विनिपेग : (१) कॅनडातील ‘मॅनिटोबा’ प्रांतीची राजधानी व देशातील चौथ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ६,५२,३५४ (१९९१).कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांचा सरहद्दीपासून उत्तरेस १०५ किमी. तसेच विनिपेग सरोवरापासून दक्षिणेस ६५ किमी अंतरावर असिनबॉइन व रेड या नद्यांच्या संगमावर हे वसले आहे.

इ. स. १७३८ मध्ये फ्रेंच जलप्रवासी ला व्हेरांद्री याने येथे ‘फोर्ट रूझ’ हा किल्ला बांधला व तेथे पहिले व्यापारी ठाणे स्थापन केले. त्यानंतर ‘रेड रिव्हर’ भागात इतर व्यापारी ठाण्यांचीही स्थापना झाली. नॉर्थ वेस्ट कंपनीने १८०४ मध्ये येथे ‘फोर्ट जिब्राल्टर’ आणि हडसन्स बे कंपनीने १८२१ मध्ये ‘फोर्ट गॅरी’ हे किल्ले बांधून आपल्या व्यापारी ठाण्यांची स्थापना केली. स्कॉच वसाहतकाऱ्यांनी १८११-१२ मध्ये रेड रिव्हर वसाहतीची स्थापना केली होती. या तिन्ही वसाहतींनी मिळून सांप्रतच्या विनिपेग शहराची स्थापना केली. विनिपेग सरोवरावरून या शहराचे नाव विनिपेग असे ठेवण्यात आले (१८३५). १८७० पासून ही मॅनिटोबाची राजधानी आहे. १८७३ मध्ये त्याला शहराचा दर्जा देण्यात आला.

विनिपेगचे स्थान कॅनडाच्या जवळजवळ भौगोलिक मध्याजवळ येते. त्यामुळे ‘पश्चिमेचे प्रवेशद्वार’ म्हणून ते ओळखले जाते. या मोक्याच्या स्थानामुळेच त्याचा विकास घडून आला. आर्थिक कार्याच्या दृष्टीने विचार करता विनिपेग शहराला ‘उत्तरेकडील शिकागो’ म्हणतात. १८८१ मध्ये कॅनडियन पॅसिफिक हा खंडांतर्गत लोहमार्ग येथे पोहोचला. तेव्हापासून विनिपेग हे प्रेअरी प्रदेशातील एक प्रमुख धान्यव्यापाराचे, साठवणुकीचे व वितरणाचे केंद्र बनले. खंडांतर्गत लोहमार्गाप्रमाणेच ट्रान्स-कॅनडियन महामार्गावरील हे प्रमुख प्रस्थानक आहे. आज विनिपेग हे कॅनडातील सर्वात मोठया औद्योगिक, व्यापारी, वित्तीय, विमा, वाहतूक व सांस्कृतिक केंद्रांपैकी एक केंद्र बनले आहे. जगातील मोठया गव्हाच्या बाजारपेठांपैकी ही एक आहे. रेल्वे कर्मशाळा, धान्य उत्थापक, मांस डबाबंदीकरण, पीठ गिरण्या, छपाई, दारू गाळणे, अन्नप्रक्रिया, सिमेंट, कापड, कृषि-अवजारे, धातु-उत्पादने, रॉकेट, विमानाच्या सुट्या भागांची निर्मिती इ. उद्योगधंदे शहरात चालतात. विनिपेग नदीवरील जलविद्युत् निर्मितीकेंद्रांकडून होणारा मुबलक व स्वस्त वीजपुरवठा तसेच नैसर्गिक वायू व उत्तम वाहतूक सुविधा यांमुळे येथील उद्योगधंद्यांचा विकास अधिक झाला आहे. शहराच्या उत्तेरकडील जिल्ह्यात खाणकाम व्यवसाय महत्त्वाच आहे. विनिपेगचा आंतरराष्ट्रीय विमानतळ विशेष गजबजलेला असतो.

रेड नदीला १९५० मध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे विनिपेग शहराची बरीच हानी झाली. पुरापासून शहराचे संरक्षण करण्यासाठी ४८ किमी. लांबीचा रेड नदी पूरमार्ग बांधण्यात आला (१९६७). १९७२ मध्ये विनिपेग शहरात त्याच्या अकरा उपनगरांचा समावेश करण्यात आला. शहरात विभिन्न वंशाचे लोक राहतात. रॉयल विनिपेग बॅले, मॅनिटोबा थिएटर सेंटर, सिंफनी वाद्यवृंद या येथील प्रमुख सांस्कृतिक संस्था आहेत. येथील प्रांतीय विधान मंडळाची वास्तू (१९२०), विनपेग कलावीथी, ‘असिनबॉइन पार्क’ मधील प्राणिसंग्रहालय, प्रसिद्ध ‘सेंटेनिअल सेंटर’ या वास्तूतील तारामंडळ तसेच मानव आणि निसर्गविषयक मॅनिटोबा वस्तुसंग्रहालय इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. दरवर्षी ऑगस्टमध्ये येथे आंतरराष्ट्रीय लोककला उत्सव भरतो तसेच उन्हाळ्यात मॅनिटोबा संगीत महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येतात. शहरात मॅनिटोबा विद्यापीठ (१८७७), विनिपेग विद्यापीठ (१९४७) म्हणजेच पूर्वीचे युनायटेड कॉलेज ह्या शैक्षणिक संस्था आहेत. सेंट बॉनिफेस (१८१८), सेंट जॉन्स (१८६६), सेंट पॉल्स (१९२६) व सेंट ॲड्र्यूज (१९४६) ही मॅविटोबा विद्यापीठाशी संलग्न असणारी प्रमुख महाविद्यालये येथे आहेत.

(२) विनिपेग हे कॅनडातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर असून ते मॅनिटोबाच्या दक्षिणमध्य भागात, विनिपेग शहराच्या उत्तरेस ६५ किमी. वर २१७ मी. उंचीवर आहे. सरोवराची लांबी ४२५ किमी.,रूंदी ४० ते १०९ किमी. व क्षेत्रफळ २४,५१४ चौ. किमी. आहे. सरोवराची सरासरी खोली १५ मी. व कमाल खोली २१६ मी. आहे. विनिपेग सरोवर म्हणजे प्राचीन ॲगसी या हिमनदीय सरोवराचा अवशेष आहे. या सरोवराला रेड, विनिपेग व सस्कॅचेवन या नद्या व इतर अनेक प्रवाह य़ेऊन मिळतात. नेल्सन नदीमार्गे ईशान्येकडील हडसन उपसागराला हे सरोवर जोडलेले आहे. सरोवराच्या सभोवती आर्थिकदृष्ट्या उपयुक्त अशा अनेक वृक्षांची वने आहेत. सरोवराचा दक्षिण किनारा पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहे. जहाजवाहतूक व मासेमारीच्या दृष्टीनेही सरोवराला महत्त्व आहे. हेक्ला, डिअर व ब्लॅक ही सरोवराला प्रमुख बेटे आहेत.

व्हेरांद्री याच्या सफरीने १७३३ मध्ये या सरोवराचा शोध लावला. विन-निप्पी (गढूळ पाणी) या क्री इंडियन शब्दावरून सरोवराचे विनिपेग हे नाव रूढ झाले. सुरूवातीच्या काळातील समन्वेषक व फर व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा सरोवरमार्ग महत्त्वाचा होता.

सरोवरला मिळणाऱ्या अनेक महत्त्वाच्या नद्यांपैकी विनिपेग (लांबी ३२० किमी.) ही एक महत्त्वाची नदी आहे. या नदीमुळे वुडस (आँटॅरिओ) व विनिपेग सरोवरे एकमेकांशी जोडली गेली आहेत. विनिपेग नदीमार्गात अनेक धबधबे व द्रुतवाह असून त्यांमुळे जलवाहतुकीत अडथळा येत असला, तरी त्यांचा उपयोग विद्युतनिर्मितीसाठी करून घेतलेला आहे. या नदीवर एकूण सहा जलविद्युत् निर्मितिकेंद्रे आहेत.

चौधरी, वसंत