निसर्गसुंदर दल सरोवर, काश्मीर.

दल सरोवर : जम्मू व काश्मीर राज्यातील एक महत्त्वाचे सरोवर. हे श्रीनगरच्या ईशान्येस असून याची लांबी ८·४ किमी. व रुंदी ४ किमी. आहे. हे एक प्रसिद्ध रमणीय ठिकाण असून सरोवराकाठच्या मोहक हिरव्या निसर्गाचे पाण्यातले प्रतिबिंब मन प्रसन्न करते. लालसर चिनार, गगनचुंबी सोनेरी पॉप्लर वृक्ष, रक्तरंगी लव्हाळे यांच्या अप्रतिम सौंदर्यामुळे सरोवराकाठचा परिसर मनाला सुखावतो. सरोवराकडून शहराकडे पाहता डावीकडील तख्त–इ–सुलेमान टेकडी आणि उजवीकडील हरी पर्वत यांच्यामध्ये श्रीनगर वसले आहे. पश्चिमेस दूरवर हिमाच्छादित पर्वत दिसतात. सरोवराभोवती शहाजहानने लावलेली चष्मशाही बाग, जहांगीराने बांधलेली शालिमार बाग, अकबराचे वेळी तयार केलेली नसीम बाग व निशात बाग इ. सुंदर सुंदर बागा आहेत. सरोवरात सोनलंका, रूपलंका ही लहान बेटे आहेत. दलचा अर्थ काश्मीरीमध्ये ‘सरोवर’ तर तिबेटीमध्ये ‘शांत’ असा होतो. पुराच्या वेळी झेलम नदीच्या पाण्याचा श्रीनगर शहराला होणारा धोका टाळण्यासाठी १९०४ मध्ये या नदीपासून सरोवराला मिळणारा कालवा काढला असल्यामुळे झेलम नदीला पूर आल्यावर सरोवर तुडुंब भरते.

सावंत, प्र. रा.