ओलांद : फिनिश आख्वेनन्मा. स्वीडन आणि फिनलंड ह्यांच्यामधील बॉथनियाच्या आखाताच्या तोंडाशी असलेला फिनलंडचा द्वीपसमूह. क्षेत्रफळ १,४८१ चौ. किमी. लोकसंख्या २०,६६६ (१९७१). या द्वीपसमूहात सु. ६,५०० लहानलहान बेटे असून त्यांपैकी ८० बेटांवर लोकवस्ती आहे. आख्वेनन्मा बेटावरील माऱ्यानहामिना हे प्रमुख शहर आहे. मच्छीमारी व गुरे पाळणे हे आख्वेनन्मा बेटावरील प्रमुख उद्योग असून प्रवासी लोकांचे हे आवडते केंद्र आहे. स्वीडन व रशिया ह्यांच्याकडून १९१७ मध्ये ही बेटे फिनलंडला मिळाली. बहुतेक लोक स्वीडिशभाषी आहेत. १९२० साली स्वीडनने त्यांवर आपला हक्क सांगितला परंतु राष्ट्रसंघाने ती फिनलंडला दिली. त्यामुळे येथे फिनलंडने बरीच स्वायत्तता ठेवली आहे.

शाह, र. रू.