ताकाओका : जपानच्या होन्शू बेटावरील तोयामा प्रांतातील औद्योगिक शहर. लोकसंख्या १,५९,६६४ (१९७०). हे शो नदीवर बसले आहे. १६०९ मध्ये जेव्हा ताकाओका किल्ला बांधला गेला, तेव्हाच या शहराची स्थापना झाली. येथील हिवाळा आर्द्र व ढगाळ, तर उन्हाळा उबदार व दमट हवामानाचा असतो. हे ठिकाण व्यापाराचे व वेगवेगळ्या उद्योगधंद्यांचेही केंद्र आहे. होन्शू बेटावरील हे लोहमार्गाचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे तांदळाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. लोखंडी सामान, ॲल्युमिनियम, रसायने, कागद व सूत हे येथील महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत. साकूराबाबा  व ताकाओका ही उद्याने प्रेक्षणीय असून येथील बुद्धाचे देऊळ प्रसिद्ध आहे. तोयामा उपसागरावरील फुशिकी हे याचे निर्यात बंदर आहे.

क्षीरसागर, सुधा