श्रीरंगम् : थिरूवरंगम्. भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक प्रसिद्ध वैष्णवतीर्थक्षेत्र. लोकसंख्या ७०,१०९ (१९९१). हे राज्याच्या मध्यभागीतिरूचिरापल्ली जिल्ह्यात, कावेरी व कोलेरू नदयांदरम्यान निर्माण झालेल्या

राजगोपुरम् : श्रीरंगनाथ मंदिराचे दक्षिण प्रवेशद्वार, श्रीरंगम्.श्रीरंगम् बेटावर वसले असून तिरूचिरापल्ली शहराच्या उत्तरेस चार किमी.वर आहे. मुख्य भूमीशी ते पुलांनी जोडण्यात आले आहे. १८७१ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. शहरात महाविदयालयीन शिक्षणापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तिरूचिरापल्ली येथे काम करणाऱ्या अनेकांचे हे निवासी शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

या स्थळाची माहिती प्राचीन वाङ्‌मय व कोरीव लेखांतून मिळते. चोल वंशाच्या कारकीर्दीत (अकरावे शतक) शेतीसाठी श्रीरंगम् बेटाच्या पूर्व टोकावर ३२१ मी. लांब व १२ते १८ मी. रूंद असा दगडी मोठा बंधारा बांधण्यात आला होता. त्याच्या जवळच१८४५ मध्ये ‘गँड ॲनिकट ’ बांधण्यात आला.

येथील श्रीरंगनाथस्वामी मंदिर हे पर्यटकांचे आकर्षण असून त्याचे बांधकाम चोल राजा पहिला परांतक (कार. ९०७९५३) याच्या कारकीर्दीत झाले असावे, असा तज्ज्ञांचा कयास आहे.पुढे चोल वंशातील राजांनी त्याचा विस्तार केल्याचे मंदिरातील कोरीवलेखांवरून दिसून येते. तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात मंदिराची बरीच पडझड झाली. पुढे वैष्णव आळवार संतांनी पुढाकार घेऊन त्याचा जीर्णोद्धार केलाआणि नंतर पांड्य राजांनी, विशेषत: पहिला जटावर्मन सुंदर पांड्य (कार.१२५१-१२६८) याने त्याची पुनर्बांधणी करून मंदिराला अठरा लाख सुवर्णमोहोरांची देणगी दिली आणि छत सोन्याने मढविले, असे श्रीरंगम् कोरीव लेखातम्हटले आहे. त्याने स्वत:ला येथे राज्याभिषेक करून घेतला व तुळाभारही केला.पुढे चौदाव्या शतकात मुस्लिम हल्ल्यांत मंदिराची बरीच पडझड झाली. त्यानंतर विजयानगरच्या सामाज्यकाळात (१३३६-१५६५) पुन्हा मंदिर पूर्ववत करण्यात येऊनत्याचा विस्तारही करण्यात आला. पुढे नायक राजांनी या मंदिरास देणग्या देऊनबहुविध शिल्पांनी ते अलंकृत केले.

श्रीरंगनाथस्वामी मंदिराचे क्षेत्रफळ ६ चौ. किमी. असून त्यात एकाभोवती एक असे सात प्राकार आहेत. त्या प्राकारांच्या प्रवेशद्वारांवर २१ गोपुरे आहेत. सर्वांत मोठया राजगोपुराची उंची ७२ मी. आहे. सर्वांत बाहेरच्या प्राकाराची लांबी ८३६ मी. व रूंदी ७६८ मी. आहे. या प्राकारांच्या अंतर्भागात, विशेषत: बाहेरच्या तीन प्राकारांत, सर्व शहर सामावलेले आहे. या प्राकारांतून अनेक मंडप आणि छोटी मंदिरे आहेत. यांतील चौथ्या प्राकारातील मंडप भव्य असून त्यातील सहस्रस्तंभ सभागृहाची लांबी १५२ मी. व रूंदी ४२ मी. आहे. त्यात एकूण ९५३ अलंकृत एकसंध पाषाणाचे स्तंभ आहेत. या प्राकारांतील शेषगिरी या मंडपातील स्तंभांवर दोन पायांवर उभ्या असलेल्या घोड्यांचे शिल्प लक्षणीय आहे. शिवाय या प्राकाराशेजारचे वेल्लई गोपुर प्रेक्षणीय आहे. उंजल मंडप आणि किली मंडप यांत अनुकमे हिंदोळा (चौफळा) आणि पिंजऱ्यातील पोपट (संकल्प लिदानासाठी) यांचे शिल्पांकन आहे.कृष्ण, धन्वंतरी, पट्टाभिराम, कोदंतराम, श्रीरंगनचियार (श्रीरंगनायकी वालक्ष्मी) यांची मंदिरे आहेत. याशिवाय उदयाळवार, अलवांदर, नम्माळवार, रामानुजाचार्य इ. संत-आचार्यांची मंदिरे आहेत. पाचव्या प्राकारात गरूडाचीभव्य मूर्ती आहे. याच प्राकारात चंद्रपुष्करिणी (सरोवर) आहे. सहाव्याप्राकाराच्या आत सुवर्णमंडित ध्वजस्तंभ व हनुमानाची भव्य मूर्ती आहे. येथेनायक राजांची भव्य व्यक्तिशिल्पे खोदलेली आहेत. सतराव्या शतकातील चोक्कनाथनायक आणि त्याचे बंधू यांची व्यक्तिशिल्पे संस्मरणीय आहेत. कर्नाटकच्या नबाबाच्या लष्करातील अठराव्या शतकातील लाला तोडरमल या सेनापतीचेही एक पाषाणशिल्प आहे.

सातव्या प्राकारात श्रीरंगनाथाचे दक्षिणाभिमुख मुख्य मंदिर आहे. ते आकाराने लहान आहे. त्याचे मानचित्र (विधान) चौकोनी आहे. मात्र गर्भगृहाचा अभिकल्प मूळ वास्तूच्या रचनाबंधाला शोभेल असा दीर्घ-वर्तुळाकार आहे. गर्भगृहात शेषशायी श्रीरंगनाथाची द्विभुज, श्यामवर्णी विशालकाय मूर्ती आहे. तिच्या मस्तकावर शेषनागाचा फणा आहे.मंदिराच्या माथ्यावर एका रांगेत चार शिखरे आहेत. प्रकोष्टाच्याप्रक्षेपणातही अशाच प्रकारच्या शिखरांची रचना केलेली असून दर्शनी भागातमोठी कमान आहे. तिच्यावर सिंहशीर्ष असून त्याच्या खाली मकर ज्ञापकेदर्शविली आहेत आणि त्यासमोर विष्णूची उभी मूर्ती आहे. मंदिराचे विमानसंकेतगर्भित (ओंकार) अक्षरासारखे दिसते. त्यावर चार कळस आहेत. हेविमान सुवर्णमंडित आहे. या मंदिराच्या वास्तुशैलीत चोल, पांडय्, नायक तसेचविजयानगर वास्तुशिल्पशैलींचे विशेष आढळतात मात्र त्या सर्वांत विजयानगरशैलीचा प्रभाव जाणवतो.

गावाजवळच जंबुकेश्वर महादेव, रॉकफोर्ट, समयपुरम् , तिरूवनाइकोविल, कुमार वैयालुर इ. प्रसिद्घ मंदिरेआहेत. रामानुजाचार्यादी वैष्णव आचार्यांचे श्रीरंगम् हे वास्तव्याचे ठिकाणहोते. रामानुजाचार्यांनी येथेच आपली जीवनयात्रा संपविली. येथे धनुर्मासात (डिसेंबर) अमावास्येपासून २० दिवस वैकुंठ एकादशीचा मोठा उत्सव भरतो.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Struggle for Empire, Bombay, 1957.

           2. Sivaramamurti, Calambur, The Art of India, New York, 1977.

देशपांडे, सु. र.