तिन्‌त्सिन : तिन्‌सिन व त्येन्‌जिंग. हे चीनमधील होपे प्रांतातील महत्त्वाचे शहर. लोकसंख्या ४५,००,००० (१९७० अंदाज). बाय नदीवरील हे बंदर गैरसोयीचे असले तरी महत्त्वाचे आहे. सुती व लोकरीच्या कापडगिरण्या व खाद्यपदार्थांच्या कारखान्यांत अलीकडे रासायनिक व भारी अभियांत्रिकी कारखान्यांची भर पडली आहे. एकोणिसाव्या शतकात लष्करी दृष्ट्या तिन्‌त्सिन पुष्कळ गाजले. १८६० मध्ये हे पाश्चात्त्य व्यापाऱ्यांना खुले करण्यात आले. बॉक्सर बंडानंतर ७ वर्षे हे पाश्चात्य अंमलाखाली होते, तेव्हा याची तटबंदी नष्ट करण्यात आली. १९४६ मध्ये पाश्चात्यांचे येथील सर्व हक्क नष्ट करण्यात आले. उद्योग, व्यापार याबरोबरच ते एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे.

ओक, द. ह.