हिमालय : जगातील सर्वाधिक उंचीचा आणि विशाल पर्वतसमूह.हा सर्वांत तरुण आणि पश्चिम-पूर्व पसरलेला सर्वाधिक लांबीचा घडीचापर्वत आहे. लांबी सु. २,५०० किमी. रुंदी सु. १५०–४०० किमी. आणि क्षेत्रफळ सु. ५,००,००० चौ. किमी. रेखावृत्तीय विस्तार ७३° पू.ते ९५° पू. रेखांश. पर्वताची रुंदी पश्चिमेस जास्त असून पूर्वेस त्यामानाने कमी आहे. भारताच्या उत्तर सरहद्दीवर पश्चिम-पूर्व दिशेत पसरलेली ही सलग पर्वतश्रेणी असून तिच्या उत्तरेस विस्तीर्ण असे तिबेटचे पठार, तर दक्षिणेस उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेस भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील पाकव्याप्त भागात जेथे सिंधू नदी एक मोठे वळण घेते, तेथपासून किंवा तेथील नंगा पर्वतशिखरापासून ते पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीएक मोठे वळण घेऊन पुढे भारतात प्रवेश करते, तेथपर्यंत किंवातेथील नामचा बारवा शिखरापर्यंतच्या पर्वतश्रेण्यांचा समावेश हिमालयपर्वतात केला जातो. भारताची उत्तर सरहद्द हिमालय पर्वतश्रेणीने सीमितझालेली आहे. हिमालयाचा आकार कमानीसारखा असून त्या कमानीचीबहिर्वक्र बाजू दक्षिणेस भारताच्या बाजूला आहे. हिमालयाचा विस्तार पाकिस्तान, चीन (तिबेट), नेपाळ, भूतान या देशांत आणि भारतातीलजम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशया राज्यांत आहे. 

 

जगातील इतर प्रमुख पर्वतांप्रमाणेच हा पर्वतही प्राचीन सागरीतळावर वलीकरण प्रक्रियेतून उंचावला गेलेला भूसांरचनिक पर्वत आहे. हिमालयाचे वलीकरण दोन पठार शृंगांभोवती झालेले असून त्यांपैकीएक शृंग पाकिस्तानच्या सरगोधा जिल्ह्यातील किराणा हिल येथे, तरदुसरे मेघालयातील शिलाँग पठार येथे आढळते. शृंगाभोवती पर्वतालातीव्र वळण प्राप्त झालेले असते, त्याला अक्षकेंद्र असे म्हणतात. अशादोन अक्षकेंद्रांपैकी एक केंद्र जम्मू व काश्मीर राज्यातील नंगा पर्वत, तर दुसरे नामचा बारवा हे आहे. हिमालयासह आशियातील पर्वत-श्रेणींचा आकृतिबंध खंडाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पामीरच्यापठाराच्या संदर्भाने स्पष्ट करता येतो. ‘पामीर नॉट’ (जगाचे छप्पर) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्वतांतर्गत पठाराचा विस्तार ताजिकिस्तान, चीन (तिबेट), भारत आणि अफगाणिस्तान यांच्या सीमाभागांत आहे. चोहोबाजूंनी पर्वतांनी वेढल्यामुळे पामीरसह हा संपूर्ण प्रदेश एक पर्वतसमुच्चय बनला आहे. पामीरपासून अनेक लहानमोठ्या पर्वतरांगानिरनिराळ्या दिशांनी विस्तारलेल्या आहेत. त्यांमध्ये पूर्वेस जाणाऱ्याअल्ताई, कुनलुन व काराकोरम या रांगा, ईशान्येकडे जाणारी तिएनशानरांग, नैर्ऋत्येकडे जाणारी हिंदुकुश पर्वतश्रेणी, तर आग्नेयीस जाणारीहिमालय पर्वतश्रेणी यांचा समावेश होतो. हिमालयाव्यतिरिक्त इतर श्रेण्या हिमालयात समाविष्ट केल्या जात नसल्या, तरी त्या हिमालयाशीचनिगडित आहेत. हिमालयाच्या उत्तरेस सिंधू नदीच्या पलीकडील जटिलपर्वतप्रणालीत काराकोरम श्रेणी असून तिचा विस्तार पामीर पठारापासूनकैलास रांगेपर्यंत आढळतो. काराकोरम श्रेणीत के -२ किंवा मौंट गॉडविन ऑस्टिन (८,६११ मी.) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. काराकोरम श्रेणीत ध्रुवीय प्रदेशाच्या बाहेरील सर्वांत लांब हिमनद्या आहेत. सिंधू नदीने काराकोरमबरोबरच लडाख व कैलास पर्वतश्रेण्याही हिमालयापासून अलग केल्या आहेत. ब्रह्मपुत्रेच्या वरच्या खोऱ्यामुळे हिमालयाच्या मुख्य श्रेणीपासून कैलास व निएन चेन टांगला या श्रेण्या अलग केल्या आहेत. हिमालयाच्या उत्तरेस असलेले तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील विस्तृत पठार असून तेही ‘जगाचे छप्पर’ म्हणून ओळखले जाते. सदैव बर्फाच्छादित असलेले मौंट कैलास (६,७१४ मी.) हे प्रसिद्ध शिखर तिबेटमध्ये आहे. ते हिंदू व बौद्ध धर्मीयांचे पवित्र ठिकाण आहे. भाविक लोक त्यांच्या देव-देवता आणि साधु-संतांचे वास्तव्य येथे असल्याचे मानतात. कैलास शिखरापासून जवळच पवित्र मानसरोवर आहे. 

 

प्राचीन वाङ्मयातील हिमालय : हिमालय हा संस्कृत शब्द असून हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर. यावरून बर्फाचे घर असलेला प्रदेश म्हणजे हिमालय अशी व्युत्पत्ती केली जाते. पूर्वीचे भूगोलज्ञ या श्रेणीचा इमाउस किंवा हिमाउस व हेमोदास असा उल्लेख करीत असत.यांपैकी इमाउस किंवा हिमाउस हे नाव गंगेच्या उगमाच्या पश्चिमेकडील हिमालयाच्या पश्चिमेकडील भागास, तर हेमोदास हे पूर्वेकडील भागासाठी वापरलेले असावे. संस्कृत हिमवत किंवा प्राकृत हेमोटा म्हणजे बर्फाळ, यावरून हेमोटस हा शब्द वापरलेला असावा. 

 

संस्कृत ग्रंथांत या पर्वताला हिमवत, हिमवान, हिमाचल, हिमाद्री, हैमवत अशी नावे आहेत. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ऐतरेय ब्राह्मण याग्रंथांत त्याचा उल्लेख हिमवत व हिमवंत असा केलेला आहे. महाभारतात नेपाळच्या पश्चिमेकडील प्रदेशाला हिमवत प्रदेश असे नाव दिले असून त्यातून गंगा, यमुना व सतलज या नद्या वाहतात, असे म्हटले आहे.अर्जुन व बलरामाची यात्रा, भीम व दुर्योधन यांचे गदायुद्ध, पांडवांचेनिर्याण या घटना हिमालयातच घडल्याचे मानले जाते. गीतेत श्रीकृष्णानेस्वतःला ‘स्थावराणां हिमालयः’ असे म्हटले आहे. पुराणांत हिमालय हावर्षपर्वत किंवा मर्यादापर्वत असल्याचे सांगितले आहे. मार्कंडेय व कूर्म पुराणांत हिमालयाचे वर्णन आहे. कालिका पुराणात त्याला पर्वतांचाराजा म्हटले असून मत्स्य पुराणात हिमालयातील फल-पुष्प संपदेचे वर्णनआहे. महाकवी कालिदासाला हिमालयाने विशेष मोहिनी घातली होती.त्याच्या काव्यात हिमालयातील अनेक स्थळांचा निर्देश आढळतो. 

 

वसिष्ठ, वाल्मीकी, कण्व, व्यास इ. अनेक तपस्वी ऋषींचे आश्रम हिमालयात होते. पुराण काळातील ऋषींप्रमाणेच आधुनिक काळातीलस्वामी रामतीर्थ व स्वामी विवेकानंद यांनाही तपश्चर्येसाठी हिमालयाचा परिसर योग्य वाटला कारण या पवित्र भूमीवरील वातावरणाचा मनावर मंगलमय प्रभाव पडतो. ते वातावरण मनःशांतीसाठी अनुकूल ठरते. म्हणूनच आजही अनेक साधुसंत, बैरागी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी हिमालयात जाऊन तप करीत असतात. धर्म, संस्कृती, देवता, साहित्य, कला इ. जीवनाच्या सर्व अंगांवर हिमालयाचा प्रभाव गेली हजारो वर्षे पडलेला आहे. तो केवळ दगडमातीचा डोंगर नसून हिंदूंना ते पूज्य देवालयच आहे. महाभारतात द्विगर्त, त्रिगर्त, मद्र इ. पर्वतीय राज्यांचा निर्देश आढळतो. कामरूप, नेपाळ, काश्मीर या प्रदेशांतही हिंदू राज्ये त्या काळी होती व ती समृद्ध आणि सुस्थित होती. शबराने हिमालयात अनेक गिरिदुर्ग उभारले होते. तो हिमालयातील पहिला वसाहतकार असावा, असे मानले जाते. 

 

निर्मिती : हिमालय पर्वताची निर्मिती स्तरित आणि रूपांतरित खडकांच्या रचना असलेल्या प्रदेशात वलीकरण क्रिया होऊन झालेली आहे. ॲल्फ्रेड वॅगनर यांच्या खंड विप्लव सिद्धांतानुसार अगदी सुरुवातीला अस्तित्वात असलेल्या पॅन्जीया महाखंडाचे ट्रायासिक कालखंडात (सु. २४.५ ते २०.८ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) पश्चिम-पूर्व दिशेत विखंडन होऊन उत्तरेकडील लॉरेंशिया अंगारभूमी व दक्षिणेकडील गोंडवनभूमी अशी दोन भूखंडे अस्तित्वात आली. दोन्ही भूखंडांच्या दरम्यानच्या भागात पडलेली भेग रुंदावत जाऊन त्या ठिकाणी पाणी साचून तेथे टेथीस समुद्र अस्तित्वात आला. दोन्ही भूखंडांकडून वाहत येणाऱ्याद्यांनी मोठ्या प्रमाणावर वाहून आणलेला गाळ, चिखल आणि वाळूचे टेथीसच्या तळावर संचयन होत गेले. वरच्या थराचा व पाण्याचा दाब पडत जाऊन या सर्व पदार्थांचे कालांतराने गाळाच्या(स्तरित) खडकांत रूपांतर झाले. कालांतराने गोंडवनभूमी उत्तरेकडे सरकू लागल्यामुळे दोन्ही खंडे एकमेकांजवळ येऊ लागली. परिणामतः टेथीसमधील गाळाच्या मृदू खडकांवर दाब पडून तेथील भूकवचाला वळ्या पडू लागल्या. दाब जसजसा वाढत गेला तसतशा वळ्या उंचावत गेल्या. ही पर्वतनिर्माणकारी हालचाल सु. ५० द. ल. वर्षांपूर्वी सुरू झाली असावी. ही क्रिया अगदी संथ गतीने दीर्घकाळपर्यंत चालू राहून टेथीस समुद्राच्या जागेवर उंच हिमालयीन पर्वतश्रेण्या अस्तित्वात आल्या. निर्मितीची ही प्रक्रिया न्युम्युलाइट कालखंडानंतर सुरू होऊन ती प्लाइस्टोसीन कालखंडापर्यंत चालू राहिली. पूर्ण उंचीच्या पर्वताची निर्मिती होण्यासाठी एकूण सु. ६-७ द. ल. वर्षे लागली. त्याच वेळी क्षरण क्रियाही चालू होती. हिमालय उंचावण्याची ही गती अतिशय मंद असल्यामुळे येथून पूर्वीपासून वाहणाऱ्याद्यांनी आपले मूळ प्रवाह खनन करून कायम ठेवले. उदा., पश्चिमवाहिनी सतलज नदीने येथील उत्तर-दक्षिण पर्वतश्रेणीचे कल्पा (चिनी) येथे सु. ६०० मी. खोल खनन करून हिमालय पार केला आहे. हिमालयनिर्मितीची उत्क्षेपक्रिया चालू असताना तीन वेळा मोठे रेटे बसले. त्यामुळे हिमालयाच्या एकमेकींना समांतर अशा तीन श्रेण्या अस्तित्वात आल्या. भूवैज्ञानिक दृष्ट्या हिमालयाच्या निर्मितीचा हा काळ तृतीयक कालखंडाचा मानला जातो. सर्वांत अलीकडच्या पर्वत निर्माणकारी हालचालींमधून हिमालय पर्वताची निर्मिती झालेली असल्यामुळे ह्याला सर्वांत तरुण पर्वत समजले जाते. गोंडवनभूमी उत्तरेकडे सरकण्याची आणि हिमालयाची उंची वाढण्याची क्रिया अजूनही चालू आहे परंतु ती अतिशय मंद आहे. 

 

हिमालयाच्या निर्मितीबाबत अशीही एक शक्यता वर्तविली जाते की, नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे टेथीसच्या तळभागावर प्रचंड प्रमाणावर निक्षेपण होऊन त्यापासून तेथे गाळाच्या खडकांची निर्मिती झाली. गाळाच्या खडकाच्या राशींमुळे टेथीसच्या तळभागावर प्रचंड वजनाचा दाब पडूनतेथे भूद्रोणी निर्माण झाली. उत्तरेकडील अंगाराभूमी दक्षिणेकडे सरकू लागल्यामुळे गोंडवनभूमी आणि अंगारा या खंडांदरम्यानचे अंतर कमी होऊ लागले. अंगाराभूमीच्या दाबामुळे टेथीसचा तळ हळूहळू वर उचललाजाऊ लागला. कालांतराने तेथे हिमालय या घडीच्या पर्वतश्रेण्यांची निर्मिती झाली. उत्तरेकडून अंगाराभूमीचा दाब पडून हिमालय निर्माण झाल्यानेत्याचा आकार कमानीप्रमाणे झाला असून त्या कमानीचा बहिर्वक्र भाग दक्षिणेकडे आला आहे. 


 

भूपृष्ठ सांरचनिकी सिद्धांतानुसार दक्षिणेकडील भारतीय भूपट्ट आणि उत्तरेकडील यूरोपीयन भूपट्ट यांचा परस्परांवर आघात होऊ लागला.दोन्ही भूपट्ट एकमेकांकडे सरकत राहिल्यामुळे भूपट्टांच्या सीमारेषेवर(कडांवर) दाब पडू लागला. त्या दाबामुळे भूपट्टांच्या कडांवर गिरिजनक हालचाली सुरू होऊन त्यातूनच हिमालयाची निर्मिती झाली असावी, असे मानले जाते. क्रिटेशस कालखंडात (सु. ७० द. ल. वर्षांपूर्वी) भारतीय भूपट्ट वर्षाला १५ सेंमी. या वेगाने उत्तरेकडे सरकत होता. यावेगाने भारतीय भूपट्ट उत्तरेकडे सरकत राहिल्यामुळे सु. ४०–५० द. ल. वर्षांपूर्वी भारतीय व यूरेशियन भूपट्ट एकमेकांना येऊन भिडले. त्यामुळे टेथीस समुद्र पूर्णपणे बंद झाला. कालांतराने टेथीसच्या तळावरीलगाळाच्या खडकांवर पडलेल्या दाबामुळे तो भाग उंचावत गेला आणिशेवटी तेथे हिमालयाची निर्मिती झाली. यातील मौंट एव्हरेस्ट शिखरसागरी चुनखडीच्या खडकांपासून बनलेले आहे. 

 

सांप्रत भारतीय भूपट्ट सातत्याने यूरेशियन भूपट्टाखाली (तेथील तिबेटच्या पठाराखाली) सरकत असल्यामुळे तिबेटच्या पठाराचा भाग उंचावत आहे. किंबहुना तिबेटच्या पठाराची निर्मिती या प्रक्रियेतूनच झालेली आहे. भारतीय भूपट्ट अजूनही वर्षाला ६७ मिमी. या वेगाने उत्तरेकडे सरकत असून यावेगाने पुढील १० द. ल. वर्षांत हे भूपट्ट सु. १,५०० किमी. उत्तरेकडेआशिया खंडाखाली सरकलेला असेल. वर्षाला २० मिमी. वेगाने दोन्हीभूपट्ट एकमेकांजवळ येत असून त्यामुळे हिमालयाची उंची वर्षाला५ मिमी. या वेगाने वाढत आहे. भारतीय भूपट्ट यूरेशियन भूपट्टाखाली सरकण्यामुळे हा भाग क्रियाशील भूकंपप्रवण बनला आहे. म्यानमार-मधील आराकान योमा पर्वत आणि बंगालच्या उपसागरातील अंदमानव निकोबार बेटांच्या उंचवट्याची निर्मिती अशाच प्रकारे भूपट्टांच्या एकमेकांवरील आघातामुळे झालेली आहे.

 

भूविज्ञान : हिमालयाच्या बऱ्याचशा भागाची अचूक भूशास्त्रीय माहिती अद्याप उपलब्ध नाही. हिमालयाची संरचना सामान्यपणे आल्प्ससदृश आहे. सांरचनिक दृष्ट्या हिमालय श्रेणी ही पश्चिमेकडील हिंदुकुश व बलुचिस्तान श्रेण्यांशी आणि पूर्वेकडील चीनमधील सिकँग व पश्चिम म्यानमारमधील श्रेण्यांशी संबंधित असल्याचेही मानले जाते. मध्य हिमालयाच्या आसाच्या भागात आढळणारी अनेक उंच शिखरे ग्रॅनाइट खडकांनी बनलेली आहेत. याशिवाय पट्टिताश्म, सुभाजा व फायलिट या खडकरचना आढळतात. हिमालयात ठिकठिकाणी अगदी प्राचीन अवसादी व रूपांतरित (हिमालयीन अवसादापेक्षाही जुने) खडक आढळतात. 

 

प्राकृतिक रचना : हिमालयाचा उंच उठाव, त्यांवरील हिमाच्छादितभव्य शिखरे, खोलवर विच्छेदित भूमिस्वरूपे, जटिल भूशास्त्रीय संरचना, मोठ्या हिमनद्यांच्या वरच्या टप्प्यांकडील विस्तीर्ण हिमक्षेत्रे, उंच कड्यांवरूनमोठ्याने आवाज करीत कोसळणारे धबधबे, पूर्व प्रस्थापित नदीप्रणाल्या, नद्यांनी तयार केलेल्या खोल घळ्या व रुंद दऱ्या, विविध प्रकारची समृद्धवने इ. भूदृश्ये हिमालयात सर्वत्र आढळतात. पश्चिम भागापेक्षा पूर्वभागातील हिमालयाची मैदानी प्रदेशापासून उंची एकदम वाढलेली दिसते. हिमालयाची दक्षिण सीमा पश्चिम भागात ३०० मी. उंचीच्या समोच्च रेषेने, तर पूर्व भागात ती १५० मी. समोच्च रेषेने सीमित होते. हिमालयातीलखिंडी या जगातील सर्वाधिक उंचीवरील खिंडी आहेत. त्यांपैकी बहुतेकखिंडी नोव्हेंबर ते मे दरम्यान हिमाच्छादित असतात. प्राकृतिकदृष्ट्याहिमालय पर्वतप्रणालीत पश्चिम-पूर्व दिशेत एकमेकींना समांतर पसरलेल्या तीन पर्वतश्रेण्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे (१) बृहत् हिमालयकिंवा हिमाद्री (ग्रेटर हिमालय), (२) छोटा हिमालय किंवा हिमाचल किंवा महाभारत रांग (लेसर किंवा लोअर हिमालय) आणि (३) शिवालिक टेकड्या किंवा बाह्य हिमालय (आउटर हिमालय) याप्रमाणे याश्रेण्या आहेत. 

 

(१) बृहत् हिमालय किंवा हिमाद्री : सर्वांत उत्तरेकडील आणि सर्वाधिक उंचीची ही पर्वतश्रेणी आहे. तिचे हिमाद्री हे प्राचीन नाव असून बृहत् हिमालय हे अलीकडील नाव आहे. हिमालयाच्या उत्तरेला विस्तीर्ण असे तिबेटचे पठार असून या पठाराच्या दक्षिण भागातच हिमाद्री ही पहिलीरांग आहे. कायमस्वरूपी हिमरेषेपेक्षाही उंच असलेली ही एकमेव श्रेणीआहे. त्यामुळे सतत हा भाग हिमाच्छादित असतो. यामध्ये अनेकहिमाच्छादित शिखरे व कटक आढळतात. या रांगेची सरासरी उंचीसु. ६०० मी. असून मौंट एव्हरेस्ट (८,८४८ मी.) हे जगातील सर्वोच्चशिखर याच रांगेत आहे. जगातील सर्वांत उंच १२ शिखरांपैकी ९ शिखरेया रांगेत असून सस.पासून ७,३०० मी. पेक्षा अधिक उंचीची ३० शिखरेया रांगेत आहेत. एव्हरेस्टशिवाय जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंचशिखर कांचनजंघा (८,५९८ मी.), धौलागिरी (८,१७२ मी.), नंगा पर्वत (८,१२६ मी.), नंदादेवी (७, ८१७ मी.), नामचा बारवा (७,७५६ मी.) ही प्रमुख शिखरे आहेत. सर्वाधिक उंची या वैशिष्ट्याशिवाय हिमाच्छादित व तीव्र उताराची खडबडीत शिखरे, मोठमोठ्या हिमनद्या, खोल घळया, समशीतोष्ण कटिबंधीय व अल्पाइन प्रकारची वने ही या श्रेणीची इतर वैशिष्ट्ये आहेत. उत्तरेकडे या श्रेणीचा उतार क्रमाक्रमाने कमी होत जातो.काही प्रमुख नद्यांची खोरी बऱ्याच अंतरापर्यंत या श्रेणीला समांतर जाताना दिसतात. यामध्ये ग्रॅनाइट खडक तसेच रूपांतरित अवसाद आढळतात. 

 

(२) छोटा हिमालय किंवा हिमाचल : हिमाद्रीच्या दक्षिणेस, हिमाद्रीस समांतर अशी सु. ७५ किमी. रुंदीची ही श्रेणी आहे. श्रेणीची सरासरीउंची सु. २,०००–३,००० मी. आहे. या श्रेणीचे दक्षिण उतार तीव्र व उघडे असून उत्तरेकडील उतार मंद आणि वनाच्छादित आहेत. या श्रेणीची दक्षिणेकडील पायथ्यालगतच्या टेकड्यांपासून उत्तरेकडे वेगाने उंची वाढत गेलेली दिसते. या श्रेणीत अनेक ठिकाणी एकमेकींना समांतर अशास्थानिक रांगा पसरलेल्या आढळतात. भूविज्ञानाच्या दृष्टीने याला जरीछोटा हिमालय म्हटले जात असले, तरी यातील शिखरे सु. ५,००० मी. पर्यंतच्या उंचीची आहेत. तसेच काही ठिकाणी वर्षभर हिमाच्छादितभाग आढळतात. काही ठिकाणी ही श्रेणी हिमाद्रीत विलीन झालेलीदिसते. यातील खडक अल्गाँक्वियन ते इओसीन कालखंडातील संपीडित व रूपांतरित स्वरूपाचे आढळतात. 


 

(३) शिवालिक टेकड्या : छोट्या हिमालयाच्या पायथ्यालगतच्याटेकड्या आणि पर्वतश्रेण्यांच्या प्रदेशास शिवालिक या नावाने ओळखलेजाते. याला बाह्य हिमालय असेही संबोधले जाते. शिवालिक टेकड्यांच्या दक्षिणेस उत्तर भारतीय मैदान आहे. या प्रदेशाची सरासरी उंची सु. ६००–१,२२० मीटरच्या दरम्यान असून रुंदी १० – ५० किमी. आहे. शिवालिकच्या अंतर्गत भागात अनेक समांतर कटक आणि सांरचनिक दऱ्या आढळत असून काही ठिकाणी या प्रदेशाची उंची १,५०० मी.पर्यंतही वाढलेली दिसते. सर्वांत अलीकडच्या म्हणजे साधारण मध्य मायोसीन ते लोअर प्लाइस्टोसीन काळातील भूहालचालींमधून या भागाची निर्मिती झालेली आहे. हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन याभागात आढळते. 

 

शिवालिक पर्वतराजीच्या उत्तरेडील डोंगररांगांना समांतर अनुलंब अशी खोरी आढळतात. डोंगररांगांवरून वाहून आणलेल्या खडेमातीने भरलेली ही सपाट तळाची, सुपीक खोरी असून त्यांना दून (ड्रन) असे म्हणतात. उदा., डेहराडून किंवा डेहरा खोरे. हे खोरे सु. ७५ किमी. लांब, २५ किमी. रुंद व ३६०–९०० मी. उंचीपर्यंत चढत गेलेले आहे. शिवालिक भागात आधुनिक सागरी निक्षेप, मृदु वालुकाश्म, शेल, पिंडाश्मयुक्त खडक अशा रचना आढळतात. दक्षिणेकडील पायथ्यालगत अधिक पर्जन्यमान असलेला तराई हा गवताळ व दलदलयुक्त प्रदेश आहे. पायथ्यालगतच्या, परंतु नद्यांच्या पात्रापासून उंचवट्यावरील दगडगोटे व भरड रेती यांच्या जुन्या व जाडसर गाळाच्या प्रदेशास भाबर या नावाने ओळखले जात असून त्याची सस.पासून सरासरी उंची सु. १,३७० मी. आहे. या विभागात दाट वने आहेत. भाबर प्रदेशातील कार्स्ट स्थलरूपांमुळे अनेक नद्यांचे प्रवाह भूमिगत होतात. हे भूमिगत प्रवाह तराई प्रदेशात पुन्हा भूपृष्ठावर येतात. त्यामुळे तराई प्रदेश दलदलयुक्त बनला आहे. या प्रदेशात बोरु-वेताची वने आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार व नेपाळमध्ये तराई प्रदेश आढळतो. 

 

हिमालयाचे प्रादेशिक विभाग : हिमालयाचे पश्चिमेकडून पूर्वेकडेअनुक्रमे (१) पश्चिम हिमालय, (२) मध्य हिमालय व (३) पूर्व हिमालयअशा तीन भागांत विभाजन केले जाते. 

 

(१) पश्चिम हिमालय : पश्चिमेस नंगा पर्वत किंवा सिंधू नदीच्या मोठ्या वळणापासून पूर्वेस नेपाळच्या सरहद्दीपर्यंत किंवा काली नदीपर्यंतच्या हिमालयाचा समावेश पश्चिम हिमालयात केला जातो. या विभागाचे जलवहन सिंधू, यमुना, गंगा या प्रमुख नद्यांनी आणि त्यांच्या उपनद्यांनी केलेले आहे.भारतातील पहाडी राज्य म्हणून ओळखले जाणारे जम्मू व काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातील पर्वतीय प्रदेश या विभागात येतात.सिंधू व तिची उपनदी गिलगिट या दोन्ही नद्यांच्या प्रवाहमार्गांच्या कर्ण-रेषेमुळे जम्मू व काश्मीर राज्याची दोन भागांत विभागणी झाली आहे.या प्रवाहमार्गाच्या उत्तरेकडील भागास ट्रान्स-हिमालय असे संबोधले जाते. यामध्ये वेगवेगळ्या पर्वतश्रेण्यांचा समावेश होतो. अगदी उत्तर सरहद्दीवर अघील श्रेणी आहे. तिच्या दक्षिणेस विस्तृत अशी काराकोरम श्रेणीअसून तिच्यात बलतोरो, बिआफो, सिमो (रोमो), सिआचेन (स्याचेन) यांसारख्या मोठमोठ्या हिमनद्या आणि उंचउंच शिखरे आहेत. येथील हिमनद्यांचा वेग अधिक आहे. जगातील सर्वाधिक उंचीच्या चौदा आठ हजारी (एट थाउजंडर्स) शिखरांपैकी चार शिखरे काराकोरम श्रेणीत आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर के-टू याच पर्वतश्रेणीत आहे. काराकोरमच्या दक्षिणेस कैलास व लडाख पर्वतश्रेण्या आहेत. सिंधू खोऱ्याच्या दक्षिणेस झास्कर पर्वतश्रेणी असून तिच्या दक्षिणेस बृहत् हिमालय आहे. बृहत् हिमालयाच्या दक्षिणेस अनुक्रमे पीर पंजाल, धौलाधार व शिवालिक या पर्वतश्रेण्या आहेत. बृहत् हिमालय आणि पीर पंजाल यांदरम्यानच्या प्रदेशात पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ख्याती असलेले काश्मीर खोरे (व्हॅली ऑफ काश्मीर) आहे. वायव्य-आग्नेय दिशेत पसरलेल्या काश्मीर खोऱ्याची लांबी सु. १५० किमी., रुंदी सु. ८० किमी. व सस.पासूनची सरासरी उंची सु. १,७०० मी. आहे. या खोऱ्यातून झेलम नदी साधारणपणे उत्तरेकडे वाहत जाते. जम्मू व काश्मीरमध्ये भारताच्या पूर्व सरहद्दीवर लानक, कोने, केपसांग, डोमजोर, चांग, जरा, चार्डिंग, इमीस या खिंडी आहेत. 

 

पश्चिम हिमालयाचा जो भाग हिमाचल प्रदेश राज्यात येतो त्या भागात सिमला, कुलू-मनाली यांसारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत. हिमाचल प्रदेशातील भारतीय सरहद्दीवर शिपकी, रानीसो या खिंडी आहेत. पश्चिम हिमालयाच्या उत्तराखंडमधील भागात गंगा, यमुना या प्रमुख नद्यांचीआणि त्यांच्या उपनद्यांची उगमस्थाने आहेत. जम्नोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ इ. पवित्र स्थळे, नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण व प्रसिद्ध पर्यटनकेंद्र, तर नंदादेवी, त्रिशूल, बंदरपूंछ, कामेट ही उंच शिखरे आहेत. उत्तरा-खंडच्या उत्तर सरहद्दीवर थांग, मुलिंग, मान, नीती, तुनजुन, शालशाल, बालचा धुरा, कुंग्रीबिंग्री, लांपिया धुरा, मंगशा धुरा व लिपुलेख या खिंडी आहेत. पश्चिम हिमालयाची विभागणी उत्तर काश्मीर हिमालय, दक्षिण काश्मीर हिमालय, पंजाब हिमालय व कुमाऊँ हिमालय अशा चार उपविभागांत केली जाते. 

 

(२) मध्य हिमालय (नेपाळ हिमालय) : नेपाळमधील हिमालयाचा समावेश सामान्यपणे मध्य हिमालयात (ग्रेटर हिमालय) केला जातो. याचा बहुतांश भाग नेपाळमध्ये असल्यामुळे याला नेपाळ हिमालय असेही म्हणतात. या विभागाने सु. १,१६,८०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. नेपाळ हा पूर्णतः पर्वतीय देश आहे. नेपाळच्या उत्तर सरहद्दीजवळून हिमाद्रीचा मध्य आस गेलेला आहे. नेपाळच्या मध्य भागातील पश्चिम-पूर्व दिशेत सलग पसरलेल्या लेसर हिमालय श्रेणीस महाभारत श्रेणी असे म्हणतात. या श्रेणीच्या दक्षिणेस भारतातील दूनप्रमाणे अनुलंब खोरी आढळतात. त्यांना भित्री मधेश असे म्हणतात. भित्री मधेशच्या दक्षिणेस शिवालिक टेकड्या स्पष्टपणे दिसतात. शिवालिक टेकड्यांच्या दक्षिणेस भाबर प्रदेश आणि तराई वने आढळतात. शेतीसाठी येथील बरीच जंगलतोड झालेली आहे. नेपाळमधून वाहणाऱ्या कर्नाली (घागरा), गंडक व कोसी या तीन प्रमुख नद्यांनी व त्यांच्या उपनद्यांनी नेपाळ हिमालयाचे जलवहन केलेले आहे. या तीन नदीखोऱ्यांना अनुसरून नेपाळ हिमालयाचे तीन उपविभाग केले जातात. यांपैकी धौलागिरी शिखराच्या पश्चिमेस कर्नाली खोरे आहे. पश्चिमेस धौलागिरी गिरिपिंड ते पूर्वेस काठमांडूपर्यंतचा प्रदेश गंडक खोऱ्यात येतो, तर काठमांडूच्या पूर्वेकडील प्रदेश कोसी खोऱ्यात समाविष्ट केला जातो. जगातील आठ हजारी (८,००० मी. पेक्षा अधिक उंचीची) शिखरांपैकी सर्वाधिक शिखरे नेपाळ हिमालयात आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे धौलागिरी, अन्नपूर्णा (८,०७५ मी.), मानास्लू (८,१५६ मी.), गोसाइंतान (८,०१३ मी.), चो ओयू (८,१५३ मी.), मौंट एव्हरेस्ट (८,८४८ मी.), मकालू (८,४८१ मी.), कांचनजंघा ही आठ हजारी शिखरे आहेत. ही सर्व शिखरे विस्तृत हिमप्रदेशाने वेढलेली असून तेथून वेगवेगळ्या हिमनद्यांना हिमाचा पुरवठा होतो. 

 

(३) पूर्व हिमालय : नेपाळच्या पूर्व सरहद्दीवरून वाहणाऱ्या मेची नदीखोऱ्यापासून किंवा सिंगलिआ पर्वतश्रेणीपासून ते पूर्वेस नामचा बारवा भोवतालच्या ब्रह्मपुत्रेच्या मोठ्या वळण भागापर्यंतच्या भागाचा समावेशपूर्व हिमालयात केला जातो. भारतातील सिक्कीम, प. बंगाल (दार्जिलिंग प्रदेश) आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत तसेच भूतानमध्ये पूर्व हिमालयाचा विस्तार झालेला आहे. ब्रह्मपुत्रा, तिस्ता, लोहित, सुबनसिरी, मानसनद्यांनी आणि त्यांच्या उपनद्यांनी या भागाचे जलवहन केले आहे. पूर्व हिमालयाच्या उत्तर सरहद्दीवर जेलेप ला व नथू ला या प्रमुख खिंडीआहेत. हिमालयाच्या या भागाची उंची कमी असून त्यावर घनदाट अरण्ये आहेत. पूर्व हिमालयाचे पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे सिक्कीम हिमालय, दार्जिलिंग हिमालय, भूतान हिमालय व आसाम हिमालय असे चारउपविभाग केले जातात. अरुणाचल प्रदेशातील हिमालयाच्या भागासआसाम हिमालय असे संबोधले जाते. अरुणाचल प्रदेशाच्या पश्चिम भागातील तवांग प्रदेशापासून पूर्वेस म्यानमारच्या सीमेवरील वालाँग प्रदेशापर्यंतभारत-चीन यांदरम्यानची मॅकमहोन ही आंतरराष्ट्रीय सरहद्द हिमालयपर्वतश्रेणीला अनुसरून निश्चित करण्यात आलेली आहे परंतु चीनने यासरहद्द रेषेला मान्यता दिलेली नसल्यामुळे भारत आणि चीन ह्यांच्यातया सीमेबद्दल अद्याप वाद आहे. 

 

भौगोलिक दृष्ट्या हिमालयाचे पश्चिमेकडून-पूर्वेकडे सामान्यपणे पंजाब हिमालय, कुमाऊँ हिमालय, नेपाळ हिमालय व आसाम हिमालय असे चार उपविभाग केले जातात. कित्येकदा काश्मीर हिमालय, पंजाब, कुमाऊँ, नेपाळ, सिक्कीम, दार्जिलिंग, भूतान व आसाम हिमालय अशा उपविभागांतही वर्गीकरण केले जाते. 


 

काश्मीर हिमालय : हिमालयाचा सर्वाधिक रुंदीचा भाग जम्मू व काश्मीर राज्यात आहे. येथील हिमालयाची पश्चिम-पूर्व लांबी सु. ७०० किमी. व उत्तर-दक्षिण रुंदी सु. ५०० किमी. असून क्षेत्रफळ सु. ३,५०,००० चौ. किमी. आहे. येथील भूमिस्वरूपे, वनाच्छादन, मृदा प्रकार, हवामान व प्रदेशाची सुगमता इ. घटकांमध्ये बरीच विविधता आढळते. हिमालयाच्या इतर कोणत्याही उपविभागापेक्षा काश्मीर हिमालयात सर्वाधिक हिमाच्छादन व हिमनद्या आढळतात. काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे अनेक उंचउंच कर्णाकृती पसरलेल्या रांगा आणि तटबंदीयुक्त रांगांच्या दरम्यान द्रोणीसारखी अनुदैर्घ्य खोरी आढळतात, त्याप्रमाणे हिमालयाच्या अन्य कोणत्याही भागांत आढळत नाहीत. येथील बृहत् हिमालय श्रेणीमुळे उत्तर काश्मीर हिमालय वदक्षिण काश्मीर हिमालय असे दोन भाग झाले आहेत. काश्मीरमधील बृहत् हिमालय श्रेणी नंगा पर्वतापासून पूर्वेस सु. ८५० किमी. अंतरापर्यंत वेड्यावाकड्या स्वरूपात पसरली असून तेथील तिची सरासरी उंची ५,५०० मी. आहे. काश्मीर हिमालयाचा ईशान्य भाग लडाख पठाराने व्यापला आहे. या पठाराची सरासरी उंची सु. ५,३०० मी. आहे. भारतातील हे सर्वाधिक उंचीचे पठार आहे. भूतकालीन हिमानी क्रियांचे तसेच स्थलिप्राय मैदानांचे पुरावे येथे दिसतात. हिमाद्रीच्या दक्षिणेस वैशिष्ट्यपूर्ण हिमाचल श्रेण्या आहेत. हिमाचल पट्ट्याची येथील रुंदी सु. १०० किमी. व सरासरी उंची सु. ३,००० मी. आहे. काश्मीरमधील शिवालिक टेकड्या जम्मू प्रदेशात असून त्यांना जम्मू टेकड्या असेही संबोधले जाते. या टेकड्यांचा विस्तार झेलम नदीपासून ते रावी नदीपर्यंत आहे. शिवालिकच्या मैदानी प्रदेशात चिनाबची उपनदी रावी हिच्या काठावर जम्मू शहर वसले आहे. 

 

पंजाब हिमालय : पंजाब व हिमाचल प्रदेशातील पर्वतराजीला पंजाब हिमालय असे म्हणतात. क्षेत्रफळ सु. ४५,००० चौ. किमी. चिनाब, रावी, बिआस, सतलज आणि त्यांच्या उपनद्यांनी या हिमालयीन भागाचे जलवहन केले आहे. 

 

कुमाऊँ हिमालय : उत्तराखंडमधील पर्वतराजीला कुमाऊँ हिमालय असे संबोधले जाते. सतलज व काली (शारदा) या नद्यांच्या दरम्यानचा भागयात येतो. गंगा व यमुना नद्यांची उगमस्थाने या दृष्टीने कुमाऊँ हिमालयाला महत्त्व आहे. या विभागाचा विस्तार सु. ३८,००० चौ.किमी. असून शिवालिक, हिमाचल आणि हिमाद्री या तिन्ही पर्वतश्रेण्यांचे क्षेत्र स्पष्टपणे यामध्ये दिसते. यांपैकी शिवालिक प्रदेश यमुना व गंगा नद्यांदरम्यानच्यासु. ७४ किमी. लांबीच्या क्षेत्रात पसरला आहे. या भागातील उतार वनाच्छादित असून त्यात ९०० – १,००० मी. उंचीची सपाट माथ्याची शिखरे आढळतात. शिवालिकच्या उत्तरेस शिवालिकला समांतर अशा संरचनात्मक द्रोणीनिर्माण झाल्या आहेत. पूर्वेकडील भागापेक्षा पश्चिमेकडील भागात याद्रोणी अधिक विकसित झालेल्या आढळतात. उदा., पश्चिम भागातील डेहराडून द्रोणी सु. ७५ किमी. लांबीची व १५–२० किमी. रुंदीची आहे. कुमाऊँ हिमालयातच शिवालिकच्या व प्रामुख्याने द्रोणी प्रदेशाच्याउत्तरेस असलेल्या हिमाचल हिमालयात मसूरी व नाग टिब्बा या दोन श्रेण्यांचा समावेश होतो. त्यांपैकी सु. १२० किमी. लांबीच्या मसूरी--श्रेणीत सु. २,०००–२,६०० मी. उंचीची मसूरी व रानीखेतसारखीअनेक गिरिस्थाने आहेत. त्यांपैकी मसूरीला हिमालयातील गिरिस्थानांची राणी असे संबोधले जाते. नैनिताल शहराजवळ अनेक सरोवरे (ताल) असून त्यांपैकी नैनिताल आणि भीमताल ही सरोवरे विशेष सुंदरआहेत. नंदादेवी व त्रिशूल ही येथील हिमाचल श्रेणीतील प्रमुख शिखरे आहेत. कुमाऊँ हिमालयातील हिमाद्रीमध्ये सु. ६,६०० चौ. किमी. क्षेत्र हिमाच्छादित (हिमाल) आहे. गंगोत्री हिमालमधून गंगोत्री व केदारनाथया हिमनद्यांना, तर नंदादेवी हिमालपासून मिलम व पिंडारी या हिम-नद्यांना हिमाचा पुरवठा होतो. गंगोत्री हिमनदीची लांबी ३० किमी. असून तिच्या चार उप हिमनद्या प्रत्येकी सु. आठ किमी. लांबीच्या आहेत. बद्रीनाथपासून कुमाऊँ हिमाद्रीमधील उंचउंच शिखरे दिसतात. नंदादेवीहे यांतील सर्वोच्च शिखर असून त्याशिवाय दूनगिरी (७,०६६ मी.), त्रिशूल (७,१२० मी.), नंदाकोट (६,८६१ मी.), नंदाकाना (६,३०९ मी.), नंदाघुंटी (६,०६३ मी.), कामेट (७,७५६ मी.), सतोपंथ (७,०८४ मी.), बद्रीनाथ (७,१३८ मी.), केदारनाथ (६,९४० मी.), गंगोत्री (६,६१४ मी.) व श्रीकांता (६,७२८ मी.) ही यातील इतर प्रमुखशिखरे आहेत. 

 

सिक्कीम हिमालय : सिक्कीम हिमालयाची पश्चिम सरहद्द सिंगलिआ ( सिंगलिला) श्रेणीने, तर पूर्व सरहद्द डोंख्या श्रेणीने सीमित केलेली आहे. हिमाद्री श्रेणी सिक्कीममध्ये आल्यानंतर तिची दिशा पूर्व बनलेली आहे. या दिशेत काही अंतर गेल्यानंतर ती ईशान्येकडे वळलेली दिसते. या भागात हिमालयाच्या दक्षिण सरहद्दीवर शिवालिक श्रेणीची केवळ एक अरुंद पट्टी दिसते. सिक्कीम हिमालयात तिस्ता नदीचे विस्तृत खोरे आहे. सिक्कीम व चुंबी खोरे यांदरम्यानचे व्यापारी मार्ग नथू ला व जेलेप या खिंडींतून जातात. 

 

दार्जिलिंग हिमालय : दार्जिलिंग हिमालयात उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या सिंगलिआ व दार्जिलिंग या दोन प्रमुख श्रेण्या आहेत. त्यांपैकी सिंगलिआ श्रेणीमुळे दार्जिलिंग जिल्हा (प. बंगाल) नेपाळपासून अलग झाला आहे. दार्जिलिंग श्रेणी तराई मैदानापासून सेंचल शिखरापर्यंत एकदम वाढत गेलेली दिसते. या हिमालयीन भागात सु. २,१०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी चहाचे मळे आहेत. या हिमालयीन भागाचे जलवहन मेची, बालासन, महानंदा, ग्रेट रनगीट व तिस्ता नद्यांनी केलेले आहे. त्यांपैकी तिस्ता ही सर्वांत मोठी नदी आहे. 

 

भूतान हिमालय : भूतान हिमालयाने सु. २२,५०० चौ. किमी. क्षेत्रव्यापले असून त्यात खोल दऱ्या आणि उंच पर्वतरांगा आढळतात. थोड्याशा अंतरात भूमिस्वरूपात एकदम बदल झालेले दिसतात. त्याचा येथील हवामानावर परिणाम झालेला दिसतो. भूतानच्या एका दिवसाच्या प्रवासात सायबीरियन हिवाळ्यासारखे अति थंड हवामान, सहारासारखे अतिशयउष्ण हवामान आणि इटलीतील भूमध्य सागरी प्रकारचे सौम्य आल्हाद-दायक हवामानही अनुभवास येते. भूतान हिमालयात तोसी नदीच्यापूर्वेस शिवालिक श्रेण्या पुन्हा दिसू लागतात. तेथून त्या पुढे देशाच्यापूर्व भागापर्यंत आढळतात. भूतान हिमाचलमध्ये उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या श्रेण्या दिसतात. उदा., मसंग क्यूंगडू, थिंफू. थिंफू श्रेणीच्या पूर्वेस अतिशय ओबडधोबड असे पुनाखा खोरे आहे. 

 

आसाम हिमालय : हिमालयाचा हा सर्वांत पूर्वेकडील भाग अरुणाचल प्रदेशात विस्तारलेला आहे. क्षेत्रफळ सु. ६७,५०० चौ. किमी. येथेहिमाद्री, हिमाचल व शिवालिक हे तीनही भाग स्पष्टपणे दिसतात. येथील सृष्टिसौंदर्यामध्ये खूपच विविधता आढळते, तसेच वनाच्छादित शिवालिक टेकड्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यापासून एकदम सु. ८०० मी. उंचीपर्यंत वाढत गेलेल्या दिसतात. हिमाचल श्रेण्यांमध्ये समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारची वने आढळतात. आसाम हिमाद्रीचा विस्तार नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत असून त्यात ६,००० मी. पेक्षा अधिक उंचीची अनेक शिखरे आहेत. 


 

ईशान्येकडील पर्वतरांगा व टेकड्या (पूर्वांचल) : ब्रह्मपुत्रा नदी-पात्राच्या व नामचा बारवा शिखराच्या पूर्वेस काही अंतरापर्यंत पर्वतरांगाव टेकड्यांचा प्रदेश आहे. भारताच्या अगदी ईशान्य भागात या रांगा दक्षिणेकडे वळलेल्या दिसतात. पुढे त्यांचा विस्तार भारत-म्यानमार सरहद्दीवरून दक्षिणेकडे गेलेला आहे. म्यानमारमधून पुढे मलेशियाच्या द्वीपकल्पापर्यंत आणि त्यानंतर इंडोनेशिया बेटांवरील पर्वतश्रेण्यांच्या स्वरूपात त्यांचा विस्तार आढळतो. या सर्व पर्वतरांगा व टेकड्या वेगवेगळ्या प्रादेशिक व स्थानिक नावांनी ओळखल्या जातात. ब्रह्मपुत्रेच्या पूर्वेकडील आणिपुढे दक्षिणेकडील या पर्वतरांगा मुख्य हिमालयात समाविष्ट होत नसल्यातरी त्या हिमालयाच्याच विस्तारित व संबंधित रांगा मानल्या जातात. प्राकृतिक दृष्ट्या ईशान्येकडील हा विभाग पूर्णपणे पर्वतीय नसून त्यामध्ये कमी उंचीच्या टेकड्या, पठारे तसेच मैदानेही आहेत. तृतीयक कालखंडा-तील वलीकरण प्रक्रियेबरोबरच या पर्वतीय प्रदेशाचे उत्थापन झालेलेआहे. ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश पूर्वांचल, मेघालय पठार आणि आसामचे खोरे अशा तीन प्राकृतिक उपविभागांत विभागला जातो. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालय या राज्यांत वेगवेगळ्या रांगा व टेकड्या आढळतात. या संपूर्ण भागाला पूर्वांचल (पूर्वेकडीलपर्वत) असे संबोधले जाते. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे मिशमी, पातकई, नागा, मणिपूर, मिझो किंवा लुशाई या नावांनी या टेकड्या ओळखल्याजात असून त्या भारत-म्यानमार सरहद्दीवर पसरल्या आहेत. या सर्वटेकड्या कमानदार स्वरूपात असून त्यांची बहिर्वक्र बाजू भारताकडे आहे. या टेकड्या घनदाट वनांनी वेढलेल्या आहेत. या प्रदेशात झूम हीभटकी शेती केली जाते. मेघालय पठार हा आज जरी ईशान्येकडीलपर्वतरांगांचाच एक भाग मानला जात असला, तरी प्रत्यक्षात हा द्वीपकल्पीय भारताच्या संपुंजित खंडाचाच एक विस्तारित भाग आहे. पुरातन काळातया द्वीपकल्पाच्या पूर्वेला एक मोठा खोलगट भाग होता, तो गंगा वब्रह्मपुत्रा नद्यांच्या संचयनकार्यामुळे भरून आला. मध्यजीव महाकल्पात आणि तृतीयक महाकल्पाच्या सुरुवातीच्या काळात सागरी अतिक्रमणामुळे या पुरातन भूमीच्या काही भागाचे निमज्जन झाले. तद्नंतर टेथीसच्या जागेवर ज्याप्रमाणे हिमालयाची निर्मिती झाली, त्याचप्रमाणे येथेही सागरतळाचाभाग हळूहळू उंचावत जाऊन मेघालय पठाराची निर्मिती झाली. दक्षिणेकडील सुरमा नदीखोऱ्याकडून पाहिले असता या पठाराचा मध्य आणि पूर्व भाग टेबललँडसारखा दिसतो. या पठाराच्या कडा अगदी तीव्रस्वरूपाच्या आणि कड्याप्रमाणे आहेत. या पठारी भागावरून मैदानी प्रदेशाकडे वाहणाऱ्याद्यांच्या प्रवाहमार्गात अनेक धबधबे निर्माण झालेले आहेत. तसेच नद्यांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. या पठारी भागावरच गारो, खासी व जैंतिया या टेकड्या पसरल्या आहेत. खासी टेकडीत असलेले चेरापुंजी पठार हे भारतातील संरचनात्मक मंचाचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण असून येथील चेरापुंजी व मॉसिनराम या ठिकाणी जगातील सर्वाधिक पर्जन्याची नोंद झाली आहे. विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे मेघालयाची पर्वतीय भूमी सतत मेघाच्छादित राहते. यावरूनच या प्रदेशाला मेघालय (मेघांचे आलय) हे नाव पडले आहे. आसाम खोऱ्याला तर उत्तरेकडून आणि दक्षिणेकडूनही उंच पर्वतरांगांनी वेढलेले आहे. 

 

मृदा : हिमालयात विविध प्रकारच्या मृदा आढळतात. प्रदेशाची उंची, उताराचे स्वरूप, वनाच्छादन, धूपेचे प्रमाण, पूर्वीच्या आणि आताच्या हिमानी क्रिया इ. घटकांशी मृदाप्रकार निगडित आहेत. सखल भागांत जेथे मैदानी प्रदेश आणि टेकड्या एकमेकांना भिडल्या आहेत, अशा भागांत जाडी रेवव भरड वाळू आढळते. ज्या भागातून नद्या वाहतात त्यांच्यालगत काही ठिकाणी गाळाच्या मृदेचे पट्टे, तर काही भागांत तांबडी लोम मृदा आढळते. मध्य आणि खालच्या भागातील श्रेण्यांमधून वाहणाऱ्याद्यांच्या काठांवर, तसेच काठालगतच्या पायऱ्यापायऱ्याच्या उतारांवर गाळाची सुपीक मृदा आढळते. उष्ण कटिबंधीय अरण्यांच्या प्रदेशात वरच्या थरात ऑक्सिडीकरण झालेले असले, तरी कुजट पदार्थांचे प्रमाण अधिक असलेली निक्षालित मृदा आढळते. पाइन वृक्षांच्या अरण्यमय प्रदेशात अम्लीय व पॉडझॉल मृदा, ओक वृक्षांच्या अरण्यमय प्रदेशात तपकिरी मृदा आणि दलदलीच्या प्रदेशात पीट मृदा आढळतात. तीव्र उताराच्या प्रदेशात अपक्व किंवा पातळ खडकाळ मृदा, अधिक उंचीच्या प्रदेशात हिमनदीय निक्षेप मृदा, हिमायित प्रदेशात धोंडे-माती आणि हिम-जलोढीय मृदा, तर हिमरेषेजवळच्या थंड प्रदेशात अपरिपक्व मृदा आढळतात. 

 

हिमनद्या : अंटार्क्टिका आणि आर्क्टिकखालोखाल सर्वाधिक हिम व बर्फाच्छादनाचा प्रदेश हिमालयातच आहे. हिमालयाचे अक्षवृत्तीय स्थान कर्कवृत्तापासून जवळ असतानाही हिमालयातील कायम हिमरेषा जगातसर्वाधिक उंचीवर (सु. ५,५०० मी.) आढळते. याउलट न्यू गिनी बेटा-वरील पर्वतशिखरे, मध्य आफ्रिकेतील मौंट रूवेनझोरी आणि दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामधील पर्वतशिखरे विषुववृत्तीय प्रदेशात असूनही तेथील हिमरेषा सु. ९०० मी. उंचीच्या दरम्यान आहे. हिमालयातील अधिक उंचीचे प्रदेश वर्षभर हिमाच्छादित असतात. त्यांमधून अनेक हिमनद्याउगम पावतात. हिमाच्छादित प्रदेश आणि हिमनद्यांमुळे येथे उगम पावणाऱ्या मोठमोठ्या नद्यांना बारमाही पाणीपुरवठा होतो. हिमालय पर्वतश्रेणीतसु. १५,००० हिमनद्या असून त्यांत सु. १२,००० घ. किमी. गोडे पाणी सामावलेले आहे. येथील गंगोत्री, जम्नोत्री (उत्तराखंड), खुम्बू (नेपाळ) आणि झेमू (सिक्कीम) या प्रमुख हिमनद्या आहेत. गंगोत्री या हिमनदीची लांबी सु. ३२ किमी. आहे. खुम्बू हिमनदी नेपाळमध्ये एव्हरेस्ट शिखराच्या परिसरात प्रतिदिनी अंदाजे ३० सेंमी.ने, तर काराकोरम श्रेणीत बालतोरो हिमनदी प्रतिदिनी अंदाजे दोन मीटरने पुढे सरकते. 

 

नद्या : हिमालयात असंख्य नद्यांची उगमस्थाने आहेत. अनेक हिमालयीन नद्या पूर्वप्रस्थापित स्वरूपाच्या व हिमालयापेक्षाही जुन्या आहेत. हिमालयाचे उत्थापन अगदी मंद गतीने होत होते. त्याच वेळी या नद्यांनी पात्राचेअधोगामी खनन करून आपला प्रवाहमार्ग कायम राखला. त्यामुळे या नद्यांनी हिमालयात खोल घळयांची निर्मिती केलेली आहे. गंगा, सिंधूव ब्रह्मपुत्रा (त्सांगपो) यांसारख्या जगातील प्रसिद्ध नद्यांचे व त्यांच्या उपनद्यांचे उगम हिमालय पर्वतप्रणालीतच होतात. अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या अशा त्यांच्या प्रमुख दोन नदीप्रणाल्या निर्माण झाल्या आहेत. त्यांपैकी पश्चिमवाहिनी नदीप्रणालींमध्ये सिंधू प्रणाली सर्वांत मोठी आहे. कैलास पर्वतात उगम पावणारी सिंधु नदी संपूर्ण हिमालय पार करून प्रथम भारतातून व त्यानंतर पाकिस्तानातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. मार्गात अनेक ठिकाणी तिने खोल घळया निर्माण केल्या आहेत. भारताच्या उत्तर भागातील काराकोरम तिच्या पश्चिमेकडील हिंदुकुश आणि पूर्वेकडील लडाख या पर्वतश्रेण्यांमुळे सिंधु नदीचे खोरे मध्य आशियाई नद्यांच्या खोऱ्यांपासून अलग झाले आहे. तिच्या ज्या पाच नद्यांवरून पंजाब (पाच नद्यांमधील दुआब प्रदेश) हे नाव पडले आहे त्या झेलम, चिनाब, रावी, बिआस आणि सतलज याही हिमालय पर्वतप्रणालीतच उगम पावतात. 

 

हिमालयातील इतर बहुतांशी नद्या गंगा-ब्रह्मपुत्रा खोऱ्यांकडे वाहतजातात. या खोऱ्यातील नद्यांमध्ये गंगा, यमुना व ब्रह्मपुत्रा (त्सांगपो) या प्रमुख नद्यांचा आणि त्यांच्या अनेक उपनद्यांचा समावेश होतो. गंगा-ब्रह्मपुत्रा यांचा संयुक्त प्रवाह बंगालच्या उपसागराला मिळतो. गंगा, यमुना, काली, शारदा या नद्या हिमालयातील मध्यवर्ती हिमाच्छादित श्रेणीत उगम पावतात. पावसाळ्यात हिमालय परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे, तर उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे येथील नद्यांना बारा महिने भरपूर पाणी असते. नद्यांचे बारमाही स्वरूप आणि अनुकूल प्राकृतिक रचनेमुळे त्यांच्यात जलविद्युत्शक्ती निर्मितीची खूप मोठी संभाव्यता आहे. प्रत्यक्षात क्षमतेच्या तुलनेत अतिशय अल्प प्रमाणात वीज निर्माण केली जाते. हिमालयीन नद्यांनी हिमालयातून वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे पश्चिमेस पंजाबपासून ते पूर्वेस आसामपर्यंत गाळाचे विस्तृत सुपीक मैदान तयार झाले आहे. 


 

सरोवरे : हिमालयीन प्रदेशात अनेक सरोवरे असून ती प्रामुख्याने ५,००० मी. पेक्षा कमी उंचीवर आढळतात. वाढत्या उंचीनुसार सरोवरांचा आकार कमी होताना दिसतो. नेपाळमधील अन्नपूर्णा गिरिपिंडात असणारे तिलिचो त्सो हे जगातील सर्वाधिक उंचीवरील सरोवरांपैकी एक आहे. जम्मू व काश्मीर राज्यात श्रीनगरजवळ प्रसिद्ध दल सरोवर, तर झेलम नदीच्यापात्रात वुलर सरोवर आहे. हिमालयात हिमोढाच्या संचयनामुळे काहीसरोवरे निर्माण झाली आहेत. काश्मीरमध्ये पहलगामवरून अमरनाथकडे जाणाऱ्या मार्गावर असलेले सिशरम नाग सरोवर या प्रकारचे आहे.कोलहोई (५,४२५ मी.) शिखरापासून बाहेरच्या बाजूस पसरलेल्या लहान खोऱ्यांमध्ये असणारी हर नाग व दूध नाग सरोवरे याच प्रकारची आहेत. काश्मीरमधील श्योक खोऱ्यात अनेकदा हिमनदीच्या अडथळ्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाची सरोवरे निर्माण होतात. लडाख आणि रूप्शू प्रदेशात आढळणारी सॉल्ट सरोवर, पंगाँग त्सो (सरोवर) व त्सो मोरारी ही सरोवरे सातत्याने आटत असून त्यांचे पाणी दिवसेंदिवस मचूळ बनत आहे. हिमालयाच्या पलीकडे तिबेटच्या पठारावर मान सरोवर, राक्षसताल, यामड्रॉक त्सो ही प्रसिद्ध सरोवरे आहेत. अधिक उंचीच्या भागात विखुरलेल्या स्वरूपात अनेक सरोवरे आढळतात. त्यांपैकी काही सरोवरे भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या बांधांमुळे तयार झाली आहेत. पंजाब हिमालयातील स्पिती नदीच्या वरच्या खोऱ्यात सस.पासून ४,४२० मी. उंचीवर आढळणारे चंद्रताल सरोवर या प्रकारचे आहे. काही वेळा कडे कोसळल्यामुळे किंवा हिमप्रपातामुळेही सरोवरे निर्माण होतात. सिक्कीमच्या उत्तर भागात गुरूडोंगमर चो व त्सांगमो ही सरोवरे आहेत. 

 

हवामान : भारतीय उपखंडातील तसेच तिबेटच्या पठारावरील हवामानावर हिमालयाच्या पश्चिम-पूर्व विस्ताराचा आणि अधिक उंचीचा फार मोठा परिणाम झालेला आहे. हिमालयाच्या वेगवेगळ्या भागांतील हवामानात व पर्जन्यमानात बरीच तफावत आढळते. पश्चिमेपेक्षा पूर्व भागातीलहवामान अधिक उबदार आणि आर्द्र असते. उत्तर आणि दक्षिण भागांतील हवामानातही बरीच तफावत निर्माण झाली आहे. अधिक उंचीमुळेहिवाळ्यात उत्तरेकडून मध्य आशियातून वाहत येणारे खंडीय अतिशीतवारे हिमालयाला अडतात. हिमालय ओलांडून ते दक्षिणेकडे येऊ शकत नाहीत. त्यामुळे भारतीय उपखंडाचे या अतिशीत वाऱ्यांपासून संरक्षण झाले आहे. त्यामुळे हिमालयाच्या उत्तरेकडील हवामानापेक्षा दक्षिणेकडील हवामान अधिक उबदार असते. हिमालयामुळेच भारतीय भूमीवर मोसमी प्रकारचे हवामान स्थिरावत असते. दक्षिणेकडील हिंदी महासागरावरून वाहत येणाऱ्या बाष्पयुक्त नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गातील हिमालय पर्वताला अडलेल्या वाऱ्यांपासून उत्तर आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस तसेच हिमवृष्टी होते. याउलट उत्तरेकडील तिबेटचे पठार पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्यामुळे तेथे पाऊस अतिशय कमी पडतो. परिणामतः तेथे ओसाड हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात हिमालयात पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे पर्जन्यमान आणि पर्जन्याचा कालावधी कमीकमी होत जातो. पूर्व हिमालयीन भागात ते सर्वाधिक, नेपाळमध्ये मध्यम तर, तेथून पश्चिमेकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीरमध्ये आणखी कमीकमी होत गेले आहे. हिमालयाच्या दक्षिण उतारावर असलेल्या दार्जिलिंग येथे ३०५ सेंमी., सिमला व मसूरी येथे सु. १५३ सेंमी. आणि हिमाद्रीच्या उत्तर भागातील काश्मीरमधील स्कार्डू, गिलगिट व लेह येथे केवळ ८–१५ सेंमी. पाऊस पडतो. मध्य आशियातील ताक्लामाकान व गोबी वाळवंटाच्या निर्मितीस हिमालय पर्वताचे स्थान कारणीभूत ठरले आहे. 

 

हिवाळ्यातील हवामानात उंचीनुसार तफावत आढळते. पर्वताच्या पायथ्यालगतच्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय हवामान, तर अधिक उंचीच्याभागात कायमस्वरूपी हिम व बर्फाच्छादन आढळते. सु. ६०० मी. उंचीपर्यंतच्या सखल खोऱ्यांमध्ये उष्ण व आर्द्र हवामान आढळते. त्यानंतरसु. २,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात क्रमाक्रमाने शीतलता वाढत जाते. सु. ३,००० मी. उंचीपर्यंतच्या भागात थंड हवामान, तर त्यानंतरच्या हिमरेषेनंतरच्या प्रदेशात आर्क्टिक ते ध्रुवीय प्रकारचे हवामान आढळते. दक्षिणाभिमुख उतार अधिक सूर्यप्रकाशित व अधिक पर्जन्याचे असतात. हिवाळी ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात सु. ३,०००–५,००० मी.उंचीच्या प्रदेशात अतिशय वेगाने वारे वाहतात. रोहतांग खिंडीत तर ती ओलांडताना माणूस किंवा मेंढीसुद्धा वाऱ्याबरोबर उडून जाऊ शकेल, इतके वेगवान वारे असल्याचे सांगितले जाते. हिवाळ्यात मध्य कटिबंधीय जागतिक पश्चिमी वारे हिमालयाच्या पश्चिम भागात अधिक सक्रिय असतात. त्यांच्याबरोबरच येथे आवर्तीय न्यूनभार प्रदेश तयार होतो. हा प्रदेश पश्चिमेकडे सरकत जातो. आग्नेयीकडून येणारे उबदार वारे या प्रदेशाला मिळाल्यानंतर येथे आर्द्रतेचे प्रमाण वाढते. सीरस व सीरोक्युम्युलस प्रकारच्या ढगांचीनिर्मिती होते. तेथे निर्माण होणाऱ्या या वातावरणीय स्थितीला पश्चिमीविक्षोभ (न्यूनभार) असे म्हणतात. यामुळे येथील कमी उंचीच्या भागात अल्प प्रमाणात पाऊस पडतो, तर अधिक उंचीच्या प्रदेशात हिमवृष्टी होते. काही वेळा त्यांच्याबरोबर येथे ब्लिझर्ड ही हिमवादळे निर्माण होतात.त्यांमुळे हवाई वाहतुकीत अडथळे येतात व अधिक उंचीवरील खिंडी वाहतुकीस बंद होतात. न्यूनभार तीव्र असल्यास तुफान वृष्टी होते. पश्चिमी विक्षोभाची तीव्रता पूर्वेकडे कमीकमी होत जाते. 

 

हिमालयातून वाहणाऱ्याद्या वेगवान असल्यामुळे त्या क्वचितच गोठतात. तिबेटकडील उतारापेक्षा भारताकडील उतारावरील हिमनद्या बऱ्याच कमी उंचीपर्यंत आढळतात. उत्तरेकडील भागात सस.पासून ४,५७५ मी.पर्यंत, तर दक्षिणेकडील उतारावर त्या सामान्यपणे ३,५०५ मी.पर्यंत खाली उतरतात. भारताकडील बाजूपेक्षा तिबेटकडील बाजूवर हिमरेषा बरीच उंचावरआहे कारण तेथे हिमवृष्टी अधिक होते. दक्षिणाभिमुख उतारावर हिमरेषासस.पासून ४,७२५ मी.वर, तर उत्तरेकडील तिबेटच्या पठारावर ती६,१०० मी. उंचीवर आढळते. पश्चिम भागात हिमरेषा कमी उंचीवर, तरपूर्व भागात ती जास्त उंचीवर आहे. काश्मीरमध्ये सामान्यतः सस.पासून१,६०० मी. उंचीपर्यंत हिमवृष्टी होतच असते. 

 

वनस्पती व प्राणी : हिमालयाच्या वेगवेगळ्या भागातील हवामानामधील भिन्नता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाशाची उपलब्धता, प्रदेशाची उंची, मृदा प्रकार इ. घटकांमधील तफावतीनुसार वनस्पती व प्राणिजीवनात विविधता आढळते. येथे उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि टंड्रा प्रकारचे हवामान आढळत असल्यामुळे त्या त्या हवामानाला अनुसरून वनस्पतींचे प्रकार आढळतात. उंचीनुसार त्यांमध्ये तफावत दिसते. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील प्रदेशातील वनस्पती प्रकारांतही फरक दिसतो. पूर्व भागात वनांचे प्रमाण अधिक आहे. ओक, पाइन, फर, र्‍होडोडेंड्रॉन, बर्च (भूर्ज), बीच, ज्युनिपर व देवदार हे हिमालयात आढळणारे सर्वसामान्य वृक्ष आहेत. दक्षिणेकडील तीव्र उतारांवर सस.पासून ९१० मी. उंचीपर्यंत अंजीर व ताडासारखे उष्ण कटिबंधीय वृक्ष, सुमारे २,१०० मी. उंची पर्यंतओक, चेस्टनट व लॉरेल वृक्ष आणि ३,६६० मी. पेक्षा अधिक उंचीवर सीडार व इतर सूचिपर्णी वृक्ष आढळतात. साल, टून, सिसू, देवदार या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पती आहेत. पर्वताच्या उतारांवर र्‍होडोडेंड्रॉन जातीची फुलझाडे दिसतात. जंगलांमध्ये अनेक झुडुपे आणि वेली वाढलेल्या दिसतात. समुद्रसपाटीपासून सु. १,५०० मी. उंचीच्या प्रदेशात चहाच्या मळ्यांची लागवड केली जाते. पर्वताच्या दक्षिण उतारांवर सु. १,८०० मी. उंचीपर्यंत तांदूळ, मका आणि ज्वारवर्गीय धान्यपिके, तर अधिक उंच भागात गहू व बार्लीचे उत्पादन घेतले जाते. 


 

प्रदेशाची उंची आणि पर्जन्यमानावर आधारित हिमालयातील अरण्यांचेउष्ण कटिबंधीय, उपोष्ण कटिबंधीय, शीत कटिबंधीय, अल्पाइन व स्टेपीवने असे वेगवेगळे प्रकार पाडता येतात. हिमालयाच्या पायथ्याशी उष्ण कटिबंधीय पानझडी वने आढळतात. ती प्रामुख्याने तराई नावाने परिचितआहेत. साल हा यांतील सर्वत्र आढळणारा महत्त्वाचा वृक्ष आहे. काश्मीर खोऱ्यात रुंदपर्णी पानझडी वने आहेत. यांमध्ये वॉलनट, चेस्टनट, चिनार, विलो, तुती, बांबू, देवदार, र्‍होडोडेंड्रॉन इ. वृक्ष आढळतात. पूर्वेकडे ओक, पाइन व र्‍होडोडेंड्रॉन अशी मिश्र वने आहेत. वायव्य काश्मीरमधील उघड्या खडकाळ व कंकर प्रदेशात उपोष्ण कटिबंधीय वने आहेत. यांमध्ये शुष्क काटेरी तसेच इतर प्रकारची झुडुपे व वृक्ष आढळतात. नंगा पर्वतात सु. २,००० मी. उंचीपर्यंत आणि सॉल्ट रेंजच्या पायथ्यालगत तसेच जम्मू व काश्मीरमधील शिवालिक टेकड्यांच्या दोन्ही उतारांवर असे वनस्पतीप्रकार आहेत. झेलम, चिनाब व सतलज या नद्यांच्या खोऱ्यांतील सस.पासून सु. ५००–१,५०० मी. उंचीच्या आणि सु. ८० सेंमी. पर्जन्य असलेल्या प्रदेशात उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आहेत. यांमध्ये कमी उंचीचे वृक्ष, लहान व सदाहरित पाने असलेली व काटेरी झुडुपे आढळतात. दार्जिलिंग, सिक्कीम व भूतान प्रदेशांत १,८००–२,५०० मी. उंचीच्या प्रदेशात सदाहरित पर्वतीय वने आढळतात. ही अरण्ये घनदाट असून तेथे मंडपी (कॅनॉपी) रचना दिसते. वृक्षांची उंची ३० मी. पर्यंत आढळते. येथे विविध प्रकारचे ओक, मॅग्नोलिया, र्‍होडोडेंड्रॉन इ. वृक्षांची विस्तृत वने आहेत. जंगलात हरिता, आर्किड व दगडफूल यांची रेलचेल दिसते. पश्चिम भागात अधिक उंचीवर उप-अल्पाइन वने आहेत. त्यांत बर्च, जूनिपर व र्‍होडोडेंड्रॉन वनस्पती अधिक आहेत. हिमरेषेच्या खालच्या भागात क्रमाने अल्पाइन खुरट्या वनस्पती व गवत आढळते. तसेच काही औषधी वनस्पती सापडतात. गवताळ प्रदेशाच्या वरच्या सीमाभागात गुग्गुळ ही सुवासिक झुडुपे आढळतात. अल्पाइन गवताळ प्रदेशात विविध प्रकारची पुष्कळ फुलझाडे वाढत असून त्यांमध्ये किराईत (जेन्शन), प्रिमरोझ (प्रिन्यूला), आयरिश, पाषाणभेद, जरेनियम, ॲस्टर, थायमस ही प्रमुख फुलझाडे व पल्सॅटिलम, बचनाग (अकोनीटम) इ. औषधी वनस्पती आढळतात. स्टेपी प्रदेश आणि मुख्य अरण्ये यांदरम्यानच्या संक्रमणावस्थेच्या प्रदेशात स्टेपी वने असून विशेषतः जूनिपर पाइन व ओक वृक्ष अधिक आहेत. सिंधू, सतलज, काली गंडक व घागरा या नद्यांच्या घळयांच्या व तशाच प्रकारच्या भागांत, त्याचप्रमाणे सिमला टेकड्या, यमुना, भागीरथी व अलकनंदा नद्यांची खोरी व नेपाळमध्ये ही वने आहेत. नंगा पर्वताच्या उत्तर उतारावर २,०००–३,००० मी. उंचीच्या प्रदेशात आणि दक्षिण उतारावर ४,०००–४,२०० मी. उंचीच्या प्रदेशात स्टेपी वने पहावयास मिळतात. पूर्वेकडे झूम प्रकारची भटकी शेती केली जाणाऱ्या प्रदेशात स्टेपी वने आहेत. 

 

हिमालयात समृद्ध प्राणिजीवन आहे. समशीतोष्ण आणि शीत कटिबंधात आढळणारे प्राणी हिमालयात आढळतात. वाघ, चित्ता, गेंडा, निळ्या मेंढ्या, हत्ती, याक, कस्तुरीमृग, रानडुक्कर व वेगवेगळ्या प्रकारची माकडे येथे आढळतात. उत्तरेकडील गोठणबिंदूच्या खाली जाणाऱ्या तापमानाच्या प्रदेशात सहसा प्राणिजीवन आढळत नाही. हिवाळ्यात अधिक उंचीच्या प्रदेशातील प्राणी कमी उंचीच्या प्रदेशाकडे स्थलांतर करतात. थंड ओसाड भागातप्रामुख्याने याक प्राणी तर लडाखमध्ये थोराड रानटी मेंढ्या आढळतात. शेळ्या, मेंढ्या, याक हे येथील पाळीव प्राणी आहेत. जिम कॉर्बेट, नामदफा, रॉयल चितवन, काझिरंगा, रॉयल बर्दिआ, ग्रेट हिमालयन ही हिमालयातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत. 

 

आर्थिक महत्त्व : विस्तृत अरण्ये व गवताळ प्रदेश, खनिज संसाधनांचे साठे, जलविद्युत्शक्ती निर्मितीची प्रचंड संभाव्यता, मशागतयोग्य सुपीकजमीन ही हिमालयातील प्रमुख संसाधने आहेत. येथे आर्थिक दृष्ट्या उपयुक्त वृक्षांची वने असून त्यांमधून विविध प्रकारचे लाकूड आणि वेगवेगळीवनोत्पादने मिळतात. आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या दृष्टीने हिमालयालाफार मोठे महत्त्व आहे. सिंकोना, इपिकॅक, सर्पगंध यांसारख्या असंख्यऔषधी वनस्पती विपुल प्रमाणात येथील अरण्यांतून मिळतात. चहा हे हिमालयातील सर्वाधिक महत्त्वाचे मळ्याच्या शेतीतील उत्पादन असूनदार्जिलिंग हा त्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा प्रदेश आहे. सफरचंद, संत्री, अलुबुखार, द्राक्ष, सप्ताळू, चेरी, विविध कवचफळे (उदा., अक्रोड, बदाम इ.), वेगवेगळ्या प्रकारची मृदुफळे इ. फळांची उत्पादने येथे घेतली जातात. सुवासिक उत्पादन देणाऱ्या अनेक वनस्पती येथे आहेत. केशरहे काश्मीर खोऱ्यातील विशेष महत्त्वाचे उत्पादन आहे. लाकूड, राळ( रेझीन), लोकर, रेशीम, प्राण्यांची कातडी व चामडी, फळे इत्यादींच्या मुबलक उपलब्धतेमुळे अरण्ये, प्राणी आणि उद्यानशेतीवर आधारितउद्योगांच्या विकासास येथे फार मोठा वाव असला, तरी प्रत्यक्षात अशाउद्योगांचा हिमालयीन प्रदेशात अगदीच अल्प विकास झालेला आहे.हिमालयातून वाहत येणाऱ्या बारमाही नद्यांमुळे उपलब्ध झालेल्यापाण्याचा उत्तर भारतातील कृषी व औद्योगिक विकासास फार मोठाफायदा झालेला आहे. दगडी कोळसा, चांदी यांसारखी काही खनिजे हिमालयातून मिळतात. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हिमालय ही निसर्गतः प्राप्त झालेली संरक्षक सीमा आहे. भूतकाळात हिमालयाने भारताचेसंरक्षण केलेले आहे पण आज युद्धाच्या पद्धतींत फार मोठे बदल झालेले आहेत. त्यामुळे आता हिमालयाची प्रचंड भिंत भारताच्या संरक्षणास पुरी पडणार नाही. 

 

वाहतूक : हिमालयाच्या उंच आणि ओबडधोबड पर्वतरांगा, खोलघळया, उंच शिखरे, खडकाळ कडे, बर्फाच्छादित प्रदेश, घनदाट अरण्येइ. घटक वाहतूकमार्गांच्या विकासातील प्रमुख अडथळे आहेत. जगातील सर्वाधिक उंचीवरील खिंडी प्रामुख्याने हिमाद्रीमध्ये सु. ३,००० मी. पेक्षा अधिक उंचीवर आहेत. त्या खिंडी वर्षातून केवळ काही कालावधीसाठी वाहतुकीस खुल्या राहतात. त्यामुळे ३,०००–४,००० मी. उंचीपर्यंत रस्ते बांधावे लागतात. इ. स. १९४५ पूर्वी हिमालय पार करण्यासाठीमोटार किंवा जीपगाडी जाऊ शकेल, असा एकही रस्ता नव्हता. त्यानंतर सिक्कीममधील नथू ला (खिंडी) पर्यंत जाणारा एक रस्ता बांधण्यात आला. तेव्हा चीननेही चुंबी खोऱ्यातून नथू ला पर्यंत रस्ता बांधला. हिमालय पार करू शकणारा हाच पहिला मोटार रस्ता होय. पुढे चीनने लडाख प्रदेशातून हिमालयापर्यंत जाणारा, तर भारताने लेहच्या पुढे आपल्या सरहद्दीपर्यंत रस्ते बांधले. त्यानंतर भारताने आपल्या मैदानी प्रदेशापासून काठमांडूपर्यंत त्रिभुवन राजपथ हा रस्ता तयार केला, तर चीनने काठमांडूपासून कोदारीमार्गे ल्हासापर्यंत रस्ता काढला. पुढे भारताने आपल्या सरहद्दीवरील शिपकी, माना, नीती इ. खिंडींपर्यंत रस्ते बांधले. चीननेही मोठ्या प्रमाणावर हिमालयीन सरहद्दीपर्यंत रस्त्यांचा विकास केला आहे. या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती अत्यंत जिकिरीची असते. तसेच हिवाळ्यात त्यांवरून वाहतूक करता येत नाही. वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे कधीकधी रस्ते वाहतूक बंद होते. 

 

जलपैगुरी ते दार्जिलिंग, कालका ते सिमला असे काही मोजकेच लोहमार्ग असून ते प्रामुख्याने पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पठाण-कोटपासून जोगिंदरनगर असा एक लोहमार्ग आहे. लष्करी डावपेचांच्या व संरक्षणाच्या दृष्टीने भारताच्या उत्तर सरहद्दीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून दिवसेंदिवस हा प्रदेश अधिक संवेदनशील बनत आहे. त्यातचचीनने भारताच्या उत्तर सरहद्दीलगत रस्ते आणि लोहमार्गांचे जाळे निर्माण केले आहे. विस्तारवादी मानसिकतेमुळे चीनकडून वारंवार सरहद्द प्रदेशात अतिक्रमणाचे प्रयत्न होत असतात. त्यामुळे भारतीय लष्कराला आपल्या संरक्षणासाठी येथील सरहद्दीजवळ सातत्याने सतर्क रहावे लागते. त्या दृष्टीने हिमालयातील, विशेषतः चीनशी असलेल्या सरहद्दीलगत, वाहतूकमार्गांचा विकास करणे भारताला अनिवार्य झाले आहे. त्यामुळेच भारत या भागात रस्ते व लोहमार्गांचा विकास करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अरुणाचल प्रदेश राज्यातील चीनशी असलेला ‘मॅकमहोन रेषा’ या आंतरराष्ट्रीय सरहद्दी-जवळ सु. ६,००० किमी. लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याची भारताची योजना कार्यान्वित झाली आहे. हिमालयात ठिकठिकाणी रज्जुमार्ग उभारले असून काही ठिकाणी विमान व हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे. तसेच श्रीनगर (भारत) व काठमांडू (नेपाळ) येथे विमानतळ आहेत. 


 

गिर्यारोहण व समन्वेषण : ऐतिहासिक आणि भौगोलिक कारणांमुळे भारतीय उपखंडात ब्रिटिश आल्यानंतरच या पर्वताचे समन्वेषण आणित्यातील शिखरे सर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिश या प्रदेशातून निघून गेल्यानंतरही हिमालयाच्या समन्वेषणात ब्रिटिशांचाच पुढाकार राहिला होता. भारतीय भूमीच्या सर्वेक्षणाच्या वेळी हिमालयातील उंचउंच शिखरांची नोंद नकाशात केली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील लष्करी अधिकारी विश्रांतीसाठीच्या सुटीत आवडम्हणून हिमालयातील हिमरेषेच्या वरील भागात चढून जाण्याचा प्रयत्नकरीत असत. ब्रिटिशांबरोबरच अमेरिकन, स्विस, ऑस्ट्रियन, फ्रेंच, जर्मन, जपानी, ऑस्ट्रेलियन, अजबटिनी आणि अलीकडच्या काळात रशियनव चिनी गिर्यारोहकांनीही हिमालयातील गिर्यारोहणात व समन्वेषणातसहभाग घेतला आहे. 

 

स्थानिक राज्यांनी, विशेषतः तिबेटने बराच काळपर्यंत या प्रदेशात गोऱ्या लोकांना मज्जाव केला होता. तसेच काही देशांनी विशिष्ट शिखरांवरआपला हक्क सांगितला होता. त्यामुळे त्या शिखरांकडे गिर्यारोहकांच्यामोहिमा जाऊ शकल्या नाहीत. ब्रिटन या एकमेव देशाला एव्हरेस्टवरीलमोहिमांना परवानगी होती. इटालियन गिर्यारोहकांनी के-२ व काराकोरम-मधील इतर शिखरांवर, तर जर्मनांनी नंगा पर्वतावर आपले लक्ष केंद्रितकेले होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मोजणी करून नकाशांत शिखरे दाखविली गेली, तेव्हापासून हिमालयातील गिर्यारोहकांच्या मोहिमांना वेग आला. डब्लू. डब्लू. ग्रेहॅम, सर मार्टिन कॉनवे, ए. एफ् . ममेरी, डग्लस डब्लू. फ्रेशफील्ड, टॉम जी. लाँगस्टाफ, सर फ्रान्सिस एडवर्ड यंगहजबंड आणि जनरल सी. जी. ब्रूस हे प्रमुख आद्य गिर्यारोहक आहेत. दुसऱ्या महायुद्धापासून हिमालयातील समन्वेषणाला अनुकूलता निर्माण झाली. गिर्यारोहणासाठी हलक्या वजनाची उपकरणे, प्राणवायू वापराच्या आधुनिक सुधारित पद्धती आणि इतर आधुनिक साधनसामग्रीचा वापर सुरू झाला. तेनसिंग नोर्के व एडमंड हिलरी हे एव्हरेस्ट सर करणारे पहिले गिर्यारोहक आहेत (१९५३). हे शिखर चढून जाण्याच्या प्रयत्नात अनेक गिर्यारोहकांना आपले प्राणही गमवावे लागले. पूर्वी उत्तरेकडील तिबेटच्या पठारावरील राँगबुक हिमनदीवरून हे शिखर सर करण्याचे प्रयत्न निष्फळठरले. अर्वन आणि मॅलरी हे ब्रिटिश गिर्यारोहक ८,००० मी.च्या वर नाहिसे झाले होते. कदाचित ते शिखर चढून गेले असावेत परंतु परतआले नाहीत. तद्नंतर दक्षिणेकडून नेपाळच्या बाजूने मुख्यतः नामचे बझार येथून या शिखराकडे जाण्याचा मार्ग शोधून काढण्यात आला. त्यासाठी येथील शेरपा लोक मदत करीत असत. 

 

हिमालयाच्या बहुतांश भागाचे आता समन्वेषण व नकाशाकरण झाले असून गिर्यारोहकांनी अनेक शिखरे सर केली आहेत. तरीही अजूनबरीच शिखरे सर करणे बाकी असून काही प्रदेशांत गिर्यारोहक व निसर्गवैज्ञानिक अद्याप पोहोचलेले नाहीत. जगभरातील गिर्यारोहक आज हिमालयातील शिखरे सर करण्यासाठी सातत्याने येत असतात. आधुनिक तंत्रज्ञान तसेच त्यानुसार तयार केलेली उपकरणे (प्रामुख्याने श्वासोच्छवासा-साठीचा कृत्रिम प्राणवायू, कडाक्याच्या थंडीला प्रतिकार करू शकणारी, वजनाने हलकी परंतु मजबूत उपकरणे, विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ इ.) यांची उपलब्धता पुरुष व महिलांचे फार मोठे धाडस आणि चिकाटी यांमुळे अलीकडच्या काळात गिर्यारोहणाचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या पर्यायी मार्गांनी गिर्यारोहणाचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्याबरोबरच अधिक उंचीवरील हिमालयाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचेही प्रयत्न केले जात आहेत. १९७० मध्ये एका ब्रिटिश संघाने नेपाळ हिमालयातील अन्नपूर्णा हे शिखर पर्यायी मार्गाने चढून जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यापूर्वी फे्रंचांनी हे शिखर सर केले होते. त्याच वर्षी जपानी गिर्यारोहकांनी पर्यायी मार्गाने मौंट एव्हरेस्ट चढून जाण्याचा प्रयत्न केला होता. 

 

भारतातील कलकत्ता विद्यापीठाने १९७० मध्ये गढवाल जिल्ह्यात नंदादेवीच्या दक्षिणेकडील सुंदरडुंगा खोऱ्यात शास्त्रीय संशोधन कार्यक्रमाची सुरुवात केली. भारतात अलीकडच्या काळात गिर्यारोहण क्रीडाप्रकारविकसित केला जात आहे. त्या दृष्टीने पहिल्यांदा प. बंगालमधील दार्जिलिंग येथे व त्यानंतर गढवाल जिल्ह्यातील उत्तर काशी येथे, कुलू खोऱ्यातील मनाली इ. ठिकाणी गिर्यारोहण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. गुलमर्गजवळ शास्त्रीय संशोधनविषयक कार्य चालू आहे. त्याशिवाय इतरही अनेक ठिकाणी क्लब स्थापन करण्यात आले आहेत. अलीकडे भारतीय स्त्री-पुरुष गिर्यारोहक हिमालयातील गिर्यारोहणात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. 

 

हिमालयातील यती किंवा हिममानवासंबंधीच्या रहस्यमय कथांचे गूढ अद्याप उकललेले नाही. या हिममानवाचे वास्तव्य हिमरेषेच्या वरच्या भागात असल्याचे मानले जाते. हिममानवाचा आवाज ऐकू आला, त्याला दूरवरून पाहिले किंवा त्याच्या पावलांचे ठसे दिसले, अशा अफवांमुळे काहीगिर्यारोहण सफरी परतही आल्या आहेत परंतु वेगवेगळ्या तज्ञांच्या मतेया निव्वळ दंतकथा असून तथाकथित ऐकलेले आवाज किंवा पाहिलेले पावलांचे ठसे हे अस्वल किंवा शेपटी नसलेल्या एप माकडांचे असावेत. 

 

पर्यटन : हिमालयातील उत्तुंग हिमाच्छादित शुभ्रधवल शिखरे, थंडव आल्हाददायक हवामान, थंड हवेची ठिकाणे, सरळ उभे कडे, खोलदऱ्या, हिमनद्या, वेगवान खळखळाट करत वाहणाऱ्याद्या, घनदाटअरण्ये, विविध फळाफुलांनी बहरलेल्या वृक्षवल्ली, नयनरम्य सृष्टी सौंदर्यइ. हिमालयाचे नैसर्गिक वैभव पाहण्यासाठी व त्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक हिमालयात जातात. त्याशिवाय येथे प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेली अनेक तीर्थक्षेत्रे व धार्मिक स्थळे यांसाठी भाविकही मोठ्या संख्येने हिमालयात येत असतात. कैलास, मानसरोवर, केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, ज्वालामुखी, पशुपतिनाथ, गंगोत्री, जम्नोत्री, मणिकरण, वैष्णोदेवी इ. हिंदूंची पवित्र धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रे हिमालयात आहेत. हेमिस, बोधनाथ, स्वयंभूनाथ, थ्यांगबोचे, लाचेन, तवांग येथे बौद्ध मठ आहेत. डलहौसी, कुलू, मनाली, धरमशाला, सिमला, मसूरी, नैनिताल, रानीखेत, दार्जिलिंग, धौलाधार, चक्राता इ. प्रमुख गिरिस्थाने आहेत. काश्मीरचे खोरे, गुलमर्ग, पहलगाम, खज्जियार (फुलांचे खोरे) ही पर्यटकांची विशेष आकर्षण स्थळे आहेत. 

चौधरी, वसंत