कोस्टा रीका: मध्य अमेरिकेतील एक लोकसत्ताक राष्ट्र. क्षेत्रफळ ५०,९०० चौ. किमी. लोकसंख्या १८·६ लक्ष (१९७३ अंदाज). याच्या उत्तरेस निकाराग्वा, पूर्वेस कॅरिबियन समुद्र, दक्षिणेस पनामा व पश्चिमेस पॅसिफिक महासागर असून सॅन होसे ही राजधानी आहे.

भूवर्णन: कोस्टा रीका याचा अर्थ समृद्ध किनारा. याच्या वायव्य भागातील व्होल्कानिकापासून आग्नेय भागाच्या तालामांकापर्यंत पर्वतश्रेणी असून त्यात पोआस (२,७०५ मी.), बार्बा (२,९०६ मी.), ईरासू (३,४३२ मी.), तुरीआल्बा (३,३२८ मी.) इ. ज्वालामुखी व मध्यभागात ३,८२० मी. उंचीचे चिरिपो ग्रांदे हे सर्वांत उंच पर्वतशिखर आहे. १९६३ व १९६८ साली काही ज्वालामुखींचा विनाशकारी उद्रेक झाला होता. या ज्वालामुखींच्या पायथ्यापासून ते पर्वतांच्या उतारापर्यंत एक ते दोन हजार मी. उंचीचे, समशीतोष्ण, जवळ जवळ वर्षभर वसंत ऋतूसारख्या हवामानाचे व घनतम वस्तीचे पठार असून त्यात कोस्टा रीकातील सर्व महत्त्वाची शहरे आहेत. जमीन सुपीक आहे. थोडेसे सोने निघते व तेलाचा शोध सुरू आहे. किनारी प्रदेशात सरासरी तपमान २७ से. व पठारी भागात २२ से. असते. येथे पाऊस २५० सेंमी. पर्यंत पडतो. काही भागात तो ५०० सेंमी. पर्यंत जातो. तथापि कोरड्या प्रदेशात अवर्षणाची भीती असतेच. निकाराग्वा सरोवरातून निघणारी सॅन वॉन व पूर्णतया कोस्टा रीकातूनच वाहणारी रेवेंतासोन या येथील मुख्य नद्या होत. निम्मा प्रदेश निबिड अनाघ्रात अरण्यांनी व्याप्त आहे. पाइन, ओक यांसारखे बांधकामी वृक्ष, नाना तऱ्हेची फळे व फुले यांनी कोस्टा रीका संपन्न असून ऑर्किडच्या असंख्य प्रकारांबद्दल तो प्रसिद्ध आहे. तसेच प्यूमा, जॅगुअर, मृग आणि माकडे विपुल आढळतात. पक्ष्यांच्या ७५० व सर्प आणि बेडूक यांच्या १३० जाती आढळल्या आहेत. दोन्ही समुद्रांत व नद्यांत मासे भरपूर मिळतात.  

 

इतिहास: या प्रदेशाच्या शोधाचे श्रेय कोलंबसालाच देतात (सप्टेंबर १५०२). मूळ रहिवासी अश्मयुगीन आणि तुरळक आढळल्याने आक्रमक वसाहतवाल्यांना कामकरी गुलाम मिळाले नाहीत. परिणामतः हा लॅटिन अमेरिकेतील एकमेव शुद्ध यूरोपीय लोकांचा देश राहिला व आपोआपच वंशविद्वेषाच्या संघर्षापासून बचावला. जमीनदारी व तद्‍भव समस्याही निर्माण झाल्या नाहीत. १५६२ पर्यंत याचा कारभार पनामाकडेच होता. त्यावर्षी ह्‌वानव्हास्केथ दे कोरोनादो या पहिल्याच राज्यपालाने स्पेनहून पन्नासएक कुटुंबे, शेतीसाठी बी-बियाणे व गुरेढोरे आणून वसाहतीस प्रारंभ केला. परंतु स्पेनला लुटण्यायोग्य काहीच नसल्याने हा भाग दुर्लक्षितच राहिला. आपल्या वसाहतींना स्पेनने इतर देशांशी व्यापारबंदी केल्याने याच्या मागासपणात भरच पडली आणि अडीच शतके तो तसाच राहिला. एकोणिसाव्या शतकात स्पेनच्या अनेक वसाहतींत बंडे झाली तथापि कोस्टा रीका अलिप्तच होता. त्याला स्वतः काही न करता इतरांबरोबर स्वातंत्र्य मिळाले. काही काळ मेक्सिकन साम्राज्यात व मध्य अमेरिका संघात राहून १८३८ मध्ये त्याने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. १८५० मध्ये स्पेनने ते मान्य केले. त्याचा पहिला राष्ट्रपती ब्रौल्यो कारियो (१८००–४५) याने कॉफीचे मळे सुरू केले व देशात शिस्त व स्वाभिमान वाढविला. त्यानंतरची उल्लेखनीय घटना १८७१ मध्ये राष्ट्रपती जनरल टोमास ग्वार्द्या (१८३२–८२) याने केलेले संविधान ही होय. बरेच बदल होऊनही १९४९ पर्यंत कोस्टा रीकाचे संविधान मुख्यतः हेच होते.

दुसऱ्या महायुद्धात कोस्टा रीकाने जपान-जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले होते. युद्धानंतर देशात दोन बंडे झाली. त्यांतील पहिले सफल होऊन साधारणतः डाव्या मताचे शासन अधिकारावर आले आणि दुसरे अमेरिकेच्या मदतीने मोडण्यात आले. १९४८ मध्ये सैन्याचे विसर्जन करण्यात आले. त्याऐवजी आता सु. १,२०० इतके नागरी संरक्षक दल आहे. देशाला नाविक किंवा हवाईदल नाही.

राजकीय स्थिती : कोस्टा रीका हे गणतंत्र असून त्याचे संविधान अमेरिकेच्या धर्तीवर आहे. १८७१ च्या संविधानानंतर १९४९ मध्ये आमूलाग्र नवे संविधान जाहीर झाले. १९६२ च्या दुरुस्ती अन्वये राष्ट्रपती आणि सत्तावन सदस्यांची संसद सार्वत्रिक मतदानाने चार वर्षांकरिता निवडली जातात. मात्र संसद सदस्यांपैकी निम्मे दर दोन वर्षांनी बदलतात. वीस वर्षांवरील सर्वांस मताधिकार असून सत्तर वर्षांखालील पुरुषांस मतदान सक्तीचे आहे. १९४९ मध्ये स्त्रियांनाही मताधिकार मिळाला. एकूण सात कँटन असून राज्यपाल व कँटनाधिकारी राष्ट्रपती नेमतो. सर्वोच्च न्यायालयाचे सतरा न्यायाधीश संसदेने आठ वर्षांकरिता निवडलेले असतात. या न्यायालयाच्या हाती न्यायखाते आहे. देहान्ताची शिक्षा नाही. कोस्टा रीका संयुक्त राष्ट्रांचा व मध्य अमेरिका राष्ट्रसंघटनेचा सदस्य आहे.

आर्थिक स्थिती : कोस्टा रीकाची अर्थव्यवस्था शेतीप्रधानच आहे. कॉफी आणि केळी यांच्यावर सुबत्ता अवलंबून आहे. मध्य अमेरिकेत कॉफीची लागवड प्रथम इथेच झाली (१७९५). कोको व साखर निर्यात होते. निर्यात व्यापार मुख्यतः अमेरिकेशी होतो. तांदूळ, मका, बटाटे, तंबाखू, कडधान्ये आणि पशुधन यांचेही उत्पन्न होते. दूधदुभते व पशुसंवर्धन हे व्यवसाय वाढले आहेत. १९७० मध्ये १५ लक्ष गुरे व १·९ लक्ष डुकरे होती.

थोड्यांच्या हाती अधिकांश जमीन ही लॅटिन  अमेरिकेतील समस्या कोस्टा रीकात नाही. याला अपवाद ‘युनायटेड फ्रुट’ ह्या परदेशी कंपनीच्या केळमळ्यांचा आहे. देशातील सु. ८% जमीन लागवडीखाली, सु. १४% गवताळ व सु. ७५% अरण्यव्याप्त आहे. अरण्यात रोजवुड, सीडार, मॉहॉगनी इ. किंमती लाकडांचे वृक्ष आहेत. तसेच रबर, चिकल व कँटिव्हो आणि बालसा यांसारखे मऊ लाकडांचे वृक्षही आहेत. भोवतालच्या समुद्रांत व नद्यांत भरपूर मासे मिळतात. सोने, चांदी, पारा, गंधक, जस्त, मँगॅनीज, तेल वगैरे खनिजे सापडतात परंतु थोड्याबहुत मच्छीमारीपलीकडे ही संपत्ती विनाउपयोग पडूनच आहे. एल् साल्वादोरच्या खालोखाल कोस्टा रीकाचेच औद्योगिकीकरण झाले आहे. तथापि औषधे, रसायने, कापड, तेल वगैरे आयातच करावे लागतात. १९७१ मध्ये विद्युत् उत्पादनक्षमता १,२०७ दशलक्ष किवॉ. ता. होती. १९६६ मध्ये एक तेलशुद्धीकरणाचा आणि एक अस्फाल्टचा कारखाना उभारण्यात आला. १९५० ते १९७० या काळात कातडी कमावणे, मद्ये बनविणे, पदार्थ डबाबंद करणे, साखरशुद्धीकरण, कापूस पिंजणे व कापड विणणे तसेच रंग, वनस्पती तेले, सिगारेट, अन्नपदार्थ, फर्निचर, साबण, दोर इ. उद्योग वाढले आहेत. व्यापार मुख्यतः अमेरिकेशी, मध्य अमेरिकेशी व त्या खालोखाल पश्चिम जर्मनी, कॅनडा, जपान आणि ब्रिटन या देशांशी होतो.


मजुरांच्या दोन संघटना असून त्यांचे काम व पगार संविधानाने नियमित केले आहेत. कोस्टा रीकातील बँका व विमाधंदा राष्ट्रीय आहेत. १९६० पासून खाजगी बँकांना व्यवहाराची मुभा मिळाली आहे. कोस्टा रीकाचे मध्य अमेरिका सामायिक बाजारपेठेतील स्थान महत्त्वाचे असून येथील दरडोई उत्पन्न मध्य अमेरिकेत सर्वाधिक आहे.

लोहमार्ग एकूण १,१२० किमी. आहे. दोन्हीकडच्या सागरकिनाऱ्यांस  जोडणारे चार लोहमार्ग आहेत व ते सर्व सॅन होसे या राजधानीतून जातात. १६,८०० किमी. रस्ते आहेत, परंतु फक्त ३,२५० किमी. वर्षभर उपयोगी पडणारे आहेत. इंटरअमेरिकन महामार्गाने कोस्टा रीका निकाराग्वा व पनामा यांच्याशी जोडला गेला आहे. कॅरिबियनवर लिमॉन व पॅसिफिकवरील पूंतारेनास व गाल्फितो ही मुख्य बंदरे आहेत. तथापि वाहतुकीच्या साधनांची कमतरता हा आर्थिक प्रगतीस मोठाच अडथळा आहे. एल् कोको येथे अद्ययावत आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

दूरध्वनी सर्व मोठ्या शहरांत आहेत १९६९ मध्ये ५०,०९३ दूरध्वनी ग्राहक होते. पस्तीस नभोवाणी केंद्रे व चार दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. मुख्य नाणे ‘कोलोन’ (= १०० सेंटिमो) असून याची रुपयात किंमत सु. रु. १·०९८ आहे (१९७०).

लोक व समाजजीवन : कोस्टा रीकाच्या विशिष्ट भूरचनेचा परिणाम लोकवस्तीवर झाला आहे. देशाचा फक्त दशांश भाग व्यापणाऱ्‍या  चांगल्या हवेच्या पठारावर ७६% लोक असून त्यातील ९०% स्पॅनिश आहेत. याउलट पूर्वेस कॅरिबियनकडील भागात फक्त ६% लोक राहतात. त्यापैकी ५६% लोक १८७८ पासून परकीय कंपन्यांच्या केळ्यांच्या मळ्यांत काम करण्याकरिता आणलेले जमेकन निग्रो आहेत. पश्चिमेस पॅसिफिककडे याहून थोडी दाट वस्ती असून तेथे १८% लोक आहेत. यातील ५०% गोरे, ४६% मेस्तिसो व उरलेले इंडियन वा निग्रो आहेत. आताचे कोस्टारीकन पाचशे वर्षांपूर्वी स्पेनहून आलेल्या पंचावन्न कुटुंबांचे वंशज होत. आरोग्यपचारातील प्रगती आणि बहुप्रसवता यांमुळे आधुनिक काळात प्रजावाढ झपाट्याने होत आहे.

कॉफीचे मोठे मळे, गुरांचे मोठे कळप व त्यांचे मालक, निर्यात करणारे व उद्योगपती धनिकवर्ग, व्यावसायिकांचा मध्यमवर्ग, शिक्षक, कारकून वगैरेंचा कनिष्ठ मध्यमवर्ग व कामगार आणि छोटे जमीनमालक यांचा कनिष्ठ वर्ग असे चार स्तर देशात असले, तरी फार श्रीमंत व फार गरीब किंवा पिळवणूक करणारे व होणारे असा तीव्र भेद या देशात दिसून येत नाही. बहुतेक सर्वांचे मुख्य अन्न तांदूळ व वाटाणे, घेवडे हे आहे. सर्वांचा पोशाख साधाच असतो. सैनिकीवृत्तीचे सार्वत्रिक वावडे आहे. कामगारांसाठी आजार, वार्धक्य आणि मृत्यू यांबाबत विम्याची तरतूद केलेली आहे.

कॅथलिक पंथ देशाचा अधिकृत धर्म आहे व ९०% हून अधिक लोक कॅथलिकच आहेत. तथापि इतर पंथांना धर्मस्वातंत्र्य आहे. कुटुंबव्यवस्था जवळ जवळ अविभक्त कुटुंबपद्धतीप्रमाणे असून मोठी कुटुंबे एकत्र राहून शेती करतात. काही शहरी लोक सोडल्यास बहुसंख्य खेडूतच आहेत.

भाषा-साहित्य, शिक्षण वगैरे : कोस्टा रीकाची भाषा स्पॅनिश असून रेपेर्तीरिओ अमेरिकानो  हे उदार विचारांचे विख्यात मासिक तेथेच निघते. आकिलिओ एचेव्हेरिया (१८६६-१९०६) हा प्रसिद्ध लेखक व रेपेर्तीरिओचा हवाकीन गर्सिआ माँझ (१८८१–१९५८) हे स्पॅनिश साहित्यात सर्वश्रुत आहेत. १९७१ मध्ये देशात सात दैनिके प्रसिद्ध होत होती. त्यांपैकी एक इंग्रजी भाषेत होते. नियतकालिके एकवीस आहेत.

सैनिकांपेक्षा शिक्षकांची संख्या अधिक हे कोस्टा रीकाचे भूषण होय. सर्व शिक्षण विनाशुल्क आहे. सात ते सतरा वर्षेपर्यंत शिक्षण सक्तीचे आहे. ८०% ही येथील साक्षरता लॅटिन अमेरिकेत दुसऱ्‍या क्रमांकाची आहे. १९७२ मध्ये २,७०६ प्राथमिक शाळांतून ३,७४,२६९ विद्यार्थी आणि १२, ७११ शिक्षक व कर्मचारी होते. १५९ सरकारी व खाजगी माध्यमिक शाळांतून ९७,९५३ विद्यार्थी होते. १८४३ मध्ये सॅन होसे येथे स्थापन झालेल्या कोस्टा रीका विद्यापीठात १३ विद्याशाखांत मिळून २०,९१४ विद्यार्थी व १,१९५ प्राध्यापक होते. १९६१ मध्ये एक वैद्यकीय विद्यालय स्थापन झाले आहे. सर्व माध्यमिक शाळांतून १९४४ पासून इंग्रजीही शिकविले जाते.

फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असून बास्केटबॉल, बेसबॉल, मुष्टियुद्ध, गोल्फ, टेनिस, पोहणे हेही लोकप्रिय आहेत. १,९८,५१३ (१९६८ अंदाज) वस्तीचे सॅन होसे हे राजधानीचे शहर आल्हाददायक हवेसाठी व सौंदर्याबद्दल प्रसिद्ध आहे. तेथील राष्ट्रीय नाट्यगृह, ललितकला संग्रहालय आणि बागा तसेच ३,४३२ मी. उंचीचा ज्वालामुखी ईरासू ही त्या देशाची प्रमुख आकर्षणे होत. 

    शहाणे, मो. ज्ञा.


कोस्टा रीकाची राजधानी सॅन होसे येथील केळी कामगारांची वसाहत

केळी : कोस्टा रीकाचे प्रमुख उत्पादन.कोस्टा रीकन युवतीईरासू ज्वालामुखी, कोस्टा रीका.बैलगाडीच्या चाकांवरील कोरीव नक्षीकाम कोस्टा रीकाचे एक वैशिष्ट्य