लिख्टेनश्टाइन : यूरोप खंडातील अतिशय छोट्या देशांपैकी एक स्वतंत्र देश. क्षेत्रफळ सु. १६० चौ किमी. ४७ते ४७ १४उ. अक्षांश व ९ २९ते ९ ३८पूर्व रेखांश यांदरम्यान विस्तारलेल्या या देशाची दक्षिणोत्तर लांबी सु. २४.५ किमी. व पूर्व पश्चिम रुंदी ९.४ किमी. आहे. लोकसंख्या २९,००० (१९८९ अंदाज). आकाराने साधारणतः त्रिकोणी असलेल्या या ऱ्हाईन नदीच्या खोऱ्यातील देशाच्या दक्षिणेस व पश्चिमेस स्वित्झर्लंड (अनुक्रमे ग्राउब्यूंडन व सेंट गॅलेन जिल्हे) असून पश्चिम सीमा ऱ्हाईन नदीने निश्चित केली आहे. याच्या पूर्वेला व उत्तरेला ऑस्ट्रियाचा व्होरार्लबर्ग प्रांत येतो. फादूत्स हे देशाच्या राजधानीचे व प्रशासनाचे केंद्र असून त्याची १९८७ मध्ये अंदाजित लोकसंख्या ४, ८९१ होती. 

भूवर्णन : भूरचनेच्या दृष्टीने लिख्टेनश्टाइनचे दोन भाग पडतात. पश्चिमेकडील ऱ्हाईन नदीच्या उजव्या काठावरील सपाट भूभाग देशाचे सु. ४० टक्के क्षेत्र व्यापतो. ऱ्हाईन नदीकाठचा मैदानी भाग पूर्वी पूरप्रवण असून तो खाजणाने व्यापलेला होता. १९३० नंतर कालवे खणून व त्याचे भूमिसंपादन करून या भागाचे शेतजमिनीत रूपांतर करण्यात आले आहे. त्यात मिश्र शेती आढळते. गावे व शेते पूर मर्यादेच्या वरच्या भागात आढळतात. या भागाच्या पूर्वेकडे व दक्षिणेकडे ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड यांच्या सीमेलगत मध्य आल्‍प्‍सचा उत्तरेकडे गेलेला सोंडेचा भाग आहे. तो ‘रेटिकॉन मासीफ’ या नावाने ओळखला जातो. देशाच्या पूर्वेकडील सु. ६६ टक्के भाग या पर्वतरांगेच्या पायथ्याच्या टेकड्यांनी व्यापलेला आहे. या पर्वतप्रदेशांचे कमी उंचीचे भाग सदाहरीत वृक्षांनी व अल्पाइन फुलझाडांनी व्यापलेले आहेत, तर उंच शिखरे बर्फाच्छादित आढळतात. देशातील कमाल उंची दक्षिण सरहद्दीजवळील ग्राउसपिट्‍स (२,५९९ मी.) येथे आढळते. पर्वतीय भागाची उंची ऑस्ट्रियाच्या सीमेकडे वाढत जाते व ती १,८०० ते २,३५० मी. यांदरम्यान भरते. देशाच्या आग्‍नेय भागातून दक्षिणोत्तर दिशेने झामीना नदी वाहत जाते. पश्चिम सरहद्दीवरून व आग्‍नेय भागातून दक्षिणोत्तर वाहणाऱ्या अनुक्रमे ऱ्हाईन व झामिना या दोनच प्रमुख नद्या देशात असून ऱ्हाईन नदीपासून देशात अनेक कालवे काढण्यात आले आहे. पूर्वी ऱ्हाईन नदीचे खोरे म्हणजे दलदलीचा भाग होता, परंतु १९३० पासून पूरनियंत्रणाच्या योजनांमुळे खोऱ्यातील सुपीक जमिनीचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेण्यात आला आहे.

हवामान : लिख्टेनश्टाइन हा देश बराचसा डोंगराळ असल्यामुळे व त्याचे स्थान खंडांतर्गत भागात असल्यामुळे तेथील हवामान विषम असणे स्वाभाविक आहे. अतिविषम नसून काहीसे सौम्य असणे स्वाभाविक आहे. मात्र ते अतिविषम नसून काहीसे सौम्य आहे. कारण त्यावर दक्षिणेकडून येणाऱ्या ‘फॉन’ या स्थानिक उष्ण वाऱ्यांचा प्रभाव आढळतो. हिवाळ्यात तापमान – १५ से. पर्यंत उतरते तर उन्हाळ्यात ते स्थानानुसार २० ते २८ से. पर्यंत चढते. फॉन वाऱ्यांमुळे वसंत ऋतूची चिन्हे लवकर दिसतात. या प्रकारचे हवामान द्राक्षे व मका पिकविण्यास अतिशय उपयुक्त ठरते. पर्वतीय भागात अशी अनुकुलता आढळणे, ही एक आगळीच गोष्ट मानली जाते. वार्षीक वृष्टी ९१४ ते १,१४३ सेंमी. एवढी असून ती उन्हाळ्यात पावसाच्या स्वरूपात व हिवाळ्यात हिमाच्या रूपात आढळते. बर्फ सु. ३५ दिवस साठून राहते. फॉन वाऱ्यांमुळे त्याचा साठून राहण्याचा काळ घटतो. येथे जून ते ऑगस्ट हे सर्वसाधारणपणे पावसाचे महिने आहेत.

वनस्पती व प्राणिजीवन: उंचीनुसार पडणाऱ्या हवामानातील फरकामुळे लिख्टेनश्टाइनच्या नैसर्गिक वनस्पती व प्राणिजीवन यांत विविधता आढळते. सखल भागात जंगले नाहीत. डोंगराळ भागांचे खालचे उतार सदाहरित जंगले व फुलझाडे यांनी व्यापलेले असून उघडी-बोडकी डोंगरशिखरे बर्फाच्छादित असतात. फॉन वाऱ्यांनी निर्मान होणाऱ्या उबदार हवामानामुळे ऑर्किडेसी कुलातील अनेक जाती या भागात दिसून येतात. पर्वतांच्या उंच भागात जेन्शियन, आस्पीय गुलाब, एडलव्हाइस यांसारख्या वनस्पती आढळतात. कॉपर किंवा रेड बीच, सिकॅमूर, नॉर्वे मॅपल, ॲल्डर, लार्च, एल्म, ॲश आणि अनेक सूचिपर्णी वृक्ष या देशात आढळतात. वॉटर मिलफॉइल, मेअर्स टेल, पाणकणीस, बर्ड्‍स आय, प्रिमरोझ इ. वनस्पतीही तुरळक प्रमाणात आहेत. जंगलांखालील क्षेत्राच्या ९२% जमीन सार्वजनिक मालकीची असून उरलेल्यापैकी निम्मी जमीन राजाच्या खाजगी मालकीची आहे.

सूचिपर्णी जंगलप्रदेशात आढळणारे प्राणिजीवन लिख्टेनश्टाइनमध्ये आढळते. रेड हरिण, रो हरिण, ससे, काळा कोंबडा, खोकड, बिजू व शॅम्वा (हरनाचा एक प्रकार), मार्मोट हे प्राणी विपुल असून पक्ष्यांच्या १२० जाती आहे. त्यांमध्ये द्रोणकावळा व गरूड हे प्रामुख्याने दिसून येतात. श‌ृंगी घुबड क्वचित दृष्टीस पडते. पूर्वी अस्वल, बिडाल, रानमांजर, कासव, खेकडे इ. प्राणी मुबलक असत. आता ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

इतिहास व राज्यव्यवस्था: ऱ्हाईन नदीखोऱ्याचा हा भाग नेहमीच वसाहतीचे लक्ष्य बनला आहे. इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळापासून या प्रदेशावर रोमनांची सत्ता होती. ३०० मध्ये सेंट लूशन याने येथील लोकांना कॅथलिक पंथाची दीक्षा दिली. ५३६ मध्ये फ्रॅंक लोकांनी या प्रदेशावर हल्ला केला होता. सम्राट शार्लमेनने चेव्ह येथील बिशपला या प्रदेशाचे गव्हर्नरपद दिले होते. शार्लमेनच्या मृत्यूनंतर या प्रदेशाचे फादूत्स व शेलनबेर्ख असे दोन भाग झाले. इ.स. ८१४ पासून अनेक वर्षे हा प्रदेश पवित्र रोमन साम्राज्याच्या फादूल्स व शेलनबेर्ख या दोन स्वतंत्र घराण्यांच्या ताब्यात होता. त्याच काळात त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले व या प्रदेशावर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. पुढे व्हॉन होहेनेम या येथील राज्यकर्त्यांवर आर्थिक संकट ओढवल्यानंतर व्हिएन्नाचा राजपुत्र योहान ॲडम लिख्टेनश्टाइन याने शेलनबेर्ख व फादूल्स हे प्रांत अनुक्रमे १६९९ व १७१२ मध्ये विकत घेतले. त्यांत आजूबाजूच्या ऑस्ट्रिया व इतर प्रदेशातील स्वतःच्या मालकीच्या प्रदेशांची भर घालून त्याने २३ जानेवारी १७१९ रोजी लिख्टेनश्टाइन या राज्याची निर्मिती केली मात्र तो पवित्र रोमन साम्राज्याचाच एक भाग मानला जात असे.

नेपोलियनच्या कारकिर्दीत लिख्टेनश्टाइनवर फ्रेंच व रशियन या दोघांनी आक्रमण केले. प्रेसबुर्ख (ब्रात्यिस्लाव्हा) येथील १८०५ च्या तहानुसार या राज्याने ऱ्हाईन संघात प्रवेश केला आणि त्यामुळेच त्याला सार्वभौम राज्याचा दर्जा प्राप्त झाला (१८०६). नेपोलियनच्या पाडावानंतर लिख्टेनश्टाइनने नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जर्मन संघात प्रवेश मिळविला. १८६६ मधील सात आठवड्यांच्या युद्धात प्रशियाने ऑस्ट्रियावर विजय संपादन केल्यामुळे जर्मन संघ बरखास्त झाला तसेच लिख्टेनश्टाइनचे इतर जर्मन राष्ट्रांबरोबरचे घटनात्मक संबंध संपुष्ठात आले व खऱ्या अर्थाने हा देश स्वतंत्र झाला. पुढे दोन वर्षांनी या राज्याने आपले लष्कर काढून टाकून तटस्थता पतकरली.


ऑस्ट्रियाबरोबरच १८५२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जकात संघामुळे पहिले महायुद्ध संपेपर्यंत या राज्याचे ऑस्ट्रियाशी घनिष्ठ आर्थिक संबंध होते. युद्धसमाप्तीनंतर मात्र ऑस्ट्रियन चलन आणि अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याने या राज्याने आर्थिक संबंधांसाठी दुसरा शेजारी देश स्वित्झर्लंड याच्याकडे धाव घेतली. १९२१ मध्ये जरी त्याला स्विस संघात प्रवेश मिळू शकला नाही, तरी १९२३ मध्ये सीमाशुल्क व स्विस चलनाचा वापर यांविषयी करार करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्वित्झर्लंडप्रमाणे याही देशाने तटस्थतेचे धोरण स्वीकारले होते. 

फादूत्स व शेलनबेर्ख हे दोन प्रांत एका आधिपत्याखाली येऊन अडीचशेहून अधिक वर्षे लोटली, तरी त्यांची प्रादेशिक अस्मिता टिकून आहे आणि ‘उंच प्रदेश’ व ‘सखल प्रदेश’ असे दोन स्वतंत्र विभाग आजही ओळखण्यात येतात.

दूसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत लिख्टेनश्टाइनची गणना शेजारील यूरोपीय राष्ट्रांचा फारसा प्रभाव न पडलेला जगातील एक शांत व ग्रामीण प्रदेश म्हणून करण्यात येत होती. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र तेथे औद्योगिक प्रगती झपाट्याने सुरू झाली. 

घटनात्मक दृष्ट्या लिख्टेनश्टाइनमध्ये राजेशाही असून राजा व प्रजा या दोघांपासून सरकारला अधिकार प्राप्त होतात. राज्याधिकार हा वंशपरंपरेने लिख्टेनश्टाइन घराण्यातील पुरुषालाच राजघराण्याच्या कायद्यानुसार प्राप्त होतो. १९२१ च्या राज्यघटनेनुसार देशात ‘लँडटॅग’ ही एकसदनी संसद (प्रतिनिधी सभा) असून तीत ४ वर्षांच्या मुदतीकरिता निवडून आलेले १५ सदस्य असत परंतु १९८८ मध्ये घटनेत दुरुस्ती करण्यात येऊन ही संख्या २५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असते. मतदानाचा अधिकार २० वर्षे वा अधिक वर्षे वयाच्या पुरुषांनाच असतो. जुलै १९८४ पासून २० वर्षांवरील महिलांना केवळ राष्ट्रीय पातळीवर मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. महत्त्वाच्या स्थानिक प्रश्नांवर मतदान करण्याचा अधिकार त्यांना नसतो. डिसेंबर १९८५ मध्ये स्त्री-पुरुष यांना समान मताधिकार देण्यात यावा, असा घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, परंतु तो बहुमताने फेटाळण्यात आला.

संसदेच्या शिफारशींवरून राजा पंतप्रधान व उपपंतप्रधान यांची चार वर्षांकरिता नेमणूक करतो. पंतप्रधानपदासाठी शिफारस केला जाणारा माणूस लिख्टेनश्टाइनमध्ये जन्मलेला असावा लागतो. प्रतिनिधी सभा चार वर्षांसाठी चार कौन्सिलरांच्या नावांची शिफारस करते व त्यानंतर राजा त्यांची नेमणूक करतो. ते प्रशासनात मदत करतात. प्रतिनिधी सभा बरखास्त करण्याचे अधिकार राजाला असतात. ऑगस्ट १९८४ मध्ये प्रिन्स फ्रांट्‍स जोझेफ यांनी आपला मुलगा प्रिन्स हॅन्झ ॲडम याच्या हाती कार्यकारी सत्ता सुपूर्द करून स्वतः नामधारी प्रमुखत्व स्वीकारले आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे ११ लहान परगण्यांमध्ये (कम्यूनमध्ये) विभाजन करण्यात आले आहे. हे परगणे म्हणजे राज्याच्या चौकटीत काम करणारे स्वतंत्र प्रशासकीय घटक असतात. त्यांना आवश्यकता भासल्यास नवीन कर बसविता येतात. कोणत्याही १,००० लोकांचा गट किंवा तीन कम्यून कायदा करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव देऊ शकतात. पुढे त्यांवर प्रतिनिधी सभेत चर्चा होऊन तो मंजुर होतो. अशा तऱ्हेने मंजूर झालेल्या काही प्रस्तावांवर लोकमत घेतले जाऊ शकते. मात्र सर्वसाधारणपणे प्रतिनिधी सभेने मंजुरी देऊन राजाची संमतिदर्शक सही झाल्यानंतर कायदा लागू होतो. ‘फादरलँड युनियन’ व ‘प्रोग्रेसिव्ह सिटिझन्स पार्टी’ असे राज्यात दोन प्रमुख राजकीय पक्ष असून १९८९ मध्ये त्यांचे लँडटॅगमधील बलाबल अनुक्रमे १३ व १२ होते. राज्य कोणत्याही पक्षाचे असले, तरी वेगवेगळ्या पक्षांत सहकार्याची भावना आढळते.

फडके, वि. शं. 

न्याय व संरक्षण : देशाच्या दिवाणी आणि दंडविषयक अशा स्वतंत्र संहिता असून, त्यांनुसार देशात न्यायदानाचे कामकाज चालते. न्यायदानयंत्रणेत देशात सर्वांत खालच्या स्तरावर परगणा न्यायालयाचे एका न्यायधीशाच्या नियंत्रणाखाली किरकोळ दिवाणी तसेच फौजदारी खटल्यांवर कामकाज चालते. मोठ्या तसेच गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत पाच न्यायधीशांच्या स्वतंत्र फौजदारी न्यायालयामार्फत न्यायदान केले जाते. यांशिवाय देशात बालन्यायालये तसेच तीन न्यायाधीशांचा अंतर्भाव व मिश्र अधिकारिता असलेली इतरही काही न्यायालये (कोर्ट ऑफ असाइज) आहेत. देशात उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय असून दोहोंमध्ये प्रत्येकी पाच न्यायाधीशांची नेमणूक केलेली असते. दिवाणी व फौजदारी खटल्यांच्या बाबतींतील अपिलांवर या न्यायालयांत कामकाज चालते. यांशिवाय देशात प्रशासकीय व राज्य न्यायालय यांची विधिवत स्थापना करण्यात आली असून त्यांत सरकारी धोरणाविषयक बाबींवरील अपिलांवर न्यायदान केले जाते. १९८९ पासून देशात मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. लिख्टेनश्टाइनमध्ये सैन्यदल नाही. पोलीसदल अत्यल्प असून १९८९ मध्ये त्यात ४५ पोलीस व २३ साहाय्यक पोलीस होते. 

संकपाळ, ज. बा. 

आर्थिक स्थिती: लिख्टेनश्टाइनमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती जवळ जवळ नाहीच. लाकडांसह सर्वच कच्चा माल आयात करावा लागतो. त्यामुळे औद्योगिकीकरणास फारसा वाव नाही. थोड्या प्रमाणात शेती व पर्यटन उद्योग यांचा विकास झाला आहे. याशिवाय यूरोपमधील अतिशय छोट्या देशांच्या पोस्टाच्या तिकीट छपाईपासून मिळणारे उत्पन्न, परदेशी व्यापारपेठांची नाममात्र कार्यालये उघडल्यामुळे उपलब्ध होणारे भाडे, तसेच अतिशय शिथिल कायदे आणि चलनविनियमाचे स्वातंत्र्य यांमुळे आकर्षित होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील ठेवी, या सर्वांमुळे आकाराने छोटे असूनही या राज्याची आर्थिक भरभराट झाली आहे. त्यामुळे राज्य कर्जबाजारी नाही. अलिकडे छोटे उद्योगधंदेदेखील निघाले आहेत. 

राष्ट्राचा केवळ १२% भागच सधन शेतीसाठी योग्य आहे. तरीदेखील सु. २५% भागात शेती केली जाते. मात्र शेतीत गुंतलेल्या लोकांचे प्रमाण अल्प असून ते दिवसेंदिवस कमी होत आहे. १९३० पासून १९८८ पर्यंत शेतीव्यवसायातील लोकांचे प्रमाण ७० टक्क्यांवरून २ टक्क्यांवर घसरले आहे. त्यामुळेच शेतांचे आकारमान वाढत आहे. शेताचे सरासरी आकारमान पाच हेक्टर असते. ऱ्हाईनच्या किनाऱ्यालगतचा मैदानी भाग हा अर्थातच सर्वांत सुपीक प्रदेश. येथे प्रामुख्याने मका, इतर धान्ये, बटाटे आणि बागायती पिके आढळतात. डोंगराच्या पायथ्याजवळील मंद उतारावर चेरी, पिस्ता, द्राक्षे, नासपती आणि सफरचंदे व त्यांसारखी इतर फळे पिकविली जातात. भाजीपाला उत्पादनाचे प्रमाणही वाढत आहे. १९८६ मध्ये प्रमुख कृषी-उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन मे. टनांत) : गहू ३६३ ओट ११ सातू ४८० मका २९,३९० व बटाटे १,१९४.


आल्प्स पर्वताच्या पायथ्याजवळील कुरणांत गुरे पाळण्याचा धंदा व दुग्धव्यवसाय चालतो. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत तर आल्प्स पर्वताच्या वरच्या उतारावरदेखील गुरे चारण्यात येतात. या व्यवसायाला आता भरभराटीचे दिवस येत आहे. १९८९ च्या आकडेवारीप्रमाणे राज्यात २,८४७ दूध देणाऱ्या गाई ३,३२८ इतर गुरे २,४७० मेंढ्या २,६९८ डुकरे १७६ शेळ्या व २११ घोडे होते. १९८८ मध्ये १,२९,६८,४०० किग्रॅ. दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन झाले. लिख्टेनश्टाइनमध्ये व्यापारी तत्त्वावर मासेमारी होत नाही. काही नद्या, लहान प्रवाह हे मासेमारी खेळासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

कच्च्या मालाच्या अभावामुळे राज्यात औद्योगिकीकरण फारसे झालेल नाही व राज्यात अवजड उद्योग नाहीत. खाणकामदेखील दगडांच्या खाणीच्या स्वरूपातच आढळते. मात्र छोटे उद्योगधंदे राज्यभर पसरले आहेत. त्यांमध्ये धातुकाम, औषधोत्पादन, अन्नपदार्थनिर्मिती आणि कातडी माल, शिवणयंत्राच्या सुया, विणकामाची यंत्रे, कापड यांसारख्या उपभोक्ताभिमुख पदार्थांच्या निर्मितीचा समावेश होतो. अलिकडे द्राक्षांवर प्रक्रिया करून मद्यनिर्मितीच्या उद्योगाला गती मिळाली आहे. फळे हवाबंद डब्यांत भरण्याचा व्यवसायही येथे चालतो. याशिवाय संगणक, प्रकाशयंत्रे, सूक्ष्ममापक, कृत्रिम दात यांसारखी उत्पादनेही होतात. हस्तव्यवसायांमध्ये नक्षीकाम केलेली मातीची भांडी व लाकडावरील कोरीवकाम यांचा समावेश होतो. 

लिख्टेनश्टाइनमध्ये १९८७ च्या आकडेवारीनुसार ६,७८० कामगार उद्योगधंद्यात गुंतलेले होते. औद्योगिकीकरणामुळे अर्थातच ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली, स्पेन यांसारख्या समीप राष्ट्रांतून लोक स्थलांतरित झाले आहेत. ऑस्ट्रियातील काही लोक रोज ये-जा करतात. देशात अवजड उद्योग नसल्यामुळे अर्थातच येथे विकसित देशांना भेडसावणारी प्रदूषणाची समस्या आढळत नाही. तिचा पर्यटन व्यवसायाच्या वाढीस चांगला हातभार लागला आहे. 

लिख्टेनश्टानसारख्या छोट्या व लोकसंख्या काही भागांत केंद्रित झालेल्या देशाला मोठ्या व्यापारकेंद्राची जरूरी नाही. सर्वसाधारणपणे परगण्यांच्या शहरांत नेहमीच्या गरजेच्या वस्तू मिळण्याची दुकाने आढळतात. फादूत्स आणि शान या मोठ्या शहरांत मात्र चैनीच्या वस्तूंची काही दुकान आढळतात. देशाच्या दृष्टीने परदेश-व्यापारसंबंध अधिक महत्त्वाचे ठरतात. त्या दृष्टीने स्वित्झर्लंडबरोबर झालेल्या करारानुसार याचे खुले व्यापारसंबंध आहेत. १९८७ मध्ये राज्याच्या निर्यातीपैकी १७% निर्यात एकट्या स्वित्झर्लंडकडे झाली, तर आणखी ५.८% निर्यात यूरोपीय खुल्या व्यापार संघटनेच्या इतर सदस्य राष्ट्रांकडे झाली. यूरोपीय आर्थिक समुदायाबरोबरही लिख्टेनश्टाइनचे व्यापारसंबंध बरेच जवळचे असून १९८७ मध्ये त्या समुदायातील देशांकडे जवळजवळ ४०% माल निर्यात करण्यात आला.

लिख्टेनश्टाइनमध्ये कोळसा किंवा खनिज तेल यांसारखी ऊर्जासाधने नसल्यामुळे जलविद्युत् शक्तीवर अवलंबून रहावे लागते. अशी ऊर्जा निर्माण करण्याचे प्रयत्‍न १९२७ पासून चालू असून १९८८ मध्ये ६०,०८२ किवॉ. ता. वीज निर्माण झाली. मात्र अंतर्गत गरजेच्या मानाने हे उत्पादन फारच कमी असल्याने उर्वरीत गरज भागविण्यासाठी स्वित्झर्लंडमधून वीज आयात करावी लागते. आयातीचे प्रमाण हिवाळ्यात वाढते, कारण त्याच काळात विजेचा वापरही वाढतो. हे छोटे राष्ट्र असूनही येथील अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे. विकासाबरोबर देश भकास होणार नाही याची काळजीदेखील सरकारकडून घेतली जात आहे. सुपीक खोरी, विस्तीर्ण कुरणे व विकसित बागा यांचा पुरेपूर उपयोग करून या देशाने आपला विकास साधून घेतला आहे. 

दळणवळण : या बंदिस्त प्रदेशात आजूबाजूच्या देशांशी उपलब्ध असलेल्या दळणवळणाच्या सोयी महत्त्वाच्या ठरतात. त्या दृष्टीने बाजूच्या देशांना जोडणाऱ्या मार्गांचे उत्तम जाळे येथे आहे. हा देश पॅरिस-व्हिएन्ना यांना जोडणाऱ्या द्रुत लोहमार्गावर असल्याने उत्तरेकडील मैदानी प्रदेशास सुगमता प्राप्त झाली आहे. १८.५ किमी. लांबीच्या या लोहमार्गाचा कारभार ऑस्ट्रियन रेल्वे कंपनी पाहते. शिवाय देशात २५० किमी. लांबीचे रस्ते असून अंतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतूकीसाठी (उदा,ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या देशांत जाण्यासाठी) डाक कार्यालयाच्या बसगाड्या (डाक बसगाड्या) हे महत्त्वाचे साधन ठरते. ऱ्हाईन व झामीना नद्यांची खोरी ७४० मी. लांबीच्या बोगद्यांनी जोडली आहेत. देशात हवाई वाहतुकीची सोय अपुऱ्या मागणीमुळे उपलब्ध नाही.

टपाल व तार यांची व्यवस्था १९२४ च्या करारानुसार स्वित्झर्लंडकडे आहे. मात्र देशाची स्वतःची पोस्टाची तिकिटे विकण्याची व्यवस्था आहे. १९८८ साली देशात १४,६१२ दूरध्वनिसंच ९,७८० बिनतारी संच ४२४ टेलेक्स संच होते. त्याच वर्षी दूरचित्रवाणी संचांची संख्या ९,१५५ होती. देशात १९८९ मध्ये दोन दैनिके प्रसिद्ध होत होती व त्यांचा एकूण खप १६,३५० एवढा होता.

लोक व समाजजीवन: लिख्टेनश्टानमधील लोक प्रामुख्याने ॲलेमॅनिक वंशाचे असून ते मेन आणि डॅन्यूब या नद्यांच्या दरम्यान वस्ती केलेल्या जर्मन-भाषिक जमातींचे वंशज आहेत. यांशिवाय काही लोक स्थलांतरित आहेत. देशातील लोक बव्हंशी रोमन कॅथलिक पंथाचे (८७.३%) असून प्रॉटेस्टंट पंथीय अल्प प्रमाणात आहेत (८.२% १९८८). बहुतेक लोकवस्ती ऱ्हाईनच्या खोऱ्यात केंद्रित झाली असून फादूत्स व शान हे लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचे कम्यून होत. फादूत्स हा शासकीय आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे कम्यून असून औद्योगिकीकरण प्रामुख्याने शानमध्ये झाले आहे. या देशातील सृष्टिसौंदर्याकडे बहुतेक पर्यटक आकृष्ट होतात. येथील लोकांच्या जीवनपद्धतीत जुन्या व नव्या गोष्टींचा सुरेख संगम झाला आहे. जर्मन ही येथील राष्ट्रभाषा आहे.

सार्वजनिक आरोग्य राखण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य समितीकडे असते. राज्य आरोग्य अधिकारी या समितीचे मुख्य असतात. १९८९ मध्ये देशात एकच रुग्णालय होते, मात्र लिख्टेनश्टाइनला शेजारील अत्याधुनिक स्विस आरोग्य सेवांचा फायदा घेता येतो. सामाजिक सुरक्षिततेसाठी अनेक सक्तीच्या विमा योजना आहेत. त्यांमध्ये मालक, नोकर, सरकार अशा अनेक घटकांकडून आर्थिक योगदान मिळते.

शिक्षण : राष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून शिक्षणाचे नियमन केले जाते. शिक्षण संस्थांमध्ये ८ वर्षे प्राथमिक, ३ वर्षे माध्यमिक तसेच व्यावसायिक व्यापारी, संगीत व तांत्रिक शिक्षण दिले जाते. सात वर्षांवरील सर्व लोक साक्षर आहेत. १९८९-९० च्या आकडेवारीनुसार देशात १४ प्राथमिक तीन उच्च प्राथमिक, पाच माध्यमिक आणि तीन मागास वर्गीयांकरिता, शाळा होत्या. विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३,५८७ तर शिक्षकांची २६४ इतकी होती.

 

लिख्टेनश्टाइनच्या राजपुरुषांनी वेळोवेळी संगृहीत केलेल्या कलाकृती फादूत्समधील कलावीथीत प्रदर्शित केल्या आहेत. त्यांमध्ये फ्लेमिश व डच चित्रकारांनी काढलेली उत्कृष्ट चित्रे आहेत. याशिवाय १९६९ मध्ये राष्ट्रीय कला संग्रहालय उघडण्यात आले असून त्यात जुनी चित्र व विसाव्या शतकातील रेखाचित्रांचा संग्रह आहे. लिख्टेनश्टाइन डाक संग्रहालयात पोस्टाच्या तिकिटांचा मोठा संग्रह असून त्यात १९१२ पासून काढलेली सर्व तिकिटे, तसेच १९२१ मध्ये हा देश जागतिक टपाल संघाचा सदस्य झाल्यापासून जगातील तर देशांकडून आलेली तिकिटे, यांचाही समावेश आहे. फादूत्समधील राष्ट्रीय पुराणवस्तुसंग्रहालयात पुरातन, तसेच रोमन कलावस्तूंचा संग्रह असून येथे देशाचा कलेतिहास विशद करणारे तसेच लोकगीतांचा परीचय करून देणारे संग्रहालयही आहे.


पर्यटन : लिख्टेनश्टाइन सरकारने पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन दिले आहे. पर्वतमय प्रदेशांत पर्यटकांना आकर्षून घेणारे सृष्टिसौंदर्य असल्यामुळे व शासनाने जंगलतोड थोपवून पर्यावरणाचे संवर्धन केल्यामुळे परिस्थिती या व्यवसायाला अतिशय अनुकूल आहे. येथे येणारे पर्यटक शेजारील यूरोपीय देशांतून येत असून त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने फादूत्स येथे किंवा आल्पीय उतारांवरील हॉटेलांत असते. १९८८ मध्ये ७१,६३३ पर्यंटकांनी लिख्टेनश्टानला भेट दिली. येथे काही हिवाळी खेळही खेळले जातात. जलतरण, टेनिस, हायकिंग, बर्फावरील खेळ हे येथील लोकप्रिय खेळ आहेत. पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गिर्यारोहण, निसर्गभ्रमण, फादूत्स व गटेंबर्ग येथील किल्ले, किल्ल्यांचे अवशेष ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

भूवेष्टित स्थान, छोटे आकारमान, नगण्य नैसर्गिक साधनसंपत्ती या समस्या असूनही लिख्टेनश्टाइनने शेजारील राष्ट्रांच्या सहकार्यांच्या जोरावर आपला स्वाभिमान न गमावता प्रगती साधण्यात यश मिळविले आहे. परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे आवश्यक ते आर्थिक व राजकीय बदल घडवून या देशांने संतुलन राखले आहे. 

फडके, वि. शं.

राजधानी मन्‍रोव्हियातील प्रमुख मार्गाचे दृश्य, लायबीरिया.निंबा पर्वतातील लोहधातुकाची खाण, लायबीरिया.


राजधानी फादूत्स येथील एक प्रमुख रस्ता, लिख्टेनश्टाइन.फादूत्स शहराचे एक दृश्य, लिख्टेनश्टाइन.मन्‍रोव्हियाची पारंपारिक बाजारपेठ, लायबीरिया.कोळीवाड्यातील जाळी धुण्याच्या मातीच्या टाक्या, मन्‍रोव्हिया बंदर, लायबीरिया.रबरमळ्यातील कामगाराची पानांनी शाकारलेली मातीची झोपडी, लायबीरिया.फादूत्स येथील ऐतिहासिक मध्ययुगीन किल्ला, लिख्टेनश्याइन.