आले व तेव्हापासून फ्रान्समध्ये शासनपुरस्कृत असा कोणताच अधिकृत धर्म नाही. सर्व धर्मपंथांना आपापल्या धार्मिक संघटना चालविण्याचा कायदेशीर हक्क आहे. फ्रान्समधील बहुसंख्य लोक रोमन कॅथलिक आहेत. प्रॉटेस्टंटांमध्ये अनेक उपपंथांचे सु. ७ लाख ५० हजार लोक (१९७५) असून मुस्लिमांची संख्या १९७८ साली २० लक्ष होती. हे मुस्लिम लोक उत्तर आफ्रिकेतील असून मोठ्या शहरांत सामान्यपणे कामगार म्हणून काम करतात.

विद्यमान फ्रेंच समाजात परंपरा आणि वैज्ञानिक तांत्रिक युगाची नवता यांच्यात समन्वय साधण्याची प्रक्रिया सर्वच सांस्कृतिक क्षेत्रांत सुरू आहे. शिक्षणक्षेत्राचे उदाहरण या बाबतीत मोठे बोलके ठरेल. १९६८ साली फ्रेंच विद्यार्थिवर्गाने जो प्रक्षोभक उठाव केला, त्यामागे अल्पसंख्यांक अशा अभिजनवर्गापुरती उपयुक्त ठरलेली जुनी शिक्षणव्यवस्था अधिक लोकाभिमुख व्हावी, हे एक कारण होते.

पारंपरिक फ्रेंच समाजातील सामाजिक स्तरीकरण पक्के व बंदिस्त होते. उच्चवर्ग व बहुजनवर्ग यांच्यामध्ये परस्परसंबंध केवळ औपचारिक स्वरुपाचे होते. तथापि ही पारंपरिक समाजरचना बदलत चालली आहे. औद्योगिकीकरणाची तसेच आधुनिकीकरणाची वेगवान प्रक्रिया दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात सुरू झाली. भौतिक संपन्नता, सामाजिक सुरक्षा, समान संधी व स्वातंत्र्य ही या नव्या प्रक्रियेची प्रेरक तत्त्वे होती. शहरांची वाढ होत चालली आहे व त्यांतून जागेची, घरांची टंचाई जाणवत आहे.

फ्रेंच राज्यक्रांतीपासून फ्रान्समध्ये वर्गकलह सुरू आहे. मालकवर्ग व कामगारवर्ग यांच्यातील कलह अनेकदा प्रक्षोभक वळण घेत असतो. ग्रामीण भागात जमीनदार आणि गरीब शेतकरी यांच्यातील संघर्षाची धार मात्र कमीकमी होत चालल्याचे दिसते. यांत्रिक-तांत्रिक कृषिपद्धतींमुळे होणाऱ्या रचनात्मक व आर्थिक संबंधांतील बदल, हे त्याचे कारण होय.

मध्यमवर्ग हाच फ्रेंच समाजातील प्रभावी वर्ग आहे. या वर्गाच्या आचारविचारांचा आणि एकूणच जीवनशैलीचा पगडा फ्रेंच समाजावर अधिक आहे. फ्रान्समधील कुटुंबव्यवस्थाही बदलत आहे. एकेकाळच्या दोनतीन पिढ्यांच्या एकत्रित वा विस्तारित कुटुंबाऐवजी आता आईबाप व त्यांची मुले एवढ्यांपुरती छोटी कुटुंबे अस्तित्वात येत आहेत. वृद्धांपेक्षा लहान मुलामुलींनाच फ्रेंच कुटुंबात वरचढ स्थान आहे. दोन पिढ्यांतील संघर्ष हा इतर आधुनिक समाजांप्रमाणे फ्रान्समध्येही दिसून येतो.

फ्रेंच स्त्रीचे खरे स्थान कुटुंबांतर्गतच आहे. १९४५ नंतर दोन वा अधिक मुलांसाठी सरकारतर्फे भत्ते देण्यात येऊ लागले व परिणामतः अनेक कामकरी स्त्रियांनी आपली कामे सोडून दिली. कुटुंबातील आर्थिक सत्ता ही स्त्रीच्याच हाती असते. कामकरी स्त्रियांपैकी कारखान्यात, शेतावर, पांढरपेशा व्यवसायांत आणि स्वतंत्र व्यवसायांत वा उद्योगधंद्यांत गुंतलेल्या स्त्रियांचे प्रमाण प्रत्येकी २५% आहे. स्त्रीला कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्त्री पुरुषांच्या वेतनांतील फरक हा इतर पश्चिमी देशांपेक्षा फ्रान्समध्ये कमी आहे. १९४५ पर्यंत स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता. स्त्रीमुक्तीच्या चळवळीची विशेष स्पृहाही फ्रेंच स्त्रीला नाही, असे दिसते.

तरुणवर्ग हा फ्रेंच समाजातील सर्वांत प्रभावी असा वर्ग. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक यांसारख्या सर्वच क्षेत्रांतील परिवर्तनाचा तो अग्रदूत समजला जातो. तरुण आणि तारुण्य यांचे फ्रेंच समाजाचे आदर्शीकरणच केले आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जननप्रमाण कमी झाल्याने युवकवर्गाचे महत्त्व विशेषच वाढले. नागरी विद्यार्थी व ग्रामीण युवक यांनी दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात अनेकदा उठाव करून समाजात बदल घडवून आणले. शेतावरील बड्या जमीनदारांचे नियंत्रण कमी करण्यात व कृषिव्यवस्थेत रचनात्मक सुधारणा करण्यात ग्रामीण युवकांच्या चळवळीचा फार मोठा वाटा आहे. औद्योगिक क्षेत्रातील तरुण कामगारवर्ग हाही परिवर्तनाचाच पुरस्कार करतो. अधिक कृतिप्रवण व निश्चित विचारप्रणालीचा फ्रेंच तरुणवर्ग सांस्कृतिक परिवर्तनाच्या आघाडीवर आहे.

दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातच सामाजिक सुरक्षा व कल्याण यांसंबंधीच्या अनेकविध योजना फ्रान्समध्ये राबविण्यात आल्या, त्यासंबंधीची स्थूल कल्पना पुढे दिली आहे. १९४५ मधील एका आदेशानुसार सामाजिक सुरक्षेचा एक सर्वांगीण आराखडा तयार करण्यात आला आणि सामाजिक विमा, कामगारांची नुकसान-भरपाई, आरोग्यविमा, कुटुंबभत्ता इत्यादींसंबंधीचे पूर्वीचे अनेकविध अधिनियम बाजूला करून एक मध्यवर्ती संस्था या कामासाठी उभारण्याचे ठरले. १९५६ साली सामाजिक सुरक्षासंहिता तयार करण्यात आली. या संहितेत अनेकवेळा सुधारणा करण्यात आल्या व १९६८ साली तिला अंतिम स्वरुप देण्यात आले. कामगार विमा ही त्यातील एक महत्त्वाची योजना आहे. तीतून कुटुंबभत्ता, वृद्धांना व औद्योगिक अपघातांत जखमी झालेल्यांना भत्ता देण्यात येतो. आजार, प्रसूती, अपंगता व मृत्यू यांसाठी देण्यात येणारी मदत ही सामान्यतः वेतनावर आधारित असते. कामगार आणि मालक यांची वर्गणी देण्याबाबत संयुक्त जबाबदारी मानली जाते. व्यवसाय, व्यापार व उद्योग यांत काम करणाऱ्या लोकांसाठी त्या त्या क्षेत्रात स्वतंत्रपणे विमायोजना सुरू करण्यात आली आहे. १९६६ पासून बेकारांसाठी अशीच योजना अंमलात आली. सामाजिक सुरक्षा योजनेनुसार १९६७ पासून वृद्धांना वृद्धावस्था-लाभ देण्यात येतो. सु. ९८% लोक सक्तीच्या आजार विमायोजनेखाली आलेले आहेत. उरलेल्या २ टक्क्यांसाठी १९६७ पासून अशाच प्रकारची ऐच्छिक विमायोजना आहे.

फ्रान्समध्ये बेकारांसाठी एक मदत योजना आहे. बेकार असलेल्या कुटुंबप्रमुख व्यक्तीला दरदिवशी १३·५० फ्रँक, तिच्या पतीला वा पत्नीला तसेच इतर कुटुंबियांना ५·४० फ्रँक भत्ता सरकारतर्फे देण्यात येतो. तीन महिन्यांनंतर हा भत्ता कमी करण्यात येतो. उद्योग आणि व्यापार या क्षेत्रांतील बेकार होणाऱ्या कामगारांसाठी खास भत्ता देण्याची योजनाही १९५८ पासून अंमलात आहे.

देशात १९७३ च्या अखेरीस ६९,८१० डॉक्टर, २७,८३५ औषधनिर्माते व २४,३७९ दंतवैद्य होते. तसेच सार्वजनिक रुग्णालयांची संख्या १,८७० असून त्यांत ४९,२०४ खाटांची व्यवस्था होती. सार्वजनिक मनोरुग्णालये १३५ (१,२०,००० खाटा), खाजगी रुग्णालये १,९३५ (१,००,२३२ खाटा) आणि खाजगी मनोरुग्णालये १५८ (१०,२३६ खाटा) अशी १९७१ ची आकडेवारी मिळते.

बहुसंख्य लोक वार्षिक सुट्ट्यांच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी सहलीस जातात. त्यांच्या निवासाची, वाहनांची, मनोरंजनाची साधने व सोयी देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. पर्यटन खात्यातर्फे व खाजगी व्यावसायिक संस्थांमार्फत या सोयी केल्या जातात.

जाधव, रा. ग.

शिक्षण : फ्रान्समधील शिक्षणाचा विचार करताना फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या काळापासून सुरू झालेले व दुसऱ्या महायुद्धकाळापर्यंत चालू असलेले शिक्षण, दुसऱ्या महायुद्धानंतर १९६८ पर्यंत अंमलात असलेले शिक्षण व त्यानंतरची पद्धती, असे प्रामुख्याने तीन कालखंड विचारात घ्यावे लागतात.

दुसऱ्या महायुद्धापूर्वीची फ्रान्समधील शिक्षणपद्धती यूरोपची प्रातिनिधिक पद्धती मानली जाते. या पद्धतीत भाषिक कौशल्यांवर भर होता. देशाची व त्यातील तत्त्वज्ञांची परंपरा आत्मसात करण्यासाठी भाषिक कौशल्ये आणि तात्त्विक विषयांवर अधिक भर असे. त्यामुळे शारीरिक कौशल्यांकडे दुर्लक्ष झाले. त्या काळच्या प्राथमिक शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट निधर्मी शासनव्यवस्थेसाठी आवश्यक असणारे ज्ञान देणे व तदनुकूल मनोवृत्ती निर्माण करणारे होते, तर माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचे ध्येय अधिकारी, व्यवस्थापक निर्माण करण्याचे असे. दुसऱ्या महायुद्धापूर्वीचे शिक्षण एकोणिसाव्या शतकातील व विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील सामाजिक गरजांशी मिळतेजुळते होते. ती पद्धत समाजातील वरच्या स्तरातील मुलांना योग्य अशी होती व त्या स्तरातील मुलेच शिक्षणात प्रावीण्य मिळवीत असत.

फ्रेंच पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समतेच्या तत्त्वाला लाभलेले वैधानिक संरक्षण. समतेमुळे सर्वांना सारखे शिक्षण आणि समान संधी ही तत्त्वे शिक्षणात आपोआप आली. गुणवत्ता ओळखण्यासाठी व ठरविण्यासाठी परीक्षा हेच एकमेव साधन ठरले. व्यक्तीचे भवितव्य परीक्षेतील मिळणाऱ्या गुणांवरच अवलंबून असल्याने परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. समतेच्या तत्त्वामुळे सर्व फ्रान्समध्ये एकाच प्रकारच्या शिक्षणाचा पुरस्कार करावा लागला. त्यामुळे शिक्षणात एकसूत्रीपणा आला, मात्र त्यातील उपक्रमशीलता कमी झाली.

दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्रेंच शिक्षणपद्धती त्या कालमानाचा विचार करता यशस्वी ठरली. त्या पद्धतीमुळे शास्त्र आणि सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास होत राहिला व शिक्षणाचा दर्जाही उच्च राहिला. राजकीय दृष्ट्या फ्रान्स अस्थिर असूनही एकसूत्री शिक्षणामुळे देश एकसंघ राहिला. मात्र ‘सर्वांना समान शिक्षण’ या तत्त्वामुळे शिक्षणक्रमात सुधारणा करणे, सामाजिक दृष्ट्या एक भावनात्मक बाब बनली. पराकोटीच्या चढाओढीमुळे आणि परीक्षेतील चांगल्या गुणांशिवाय चांगले भवितव्य नाही, यामुळे परीक्षेत थोडक्या लोकांनाच यश मिळे व त्यासाठी फार परिश्रम करावे लागत. परीक्षेतील यश मिळविणाऱ्‍यांचे प्रमाण अपयशी व्यक्तींच्या मानाने अल्प राहिले. फ्रेंच शिक्षणपद्धतीत त्या वेळेस एक प्रकारची जडता निर्माण झाली होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र फ्रान्समधील बदलत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षणपद्धतीत बदल करणे क्रमप्राप्त झाले. सुरुवातीची काही वर्षे, युद्धकाळात जी परिस्थिती बिघडली होती, ती स्थिरस्थावर करण्यात गेली. पण त्यानंतर अनेक गोष्टींचा शिक्षणावर परिणाम झाला. १९५० मध्ये फ्रान्समध्ये ६२ लाख विद्यार्थी होते, १९६७ मध्ये ही संख्या १ कोटी १६ लाख झाली. वाढत्या संख्येमुळे शिक्षणातील सुविधा, पद्धती इत्यादींमध्ये बदल करणे अपरिहार्य ठरले. दुसऱ्या महायुद्धानंतर नव्या जीवनपद्धती, नव्या अपेक्षा निर्माण झाल्या. परिणामतः शिक्षणाकडूनही वेगळ्या अपेक्षा निर्माण झाल्या. शहरे आणि ग्रामीण भाग यांतील लोकवस्तीचे प्रमाण, लोकांनी मोठ्या प्रमाणावर शहराकडे स्थलांतर केल्यामुळे बदलले. त्यामुळे उपलब्ध शैक्षणिक सुविधांची फेरजुळणी करावी लागली. उद्योगधंद्यांची वाढ झाल्याने माध्यमिक व उच्च शिक्षणाबद्दलची मागणी वाढली. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर नोकऱ्‍या करू लागल्याने स्त्री-शिक्षणाबद्दलच्या अपेक्षा बदलल्या. सर्व जगाप्रमाणे फ्रान्समध्ये सामाजिक मूल्ये आणि सामाजिक अपेक्षा बदलल्याने शिक्षणात बदल व्हावा, अशी लोकांनी मागणी केली. या मागणीनुसार प्रथम १९५९ मध्ये सक्तीच्या शिक्षणाची वयोमर्यादा १४ वरून १६ करण्यात आली. जगभर शास्त्र आणि तंत्रज्ञान यांना महत्त्व आल्यामुळे शिक्षणात आधुनिकीकरणाचीही मागणी होऊ लागली. कामकऱ्‍यांना अधिक फुरसत व प्रवासाच्या चांगल्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे ⇨निरंतर शिक्षणाची गरज भासू लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर शाळा व शिक्षणाच्या कल्पनेतही बदल झाला. सामाजिक सत्तास्थाने शाळा महाविद्यालयांतून बाहेरच्या जगात, विशेषतः राजकारण आणि उद्योगव्यवसाय यांकडे, स्थलांतरित झाली. शिक्षण हेच ज्ञानाचे एकमेव साधन ही कल्पनाही बदलली.

फ्रान्समधील अध्यापकांनी १९६७ – ६८ च्या सुमारास शिक्षणात आमूलाग्र बदल व्हावा, अशी मागणी केली. १३ मे १९६८ रोजी हजारो विद्यार्थ्यांनी सार्वजनिक संपाच्या काळात, संपाला पाठिंबा देताना ‘शिक्षणात आधुनिकता यावी, ते वस्तुस्थितीशी निगडित असावे व त्यात व्यवसायशिक्षणाला योग्य स्थान असावे’, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी ही केवळ विद्यार्थ्यांची होती, असे मानून चालणार नाही. फ्रेंच जनतेचे मत तीत प्रतिबिबिंत झाले होते. १९७२ मध्ये सरकारने नेमलेल्या जोक्स समितीनेही तसा अहवाल दिला.

वरील सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून १९७२ – ७३ च्या सुमारास फ्रान्समध्ये शिक्षणाचा नवा आकृतिबंध ठरविण्यात आला. त्याअन्वये वयाच्या ६ ते ११ दरम्यान ५ वर्षांचे प्राथमिक शिक्षण, त्यानंतर ४ वर्षे पूर्वमाध्यमिक शिक्षण, त्यानंतर ३ वर्षे माध्यमिक शिक्षणाची दुसरी फेरी, त्यानंतर दोन वर्षे विद्यापीठ शिक्षणाची पहिली फेरी संपते व पहिली पदवी मिळू शकते. त्यानंतरच्या दोन वर्षानी दुसरी पदवी मिळू शकते.ज्यांना अध्यापनाचे काम करावयाचे आहे, त्यांना पहिल्या पदवीनंतर एकच वर्षाचा अभ्यासक्रम घ्यावा लागतो. दुसऱ्या पदवीनंतर दोन वर्षांनी डॉक्टरेट मिळू शकते. प्रत्यक्षात मात्र पहिल्या ८ वर्षांच्या शिक्षणानंतर विद्यार्थी शारीरिक कष्टाचे काम करू शकतात, १-२ वर्षाचे व्यवासायिक अभ्यासक्रम निवडू शकतात, अथवा ३ वर्षाचा सर्वसाधारण अभ्यासक्रम निवडून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाकडे जाऊ शकतात. माध्यमिक शिक्षणाच्या दुसऱ्या फेरीत व्यावसायिक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. १९७२-७३ मध्ये ७ लाख २२ हजार विद्यार्थ्यांपैकी ३ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम निवडले होते. १९६६ पासून उच्च तांत्रिक शिक्षणाच्या संस्था स्थापन करण्यात आल्या.

फ्रान्समध्ये जरी वरील आकृतिबंध अंमलात आला असला, तरी तेथील पारंपरिक व्यवस्थेतील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे स्थान अद्यापही अबाधित आहे. काही अभ्यासक्रमांच्या बाबतीत महाविद्यालये-विद्यापीठे यांच्यापेक्षा शाळांमधील अभ्यासक्रम वरच्या दर्जाचे मानले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याबद्दल आकर्षण असते. १९७२ मध्ये शिक्षणविषयक कायद्याने तत्कालीन विद्यापीठविभागांची पुनर्रचना करण्यात आली. त्याअन्वये पॅरिसमधील १३ आणि बाहेरील ४५ अशा ५८ विद्यापीठांमध्ये एकूण ७०० अध्यापन आणि संशोधन विभाग स्थापण्यात आले. यांव्यतिरिक्त नऊ ठिकाणी विद्यापीठ केंद्रे स्थापण्यात आली व उच्च तांत्रिक शिक्षण देणाऱ्या ३ संस्था स्थापन करण्यात आल्या. याशिवाय उच्च शिक्षण देणाऱ्या ७० संस्था फ्रान्समध्ये अस्तित्वात होत्या.

फ्रान्समधील एकूण शिक्षणव्यवस्था बळकट स्वरूपाची आहे. समाजकारण आणि अर्थकारणाशी ती सुसंवादी आहे. या एकूण व्यवस्थेच्या आधारे १९७२ मध्ये जागतिक व्यापाराच्या बाबतीत फ्रान्सने ग्रेट ब्रिटनला मागे टाकले. या शतकाच्या अखेरीस तांत्रिक, व्यापारी आणि शिक्षणविषयक कामगिरीत काही बलाढ्य देश वगळल्यास फ्रान्स इतरांना मागे टाकेल. फ्रान्सच्या या प्रगतीत शिक्षणाचा मोठा वाटा आहे.

देशात १९७६-७७ या वर्षी पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या अनुक्रमे १३,९५२ ५४,९०९ व १०,४३१ शाळा होत्या. १९७८-७९ मध्ये त्यांत अनुक्रमे २२,५४,५०० ४२,१०,००० व ४३,०७,५०० विद्यार्थी शिकत होते. १९७६-७७ साली पूर्वप्राथमिक-प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळा यांतील अध्यापकसंख्या अनुक्रमे ३,१६,५०४ व ३,४३,०८४ होती. देशात १९७८-७९ साली सु. ३८ विद्यापीठे होती.

गोगटे, श्री. ब.

भाषा-साहित्य : फ्रेंच ही इंडो-यूरोपियन भाषा कुटुंबाच्या लॅटिन शाखेची–म्हणजे रोमान्स बोली–आहे. फ्रेंच साहित्याच्या विकासाला अकराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत योग्य तो वाव मिळालेला नव्हता. अकराव्या शतकाच्या ख्रिस्ती धर्मयुद्धांची सुरुवात झाली आणि त्यानंतर ‘शांसाँ द जॅस्त’ ह्या नावाने ओळखली जाणारी वीरकाव्ये रचिली जाऊ लागली. बारावे ते पंधरावे शतक ह्या फ्रेंच साहित्येतिहासाच्या कालखंडात ह्या वीरकाव्यांबरोबरच रोमान्स लिहिले गेले. वैशिष्ट्यपूर्ण दरबारी साहित्याचा हा एक नमुना. प्रेम आणि साहस हे रोमान्सचे विषय. अद्‌भुततेचे वातावरण त्यांतून आढळले. क्रेत्यँ द त्र्वा हा आरंभीचा एक रोमान्सकार होय. बाराव्या शतकात त्याचे कर्तृत्व झाले.

मध्यमवर्गीयांसाठी लिहिल्या गेलेल्या साहित्यात फॅब्लो वा फाब्लियो ह्या पद्यकथांचा समावेश होतो. बाराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि चौदाव्या शतकाचा आरंभ ह्या कालखंडात फॅब्लो रचिले गेले. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनांवर ते आधारलेले असत.

बारावे शतक ते पंधरावे शतक ह्या कालखंडात फ्रान्समध्ये भावकवितेची निर्मिती वैपुल्याने झाली. रोमां ला रोझ हे ह्या कालखंडातील एक विशेष उल्लेखनीय काव्य होय. ह्या काव्याचा पूर्वार्ध गीयोम द लॉरीस ह्याने रचिला असून उत्तरार्धाची रचना झां द म्यून ह्याने केलेली आहे. पंधराव्या शतकात फ्रांस्वा व्हीयाँ हा कवी होऊन गेला. मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ कवी म्हणून तो ओळखला जातो.

‘मिराक्ल’ आणि ‘मिस्तॅर’ हे फ्रेंचमधील आरंभीचे नाट्यप्रकार. एखाद्या धार्मिक वा अन्य प्रकारच्या आख्यायिकेवर मिराक्लची उभारणी झालेली असे. मिस्तॅरची रचना बायबलमधील कथांच्या आधारे केली जाई.

बारावे ते पंधरावे शतक, ह्या कालखंडात झां सीर द झ्वँव्हील, झां फ्र्‌वासार आणि कॉमीन हे श्रेष्ठ इतिहासकाराही होऊन गेले.

सोळावे शतक हा फ्रेंच साहित्यातील प्रबोधनकाळ. ह्या शतकातील साहित्य विपुल असून ते विविधतेने नटलेले आहे. प्येअर द राँसार हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी रॉबेअर गार्‌न्ये हा विशेष उल्लेखनीय नाटककार. फ्रेंचमध्ये शोक-सुखात्मिकेचा (ट्रॅजि-कॉमेडी) आरंभ गार्‌न्ये ह्याने केला. सोळाव्या शतकातील गद्यसाहित्यात फ्रांस्वा राब्‌ले ह्याने मोलाची भर घातली. गार्गांतुआ ह्या भव्य व्यक्तिमत्त्वाभोवती त्याने विणलेल्या कथा प्रसिद्ध आहेत. इतिहासलेखन, राजकीय स्वरूपाचे लेखन व ईश्वरविद्याविषयक लेखनही ह्या शतकात झाले. मीशेल एकेम द माँतेन ह्या थोर निबंधकाराचे कर्तृत्व ह्याच शतकातले.

सतराव्या शतकात फ्रेंच अकादमीची स्थापना झाली. प्येअर कोर्नेय, झां रासीन आणि मोल्येर ह्यांच्यासारखे नाटककार होऊन गेले. झां द ला फॉतेन हा श्रेष्ठ बोधकथाकार ह्याच शतकातला. अभिजातता वादी साहित्यविचार ह्या शतकात प्रभावी ठरला. निकॉला ब्‌वालो-देप्रेओ ह्याने त्याला तात्त्विक बैठक दिली.

अठरावे शतक हे ‘ज्ञानयुग’ म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व ह्या तत्त्वत्रयीचा प्रसार करून सर्वव्यापी अशा फ्रेंच राज्यक्रांतीची वैचारिक पूर्वतयारी करून देणारे व्हॉल्तेअर, रुसोसारखे विचारवंत ह्या शतकाने जन्माला घातले. दनी दीद्रो ह्याने आपल्या विश्‍वकोशातून गतानुगतिकत्वाला विधायक विरोध करून मानवतावादी मूल्ये समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. शार्ल द सगाँदा माँतेस्क ह्या राजकीय विचारवंताने तत्कालीन फ्रेंच समाज, फ्रान्समधील सामाजिक-राजकीय संस्था ह्यांवर उपरोधप्रचुर टीका केली. आंत्वान-फ्रांस्वा लाबे प्रेव्हो, आलँ-रने ल साझ, प्येअर कार्ले द शांब्‌लँ द मारीव्हो हे ह्या शतकातील महत्त्वाचे कादंबरीकार, आंद्रे मारी द शेन्ये हा ह्या शतकातील विशेष उल्लेखनीय कवी. आत्मचरित्रात्मक लेखनात रुसोच्या प्रांजळ ‘कबुलीजबाबा’स (ले काँफेस्याँ किंवा कन्फेशन्स) जागतिक ख्याती प्राप्त झाली आहे.

एकोणिसाव्या शतकात वास्तववाद, स्वच्छंदतावाद आणि प्रतीकवाद हे वाङ्‌मयीन संप्रदाय प्रभावी ठरले. बाल्झॅक, फ्लोबेअर, व्हिक्टर ह्यूगो, मादाम द स्ताल, मालार्मे, लामार्तीन, व्हीन्यी, म्यूसे, कोपे, बोदलेअर, गाँकूर बंधू, एमिल झोला ह्यांसारखे साहित्यिक होऊन गेले.

विसाव्या शतकातील फ्रेंच साहित्यावर दोन महायुद्धांचा लक्षणीय परिणाम दिसून येतो. अतिवास्तववाद, अस्तित्ववाद अशा विविध वाङ्‌मयीन-तात्त्विक दृष्टिकोणांचा प्रभाव फ्रेंच साहित्यिकांवर आणि कलावंतांवर पडला. पॉल व्हालेरी, आनातॉल फ्रांस, सार्त्र, काम्यू, रॉमँ रॉलां, मार्सेल प्रूस्त, एमील व्हरहारेन, माटरलिंक, आंद्रे ब्रताँ, आंद्रे माल्रो, झां कोक्तो, झां आनुईय, गाब्रीएल मार्सेल, सॅम्युएल बेकेट हे विसाव्या शतकातील श्रेष्ठ फ्रेंच साहित्यिकांपैकी काही होत.

सरदेसाय, मनोहरराय; टोणगावकर, विजया

कला-क्रीडा : फ्रान्सच्या भूमीला कलेचा वारसा प्राचीन काळापासूनच लाभला आहे पुराणाश्मीयुगीन आदिम कलेचे अवशेष फ्रान्सच्या परिसरात विपुल प्रमाणात आढळतात. उदा., दॉरदॉन्यू खोऱ्यातील ले मूस्त्ये आणि ला मादेलीन येथे आढळलेली गुहाचित्रे. ⇨ लॅस्को गुहेमध्येही प्रागैतिहासिक कलेचे नमुने आढळतात. या प्राचीन कलानिर्मितीचे स्वरुप खास फ्रेंच असे नव्हते. गॅलो-रोमन, कॅरोलिंजियन, आद्य रोमनेस्क या कालखंडांतील कलेबाबत हेच म्हणता येईल. अकराव्या शतकापासून मात्र फ्रान्सच्या कलेला स्वतःचे असे पृथगात्म राष्ट्रीय स्वरुप प्राप्त होऊ लागले. अकराव्या-बाराव्या शतकांत फ्रान्समध्ये ⇨ रोमनेस्क वास्तुकलेचा प्रभाव दिसतो. अवशिष्ट कॅरोलिंजियन वास्तूंच्या प्रभावातून ही शैली विकसित झाली असली, तरी तिच्या मूळ प्रेरणा मात्र रोमन कलेमध्ये पाहावयास मिळतात. मध्ययुगात यूरोपमध्ये फ्रेंच कला अग्रेसर होती. या काळात फ्रेंच ⇨ गॉथिक कलेचा सर्वदूर प्रसार झाला. तथापि प्रबोधनकालीन इटालियन कलेचे वैभव मात्र फ्रान्सच्या वाट्याला फारसे आले नाही. लिओनार्दो दा व्हींची, मायकेलअँजेलो यांसारखे श्रेष्ठ दर्जाचे कलावंत फ्रान्सने निर्माण केले नाहीत. किंबहुना फ्रान्सच्या कलेतिहासात असामान्य अशा एकेका कलावंतांची शिखरे आढळत नाहीत तर कैक कलासंप्रदाय जिथे उदयास आले, असे सर्जनशील भूप्रदेश दिसून येतात. सतराव्या-अठराव्या शतकांत फ्रान्सच्या कलेला पुन्हा पृथगात्मता लाभली तर एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत पॅरिसमधील अनेकविध आधुनिक कलासंप्रदायांमुळे फ्रान्समधील कलेला जागतिक प्राधान्य प्राप्त झाले.

वास्तुकला : फ्रान्समधील वास्तुकला विविध संस्कृतींच्या संमिश्र संस्कारांतून संपन्न झाली आहे. रोमनेस्क (अकरावे व बारावे शतक) व गॉथिक (बारावे ते पंधरावे शतक) या कालखंडांतील फ्रेंच वास्तुकला अनुकरणात्मक नसून स्वतंत्र आहे. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या शतकाचा प्रारंभ या दरम्यानच्या काळात त्यांनी प्रबलित काँक्रीटचे बांधकाम व कार्यवादी वास्तुकला या नव्या संकल्पना वास्तुकलेत रुजवल्या.


गॉलवरील रोमनांच्या आधिपत्यामुळे भव्य वास्तूंचा वारसा त्या प्रदेशाला लाभला. उदा., नीम, आर्ल व ॲव्हीन्यों येथील रंगमंडले, नीमनजीकची ‘पाँ द्यू गार’ (इ. स. पू. १६) ही जलवाहिनी, नीम येथील ‘मॅझाँ कारे’ हे छोटे मंदिर इत्यादी. पॅरिस येथे रोमन राजप्रासादाचे व त्यातील स्नानगृहाचे अवशेष आढळतात. रोमन स्मारकवास्तू, कमानी इ. वास्तूही अन्यत्र आढळतात. इ. स. पू. ४० ते इ. स. ५० या काळातील या वास्तू होत. इसवी सनाच्या प्रारंभकाळातील फारशा वास्तू अवशिष्ट नाहीत. फ्रान्समधील सर्वांत जुने अवशिष्ट चर्च प्वाते येथील ‘टेंपल ऑफ सेंट झां’ (६८२–९६) हे असावे. त्यात कालांतराने बरीच परिवर्तने घडत गेली. या सुरुवातीच्या काळात ‘बॅसिलिका’ या रोमन सभागृह-वास्तुप्रकाराचा बराचसा विकसित आविष्कार दिसून येतो. कॅरोलिंजियन काळात त्यात नावीन्यपूर्ण कल्पनांची भर पडली व त्यातूनच रोमनेस्क वास्तुशैलीस चालना मिळाली. फ्रान्समध्ये रोमनेस्क शैली साधारणतः अकराव्या-बाराव्या शतकांत भरभराटीस आली. रोमनेस्क शैली दक्षिण व उत्तर फ्रान्समध्ये भिन्न प्रकारे विकसित झाली. दक्षिणेस रोमन अवशेषांमुळे त्याच धर्तीवर वास्तुनिर्मिती झाली मात्र उत्तरेत ही स्थिती नसल्याने स्वतंत्र फ्रेंच रोमनेस्क शैली विकसित होऊ शकली. अकराव्या शतकातील उल्लेखनीय वास्तूंमध्ये प्वाते येथील ‘सँ ईलेअर’ (१०१८–५९) कां येथील ‘आबेई ओ दाम’ (१०६२–११४०) व ‘आबेई ओ झॉम’ (१०६६–८६) तूलूझ येथील ‘सेंट सेर्नीन’ (१०८०–९६) क्लूनी येथील विहारवास्तू (१०८९–११३१) इत्यादींची गणना होते. बाराव्या शतकामध्ये पॅरिस जवळील सँ दनीची विहारवास्तू (११३७–४४) ‘सँ मादलेन’, व्हेझले (१०८९–१२०६) व आर्ल येथील ‘सँ त्रॉफीम’ (११५२) या महत्त्वाच्या वास्तूंची निर्मिती झाली. तथापि या बाराव्या शतकाच्या अखेरीअखेरीस गॉथिक शैलीच्या निदर्शक अशा टोकेरी कमानी दिसू लागल्या. गॉथिक शैलीचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे कॅथीड्रल-वास्तू. फ्रान्समध्ये बाराव्या शतकाच्या अखेरीपासून ते तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत विपुल प्रमाणात कॅथीड्रल बांधली गेली. त्यात आम्यें येथील कॅथीड्रल (१२२०–७९) पॅरिसचे नोत्र दाम (१२६२ मध्ये प्रारंभ) शार्त्रचे नोत्र दाम (११९४–१२६०) रीम्झ येथील नोत्र दाम (१२११ मध्ये प्रारंभ) बोव्हे कॅथीड्रल (१२४७–१५६८) इ. वास्तूंमधून फ्रेंच गॉथिक शैलीतील विविधता दिसून येते. प्रारंभीच्या अवस्थेत खिडक्यांतून प्रायः दगडी बेलबुट्ट्या खोदल्या जात पण पुढे आंग्ल प्रभावातून त्यांत ज्वालासदृश (फ्लॅम्‌बॉयन्ट) आकृतिबंधांची भर पडली. ॲबीव्हिल येथील ‘सेंट वूलफ्रॅम’ व रुआन येथील ‘सेंट औएन’ ही काही उल्लेखनीय उदाहरणे. चर्चच्या खिडक्यांमध्ये रंगीबेरंगी ⇨ चित्रकाचांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. उदा., पॅरिस येथील ‘सेंट चॅपेली’ (सु. १२४४–४७) चर्चमध्ये रंगीत चित्रकाचांवर दर्शवलेले बायबलमधील प्रसंग वैशिष्ट्यपूर्ण आहेत. फ्रान्समध्ये पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून गॉथिक शैलीचा हळूहळू अस्त होत गेला व तिची जागा इटलीच्या प्रभावातून प्रबोधनकालीन कलेने घेतली. पूर्वीच्या गॉथिक वास्तू सजवण्यासाठीच सुरुवातीस या शैलीचा वापर झाला. उदा., पंधराव्या शतकातील ल्वार खोऱ्यातील किल्ले मुळात गॉथिक शैलीत होते त्यांस ग्रीको-रोमन अभिजात वास्तुघटकांची जोड देण्यात आली. प्रबोधनकालीन वास्तुकला फ्रान्समध्ये रुजवण्यात पहिल्या फ्रॅन्सिसचा वाटा मोलाचा आहे. त्याने सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक इटालियन कलावंतांना फ्रान्समध्ये आणले. त्यात ईल रोस्सो, नीक्कोलो देल आब्बाते, सेबास्त्यानो सेर्ल्यो व फ्रांचेस्को प्रीमातीत्चो हे प्रमुख होत. सेर्ल्यो हा वास्तुशिल्पज्ञ व कलातज्ञही होता व फ्रेंच वास्तुशैलीला अभिजात सौंदर्यदृष्टीची जोड देण्यात त्याचा वाटा मोठा होता. फाॅतेन्ब्लोचा प्रासाद ही त्यांची प्रमुख निर्मिती (सु. १५३०–६०). ईल रोस्सो, प्रीमातीत्त्वो व नीक्कोलो देल आब्बाते यांनी प्रासादाची रचना व सजावट या बाबतींत मोलाची कामगिरी केली. त्यातून फाँतेन्ब्लो संप्रदाय उदयास आला. इटालियन ⇨ रीतिलाघववादाची गुणवैशिष्ट्येच त्यात जोपासली गेली. फ्रेंच वास्तुशिल्पज्ञांनी अल्पावधीतच इटालियन वास्तुकल्पांची अभिनव घाटणी आत्मसात केली. प्येअर लेस्कोने ⇨ लूव्ह्‌रच्या नव्या बांधकामास १५४६ मध्ये प्रारंभ केला. लूव्ह्‌रचे बांधकाम व नवनवीन भर घालण्याचे काम पुढेही सु. तीन शतके अधूनमधून चालूच होते (१५४६–१८७८). फीलीबेअर दलॉर्म याने आने येथे हवेली (शातो) उभारली. नंतरच्या काळातील प्रख्यात वास्तुशिल्पज्ञ झां ब्यूलां याने शेतीयी येथे छोटेखानी हवेली उभारली (सु. १५६०). झाक आंद्रूए द्यू सेर्सो याने वास्तुकल्पांवर पुस्तके लिहिली. सतराव्या शतकाच्या प्रारंभी फ्रान्समध्ये इटलीच्या प्रभावातून ⇨ बरोक कलेचा उदय झाला. सालॉमाँ द ब्रॉसच्या पॅरिस येथील सँ झेर्व्हे चर्चच्या (१६१६) दर्शनी भागातून तसेच झाक लमेर्स्येच्या सॉर्‌बॉनच्या चर्चवास्तूमधून (१६३५ मध्ये प्रारंभ) ह्याचा प्रत्यय येतो. फ्रांस्वा मांसारने पॅरिसनजीक उभारलेल्या मेझोंच्या हवेलीमध्ये (१६४२–४६) अभिजाततावादाचे परिष्कृत रूप आढळते. ‘व्होल-ल् व्हिकाँत’ ही आणखी एक सुंदर हवेली (१६५७–६१). ती ल्वील व्हो या वास्तुशिल्पज्ञाच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली. अशा रीतीने सतराव्या शतकात अनेक सुंदर व भव्य हवेल्या बांधल्या गेल्या, तथापि या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा वास्तुप्रकल्प म्हणजे पूर्वीपासून चालू असलेल्या लूव्ह्‌रचे पुढील बांधकाम. चौदाव्या लूईने प्रख्यात इटालियन वास्तुशिल्पज्ञ ⇨ बेर्नीनी यांच्याकडून लूव्ह्‌रच्या पूर्वेकडील दर्शनी भागाचे आराखडे करून घेतले, तथापि पुढे ते नाकारण्यात आले व त्या कामावर ल व्हो व क्लोद पेरो यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पूर्वेकडील दर्शनी भागाची अप्रतिम रचना केली (१६६७–७०). त्यातील स्तंभावलीमध्ये अभिजात वास्तुघटकांचा विशुद्ध आविष्कार पाहावयास मिळतो. चार्ल्‌स ल ब्रं या चित्रकाराचाही या प्रकल्पात मोठा वाटा होता. अशा रीतीने इटालियन प्रभावापासून मुक्त होऊन त्यांनी फ्रेंच अभिजाततावादाचे गुणधर्म प्रस्थापित केले. ह्याच काळात चौदाव्या लूईच्या कलात्मक महत्त्वाकांक्षेचे भव्य प्रतीक म्हणता येईल असा ⇨व्हर्सायचा राजप्रासाद बांधण्यात आला. सुरुवातीस व्हर्साय येथे तेराव्या लूईने हवेली उभारली, तिचाच पुढे विस्तार करून राजप्रसादात रूपांतर करण्याचा निर्णय चौदाव्या लूईने घेतला. हा प्रकल्पही लूव्ह्‌रप्रमाणेच काही कलावंतांनी सांघिक रीत्या १६६५ ते १६८३ या कालावधीत पूर्ण केला. ल्वी ल व्हो या वास्तुशिल्पज्ञाने त्याची सुरुवात केली. त्याच्या मृत्यूनंतर झ्यूल- आर्दवँ मांसार या वास्तुशिल्पज्ञाने या कामास पुढे चालना दिली. त्याने अत्यंत विस्तीर्ण असा दर्शनी भाग पूर्ण केला, तो फ्रेंच अभिजाततावादी शैलीचा उत्तम नमुना मानला जातो. त्यातील प्रमुख भाग म्हणजे राजाराणीची शाही दालने. त्यास लागूनच प्रख्यात आरसेमहाल असून त्याच सजावट ल ब्रं आणि त्याच्या सहकाऱ्‍यांनी केली, संगमरवर, चित्रे, सोनेरी मुलामा दिलेली ब्राँझशिल्पे व ४८३ आरसे यांचा सजावटीमध्ये वापर करण्यात आला. आंद्रे लनोत्र या स्थलशिल्पज्ञाने आकर्षक व अभिनव उद्यानरचना केली. मांसारने बरोक शैलीमध्ये ‘चर्च ऑफ द इनव्हॅलिड्स’ची रचना (१६८०–१७०८) पॅरिस येथे केली. प्येअर लपोत्र याने मार्ली येथील हवेलीच्या सजावटीमध्ये नव्या अलंकरणात्मक कल्पनांचा अवलंब केला त्यातूनच ⇨ रोकोको कला उगम पावली. लपोत्रचा वारसा अनेक सजावटकारांनी व वास्तुविशारदांनी पुढे चालविला. त्यांत रॉबेअर द कॉत व झ्यूस्त-ऑरेल मेसॉन्ये हे प्रमुख होत. त्यांनी तयार केलेले आकृतिबंध पुस्तकरूपाने प्रकाशित होऊन सर्वत्र प्रसृत झाले व ते अठराव्या शतकातील यूरोपमधील रोकोको शैलीच्या प्रसारास कारणीभूत ठरले. तथापि आंझ-झाक गाब्रीएलने व्हर्साय येथील ‘पेटिट ट्रायनॉन’ (१७६२) या उद्यानगृहाच्या वास्तुरचनेमध्ये विशुद्ध अभिजात घटकांचा जो आविष्कार केला, त्यातून रोकोको शैलीचा प्रभाव ओसरल्याचे जाणवते. नव-अभिजाततावादी शैलीचा उत्कृष्ट आविष्कार जे. जी. सूफ्लॉ या वास्तुविशारदाच्या पॅरिसमधील ‘पँथीऑन’ (सँ झ्येनव्ह्येव्ह चर्च १७५७–९०) वास्तूमध्ये पहावयास मिळतो. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियनच्या कारकीर्दीस फ्रेंच वास्तुकलेमध्ये साम्राज्य (एम्पायर) शैली अवतरली (सु. १८०० ते १८३०). पॉम्पीअन, ग्रीक व ईजिप्शियन प्रेरणांतून निर्माण झालेली ही अलंकरणात्मक नवअभिजाततावादी शैली गृहशोभन, फर्निचर, वस्त्रभूषा या प्रकारांमध्ये विशेषत्वाने अवलंबली गेली. नेपोलियनचे दरबारी वास्तुकार शार्ल पेरस्ये व पी.एफ्.एल्. फाँतेन यांनी या शैलीचा विकास घडवून आणला. त्यांच्या वास्तुसजावटीचे उत्कृष्ट नमुने माल्‌मेझों, रँबूये, काँप्येन्य, फाँतेन्ब्लो इ. ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यांच्या रकय द् देकोरासिआँ अँतेरियर (१८१२) या ग्रंथाचा प्रभावही या शैलीच्या प्रसारास कारणीभूत ठरला.


एकोणिसाव्या शतकातील फ्रेंच वास्तुकला अनेक शैलींच्या संघर्षांतून सिद्ध झाली आहे. अनेक गतकालीन शैली व अभिरुची यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न या काळात मोठ्या प्रमाणावर झाले. पॅरिसमधील ‘चर्च ऑफ द मॅडेलिन’ (१८०७–४२) या बार्तेल्मी व्हिन्योंच्या वास्तूवर रोमन कलेचा प्रभाव दिसून येतो. ‘आर्क द् त्रिआँफ द् लेत्वाल’ ही भव्य विजयकमान (१८०६–३६) रोमन वारशातून आली असली, तरी वास्तुकाराच्या स्वतंत्र प्रज्ञेचा आविष्कारही तीतून प्रत्ययास येतो. जे. एफ्. शल्‌ग्रँ हा तिचा वास्तुकार. प्रबोधनकालीन इटालियन अभिजाततावादी प्रवृत्तींचा प्रभाव आंरी लाब्रूस्तच्या पॅरिस येथील ‘सँ झ्येनव्ह्येव्ह’ ग्रंथालयवास्तूच्या (१८४३–५०) बाह्यांगात पाहावयास मिळतो. मात्र त्याच्या अंतर्भागात स्तंभ व अवजड भिंती टाळून लोखंडी सांगाड्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे वाचनालयास भरपूर प्रकाश व खुलेपणाही लाभला. प्रगत स्थापत्य साधनसामग्रीचा वापर हे या वास्तूचे लक्षणीय वैशिष्ट्य. तीत आधुनिक कार्यवादी वास्तुकलेची बीजेच दिसून येतात. या काळातच गॉथिक शैलीचेही पुनरुज्जीवन झाले. त्यात प्रसिद्ध वास्तुकार व्ह्‌यॉलेलड्यूक याची कामगिरी मोलाची आहे. त्याने अनेक फ्रेंच मध्ययुगीन वास्तूंचे पुनःस्थापन केले त्यांत पॅरिसचे नोत्र दाम व कारकासॉन ही प्राचीन नगरी यांचा खास निर्देश करावा लागेल. त्याचे वास्तुशास्त्रीय लिखाणही या संदर्भात महत्त्वाचे आहे. शार्ल गार्न्येच्या पॅरिस येथील ‘ऑपेरा हाउस’ (१८६१ – ७४) या आलिशान वास्तूमध्ये, विशेषतः जिन्याच्या प्रशस्त रचनेमध्ये बरोक शैलीचा पुनःप्रत्यय येतो. अशा रीतीने या शतकातील वास्तुकला एकीकडे अनेकविध शैलींच्या संघर्षातून जात होती, त्याचवेळी स्थापत्यशास्त्रीय प्रगती व वास्तुनिर्मितीच्या साधनविषयक गरजा यांचा मेळ घातला जाऊन आधुनिक वास्तुतंत्रे व संकल्पना यांना पोषक अशी पार्श्वभूमीही तयार होत होती. एकोणिसाव्या शतकातील स्थापत्यशास्त्रीय प्रतिभेचे उत्तम उदाहरण म्हणजे ⇨ आयफेल टॉवर (१८८९) हा जगप्रसिद्ध मनोरा. फेर्दीनां द्युतॅरच्या ‘हॉल ऑफ मशीन्स’ (१८८९ १९१० मध्ये नामशेष) या विस्तीर्ण वास्तूचाही उल्लेख करावा लागेल. तथापि आधुनिकत्वाची अनेकविध प्रगल्भ रूपे विसाव्या शतकातच पाहावयास मिळतात. तिसऱ्या नेपोलियनच्या कारकीर्दीत व ओस्‌मान या नगररचनाकाराच्या देखरेखीखाली पॅरिस शहराचे आधुनिकीकरण करण्यात आले. ही या शतकाच्या वास्तुकलेतील नवप्रवृत्तीचे दर्शन घडविणारी आणखी एक महत्त्वपूर्ण घटना होय.

विसाव्या शतकात प्रगत स्थापत्य अभियांत्रिकीय तंत्रे व नवनवीन प्रायोगिक वास्तुकल्प यांच्या मिलाफातून कलात्मक वास्तुनिर्मिती साधण्यावर जास्त भर दिसतो. प्रबलित काँक्रीटच्या रचनातंत्राचा सौंदर्यपूर्ण वास्तुनिर्मितीसाठी उपयोग करून घेणारा आद्य वास्तुकार ऑग्यूस्त पेरे हा होय. त्याच्या पॅरिसनजीकच्या ल रँसी येथील चर्चवास्तूमध्ये (१९२२-२३) या तंत्राचे विकसित रूप पाहावयास मिळते. या काळात वास्तुकारांनी अशी एक शैली अवलंबली, की जीमध्ये वास्तूची वरपांगी बाह्य सजावट टाळून तिच्या कार्यवादी उद्दिष्टांवर व साधेपणाच्या तत्त्वावर भर देण्यात आला. प्रबलित काँक्रीटच्या आधुनिक रचनातंत्राचा प्रगल्भ व परिपक्व आविष्कार घडवणारे आणखी दोन प्रमुख वास्तुकार म्हणजे तॉनी गार्न्ये व ⇨ कॉर्ब्यूझ्ये. गार्न्येने लीआँ येथे खाटिकखान्याची विस्तीर्ण वास्तू पोलादाच्या साहाय्याने उभारली (१९०९–१३). तसेच तेथे वैशिष्ट्यपूर्ण क्रीडागार बांधले (१९१६). त्याचा उद्योगनगरीचा आराखडा नावीन्यपूर्ण कल्पनांच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरला (१९०१–०४). हा वास्तुकल्प यून सिते अँद्युस्त्रियॅल (१८९८) या नावाने प्रकाशित झाला. औद्योगिक युगातील मानवी गरजांचा विचार प्रामुख्याने त्यामागे होता. पोलाद व सीमेंट या माध्यमांच्या क्षमतेनुसार सुविहित आणि प्रवाही वक्राकार त्यात सूचित केले होते. फ्रान्समधील आधुनिक काळातील एक श्रेष्ठ प्रतिभावंत वास्तुकार ल कॉर्ब्यूझ्ये हा होय. त्याच्या वास्तुनिर्मितीचा व लेखनातील विचारांचा आधुनिक जागतिक वास्तुकलेच्या जडणघडणीवर मोठाच प्रभाव पडला. वास्तुनिर्मितीच्या तांत्रिक व सौंदर्यशास्त्रीय समस्यांबाबत त्याने नवी व मूलगामी दृष्टी दिली. व्हॅर झ्यून आरशितॅक्त्यूर (१९२३ इं.भा.टोवर्ड्स न्यू आर्किटेक्चर, १९२७) या ग्रंथातून त्याने आपली वास्तुतत्त्वे विशद केली. प्रबलित काँक्रीटच्या रचनातंत्रात त्याने अधिक नाजुकपणा व सुबकपणा आणला. बॉर्दोनजीक पेसाक येथील कामगार गृहनिर्माण योजना ‘व्हीला ले तेरास’ (१९२६-२७) ही पॅरिसनजीक गार्श येथील गृहरचना प्वासी येथील व्हिला सव्हॉय’ ही गृहवास्तू (१९२९) पॅरिस येथील सिते युनिव्हेर्सितॅर येथील स्वीस विद्यार्थिवसतिगृहे (१९३२) मार्से येथील ‘युनिते दाबितासिआँ’ (१९४७–५२) ही गृहवसाहत ही त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुयोजनेची काही उदाहरणे होत. अशा रीतीने प्रयोगशीलतेतून निर्माण झालेली ही आधुनिक परंपरा फ्रान्समधील वास्तुकलेला नवनव्या दिशा दाखवीत आहे.

इनामदार, श्री. दे.

मूर्तिकला : फ्रान्समध्ये साधारणपणे अकराव्या शतकापासून चर्च व कॅथीलड्रलच्या प्रवेशद्वारांवरील उत्थित शिल्पांच्या स्वरूपात मूर्तिकला प्रकटू लागली. बाराव्या शतकातील शिल्पांत ‘अकेंथस’ या काटेरी पानांच्या नक्षीचे स्तंभशीर्ष, भिंतींवरील कोरीव शिल्पपट्ट यांसारख्या अभिजात शैलीचा प्रभाव दर्शविणाऱ्या अलंकरणाबरोबरच रोमनेस्क मूर्तिकलेत पूर्वकालीन रानटी टोळ्यांच्या व कॅरोर्लिजियन या शैलींतील भौमितिक आकार व गुंतागुंतीची गुंफण असलेली नक्षीही दिसू लागली, ११४० च्या सुमारास आलेल्या गॉथिक शैलीच्या उत्थित शिल्पांत सुस्पष्टता व मृदुता आढळू लागली. उदा., शार्त्र कॅथीड्रलच्या पश्चिम दर्शनी भागातील त्रिकोणिका. स्तंभशीर्षावरील फुलापानांच्या नक्षीत व स्तंभांवरील उंचउभट मनुष्याकृतींमध्ये नैसर्गिकता अधिक दिसू लागली. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात रीम्झ येथील शिल्पांमध्ये तीन प्रमुख प्रवृत्ती दिसून येतात : (१) आर्म्ये कॅथीड्रलमधील शिल्पांप्रमाणे आदर्शवादी आकार–उदा., ॲनिन्सिएशन शिल्प. (२) ग्रीक व रोमन शैलींचा प्रभाव–व्हिजिटेशन शिल्प व (३) आध्यात्मिक भाव व्यक्त करणारे भावदर्शी चेहरे व डौलदार आविर्भाव. उदा., हसतमुख देवदूताचे शिल्प. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तरेकडून आलेले शिल्पकार आंद्रे बोन्‌व्ह (सु.१३३०–१४०३/१३) व झां द लिएज्य (कार. १३६०–७५) यांनी फ्रेंच शिल्पकलेत अधिक जोम आणला. उदा., सँ दनी येथील पाचव्या चार्ल्‌सचे थडगे. या काळात पॅरिसमध्ये हस्तिदंतामध्ये शिल्प कोरण्याची कलाही विकसित झाली. फ्रेंच मूर्तिकलेत खरी क्रांती पंधराव्या शतकातील क्लाउस स्लूटर (मृत्यू १४०६) या शिल्पकारामुळे झाली. त्याच्या शैलीतील लयबद्धता व जोमदार वास्तववादी आकार ह्यांचा प्रभाव फ्रान्स व स्पेन येथील शिल्पांवर मोठ्या प्रमाणात पडला. सोळाव्या शतकातील फ्रेंच मूर्तिकलेवर प्रबोधनकालीन इटालियन शैलीचा मोठा प्रभाव दिसून येतो. दोमेनिको फिओरेन्तिनो व बेन्‌व्हेनूतो चेल्लीनी यांच्या शिल्पांची छाप सर्वत्र दिसते. उदा., निम्फ ऑफ फाँतेन्ब्लो हे प्रख्यात शिल्प थडग्यातील शिल्पांमध्ये मृत व्यक्तीची अतिशय वास्तववादी शिल्पाकृती हे फ्रेंच शिल्पांचे एक वैशिष्ट्य ठरले. उदा., प्येअर बॉताँ (१५०७–७०) व झेर्‌मँ पीलाँ (सु.१५३५–९०) यांची शिल्पे. सतराव्या शतकात तर चर्चच्या अंतर्भागांत चित्रांपेक्षा उत्थित शिल्पांची सजावट व विशेषतः देवदूतांच्या आकृत्या दाखविण्याची पद्धत लोकप्रिय झाली. ह्या काळातील बरोक शैलीच्या शिल्पांत दोन प्रवृत्ती मुख्यत्वेकरून आढळतात : (१) धार्मिक शिल्पांचे नूतनीकरण व (२) थडग्यातील शिल्पांत प्रार्थना करण्याच्या आविर्भावांतील मृतात्म्यांची व्यक्तिशिल्पे दाखविणाऱ्या आकृती. या काळातील सुप्रसिद्ध शिल्पकार प्येअर प्यूझे (१६२०–९४) यांच्या शिल्पाकृती कारुण्य व्यक्त करतात. सतराव्या शतकाच्या उततरार्धात शिल्प हे उद्यान-सजावटीचा एक अविभाज्य भाग बनले. अशा उद्यानशिल्पांत अभिजाततावादी तसेच वास्तववादी शिल्पांकन असे दोन्ही प्रकार आढळतात. अठराव्या शतकात फ्रेंच व्यक्तिशिल्प बहराला पोहोचले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या व साम्राज्याशाहीच्या काळात (एकोणिसावे शतक) नव-अभिजाततावादी शैलीच्या शिल्पांना बहर आला. आंत्वान दनी शोदे (१७६३–१८१०) आणि प्येअर कार्तलिए (१७५७ – १८३१) ह्या शिल्पकारांनी नव-अभिजाततावादी शैलीमध्ये अनेक सेनाधिकाऱ्‍यांचे व प्रमुख व्यक्तींचे पुतळे केले. हे सर्व व्हर्सायच्या संग्रहालयात पहावयास मिळतात. एकोणिसाव्या शतकातील फ्रांस्वा ऱ्‍यूद (१७८४ – १८५५) ह्याच्या शिल्पाकृतींत–उदा., पॅरिस येथील आर्क द् त्रिआँ द् लेत्वाल या विजयकमानीवरचे ला मार्सेयॅझ हे उत्थित शिल्प. आंत्वान ल्वी बारी (१७९५–१८७५) याच्या नैसर्गिक भासणाऱ्या पशूंच्या शिल्पाकृतींत स्वच्छंदतावादी शैली दिसते. याच प्रभावातून ह्या शतकाच्या शेवटी झां बातीस्त कार्पो (१८२७–७५) याने अर्धपुतळे व समूहशिल्पे निर्माण केली. तसेच ⇨ रॉदँ (१८४०–१९१७) या प्रख्यात मूर्तिकाराने विविध मानवी भावना दर्शविणाऱ्या शिल्पाकृती निर्माण केल्या. उदा., गेट्स ऑफ हेल हे शिल्प आणि पॅरिस येथील बाल्झॅकचे व्यक्तिशिल्प. रॉदँ हा आधुनिक शिल्पशैलीचा जनक मानला जातो. त्याच्या शिल्पशैलीत दृक्‌प्रत्ययवादाचे व अभिव्यक्तिवादाचे असे दोन्ही गुण प्रकर्षाने आढळतात. वेगवेगळ्या पातळ्यांचे व त्यांवर पडणाऱ्या प्रकाशाचे आकार ह्यांचे त्याच्या शिल्पांत होणारे दर्शन, अभिव्यक्तिवादी चित्रकारांच्या चित्रांतील विरूपीकरण केल्यामुळे दिसणाऱ्या आकारांच्या व रंगांच्या तुकड्याप्रमाणे सुंदर भासते. बर्गर्स ऑफ कॅले ह्या त्याच्या शिल्पात जोमदार आकारांची सुंदर मांडणी, गतिमान रेषा, उत्कट भावप्रकटन व आकारांमधील पोकळ जागांचे सौंदर्य ही त्याच्या प्रभावी अभिव्यक्तीची सर्व वैशिष्ट्ये एकत्रित आढळतात. त्याच्या शैलीचे खरे सौंदर्य मनुष्याकृतींच्या जोशपूर्ण हालचाली व बाकदार आकृत्या यांत दिसते. थिंकर या त्याच्या ब्राँझशिल्पामध्ये मानवजातीच्या दुर्दैवाबद्दलची उत्कट भावप्रतीती शिल्पित व्यक्तीच्या विचारमग्न चेहेऱ्यातून प्रत्ययास येते. आंत्वान बूर्देलने (१८६१–१९२९) रॉदँबरोबर दीर्घकाळ काम केले. त्याच्या शिल्पांवर ग्रीक शिल्पकलेचा प्रभाव असून त्यातून अभिजाततावादी शैलीची भव्योदात्तता प्रत्ययास येते. नव्यकलाशैलीचा प्रभावही त्याच्या शिल्पांवर होता. शार्ल देस्पीओ (१८७४–१९४६) यानेही रॉदँबरोबर १९०७ ते १९१४ या काळात काम केले. आंतरिक भावनांचे प्रकटीकरण हे त्याच्या व्यक्तिशिल्पांचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. लयबद्धता, लवकचिकता व विविध पातळ्यांचे सुंदर शिल्पांकन यांचा प्रत्ययही त्याच्या शिल्पांतून येतो. त्याचे Assia हे नग्न स्त्रिचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे.

आंरी मातीस (१८६९–१९५४) या प्रख्यात चित्रकारानेही अनेक नावीन्यपूर्ण व आल्हाददायक शिल्पाकृती तयार केल्या. त्याच्या जीनेत ह्या शीर्षकाच्या, एकाच प्रतिमानावरून केलेल्या पाच वेगवेगळ्या शिल्पाकृती वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांतील सहजसुंदर आकार व विविध पातळ्या ह्यांची मांडणी वेधक आहे. ह्या शिल्पाकृती अत्यंत जिवंत भासतात. रेमाँ द्यूशाँ-व्हीयाँ (१८७६–१९१८) ह्यांच्या शिल्पाकृतींपैकी ॲथ्‌लीट ह्या शिल्पात विलक्षण गतिमान आविर्भावांमुळे तसेच आकार आणि पातळ्या ह्यांच्या विरोधाभासामुळे जिवंतपणा साधला आहे. आंरी लॉरांस (१८८५–१९५४) ह्यानेही सातत्याने शिल्पाच्या आकारांमध्ये परिवर्तने व विरूपीकरण केले. धनवादी चित्रकारांनी १९१० साली चित्रकलेत जे साध्य केले होते ते त्याने शिल्पांत आत्मसात केले.

कनिष्ठ कला : १६६० नंतर ‘गॉबेलीन’ ही उद्योगशाळा चित्रजवनिका, दागदागिने, फर्निचर इ. विविध वस्तूंच्या उत्पादनाचे केंद्र बनली. अठराव्या शतकातील चित्रजवनिकेच्या शैलीमध्ये चित्रकलेच्या अनुकरणाची प्रवृत्ती दिसते. क्लोद ओद्रां (१६५८–१७३४), शार्ल आंत्वान क्वापेल (१६९४–१७६२), फ्रान्स्वा बूशे (१७०३–७०) ह्या चित्रकारांनी तयार केलेल्या चित्रजवनिकांमध्ये त्यांच्या खास शैलींचे प्रतिबिंब दिसते. सतराव्या शतकात आंद्रे शार्ल बूल (१६४२–१७३२) या कारागिराने त्याच्या शिष्यांसमवेत धातुकाम व जडावकाम ह्यांचा सजावटीमध्ये वापर करून तयार केलेले फर्निचर वैशिष्ट्यपूर्ण आहे. पंधराव्या लूईच्या कारकीर्दीतील रोकोको शैलीचे फर्निचर हे आकर्षक व वैविध्यपूर्ण असून त्याच्या सजावटीमध्ये ब्राँझचा, छटेदार लाकडी तुकड्यांच्या जडावकामाचा तसेच लाखेच्या रंगकामाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केल्याचे दिसून येते. अठराव्या शतकात सोन्याचांदीची पात्रे व शामदाने ह्यांवरील नक्षीकामात तॉमां झेर्‌मँ (१६७३–१७४८) ह्यांसारख्या कारागिरांनी नाव कमावले. त्यांच्या अलंकरणात विविध आकृतिबंध पाहावयास मिळतात. ह्याच काळात साम्राज्यातील विविध घडामोडींची नोंद ठेवणारी नक्षीदार स्मारकपदके घडविली गेली. अठराव्या शतकात शुद्ध सोन्याचांदीची पात्रे व मृत्पात्री लोकप्रिय झाल्याने त्यांची निर्मिती करणारी अनेक मोठमोठी केंद्रे निर्माण झाली व नवनव्या संकल्पना आणि आकृतिबंध उपयोजण्यात आले.

अवर्सेकर, वसंत

चित्रकला : चौदाव्या लूईने १६४८ मध्ये ‘रॉयल अकॅडमी ऑफ फाइन आर्ट’ स्थापन करून कलानिर्मितीवर राजसत्तेचे नियंत्रण प्रस्थापित केले. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना. या अकॅडमीने कलाशिक्षण व कलानिर्मिती यांविषयी अनेक कसोट्या ठरविल्या व कलेचे स्वरूप स्पष्ट केले. कलाविद्यार्थ्यांना कडक शिस्त पाळावी लागे. चाकोरीबाहेर जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना कडक शासन केले जाई. अशा प्रकारच्या कडक शिक्षणपद्धतीचा जनक होता चित्रकार पूसँ (१५९४–१६६५). ग्रीक कलेप्रमाणे प्रमाणबद्धता, संयमित भावदर्शन व विषयाचे सखोल ज्ञान हे गुण पूसँच्या मते कलानिर्मितीसाठी आवश्यक होत. त्याच्या चित्रांत हे गुण आढळतात. चौदाव्या लूईच्या मृत्यूनंतर मात्र फ्रेंच कलाविष्कारामध्ये हळूहळू बदल होऊ लागले. पंधराव्या लूईच्या काळात सामाजिक जीवनही अधिक उत्साही व स्वच्छंदी बनू लागले. त्याचा परिणाम कलावंतांवरही झाला. त्यांच्या चित्रांतील विषय हलकेफुलके व आनंददायी असे होऊ लागले. या काळातील महत्त्वाचे चित्रकार म्हणजे व्हातो (१६८४–१७२१), फ्रागॉनार (१७३२–१८०६) आणि फ्रान्स्वा बूशे. या तिन्ही चित्रकारांच्या चित्रांची शैली काहीशी आलंकारिक असली, तरी व्हातोच्या चित्रांत रंगच्छटांचा व आशयाचा गहिरेपणा पुरेपूर जाणवतो. व्हातोनंतरचा दुसरा महत्त्वाचा चित्रकार म्हणजे शारदँ (१६९९–१७७९). ज्याची चित्रे अतिशय साध्या विषयांवरील आहेत. उदा., दैनंदिन मध्यमवर्गीय जीवनातील साध्यासुध्या, घरगुती वस्तू वा प्रसंग–प्रार्थना करणारा किंवा फुगा फुगविणारा मुलगा इत्यादी. पण या चित्रांत साधेपणाबरोबरच काव्यमयताही आढळते.

अठराव्या शतकातील तीन प्रमुख चित्रकार म्हणजे ⇨झाक ल्वी दाव्हीद (१७४८–१८२५), कॉरो (१७९६–१८७५) व अँग्र (१७८०–१८६७). यांपैकी कॉरो हा मुख्यतः निसर्गचित्रकार होता. त्याने मनुष्याकृतीही रंगविल्या. त्याच्या चित्रांत वातावरणातील सूक्ष्म हालचाली व वास्तवता आढळते. झाक ल्वी दाव्हीद याने ही अकॅडमी बरखास्त करून त्याऐवजी १७७५ मध्ये ‘इन्स्टिट्यूट नॅशनल’ची स्थापना केली तिलाच पुढे ‘फ्रेंच रॉयल अकॅडमी’ हे नाव पडले. कला व विज्ञान यांचा विकास करणे हे तिचे मुख्य ध्येय होते. यांतूनच नव-अभिजाततावादी कलासंप्रदाय उदयास आला. त्याची आचारसंहिता पुढीलप्रमाणे होती : कलानिर्मितीसाठी उदात्त व उच्च प्रतीच्या विषयांची निवड करावी. ग्रीक व रोमन संस्कृतींचा गाढ अभ्यास असावा. कलेतून देशभक्तीची व राजनिष्ठेची प्रेरणा मिळावी. इतिहासातील रोमहर्षक प्रसंगांतून, जुन्या महान काव्यांतून व श्रेष्ठ दर्जाच्या शिल्पाकृतींतून चित्रकारांनी प्रेरणा घ्यावी. रंगापेक्षा रेखाटनावर अधिक भर द्यावा व कलेची कसोटी ठरविण्याचा अधिकार अकॅडमीला असावा. दाव्हीदची ओथ ऑफ होराती हे रोमन सरदार देशासाठी लढण्याची शपथ घेत असतानाचा प्रसंग दाखविणारे चित्र व ब्रूटसच्या पुत्रांचे मृतदेह आणले जात असतानाचे दृश्य दाखविणारे लिक्टर्स बिंगिंग टू ब्रूटस बॉडीज ऑफ हिज सन्स हे चित्र हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दाव्हीद व त्याचा शिष्य अँग्र यांच्या चित्रांत निर्दोष तंत्रकौशल्य, अप्रतिम रेखांकन व सुस्पष्टता आढळते.

एकेणिसाव्या शतकातील पहिला क्रांतिकारी चित्रकारी चित्रकार म्हणजे ⇨ दलाक्‌वा (१७९८–१८६३). अकॅडमीचे सर्व नीतिनियम झुगारून देऊन स्वतंत्र प्रज्ञेचा व तरल कल्पकतेचा आविष्कार घडवत त्याचे चित्रनिर्मिती केली. वयाच्या केवळ चोविसाव्या वर्षी बार्क ऑफ दान्ते (दान्ते अँड व्हर्जिल इन हेल, १८२२) हे भव्य चित्र रंगवून त्याने अकॅडमीच्या चित्रकारांचा मोठा धक्का दिला. त्याची चित्रे पाहून अकॅडमीच्या चित्रकारांनी त्याची जाहीर निर्भत्सना केली. परंतु सर्व प्रकारच्या टीकेस सामना देत दलाक्र्‌वाने लहानमोठी मिळून १,८०० चित्रे आणि सु. ६,००० रेखाटने व शिलामुद्रिते केली. चित्रकलेवर त्याने बरेच लिखाणही केले आहे. त्याचे डेथ ऑफ सार्डंनापेलस हे तैलरंगातील चित्र प्रसिद्ध आहे. रंग व प्रकाश यांचा नाट्यमय वापर उत्कट भावाभिव्यक्ती साहित्य, पुराणे यांतील कल्पनारम्य विषय यासारख्या ⇨ स्वच्छंदतावादी चित्रसंप्रदायातील गुणवैशिष्ट्यांचे सम्यक दर्शन त्याच्या चित्रांतून घडते. एकोणिसाव्या शतकातील बराचसा उपेक्षित राहिलेला चित्रकार दोम्ये (१८०८–७९). याला आयुष्यभर जगण्याकरिता वृत्तपत्रांसाठी शिलामुद्रिते करावी लागली. त्याची बरीचशी चित्रे उपरोधात्मक आहेत. सामान्य लोकांच्या जीवनातील दुःख त्याने आपल्या चित्रांतून व्यक्त केले. कूर्बे (१८१९–७७) याने वास्तववादी शैलीत चित्रण केले. परिणामतः जुन्या विषयांकडून तत्कालीन सामाजिक जीवनातील प्रसंगांकडे चित्रकलेने वळण घेतले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्समध्ये अत्यंत महत्त्वाच्या चित्रशैली निर्माण झाल्या. पॅरिसमध्ये ⇨ एद्वार माने (१८३२–८३), ⇨ क्लोद मॉने (१८४०–१९२६), रन्वार (१८४१–१९१९), ⇨ एद्‌गार दगा (१८३४–१९१७), पीसारो (१८३०–१९०३) इ. चित्रकारांनी ⇨ दृक्‌प्रत्ययवादी चित्रसंप्रदाय निर्माण केला. त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन १८७४ साली भरले. क्लोद मॉनेचे इंप्रेशन, सनराइझ हे या संप्रदायाचे मूळ प्रवर्तक व प्रातिनिधिक चित्र. शुद्ध रंगांचा वापर करून प्रकाशात न्हाऊन निघालेल्या वस्तूंचा आभास निर्माण करणे, हे या शैलीचे मूळ तत्त्वज्ञान. प्रकाश व रंग यांच्याबाबतीत अधिकाधिक संशोधनात्मक प्रवृत्ती या संप्रदायात आढळते. येथून पुढे फ्रेंच चित्रकलेला एक अमर्याद गती लाभली व एकापाठोपाठ एक असे अनेक कलासंप्रदाय निर्माण होऊ लागले.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून पॅरिस हे जगातील एक प्रमुख व महत्त्वपूर्ण कलाकेंद्र बनले. पॅरिसमध्ये निर्माण झालेल्या विविध आधुनिक कलाप्रवृत्तींची एकत्रित नोंद ‘एकोल दी पॅरिस’ (द स्कूल ऑफ पॅरिस) अशा एका संप्रदायानेही केली जाते. त्यात फ्रेंच कलावंतांबरोबरच इतर देशांतील कलावंतही सहभागी होते. आधुनिक चित्रकलेच्या क्षेत्रात जे अनेकविध संप्रदाय निर्माण झाले, त्यांतील बहुतेक पॅरिसमध्येच उगम आहेत. ⇨ बिंदुवाद, ⇨ धनवाद, ⇨ रंगभारवाद, ⇨ अभिव्यक्तिवाद, ⇨ अप्रतिरूप कला इ. आधुनिक कलाविष्कारांचे अनेक पंथ-उपपंथ प्रथम फ्रान्समध्ये जन्माला आले. ⇨ सेझान (१८३९–१९०६), ⇨ गोगँ (१८४८–१९०३), ⇨ सरा (१८५९–९१), ⇨ तूलूझलोत्रेक (१८६४–१९०१), मातीस (१८६९–१९५४), र्‌वो (१८७१–१९५८), ब्राक (१८८२–१९६३) यांसारख्या फ्रेंच चित्रकारांची निर्मिती आधुनिकतेच्या संदर्भात लक्षणीय आहे. कलाक्षेत्रात नवीन काय घडते आहे, हे अभ्यासण्यासाठी अन्य देशांतील अनेक चित्रकार पॅरिसमध्ये जमू लागले. बरेच स्थायिकही झाले. विसाव्या शतकातील श्रेष्ठ स्पॅनिश चित्रकार पिकासो (१८८१–१९७३) ह्याने वयाच्या एकविसाव्या वर्षापासून आपल्या कलाकारकीर्दीचा बराच मोठा काळ फ्रान्समध्ये व्यतीत केला.

पॅरिस संप्रदायामध्ये विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही लक्षणीय भर पडत गेली. १९४५ नंतरच्या आघाडीच्या चित्रकारांमध्ये नीकोला द स्ताल (१९१४–५५), झां फॉत्रिअर (१८९८–१९६१), जॉर्जेस मॅथ्यू (१९२१– ), प्येअर सूलाजेस (१९१९– ), झां द्युब्युफे (१९०१– ) इत्यादींचा नामनिर्देश करता येईल. या कालखंडात अप्रतिरूप अभिव्यक्तिवादी, क्रियाचित्रणात्मक अशा चित्रप्रवृत्ती प्रामुख्याने पाहावयास मिळतात. द्युब्युफेने ‘आर ब्र्युत’ (रॉ आर्ट) ही अत्याधुनिक कलाप्रणाली निर्माण केली. क्रियाचित्रण तंत्रामध्ये निर्मिती करणाऱ्या जॉर्जेस मॅथ्यूने पॅरिसच्या नाटयगृहात चित्रनिर्मितीचा जाहीर कार्यक्रम केला, ही एक वैशिष्टपूर्ण घटना होय.

सडवेलकर, बाबुराव


संगीत : पाश्चिमात्य संगीताच्या परंपरेत फ्रान्सची कामगिरी निश्चितपणे महत्त्वाची आहे. विद्यमान पाश्चिमात्य संगीताच्या संदर्भात निखळ महत्त्वाचे म्हणता येणारे बहुधुन पद्धतीचे संगीत बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात विशेष आकाराला आले. लेऑनँ आणि पेरॉतँ (सु. ११७०–१२३५) या फ्रेंच संगीतरचनाकारांच्या अनुक्रमे दोन वा तीन वा चार विभागांच्या ‘आर्‌गॅनम’ रचना या संदर्भात उल्लेखनीय होत. तेराव्या व चौदाव्या शतकांत प्रभावी ठरलेल्या ⇨ मोतेत या संगीतप्रकाराची मुळे या दोघांनी स्थिररूप केलेल्या आर्‌गॅनम रचनाशैलीत सापडतात. आर्‌गॅनम हा प्रकार धर्मसंगीताचा असला, तरी मोतेत मात्र झपाट्याने लौकिक संगीतावर पगडा बसविणारा प्रकार ठरला.

पोपच्या वर्चस्वातून बाहेर पडून अधिकाधिक स्वतंत्र होणारा फ्रान्स नवकलांचा प्रवर्तक ठरू लागला तो चौदाव्या शतकात. द. फ्रान्समधील ⇨ त्रुबदूर वर्गातील कवींची लौकिक जीवनासंबंधीची गीते ही या काळातील महत्त्वाची भर होय. ही गीते संगीतबद्ध करून गाणारांना ‘जाँग्लर’ अशी संज्ञा होती. त्रूबदूरही आपली गीते संगीतबद्ध करीत. या गीतांची संगीतलेखने तेराव्या शतकाच्या आरंभापासून उपलब्ध आहेत. चालींचे चढउतार व कालावधी ध्यानात येण्याइतके हे संगीतलेखन सुगम आहे. धार्मिक संगीताच्या कक्षा ओलांडून संगीत विकसित व्हावे, म्हणून विषय लौकिक असावेत या संकेताने जितकी मदत झाली, तितकीच मदत संगीताची नृत्याबरोबर अधिकाधिक सांगड घातल्यामुळेही होत गेली. तसाच प्रकार नाट्य व संगीत यांची जोडयोजना करण्याबाबत. मध्ययुगीन रंगभूमीने हे कार्य साधले. झ्यू आदमसारख्या फ्रेंच संगीतकृतीने ही प्रक्रिया अधिक परिणामकारक केली. गद्य संवाद आणि अधूनमधून गीते या प्रकारे बांधणी साधल्याने गीतबद्ध रंगभूमी मागे पडली.

लौकिक संगीतप्रकारांद्वारे संगीताची धर्मसंगीताच्या बंधनातून सुटका करण्याचे कार्य पुन्हा एकदा फ्रान्समधील ‘शांसाँ’ गीतांमुळे सोळाव्या शतकात नीटपणे मार्गी लागले. संगीतरचना छापून त्यांचा प्रसार करण्याचे दूरगामी परिणाम ध्यानात घेता याही बाबतीतील फ्रान्सची कामगिरी लक्षणील ठरली. सोळाव्या शतकात प्येअर आतॅन्याँ या मुद्रक-प्रकाशकाने पॅरिसमध्ये १५२७ ते १५४९ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर संगीतरचना प्रसिद्ध केल्या. त्यापैकी २,००० शांसाँ-रचना छापण्याची त्याची कामगिरी प्रमुख होय. कवितेच्या रचनेनुसार संगीताची बांधणी असणार शांसाँ हा संगीतप्रकार फ्रान्सला पुन्हा यूरोपीय संगीताच्या मुख्य धारेत आणून सोडणारा ठरला. फ्रेंच भाषेतील बहुधुन पद्धतीचे व लौकिक आशयाचे गीत म्हणजे शांसाँ, असे समीकरण जवळजवळ एक शतकभर रुढ झानकँ (सु.१४८०–१५५८) हा शांसाँचा प्रमुख संगीतरचनाकार म्हणून प्रसिद्ध आहे.

सतराव्या शतकातील फ्रान्समधील सर्वांत महत्त्वाच्या सांगीतिक घटना दोन : चौदाव्या लूईने १६६१ मध्ये झां बातीस्त ल्यूलीची (१६३२–८७) ‘रॉयल अकॅडमी ऑफ म्यूझिक’च्या संचालकपदी नेमणूक केली व ल्यूलीने नृत्य, संगीत, संगीतिका इ. सांस्कृतिक कलाप्रकारांच्या आविष्कारांत दर्जा व अभिजातता राखता यावी, म्हणून अनेक संघटना स्थापन केल्या. ल्यूलीमुळे इटालियन ऑपेराची फ्रेंच अभिरुचीला साजेशी स्वरुपे सिद्ध झाली आणि त्यांना लोकप्रियताही लाभली.

अठराव्या शतकात सांगीतिक संवेदनशीलता बदलणे अपरिहार्यच होते. चौदाव्या लूईच्या मृत्यूनंतर कलांवरची सरकारी पकड थोडी ढिली झाली. संगीतप्रकारांना विभागणाऱ्या रेषा कमी ताठर झाल्या. काउंटरपॉइंट हे रचनातत्त्व आणि ⇨ फ्यू हा संगीतप्रकार या बरोबरच नवीन वाद्येही समोर आली. उदा., फ्रान्समध्ये ⇨ पियानो प्रथमतः १७७७ मध्ये अवतरला. ⇨ हार्प व ⇨ गिटार यांचा समावेश वाद्यवृंदात होऊ लागला. संगीतिकांचे विषय बदलू लागले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर समूहसंगीतरचनांचे प्रमाण वाढले. संचलने इत्यादींसाठी प्रांगणीय वाद्यवृंद रुजले व भरभराटीसही आले. दहाव्या चार्ल्‌सबरोबर पुन्हा काही काळ राजेशाही आली त्या काळात विनोदात्मक संगीतिका बहराला आली. सौंदर्यवादी संगीतकार ⇨ येर्‌ल्योझ (१८०३–६९) या काळातील प्रमुख रचनाकार होय. नाट्यपूर्ण रचना व तितकेच प्रभावी पियानोवादन ही त्याची वैशिष्ट्ये होत. एका दृष्टीने बेर्‌ल्योझ हा द्रष्टा होय. कारण त्याच्यानंतर फॉरे (१८४५–१९२४), ⇨ दब्यूसी (१८६२–१९१८), राव्हेल (१८७५–१९३७) इत्यादींनी प्रसिद्धीस आणलेला सांगीतिक सौंदर्यवाद त्याच्या कार्याने रुजला. आधीच्या काळातील वादनतंत्रे तसेच स्वरमेल (हार्मनी) इ. रचण्याच्या तत्त्वावरील भर यांसारख्यांना विरोधी परिणाम साधू पाहणारी, कलेकडे कला म्हणून पाहू शकतो असे मानणारी तत्त्वप्रणाली म्हणजे सांगीतिक सौंदर्यवाद होय. एकोणिसाव्या शतकातील परदेशी संगीतकारांची पॅरिस ही जणू राजधानी होती. फ्रेंच संगीतविश्वावर त्यांचा खोलवर ठसा उमटला. रोस्सीनी, माईरबेर, ऑफेनबाक यांसारख्या कैक संगीतकारांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. १९१३ मध्ये स्ट्राव्हिन्स्कीने सादर केलेल्या ल् साक्र द्यु प्रँतँ (इं.शी. द राइट ऑफ स्प्रिंग) या बॅलेच्या आर्ष संगीतरचनेमुळे दंगे माजले. ऑस्ट्रियन संगीतकार शनबेर्ख याने शोधून काढलेलली बारा-स्वरी पद्धतीही (ट्‌वेल्व्ह-टोनटेक्निक) १९२० च्या सुमारास फ्रान्समध्ये प्रसृत झाली. शनबेर्खच्याच तोडीची सांगीतिक कामगिरी फ्रान्समध्ये एरीक साती (१८६६–१९२५) या बंडखोर प्रवृत्तीच्या फ्रेंच संगीतकाराने केली. त्याने ‘ले सिक्स’ या संप्रदायाची स्थापना केली. त्यात दार्यूस मीयो (१८९२–१९७४), आर्त्यूर ऑनेगअर (१८९२–१९५५), फ्रांसीस पूलँक (१८९९–१९६३), झॉर्झ ऑरीक (१८९९– ) इत्यादींचा समावेश होतो. यांपैकी पहिल्या दोघांवर शनबेर्खच्या तंत्राचा प्रभाव दिसून येतो. आल्बेअर रूसेल (१८६९–१९३७) हा संगीतकार त्याच्या खास व्यक्तिविशिष्ट शैलीमुळे लक्षणीय ठरला. दुसऱ्या महायुद्धानंतर मेस्यां (१९०८– ) व त्याचा शिष्य ⇨ बूलेझ (१९२५– ) यांनी फ्रेंच संगीतामध्ये अधिक नावीन्य व प्रायोगिकता आणली. फ्रान्समधील आजची सांगीतिक विचारसरणी वैज्ञानिक व यांत्रिक घटकांनी अधिक प्रभावित झाली असल्याचे दिसून येते.

रानडे, अशोक

नृत्य : द. फ्रान्स प्रेक्षणीय लोकनृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळे उत्सव, विशेष मेजवानीचे प्रसंग इ.नृत्याने साजरे करण्याची पद्धत या भागात, विशेषतः प्रॉव्हांसमध्ये, पूर्वापार चालत आलेली आढळते. ‘रीगोर्दो ’ व ‘फॅरन्दोल’ ही प्रॉव्हांसमधील प्रादेशिक नृत्ये फ्रान्सच्या इतर भागांतही सतराव्या व अठराव्या शतकांत पसरली. बारझोल या गावात सेंट मार्सेलसच्या उत्सवाच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन ‘ट्राइप’ नावाचे नृत्य करण्याची प्रथा आहे. उंच उड्यांच्या या नृत्यात सर्व नागरिक भाग घेतात.

फ्रान्समध्येच ⇨ बॅले नृत्याचा प्रारंभ झाला. कॅथरिन द मेदीची हिच्यासाठी १५८१ मध्ये बॅले कॉमिक राइन हे पहिले बॅले नृत्य सादर करण्यात आले. सतराव्या शतकात नृत्यकलेत फ्रान्स आघाडीवर होता. व्हर्सायच्या राजवाड्यात होणारी दरबारी नृत्ये यूरोपभर वेगाने पसरत व लोकप्रिय होत. ब्रानल व बूरे या मूळ फ्रेंच लोकनृत्यांचे दरबारी नृत्यांत रूपांतर झाले. १६५३ मध्ये चौदाव्या लूईने स्वतः एका बॅले नृत्यात भाग घेतला होता. त्याने ‘रॉयल अकॅडमी ऑफ म्यूझिक अँड डान्स’ (१६६१) ही संस्था स्थापन केली. १६५० ते १७५० या काळात फ्रेंच दरबारात ⇨ मिन्यु हे नृत्य विशेष लोकप्रिय होते. ‘पासप्ये’ या फ्रेंच नृत्याचाही सतराव्या व अठराव्या शतकांतील बॅले नृत्यांत अंतर्भाव केलेला आढळतो.

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नृत्याचे दरबारी स्वरूप बदलले. रंगमंचावर नृत्यप्रयोग होऊ लागले. तसेच दालनातील युग्मनृत्येही (बॉलरूम डान्सेस) प्रचारात आली. ⇨ वॉल्ट्स हे युग्मनृत्य अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जवळजवळ साठ वर्षे अखंडपणे लोकप्रिय होते. ⇨ पोल्क, क्वाड्रिल इ. युग्मनृत्ये काही काळ प्रचारात होती. एकोणिसाव्या शतकात पॅरिसमध्ये ‘कॅनकॅन’ हे स्त्रियांचे भडक नृत्य विशेष लोकप्रिय ठरले. १९०९ मध्ये पॅरिसमध्ये पहिली नृत्यस्पर्धा भरविण्यात आली. प्रयोगशीलतेमुळे फ्रान्समध्ये नवे नवे नृत्यप्रकार सतत प्रचारात येत असतात. मोठमोठ्या हॉटेलांमधून तसेच निशागृहांतून भव्य देखाव्यांच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे ⇨ कॅबरेचे कार्यक्रम प्रवाशांचे मोठेच आकर्षण ठरले आहेत. भव्य देखावे, रंगीबेरंगी झगमगणारे पोशाख, दिव्यांच्या उघडझापीने साधणारा छाया-प्रकाशाचा अद्‌भुत खेळ ही त्यांची वैशिष्ट्ये. ‘लिडो’, ‘कॉन्सर्ट मेयॉल’, ‘प्लेस पिगाल’ ‘क्रेझी हॉर्स सलून’ ही पॅरिसमधी प्रमुख निशागृहे होत.

पॅरिसमधील ‘एकोल दी बोजार्त’ यासारख्या कलाशिक्षण देणाऱ्‍या अनेक संस्था फ्रान्समध्ये आहेत. त्यात अनेक देशातील कलावंत काम करीत असतात. पॅरिसमधील माँतरपानास, लॅटिन विभाग आणि माँमार्त्र या भागात कलावंत केंदित झालेले आढळतात. गाझॅत दे बोझार आणि लय ही कलाविषयाला वाहिलेली नियतकालिके उल्लेखनीय आहेत. कलावस्तू जतन करण्यासाठी फ्रेंच शासनाचे एक खास मंत्रालय आहे. ल्यूव्ह्‌र, व्हर्साय, मार्‌मॉतन, क्लूनी, ‘म्युझे नासिऑनाल दार मॉदॅर्न’ यांसारखी प्रसिद्ध कलासंग्रहालय, काँदे, शातो दी शेतीयी, ऑइसे ही तसेच लिआँ, स्ट्रॅर्‌बर्ग व बॉर्दोमधील संग्रहालय महत्त्वाचे असून देशांत एकूण पाचशेहून अधिक कलासंग्रहालये आहेत. नित्य-नैमित्तिक तसेच फिरती कलाप्रदर्शनही सतत योजिली जातात.

जगताप, नंदा

चित्रपट : फ्रेंच चित्रपट इतिहासाचे स्थूलमानाने पाच टप्पे पाडता येतील. (१) मूक चित्रपटांचा कालखंड (१८९५ ते १९२०) (२) प्रायोगिक कालखंड (१९२० ते १९४४) (३) दुसऱ्‍या महायुद्धानंतरचा कालखंड (१९४५ ते १९५९) (४) नव चित्रपटांचा कालखंड (१९५९ ते १९६५) (५) गॉदार् पर्व (१९५९ ते १९७०) व (६) विद्यमान कालखंड (१९७१ ते १९८०).

(१) मूक चित्रपटांचा कालखंड : लूई ल्यूम्येअरने १८९५ साली पहिला मूक चित्रपट यशस्वी रीत्या सादर केला. त्यात दैनंदिन जीननातील गोष्टींचे चित्रीकरण केलेले होते. उदा., कुटुंब न्याहरी करीत आहे बोट बंदराला लागत आहे आगगाडी स्टेशनात प्रवेशत आहे इ. त्यानंतर झॉर्झ मिली याने त्याच्या अगदी विरुद्ध अशा कथावस्तूंचे चित्रीकरण केले. माध्यमाच्या तांत्रिक शक्यतांचा कल्पकतेने उपयोग करून व कल्पनारम्य अशा अतिवास्तववादी कथावस्तूंचे चित्रीकरण करून त्याने ते लोकप्रिय केले. ल् व्हॉय्याज दां ला ल्यून (१९०६, इं. शी. ट्रिप टू मून). माक्स लिडंर, लूई फियाल, आबेल गान्स, झाक फेदेर व रने क्लेअर हे इतर दिग्दर्शक होत.

(२) प्रायोगिक कालखंड : या कालखंडात चित्रपट माध्यमाच्या गुणवत्तेचा सर्वंकषपणे अभ्यास होऊ लागला. झां कोक्तो, झां रन्वार्, झां व्हिगो, साशा गीत्री, माक्स ओफ्युल्स, मार्सेल कार्ने इ. फ्रेंच दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांतून या माध्यमाच्या कलात्मक सौंदर्याचा साक्षात्कार जगाला घडविला. त्यांपैकी कोक्तोची ल् सां दँ पोयॅत (१९३०, इं. शी. पोएट्स ब्लड), रव्नार्‌चा यून पार्ती द् शांपान्य (१९३६, इं. शी. ए शॅम्पेन पार्टी ), ला ग्रांद इल्यूझिआँ (१९३७, इं. शी. द ग्रेट इल्यूजन), झां व्हिगोचा लातालांता (१९३४, इं. शी. द अटलांटा), मार्सेल कार्नेचा कॅ दे ब्र्यूम (१९३८, इं. शी. पोर्ट ऑफ शॅडोज) या काही श्रेष्ठ कलाकृती मानल्या

(३) दुसऱ्‍या महायुद्धानंतरचा कालखंड : या कालखंडात चित्रपटाचे कथाविषय समाजभिमुख बनलेले आढळतात. सामाजिक समस्यांचे चित्रन चित्रपटातून दिसू लागले. त्याचबरोबर चित्रणशैलीतील प्रगती उल्लेखनीय आहे. या कालखडांतील काही श्रेष्ठ चित्रपट असे : क्लोद ओंता लाराची ले दियाब्ल ओ कॉर (१९३४, इं. शी. डेव्हील इन द बॉडी), आंरी झॉर्झ क्लुझोचा ले दियाबॉलीक (१९५३, इं. शी. द वेजेस ऑफ फिअर), झाक तातीचा जूर द् फॅत (१९३४, इं. शी. ए डे ऑफ फिअर) इत्यादी.

(४) नवचित्रपटांचा कालखंड : नवचित्रपटांमागील विचारसरणीमुळे फ्रेंच आणि पर्यायाने जागतिक चित्रपट केलेला क्रांतिकारक वळण लागले. काअिए द्यु सिनेमा या जगप्रसिद्ध फ्रेंच सिनेनियतकालिकाच्या लेखकांनी स्वतः चित्रपटनिर्मिती सुरू केली. माध्यम विषयक प्रस्थापित संकेतांना झिडकारून त्यांनी नवी चित्रणशैली स्वीकारली. या नव्या लाटेच्या प्रवर्तकांत ॲग्नेस ब्हर्दा, क्लोड शाब्रो, फ्रांक्का त्रूफो, आलॅन रेने, गॉदार् इत्यादीचा अंतर्भाव होतो. त्यांच्या चित्रपटांतील विषय प्रचलित सामाजिक समस्या व विडंबन, प्रेमकथा असेच होते परंतु त्यांचे तंत्र वेगळे व असांकेतिक असल्याने त्यातून वेगळ्या अनुभवाचा कलात्मक प्रत्यय येतो. त्रूफोचा ज्यूल एण्ड जीम (१९६१), गॉदार्‌चा आ बू द सूफ्ल (१९५९, इं. शी. ब्रेथलेस), आलॅन रेनेचा इरोशिमा माँ नामूर (१९५९, इं. शी. हिरोशिमा माय लव्ह) व लाने देरनिॲर आ मारियेनबाद (१९६१, इं. शी. लास्ट इयर इन मारियेनबाद), आलॅन रोब ग्रियेचा लिमॉरतॅल (१९६३, इं. शी. इम्मॉर्टल) हे या कालखंडातील काही श्रेष्ठ चित्रपट होत.

(५) गॉदार् पर्व : नव चित्रपटामागील विचारसरणीचा सातत्याने पाठपुरावा करणारा प्रभावी कलावंत म्हणून गॉदार्‌ला मानावे लागेल. त्याची शैली जितकी विस्कळीत, असंबद्ध तितकीच ती विचारप्रवर्तक आणि थरारक अनुभव देणारी मानली जाते. रंगभूमविरील ‘ब्रेक्टियन एलियनेशन’ (ब्रेक्टच्या नाटकातील व्यक्तीच्या एकाकीपणाची किंवा दूरीकरणाची जाणीव) या तत्वांचा चित्रपटांतील अवतार म्हणून गॉदार्‌च्या कलाकृतीकडे पाहिले जाते. सामाजिक–राजकीय समस्यांकडे नि:स्पृहपणे पाहत त्यांचे विडंबन करणे हा त्याचा आवडता कथाविषय. त्याच्या शैलीचा प्रभाव जगभर पडला. याच काळात रॉबॅर ब्रॅस्साँ हा आणखी एक श्रेष्ठ दिग्दर्शक फ्रान्समध्ये उदयास आला. तो त्याच्या ल् प्रॉसॅ द् जानदार्क (१९६२, इं. शी. जोन ऑफ आर्क्‌स ट्रायल) व पिकपॉकेट (१९५९) यांसारख्या चित्रपटांतून अस्सल वास्तवाचा प्रत्यय येतो.

फ्रेंच चित्रपटातील नवलाटेचे पडसाद नंतर इटली, इंग्लंड, अमेरिका आणि भारत इ. देशांतील पित्रपटसृष्टीत उमटले. समृद्ध साहित्य व कलाक्षेत्र यांमुळे जगातील कोणत्याही देशापेक्षा फ्रेंच चित्रपटकलेत स्थित्यंतरे अधिक प्रमाणात होताना दिसतात.

(६) विद्यमान कालखंड : १९७० ते १९८० या दशकांत फ्रेंच चित्रपटसृष्टीत नवलाटेतील दिग्दर्शक स्थिरावले, किंबहुना खंबीरपणे प्रस्थापित झाले. याला कारण म्हणजे प्रत्येकाची तत्वप्रणाली प्रगत देशातील नामवंत टिकाकारांकडून सखोलपणे अभ्यासली गेली. त्रूफो, शाब्रो गॉदार्, रने, ब्रॅस्साँ इ. दिग्दर्शकांच्या कलाकृतींचे सरग्रहण करणारे इंग्रजी ग्रंथ प्रकाशित झाले. त्यामुळे त्यांची थोरवी जगाला परिचित झाली. प्रत्येकाचा आशय व कलात्मक शैली भिन्न असूनही त्यांच्या चित्रपटांची परिणामकारकता सधन अनुभव देणारी होती. या दशकांत जागतिक चित्रपटइतिहासात श्रेष्ठ गणल्या जातील अशा कलाकृती निर्माण झाल्या. उदा., त्रूफोचे ला नुई आमेरिकॅन (१९७३, इं. शी. डे फॉर नाइट) व ग्रीन लम (१९७८) शाब्रोचे ब्लड वेडींग (१९७५) व ब्लड रिलेटिव्हज (१९७८) मॉदार्‌चे विक एण्ड (१९७४) रेनेचे प्रॉव्हिडन्स (१९७७) ब्रॅस्साँचे फोर नाइट्स ऑफ ए ड्रिमर (१९७१) व डेव्हिल्स प्रोबॅबली (१९७६). चित्रपटातील आशय व्यक्तिसापेक्ष राखून व त्या दृष्टीने तांत्रिक अंगांची योग्य प्रकारे हाताळणी करून नव्या जाणीवांचा दृक्‌प्रत्यय देण्यात या दशकातील फ्रेंच चित्रपट यशस्वी ठरले आहेत.

दिक्षित, विजय


रंगभूमि : दुसऱ्‍या महायुद्धानंतर फ्रेंच रंगभूमीवर काही मूलगामी बदल घडून आलेले दिसतात. युद्धाच्या कटू अनुभवांमुळे जुन्या निष्ठा आणि मूल्ये नष्ट झाली होती कालबाह्य ठरली होती. इतर कलांप्रमाणेच नाट्यकलेलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, आव्हाने स्विकारावी लागली. वस्तुतः प्रतिभावंत कलावंतांची कमतरता नव्हता. उलटपक्षी, जागतिक कीर्ती मिळविणारे आदामॉव्ह (१९०८–७०), झांक ओदिबर्ती (१८९९–१९६५), सॅम्युएल बेकेट (१९०६– ), झां पॉल सार्त्र (१९०५–८०), झां व्हाथिए (१९१०– ) हे नाटककार तसेच झां लूई बारो (१९१०– ) झां व्हिलर (१९१२–७१), रॉझे प्लॉशॉं (१९३१– ), झॉर्झ विल्सन (१९२१– ) हे नाट्यनिर्माते याच काळातील होत परंतु नाट्याला प्रतिसाद देणारे आस्वादक प्रेक्षक नव्हते. परिणामी काही खाजगी मालकीची नाट्यगृहे बंद करण्यात आली. फ्रान्समध्ये तीन चतुर्थांश लोक कधीच नाटके पाहत नसत, असेही आढहून आले. या निराशाजनक वातावरणावर मात करून काही नाट्यनिर्मात्यांनी–विशेषतः तरुण पिढीतील नाट्यनिर्मात्यांनी–पुढे होऊन नाट्यचळवळीला चालना देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सरकारी धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक ठरले. राष्ट्रीय नाट्यसंस्थांना सरकारी संरक्षण होतेच, परंतू दुसऱ्‍या महायुद्धानंतर १९७० च्या आसपास खाजगी मालकीच्या नाट्यसंस्थांना आर्थिक साहाय्य करण्याची आणि त्यांना करात सुट देण्याची प्रथा सुरू झाली.

फ्रान्समध्ये चार राष्ट्रीय नाट्यसंस्था असून त्यांपैकी ज्या तीन पॅरिसमध्ये आहेत, त्या अशा : (१) कॉमेदी फ्रँसॅझ किंवा मोल्येर भवन (१६८०) – येथे मोल्येरची आणि रासीनची अभिजात नाटके व काही समकालीन नाटके समतोल प्रमाणात सादर केली जातात. १९८०–८१ च्या हंगामामध्ये कॉमेदी फ्रँसॅझने मोल्येरचे ल बुर्झ्वा ज्यॉंतिऑम, म्यूसेचे ले काप्रिस द मारिआन व क्लोदेलचे पार्तांज्य द मिदी ही तीन नाटके (आलटूनपालटून) सादर केली. क्लोदेलच्या नाटकाच्या मूळ प्रकृतीला उजाळा देण्याकरिता नवीन तत्रांचाही वापर केलेला आढळतो. कॉमेदी फ्रॉंसॅझच्या उज्ज्वल परंपरेमुळे व ऐतिहासिक महत्वामुळे तिला रसिकांचा आश्रय सतत मिळत गेला.

(२) लोंदेयाँ तेआत्र द फ्राँस : हे कॉमेदी फ्रॉंसॅझशी निगडित असलेले एक नाट्यगृह आहे. झां लूई बारोच्या करकीर्दीत (१९५९ ते १९६८) त्याचे मूळ नाव बदलून ‘तेआत्र नास्योनाल द लॉदेयाँ’ असे ठेवण्यात आले. पुढे १९६८ मध्ये विद्यार्थीचळवळीची प्रचंड झळ लागल्यामुळे झां लूई बारोच्या नाट्यसंचाला सर्वस्व सोडून बाहेर पडावे लागले. मध्यंतरी आंद्रे मार्लोनेही आपला पाठिंबा काढून घेतला होता परंतु १९७१ च्या नंतर पुन्हा ही संस्था सुरू करण्यात आली. ही संस्था कॉमेदी फ्रॉंसॅझच्या धर्तीवर नाटके सादर करते, तसेच परराष्ट्रीय नाट्यसंचांचीही सोय करते.

(३) तेआत्र नास्योनाल द शायो : या संस्थेत रंगभूमीविषयक संशोधनाच्या उद्देशाने अनेक दालने बांधली आहेत. याशिवाय एक मुलांचे नाट्यगृहही आहे.

(४) तेआत्र नास्योनाल पॉप्युलॅर : या संस्थेचा सध्याचा निर्माता रॉझे प्लॉशाँ हा लीआँजवळ व्हाल्यूर्बान येथे आहे. ही संस्था पॅरिसला असताना १९५१ ते १९६८ च्या दरम्यान झां व्हिलरने काही ध्येये पुढे ठेवून तिचे नेतृत्व केले होते. इतर कलासंस्थांप्रमाणे त्यानेही सभासद नोंदविले व तिकीटांचे दर कमी ठरवून दिले. नाट्यकृती व प्रेक्षक यांच्यामध्ये एक घनिष्ठ संवाद निर्माण व्हावा अशी त्याची विचारसरणी होती. आपले नाटक हे केवळ उच्च समाजातील सुखवस्तू प्रेक्षकांपुरते मर्यादित न रहाता, कामगार आणि श्रमजीवी वर्गही अभिरुचीपूर्ण नाटकांकडे आकर्षित व्हावा म्हणूनही त्याने प्रयत्न केले.

प्रत्यक्ष पॅरिसमध्ये लहानमोठ्या नाट्यसंस्था ६० हून अधिक आहेत. १९३६ पासूनच पॅरिसमध्ये लहान नाट्यगृहाचा उदय झालेला दिसतो. उदा., नॉक्तॉंबूल, पॉश, युशॅत, बाबीलॉन, ल्यूतॅस इत्यादी. खाजगी नाट्यगृहांनी नाट्यनिर्मितीच्या बाबतीत घेतलेला पुढाकार लक्षात घेऊन राज्यसरकार आणि नगरपालिका यांच्याकडून त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. सरकारी अंदाजपत्रकातही यासाठी तरतूद केलेली आहे.

दुसऱ्‍या महायुद्धानंतर रंगभूमीवर नव्या विचारांचे प्रयोगशील निर्माते म्हणून झां लूई बारो व झां व्हिलर यांचे वर्चस्व होते. दोन महायुद्धांमधील काळात झांक कॉपो, शार्ल द्यूलँ, गास्तॉं बाती, झॉर्झ पितोएफ या युगप्रवर्तक जिद्दीच्या निर्मात्यांनी फ्रेंच रंगभूमीला पुनर्जन्म दिला. बारो आणि व्हिलर यांच्यावर या तज्ञांची निश्‍चितच छाप आहे. शिवाय आंतॉनँ आर्तोचे ॠणही नाकारता येणार नाही. नवीन कलावंत पूर्वीच्या तज्ञांचे ॠण मान्य करूनही स्वतःच्या कुवतीवर भविष्याकडे वाटचाल करीत, स्वतःचे असे नवनवे आकृतीबंध तयार करतांना दिसतात.

झां लूई बारोची नाट्यनिर्मितीच्या दिशेने वाटचाल सोपी नव्हती. तेआत्र नास्योनाल द लोदेयाँ सोडावा लागल्यावर त्याने एलिझे माँमार्त्र ही नाट्यसंस्था सुरू केली. तेथे राबले आणि ज्यारी स्यूर ला ब्यूत या दोन भव्य नाट्यप्रयोगानंतर बारो व मादलेन रनो या जोडप्याने तेआत्र दॉर्से या नाट्यगृहाची स्थापना केली. नाट्यसंच आणि प्रेक्षकवर्ग यांच्यामध्ये अधिक सुसंवाद व्हावा म्हणून येथे सोयीही करण्यात आल्या आहेत. परदेशीय नाट्यसंचांचीही येथे सोय केली जाते.

झांन लॉरा या सरकारी नाट्यविभागाच्या स्त्री कार्यवाहाने रंगभूमीचे विकेंद्रीकरण व्हावे या उद्देशाने आटोकाट प्रयत्न केले. नाट्यकलेचा उत्तमोत्तम आविष्कार केवळ पॅरिस शहरापुरता मर्यादित न राहता पॅरिसच्या आजूबाजूच्या परिसरातून, तसेच उपनगरांतूनही नाट्यसंस्थांचा प्रसार व्हावा याशिवाय पॅरिसहून दूर असलेल्या शहरातून पॅरिसशी तुलना करता येईल अशा दर्जाच्या नाट्यसंस्था सुरू व्हाव्यात, असेही प्रयत्न तिने केले. परिणामतः अलीकडे लहान गावांतूनही रंगभूमीचा प्रसार झालेला आढळतो. विशेषतः स्टॅ्स्बर्ग, तूलूझ, प्रॉव्हान्स, बूर्गाँन्या इ. शहरातून तर रंगभूमीचा प्रसार विशेषत्वाने झालेला दिसून येतो. आंद्रे मार्लोच्या प्रोत्साहनाने तर प्रत्येक गावात सांस्कृतिक केंद्रे स्थापन झाली आहेत.

झां लूई बारो, झां व्हिलर, रॉझे प्लॉशॉं, झॉर्झ विल्सन यांच्या व्यतिरिक्त झां दास्ते, मार्सेल मारेशाल, गास्तॉं बाती, गाब्रीएल मॉने, आंत्वान बुरसेय्ये हे येथील काही नाट्यनिर्माते असून यांनी आदामॉव्ह, बेकेट, झने, सार्त्र, आराबाल यांच्यापासून व्हाथिए, बॉरीस व्हयान यांच्यापर्यंतच्या नवीन नाटककारांची नाटके प्रयोगाच्या प्रकृतीविशेषांची जाणीव ठेवून दाखविली, तसेच उत्कृष्ट जुनी नाटकेही त्यांनी सादर केली. आजच्या फ्रेंच रंगभूमीचे एक लक्षात ठेवण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे आंतरदेशीय सांस्कृतिक देवाणघेवाण हे होय. इतर देशांतील नाट्यकृती व नाट्यप्रवाहांचे पॅरिसला विशेष स्वागत झाले. उदा., लिव्हिंग थिएटर, हॅपनिंग, ब्रेक्ट थिएटर इत्यादी. १९८१ मध्ये मारी स्टुअर्ट नाट्यगृहात क्लोदेलचे ‘लेशांज्य’ हे नाटक लिव्हिंग थिएटरच्या धर्तीवर दाखवले जात आहे. १९८१ मध्येच सार्त्रचे ले मुश वी क्लो, तसेच झां झनेचे ला ओत स्युर्‌व्हेआँसले बॉन ही नाटकेही सादर करण्यात आली. दुसरा एक संस्मरणीय प्रयोग म्हणजे तेआत्र द्यू सॉलेयचा आरियान मुचकिन हिने बसविलेल्या मेफिस्तो हा नाट्यप्रयोग. व्हॉसनच्या एका टोकाला जुन्या हंगारमध्ये वसलेले हे नाट्यगृह आज दहा वर्षांपासून प्रायोगिक धर्तीवर, सामाजिक आणि ऐतिहासिक बैठक असलेले निरनिराळे नाट्यप्रयोग सादर करीत आहे.

टोणगावकर, विजया


क्रीडा : फ्रान्समध्ये मध्ययुगापासून प्रचलित असलेल्या काही खेळांचे उल्लेख मिळतात. बाराव्या व तेराव्या शतकांतील ‘ला सूले’ या खेळात दोन संघ, काठ्यांनी व हातापायांनी चेंडू प्रतिपक्षाच्या हद्दीत टोलवून गोल करण्याचा प्रयत्न करीत. संपूर्ण गावे या खेळात सहभागी होत. १३६९ मध्ये पाचव्या चार्ल्‌सने या खेळात होणाऱ्‍या दुखापतींमुळे त्यावर बंधने घातली. ‘झ्यू द पाउमे’ (गेम ऑफ द हँड) हा खेळ हाताने चेंडू भिंतीवर आपटून खेळत. पुढे त्यात काही बदल होत जाऊन त्यातून कोर्ट टेनिस हा खेळ उत्क्रांत झाला. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात या खेळाला खूच लोकप्रियता लाभली. ‘साव्हाते’ नावाचा मुष्टियुद्धाचा प्रकारही प्रचलित होता. या खेळात हातांप्रमाणे पायांचाही उपयोग करीत.पंधरा ते अठरा या शतकांच्या दरम्यान फ्रान्स विरुद्ध इंग्लंड अशा कुस्तीच्या स्पर्धा झाल्याचे उल्लेख मिळतात. या स्पर्धा राजे व सरदारांच्या उपस्थितीत होत असत. रग्बी, सॉकर हे खेळ तसेच घौड्यांच्या शर्यती इंग्लंडमधून येथे आयात झाल्या. १८६५ च्या सुमारास जॉकी क्लब स्थापन झाला.

फ्रान्समध्ये खेळांची आवड विसाव्या शतकात विशेषत्वाने वाढीस लागल्याचे दिसते. सायकल शर्यती हा फ्रान्सचा राष्ट्रीय खेळ म्हणता येईल. येथे अनेक सायकल शर्यती दरवर्षी भरतात. त्यात बॉर्दो ते पॅरिस ते ब्रुसेल्स या मोठ्या शर्यती आहेत. १९०३ साली देग्रॉंज्य या वृत्तपत्रसंपादकाने सुरू केलेली ‘तूर दी फ्रान्स’ ही सर्वांत मोठी सायकल शर्यत आहे. या शर्यतीचा मार्ग सु. ४,८२८किमी. च्या (३,००० मैल) परिघातून जातो. वीस ते पंचविस दिवसांच्या या शर्यतीत देशोदेशीचे खेळाडू भाग घेतात.

सॉकर (फुटबॉल) लोकप्रिय आहे. येथे सु. ८,००० फुटबॉल क्लब आहेत. दरवर्षी होणाऱ्या सामन्यांत सु. चाळीस क्लब भाग घेतात. लॉन टेनिसमधील फ्रेंच विजेतेपदाच्या सामन्यांत अनेक राष्ट्रांचे संघ भाग घेतात. बोरोट्रा, कॉशे, लाकॉस्त, ब्र्यून्याँ या फ्रेंच टेनिसपटूंनी आंतरराष्ट्रीय डेव्हिस करंडक स्पर्धा यात वेळा जिंकली (१९२७ ते १९३३). कोर्ट टेनिस हा पूर्वापार चालत आलेला खेळही प्रचलित आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मोटर शर्यती येथे भरवण्यात येतात. ल मां येथे दरवर्षी भरणारी चोवीस तासांची मोटर शर्यत प्रसिद्ध आहे. फ्रान्समधील ग्रां प्री शर्यत ही जगातील मोठ्या शर्यतींमध्ये गणली जाते. गिर्यारोहण, पोहणे, स्कीइंग, स्किन डाइव्हिंग, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध हे खेळही प्रचलित आहेत. सुटीच्या दिवसांत सहकुटुंब प्रवास करणे हा फ्रेंच लोकांचा आवडता छंद आहे. शासनातर्फे छावण्यांची व्यवस्था केली जाते.

जगताप, नंदा

महत्वाची स्थळे : देशाचे भूमध्य सागरी किनारा (रिव्हिएरा), अटलांटिक किनारा, फ्रेंच आल्प्स व ल्वार नदीखोरे हे निसर्गरम्य प्रदेश पर्यटन केंद्रे म्हणून जगप्रसिद्ध आहेत. नॉर्मंडी व ब्रिटनी हे प्रदेश मच्छीमारी केंद्रे म्हणून पूर्वापार विख्यात आहेत. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने देशाच्या आग्नेयीस असलेल्या कॉर्सिका बेटाचेही महत्व खूप वाढत आहे.

राजधानीचे शहर ⇨ पॅरिस हे देशाच्या उत्तर भागात वसलेले असून, फ्रेंच संस्कृतीचे माहेरघर आहे. आयफेल टॉवर, बूलेव्हार्ड म्हणजे वृक्षाच्छादित रुंद रस्ते, ऐतिहासिक वास्तू, चित्रपटगृहे व रंगमंदिरे, लूव्ह्‌र कलासंग्रहालय, कलावस्तुसंग्रहालये, फॅशनगृहे, हॉटेले, संगीतगृहे, निशागृहे, उद्याने, इत्यादींनी संपन्न बनलेले हे इतिहासप्रसिद्ध शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे एक प्रमुख केंद्र आहे. शहर व त्याच्या परिसरात विमाने, मोटरी, चैनीच्या व धातूच्या वस्तू, रसायने इत्यादींचे कारखानेही आहेत. देशाच्या ईशान्य भागातील मेट्स, स्ट्रॅस्‌बर्ग, रूबे, लील आग्नेयीकडील लीआँ, ग्रनॉबल दक्षिण प्रदेशातील मार्से, नीम तर पश्‍चिम भागातील बॉर्दो आणि नँट्स ही शहरे औद्योगिक दृष्ट्या व कारखानदारीसाठी प्रसिद्ध आहेत. बॉर्दो, रीम्‌झ, एपेर्ने, दीझॉं, कॉनॅक ही शहरे मद्यनिर्मितीसाठी, तर कॅन व नीस ही फ्रेंच रिव्हिएरातील विश्रामधामे सुवासिक द्रव्यांच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. कॅले, डंकर्क, तूलॉं, नीस, नँट्स, इ. शहरे व्यापारी बंदरे म्हणून महत्वाची आहेत. तेथे जहाजबांधणी, मच्छीमारी, रेशीम व सुती कापड इ. उद्योग विकसित झाले आहेत. नँट्सला रोमनकालीन व्यापारकेंद्र म्हणून तर नॅन्सी, तूलाँ व तूलूझ या शहरांना ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार म्हणून महत्व आहे. ग्रनॉबल अणुसंशोधनासाठी प्रसिद्ध आहे. ॲरास येथे धान्य–व्यापार, मद्य, कापड, शेती अवजारे, सिमेंट, चित्रजवनिका (टॅपेस्ट्री) इ. उद्योग चालतात. कां हे शहर दुग्धव्यवसाय, जहाजबांधणी, रंगकाम यांसाठी उल्लेखनीय आहे. विल्यम द कॉंकररचे (इ. स. १०२७? –१०८७) हे आवडते निवासस्थान. बझांसाँ, बेलफॉर, ब्रेस्त ल हाव्र्ह, लीआँ, व्हर्साय, स्ट्रॅस्‌बर्ग इ. शहरे ऐतिहासिक घटना व वास्तू आणि आधुनिक उद्योगधंदे यांसाठी विख्यात आहेत. लूर्द हे रोमन कॅथालिकांचे यात्रास्थळ उल्लेखनीय आहे. औषधी गरम पाण्याच्या झऱ्‍यांसाठी व्हिशी हे शहर यूरोप खंडात प्रसिद्ध आहेत. (चित्रपत्रे).

चौंडे, मा. ल.

संदर्भ : 1. Berger, Suzanne, The French Political System, New York, 1974.

2. Blunt, Anthony, Art and Architecture in France 1500 to 1700, Harmondsworth, 1953.

3. Byron, Criddle, France 1958–78 : Evolution of the Fifth Republic Parliamentory Affairs Vol. 32, 1979.

4. Carr, J. L. France, London, 1976.

5. Cobban, Alfred, France since the Revolution and Other Aspects of Modern History, London, 1976.

6. Davidson, M. B. A Concise History of France, London, 1972.

7. Durant, Will Durant, Ariel, The Age of Napoleon, New York, 1975.

8. Evans, E. E. France, London, 1965.

9. Goncourt, Edmond and Jules de Trans. Ironside, Robin, French XVIII Century Painters, London, 1948.

10. King, E. J. Education and Development in Western Europe, London, 1969.

11. King, E. J. Moore, C. H. and Mundi, J. A. Post–Compulsory Education : A New Analysis in Western Europe. London,1974.

12. Liggins, D. National Economic Planning in France, Lexington (Mass) 1975.

13. Markham, F. M. H. Napoleon and the Awakening of Europe, New York, 1975.

14. Maurois, Andre, A History of France, London, 1960.

15. Ministry of Education, France….. The Educational Movement in France.1971–73. Paris, 1973.

16. Monkhouse, F. J. A Regional Geography of Western Europe, Harlow, 1974.

17. Pierce, Roy, French Politics and Political Institutions, New York, 1973.

18. Price, R. The Economic Modernisation of France, New York, 1975.

19. Wilenski, R. H. Modern French Painters, London, 1963.

20. Williams, Philip M. Hurrison, Martin, Politics and Society in de Gaulle’s Republic, New York, 1973.


फान्स