संयोगभूमि : दोन विस्तृत भूप्रदेशांना जोडणाऱ्या व दोन्ही बाजूंना समुद्र किंवा महासागर असणाऱ्या अरूंद भूभागासाठी ही भौगोलिक संज्ञा वापरली जाते. अशा भूभागाला लॅटिन भाषेत इस्थमस तर गीक भाषेत नेक म्हणतात. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांदरम्यानची पनामा संयोगभूमी, दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिका यांना उत्तर मेक्सिको व उत्तर अमेरिका यांच्याशी जोडणारी तवाँतपेक संयोगभूमी, गीस व पेलोपनीसस यांदरम्यानची कॉरिंथ संयोगभूमी, आशिया व आफ्रिका यांना जोडणारी सुएझ संयोगभूमी, मलाया द्वीपकल्प उत्तर मलायाशी तसेच आशिया खंडाच्या इतर भागांशी जोडणारी का संयोगभूमी इ. याची प्रमुख उदाहरणे आहेत.

संयोगभूमींमुळे दोन महासागरांदरम्यान अंतर कमी असूनही लांबून जलवाहतूक करावी लागणे, खुष्कीच्या मार्गाने होणाऱ्या व्यापाराची व युद्धप्रसंगी सैन्याच्या हालचालींची नाकेबंदी होणे इ. अडचणी निर्माण होतात तर अरूंद भूभागामुळे या क्षेत्रातील शहरांना संरक्षण व व्यापार दृष्टया अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. पनामा व सुएझ संयोगभूमीतून कालवे खोदल्यामुळे अमेरिका खंडातील पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवरील शहरांदरम्यानची अंतरे तसेच भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र एकमेकांशी जोडले गेल्याने त्यामार्गे होणाऱ्या आशिया – यूरोप यांदरम्यानच्या सागरी वाहतुकीची अंतरे खूपच कमी झाली आहेत. ज्या देशाच्या हद्दीतून असे कालवे काढले जातात, त्या देशाला जलवाहतुकीवरील कराव्दारे मोठे उत्पन्न मिळते. एकूणच संयोगभूमीमुळे अशा प्रदेशाला मुलकी व लष्करी दृष्ट्या तसेच राजकीय दृष्टया अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.

कुंभारगावकर, य. रा.