मैनाक : मैनाग. भारतवर्षातील प्राचीन पर्वत. याचा उल्लेख प्रथम तैत्तिरीय आरण्यकात आला असून रामायण, महाभारत, कूर्म पुराण, मार्केंडेय पुराण इ. ग्रंथांतही याविषयीचे उल्लेख आढळतात. या पर्वताच्या स्थानाविषयी मात्र संशोधकांत मतभेद आहेत. नंदलाल डे यांच्या मते कूर्म पुराणात उल्लेखिलेल्या ‘मैनाक गिरी’ चा विस्तार गंगा व बिआस नद्यांदरम्यान झाला असून हिमालयाच्या पायथ्याकडील ⇨ शिवालिक टेकड्या म्हणजे तो असावा. पार्जिटरच्या मते अलमोडा जिल्ह्याच्या उत्तरेस गंगा नदीच्या पूर्वेकडील उपप्रवाहाजवळील टेकड्या म्हणजे मैनाक पर्वत होय. रामायणाच्या सुंदरकांडातील उल्लेखनुसार भारत व श्रीलंका यांदरम्यानच्या सागरी भागात पसरलेली प्रचंड पर्वतरांग म्हणजे मैनाक पर्वत होय. हनुमानाला लंकेत जाताना विसावा मिळावा म्हणून सागराने पाताळातून मैनाक पर्वत वर आणला, अशी कथा सांगितली जाते. महाभारतातील उल्लेखानुसार प. भारतातील किंवा गुजरातजवळील डोंगररांग म्हणजे मैनाक पर्वतरांग होय.

इंद्राने चिडून जेव्हा सर्व पर्वतांचे पंख छाटण्यास सुरुवात केली, तेव्हा मैनाक पर्वत समुद्रात लपून बसला त्यामुळे त्याचे पंख शाबूत राहिले अशी मैनाक पर्वताविषयीची कथा परंपरेने सांगितली जाते.

चौंडे, मा. ल.