डार्टमूर : नैर्ऋत्य इंग्लंडच्या डेव्हन परगण्यातील उंचवट्याचा प्रदेश. सु. ३७ × ३२ किमी.च्या या ओसाड लहान झुडुपांच्या रानात ग्रॅनाइटी पठारावर येस टॉर ६१८ मी. व हाय विलीझ ६२१ मी. यांसारखे एकाकी खडक दिसतात. येथील डार्ट, टीन, ॲव्हन इ. आठ नद्यांचे पाणी डेव्हनमधील शहरांस पुरवितात. ग्रॅनाइट व चिनी माती खाणीतून काढणे, रानतट्टे, मेंढ्या व गुरे चारणे आणि पर्यटन व्यवस्था हे येथील तुरळक वस्त्यांतील लोकांचे व्यवसाय आहेत. प्रिन्सटाउनजवळील डार्टमूर कारागृहात नेपोलियनी युद्धातील फ्रेंच कैदी ठेवीत असत. १८५० पासून तेथे दीर्घ मुदतीचे गुन्हेगार ठेवतात. १९५१ पासून येथील ९४६ चौ. किमी. क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून राखले आहे. अनेक इंग्रजी रहस्यकथा डार्टमूरच्या राकट, रम्य पार्श्वभूमीवर घडलेल्या दाखविल्या आहेत.

गद्रे, वि. रा.