अक्कड : इराकमधील टायग्रिस व युफ्रेटीस या नद्यांच्या संगमाच्या आसमंतात असलेले अतिप्राचीन राजधानीचे ठिकाण.

इ.स.पू. २३४० च्या सुमारास पहिला सारगॉन या सेमिटिक विजेत्याने हे वसविले असावे. ‘अगेडी’ हे या शहराचे मूळ नाव होते. सेमिटिक लोकांनी येथून आपले साम्राज्य भूमध्यसमुद्रापासून इराणच्या आखातापर्यंत पसरविले होते. ⇨क्यूनिफॉर्म   लिपीमध्ये आजही अकेडियन भाषा-साहित्य उपलब्ध आहे. इ.स.पू. सु. २१८० मध्ये रानटी टोळ्यांनी अक्कडच्या सेमिटिकांचा पराभव केला.

इ.स.पू. २१२५ मध्ये सुमेरियन लोकांनी अक्कड जिंकून ते अरच्या साम्राज्याचा भाग बनविले. इ.स,पू. २०२५ मध्ये ईलमने सुमेरीयनांचा पराभव केला. ⇨हामुराबीने  इ.स.पू. अठराव्या शतकात अक्कड जिंकून ते बॅबिलोनियामध्ये विलीन केले.

पहा : सुमेरीया.

जोशी, चंद्रहास