कासेल : पश्चिम जर्मनीच्या हेसेन प्रांतातील शहर. लोकसंख्या २,१४,७८५ (१९७० अंदाज). हे फ्रॅंकफुर्टपासून सु. १५० किमी. ईशान्येस फुल्डा नदीवर वसले असून लोहमार्गाचे व अवजड उद्योगधंद्याचे महत्त्वाचे केंद्र समजले जाते. रेल्वेएंजिने, वाहने, शास्त्रीय उपकरणे, कापड, रंग, कागद व यंत्रे यांचे कारखानेही येथे आहेत. बाराव्या शतकात हे शहर वसले. नेपोलियनने आपल्या भावास वेस्ट‌फेलियाचा राजा केल्यावर त्याची राजधानी येथे होती. विमानांचे व रणगाड्यांचे मोठे कारखाने येथे असल्याने दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी ते बेचिराख केले, तेव्हा सर्व जुन्या ऐतिहासिक इमारती नष्ट झाल्या.

शहाणे, मो. शा.