क्राकाटाऊ: जावा व सुमात्रा यांदरम्यानच्या सुंदा सामुद्रधुनीमधील इंडोनेशियाचे लहान बेट. समुद्रसपाटीपासून ११० मी. उंच असलेले हे बेट येथील ज्वालामुखी उद्रेकांसाठी जगप्रसिद्ध असून, १८८३ चा येथील ज्वालामुखी उद्रेक मानवी इतिहासात सर्वांत मोठा समजला जातो. भूगर्भीय हालचालींमुळे सु. १० लाख वर्षांपूर्वी येथे एक लहान शंक्वाकृती ज्वालामुखी समुद्राबाहेर १,८२९ मी. उंच आला. ज्वालामुखी उद्रेकांमुळे इतिहासकाळात याचे रूपांतर ज्वालामुखी काहिलीत होऊन, त्याच्या समुद्राबाहेरील अवशेषांवर चार बेटे निर्माण झाली. यांमधील एका बेटावर मे १८८३ मध्ये ज्वालामुखी उद्रेक होऊन राख ९ किमी. उंच उडाली आणि आवाज १६० किमी. वरील जाकार्ताला ऐकू गेला.  २६ ऑगस्ट १८८३ रोजी दुपारी दुसऱ्या बेटावर ज्वालामुखी उद्रेक झाला. या उद्रेकातून निघालेल्या राखेचे ढग २७ किमी. उंच गेले. त्याच्या दुसऱ्या दिवशी झालेला उद्रेक आणखी मोठा होता. यामधील राख ८० किमी. उंच फेकली गेली ३,२५० किमी. दूर ऑस्ट्रेलियात त्याचा आवाज ऐकावयास मिळाला ८ लक्ष चौ. किमी. क्षेत्रावर त्याची राख पसरली गेली क्राकाटाऊपासून १०० किमी. त्रिज्येच्या क्षेत्रात तीन दिवस जवळजवळ अंधःकार होता समुद्राच्या खळबळीमुळे उफाळलेल्या लाटा दक्षिण अमेरिकेपर्यंत जाणवल्या जावा-सुमात्रा किनाऱ्यावरील लाटा ३६ मी. उंच जाऊन त्यांमध्ये सु. ३६,००० लोक दगावले. दोन बेटे समूळ नष्ट झाली. १९२७ साली येथे आणखी ज्वालामुखी उद्रेक होऊन क्राकाटाऊशेजारी एका छोट्या बेटाची निर्मिती झाली. १९६० व १९७२ साली यावर उद्रेक झाल्याची नोंद आहे.

शाह, र. रू.