आधुनिक निकोसीआ

निकोसीआ : (ग्रीक–लेफ्कॉसीआ, तुर्की–लेफ्कोशा). सायप्रस प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १,१७,१०० (१९७४). हे बेरूतच्या वायव्येस २४१ किमी. व पोर्ट सैदच्या उत्तर ईशान्येस ४५० किमी.वर, कायरीन्या व ट्रॉऑदॉस पर्वतांदरम्यानच्या मैदानात पीद्यास नदीकाठी स. स.पासून १५२ मी. उंचीवर वसले आहे. हे फामागूस्टा बंदराशी लोहमार्गाने आणि इतर मुख्य शहरांशी रस्त्यांनी जोडलेले आहे. शहरापासून ८ किमी.वर विमानतळ असून येथून दररोज लंडन, न्यूयॉर्क व यूरोपातील मुख्य विमानतळांशी हवाई वाहतूक चालते. ३३०–११९१ पर्यंत हे बायझंटिनांच्या, तर ११९२–१४८९ पर्यंत ल्यूझीन्यां राजघराण्याच्या ताब्यात होते. १३७३ आणि १४२६ मध्ये अनुक्रमे जेनोइस व मामलुक यांनी या शहराची लूट केली होती. १४८९ मध्ये हे व्हेनेशियनांच्या ताब्यात गेले, तर १५७१ मध्ये तुर्कांनी जिंकले व १८७८ पर्यंत त्यांच्याच ताब्यात राहिले. १८७८–१९६० पर्यंत हे ब्रिटिश सत्तेखाली होते. दुसऱ्या महायुद्धात बाँबहल्ल्यामुळे तसेच सायप्रसच्या स्वातंत्र्यसंग्रामातील लढायांत या शहराचे पुष्कळच नुकसान झाले होते. हे एक औद्योगिक शहर असून येथे सुती कापड, सिगारेटी, साबण, कातडी सामान, मद्य इत्यादींचे उत्पादन होते. येथे गहू, लिंबे, संत्री, बदाम इ. शेतमालाची व शेळ्या-मेंढ्या, डुकरे इ. जनावरांची बाजारपेठ आहे. शहराभोवती वर्तुळाकार प्राचीन तट असून त्याला अकरा बुरूज आहेत. बाजारपेठेजवळील पूर्वीच्या सेंट सोफिया चर्चचे मशिदीत रूपांतर झाले आहे. येथील संग्रहालयात अनमोल अशा प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे.

ओक, द. ह.