मार्मारा समुद्र : (प्राचीन प्रोपोंटिस तुर्की–मार्मारा डेनिझी). तुर्कस्तानच्या भूमीत संपूर्णपणे वेढलेला आणि बॉस्पोरस व दार्दानेल्स या सामुद्रधुन्यांनी अनुक्रमे काळ्या व इजीअन समुद्रांशी जोडलेला समुद्र. दार्दानेल्सच्या तोंडाशी असलेले गलिपली व इझमित आखाताच्या टोकाशी असलेले इझमित यांदरम्यान पूर्व-पश्चिम लांबी २७५ किमी., कमाल रूंदी ८० किमी., क्षेत्रफळ ११,४७४ चौ. किमी., सरासरी खोली ४९४ मी., मध्यभागी कमाल खोली १,२२५ मी., क्षारता हजारी २२.

याचा उत्तर किनारा यूरोपात व दक्षिण किनारा आशियात आहे बॉस्पोरसच्या मुखाशी असलेले तुर्कस्तानचे सर्वांत मोठे शहर इस्तंबूल यूरोपच्या भूमीवर, तर ऊस्कूदार किंवा स्कुदारी हे त्याचे उपनगर आशियाच्या भूमीवर आहे. सुमारे २५ लक्ष वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली असावी. येथे भूकंपाचे धक्के वारंवार बसतात.

दार्दानेल्समधून एक जोरदार प्रवाह सौम्य होऊन मार्मारा समुद्रात शिरतो. हा प्रवाह काळ्या समुद्रातून गोडे पाणी आणतो व इजीअनकडून येणारा खाऱ्या पाण्याचा प्रवाह त्याच्याखालून वहातो. मोठ्या प्रवाहांचा अभाव आणि भरतीच्या वेळीही लाटांची कमी उंची, यांमुळे सागरी वाहतुकीला हा समुद्र सोयीचा आहे. किनारा खडकाळ व उभ्या उताराचा असल्यामुळे अनेकदा धोके उद्‌भवतात. काळ्या समुद्रावरून उत्तरेकडील वारे येऊ लागले म्हणजे किनारी वाहतुकीची लहान जहाजे बेटांच्या आश्रयाला जातात.

या समुद्राच्या नैर्ऋत्य भागात, कापदा द्विपकल्पाजवळ मार्मारा द्वीपसमूह आहे. मार्मारा बेटावर प्राचीन काळापासून ग्रॅनाइट, स्लेट व मुख्यतः संगमरवर (हिंदीत) संगमर्मर) यांच्या खाणी आहेत. संगमर्मरावरूनच या समुद्राला मार्मारा हे नाव पडले. इस्तंबूलजवळच किझिल आडलार (प्रिन्सेस) द्वीपसमूह आहे. ब्यूयूकदा, हेबेली वगैरे चार मोठ्या बेटांवर बायझंटिन काळापासूनचे मठ, प्रार्थनास्थळे, स्मारके इ. आहेत. रशियन नेता लीअन ट्रॉट्‌स्की (१८७९–१९४०) हद्दपारीनंतर ब्यूयूकदा बेटावर राहिला होता. हेबेली या बेटावर तुर्की आरमारी प्रबोधिनीची शाखा आहे, तसेच १८४४ मध्ये पुन्हा बांधलेले ग्रीक ऑर्थॉडॉक्स चर्चही आहे. इस्तंबूल जवळ असल्यामुळे पूर्वी या बेटांवर शाही कैदी ठेवत असत. आता मार्मारा समुद्रातील अनेक बेटे पर्यटन केंद्रे बनली आहेत.

मार्मारा समुद्राच्या किनाऱ्यावर तेकिर्दा, स्कूतरी, यालॉवा, गेम्‌लिक, बांदर्मा, कादिकई, इझमित, कार्ताल इ. अनेक व्यापारी शहरे आहेत. ती संपन्न शेती, औद्योगिक केंद्रे, पर्यटनस्थळे इ. अनेक दृष्टींनी प्रसिद्ध आहेत.

हवा चांगली असेल, तर या समुद्राच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आनंददायक सफर करता येते. किनाऱ्यापर्यंत आलेली हिरवीगार पाइनवृक्षराजी तसेच डोंगरांवरील प्राचीन इमारती इत्यादींचे दृश्य मनोहर दिसते.

कुमठेकर, ज. ब. अनपट रा. ल.