लूगानो : स्वित्झर्लंडच्या तीचीनो परगण्यातील सर्वांत मोठे शहर आणि प्रसिद्ध पर्यटन केंद्र. लोकसंख्या २७,८१५ (१९८०). आल्प्सच्या दक्षिण उतारावरील लूगानो सरोवराच्या उत्तर काठावर हे शहर वसलेले आहे. कॅसारेट या खळखळत्या ओढ्याच्या मुखाशी हे शहर असून पूर्वेस माँते ब्रे (उंची ९२५ मी.) व दक्षिणेस असलेल्या माँते सॅन सॅल्व्हॅतॉर (उंची ९१२ मी.) या डोंगरांनी त्यास संरक्षण दिले आहे.

 

या शहराचा प्रथम उल्लेख सहाव्या शतकात आढळत असला, तरी त्याचा मध्ययुगीन इतिहासच अधिक ज्ञात आहे. मध्ययुगात व्यापारी दृष्ट्या याला विशेष महत्त्व होते. १४९९ च्या पूर्वी ते मिलानच्या साम्राज्याचा भाग होते. त्याच साली साम्राज्याच्या इतर भागांबरोबर ते फ्रेंचांच्या ताब्यात गेले. १५१२ मध्ये ते प्रथम स्विस लोकांच्या ताब्यात गेले व १७९८ मध्ये स्विस राज्यसंघ फुटेपर्यंत त्यावर स्विस सत्ता होती. १७९८-१८०३ यांदरम्यान ते हेल्वेटिक प्रजासत्ताकातील लूगानो परगण्याचे केंद्र होते. १८०३ मध्ये ते नवनिर्मित तीचीनो परगण्यात गेले. १८१५-८१ या काळात ते परगण्याचे एक शासकीय ठाणे म्हणून गणण्यात येत असे. १८४८-६६ या इटलीच्या स्वातंत्र्ययुध्दाच्या काळात ते जूझेप्पे मॅझिनी या इटालियन देशभक्ताच्या हालचालींचे मुख्य केंद्र होते. १८८८ मध्ये ते इटालियन भाषा बोलणाऱ्या स्विस प्रदेशावर सत्ता गाजविणाऱ्या बिशपचे धर्मपीठ बनले. त्यामुळेच शहरावर इटालियन छाप असणे साहजिकच आहे. शहरातील लोकांची भाषा इटालियन असून ते रोमन कॅथलिक पंथाचे आहेत.

पर्यटन, वित्तीय व्यवहार व चॉकोलेट निर्मिती ही लूगानोच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. चॉकोलेट, बिस्किटे, सिगारेटी, रेशमी वस्त्रे, लाकडी वस्तू, छपाई, हलकी यंत्रनिर्मिती इ. पर्यटन व्यवसायाशी आनुषंगिक उद्योगही आता शहरात सुरू झाले आहेत. निळ्याभोर पाण्याचे लूगानो सरोवर उंच डोंगरांनी वेढले गेले असले, तरी त्याची पार्श्र्वभूमी लाभलेले हे शहर लोहमार्ग व रस्ते यांमुळे सुगम झाले आहे. झुरिक (स्वित्झर्लंड) व उत्तर इटलीतील मिलानला जोडणाऱ्या सेंट गॉथर्ड लोहमार्गावर मोक्याच्या ठिकाणी हे शहर वसले आहे. निसर्गसौंदर्य व आल्हाददायक, तसेच उबदार हवामान यांमुळे ते लोकप्रिय बनले आहे. प्रवासी हॉटेले मुख्यतः सरोवराकडे तोंड करून खाड्या असलेल्या पर्वताच्या खालच्या उतारावर वसली आहेत. पारादीसो व कास्ताग्नोला या उपनगरांसह लूगानो शहर येथील उपसागराच्या भागात अर्धचंद्राकृती विस्तारलेले असून तेथील हिरव्यागार उतारावर ठिकठिकाणी अनेक उद्यानगृहे आढळतात. माँते ब्रे व माँते सॅन सॅल्व्हॅतॉरपर्यंत केबल रेल्वे जाते. पर्यटकांसाठी मनोरंजनाच्या अनेक गोष्टी उपलब्ध करण्यात आल्या असून त्यांत पूर्व भागातील सरोवरालगतची उद्याने, पोहण्याचे तलाव, नौकानयन, परिषद केंद्र इत्यादींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांशिवाय जुन्या शहरात अनेक पुरातन वास्तू आहेत. सॅन लोरेन्झो चर्च ही सर्वांत जुनी वास्तू असून ती तेराव्या शतकाच्या अखेरीस बांधलेली असावी. गॉथिक शिल्पशास्त्राचा तो एक उत्तम नमुना आहे. १४९९ मध्ये उभारण्यात आलेली सांता मारिया डेगली आंजोली चर्च ही आणखी एक प्रसिद्ध पुरातन वास्तू आहे. येथील ‘म्यूझोओ कॅसिओ’ मध्ये अर्वाचीन चित्रांचा उत्तम संग्रह आहे. परगण्याचे ग्रंथालय (१९४०), नगर भवन (१९४४), रेडिओ केंद्र या अलीकडील वास्तूही पर्यटकांची आकर्षणे ठरल्या आहेत. शहरात मोठमोठ्या बागा असूनत्यांमध्ये उपवृत्तीय वृक्ष आढळतात. १५१३ पासून येथे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये गुरांची जत्रा भरते. दुसऱ्या महायुद्धानंतर हे शहर यूरोपमधील अग्रगण्य वित्तीय केंद्र बनले.

लूगानो सरोवर : लूगानो शहराजवळचे लूगानो हे गोड्या पाण्याचे सरोवर आल्प्स पर्वत प्रदेशात, स्वित्झर्लंड व इटली या दोन देशांमध्ये अगदी वेड्यावाकड्या स्वरूपात पसरलेले आहे. सरोवराची कमाल लांबी ३५ किमी., कमाल रुंदी केवळ ३.२ किमी. व क्षेत्रफळ ५०.५ चौ. किमी. आहे. यापैकी ४६.५ चौ. किमी. क्षेत्र स्वित्झर्लंडच्या तीचीनो परगण्यात व उरलेले केवळ ४ चौ. किमी. क्षेत्र इटलीतील लाँबर्डी प्रदेशात आहे. हे सस. पासून २७१ मी. उंचीवर असून त्याची कमाल खोली २८८ मी. आहे. याच्या पश्र्चिमेस माद्जॉरे, तर पूर्वेस कोमो ही सरोवरे आहेत. आल्प्सच्या बाह्य सोंडांच्या दरम्यान पसरलेल्या या सरोवरामुळे तीचीनो खोरे ॲद खोऱ्यापासून अलग झाले आहे. अनेक पर्वतीय प्रवाह या सरोवराला येऊन मिळतात. लहानशा त्रेसा नदीमार्गे हे सरोवर माद्जॉरे सरोवराला जाऊन मिळते. लूगानो उपसागरकिनारा वगळता सरोवराच्या उर्वरित प्रदेशातील सौम्य हवामान, वनाच्छादित परिसर, रमणीय सृष्टिसौंदर्य यांमुळे हा परिसर पर्यटन केंद्र बनले आहे. सरोवरातून आगबोट (स्टीमर) वाहतूकसेवा उपलब्ध असून तीद्वारे लूगानो शहर किनाऱ्यावरील इतर ठिकाणांशी जोडले आहे. मेलीदा व बिसोन यांदरम्यान सरोवर खूपच उथळ असून तेथे एक मोठे दगडी धरण बांधले आहे. त्या धरणावरून काढलेला महामार्ग आणि लोहमार्गामुळे ही दोन्ही ठिकाणे एकमेकांशी जोडली गेली आहेत. सरोवराचा ईशान्येकडील फाटा उभ्या व खडकाळ पर्वताने वेढलेला आहे. लूगानो हेच या सरोवराच्या काठावरील प्रमुख नगर आहे. 

फडके, वि. शं. चौधरी, वसंत