लागोस : आफ्रिका खंडातील नायजेरियाची राजधानी, देशातील सर्वांत मोठे शहर व प्रमुक बंदर. लोकसंख्या १०,९७,००० (१९८३). देशाच्या नैऋत्य कोपऱ्यात, गिनीच्या आखातातील बेनिन उपसागर किनाऱ्यावर हे शहर वसलेले आहे. लागोस, इडो, ईकॉयी व व्हिक्टोरिया या चार बेटांवर आणि मुख्य भूमीवरील एबूटे मेट्टा, अपापा, याबा व सुरू-लेरे या चार विभागांमध्ये लागोस शहराचा विस्तार झालेला आढळतो. हे सर्व भाग साकवांनी आणि पुलांनी एकमेकांशी जोडलेले आहेत.

  

यॉरूबा नगर म्हणूनच सुरूवातीला हे ठिकाण उदयास आले. याच लोकांचे देशात आधिक्य आहे. १४७२ मध्ये पोर्तुगीज प्रथम येथे आले. त्यांनी याला लागोस हे नाव दिले. १८५१ मध्ये हे ब्रिटिशांचे संरक्षित ठिकाण बनले. तोपर्यंत गुलामांच्या व्यापारासाठी हे विशेष प्रसिद्ध होते. १८६१ मध्ये ब्रिटिशांनी हे आपल्या प्रदेशात सामील करून घेतले. १८६६ ते १८७४ या काळात ते ब्रिटनच्या पश्चिम आफ्रिकन वसाहतीचा एक भाग म्हणून राहिले. त्यानंतर गोल्ड कोस्ट कॉलनीचा ते एक भाग बनले. १८६६ मध्ये लागोसला ब्रिटिशांकित स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. १९०६ मध्ये द. नायजेरियाची, तर १९१४ मध्ये संपूर्ण नायजेरियाची ही राजधानी बनली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत (१९६०) नायजेरियन राष्ट्रवादी चळवळीचे लागोस हे प्रमुख केंद्र होते. स्वातंत्र्यप्राप्तीपासून हेच देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. परंतु राजधानीचे ठिकाण देशाच्या मध्यवर्ती भागी असावे, या दृष्टीने फेब्रुवारी १९७६ मध्ये नायजेरियन शासनाने आबूजा या संघीय राजधानी प्रदेशाच्या स्थापनेची घोषणा करून १९९० मध्ये लागोसहून येथे राजधानी हलविण्याची योजना आखली होती. 

लागोस हे देशातील प्रमुख प्रशासकीय, व्यापारी  तसेच औद्योगिक केंद्र आहे. रेडिओ आणि मोटारगाड्यांची जोडणी, लोहमार्गदुरूस्ती, जहाजदुरूस्ती, अन्नप्रक्रिया, धातू उत्पादने, वस्त्रोद्योग, मद्यनिर्मिती, रसायने, औषधे, सौम्य पेये, सौंदर्य प्रसाधने, साबण, टायर, लाकडी सामाननिर्मिती इ. उद्योगधंदे शहरात चालतात. रस्ते, लोहमार्ग, सागरी मार्ग तसेच हवाईमार्ग वाहतुकीचे हे मुख्य केंद्र आहे. या बंदरातून प्राण्यांची हाडे व कातडी, कोको, ताड उत्पादने, भुईमूग, रबर, कापूस, वनस्पती तेल, लाकूड यांची निर्यात केली जाते. अँग्‍लिकन व रोमन कॅथलिक बिशपचे पीठ येथे आहे. शहरात लागोस विद्यापीठ (स्था. १९६२). तंत्रविद्या महाविद्यालय (१९४८), राष्ट्रीय संग्रहालय व एक विस्तृत क्रीडागार आहे. 

चौधरी, वसंत