स्टाव्हांगर : नॉर्वेच्या रोगलान परगण्याची राजधानी तसेच उद्योग व व्यापाराचे केंद्र. लोकसंख्या १,९७,८५२ (२०११). हे ऑस्लोच्या पश्चिमेस २९८ किमी. व बर्गेनच्या दक्षिणेस १६० किमी.वर उत्तर समुद्राच्या बॉकन फ्योर्डच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेले आहे. ते ऑस्लोशी लोहमार्गाने व रस्त्यांनी जोडलेले असून एक उत्कृष्ट सागरी बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. येथून देशातील किनारी भागातील शहरांशी, यूरोप व उत्तर अमेरिकेशी सागरी दळणवळणाची सुविधा उपलब्ध आहे. शहराजवळच सोल हा विमानतळ आहे.

  हे शहर इ. स. आठव्या शतकात वसविण्यात आले. बाराव्या शतकात येथे बिशपचे मुख्यालय होते. ते १६८२ मध्ये क्रिश्चनसँड येथे हलविण्यात आले. त्यानंतर १९२६ मध्ये येथे ल्यूथरप्रणीत नव्या बिशप मुख्यालयाची स्थापना करण्यात आली. दुसर्‍या महायुद्धात जर्मन सैन्य येथे दाखल झाले होते (९ एप्रिल १९४०). त्यावेळी ब्रिटिश बाँबहल्ल्यात शहराची हानी झाली होती. युद्धानंतर शहराची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे.

  येथे मासे डबाबंद करणे, जहाजबांधणी, कापड उद्योग, रसायने, पोलाद, अन्नप्रक्रिया इ. उद्योग चालतात. अलिकडे खनिज तेलउद्योग हा येथील प्रमुख उद्योग झालेला आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उद्योगांशी निगडित सर्व सेवांचे हे केंद्र झालेले आहे. त्यामुळे याचा विशेष विकास झालेला असून यास ‘ ऑइल कॅपिटल ऑफ नॉर्वे ’ असे संबोधण्यात येते. येथे ‘ नाटो ’ या जागतिक संघटनेचे युद्धसज्जता केंद्र आहे.

  येथे ब्रिटिश इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टाव्हांगर आणि स्टाव्हांगर विद्यापीठ या शैक्षणिक संस्था असून यांत उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. येथील अँग्लो-नॉर्मन व गॉथिक शैलीतील सेंट स्वीथीन चर्च, स्टाव्हांगर संग्रहालय, व्हॅर्ल्गटन टेहळणी बुरूज, द नॉर्वेजियन पेट्रोलियम संग्रहालय, स्टाव्हांगर सिंफनी ऑर्केस्ट्रा इ. वास्तू व संस्था प्रसिद्ध आहेत. प्रतिवर्षी मे महिन्यात येथे आंतरराष्ट्रीय जॅझ महोत्सव भरविण्यात येतो.

गाडे, ना. स.