रामपूर : उत्तर प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या (२,०३,४९१ – १९८१). कोसी नदीकाठावरील हे शहर दिल्लीच्या पूर्वेस सु. १८४ किमी. वर असून साखर, मृत्पात्री, दमास्क कापड, तलवारी यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर मोरादाबाद-बरेली यांदरम्यान असून, ते २४ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील तसेच उत्तर रेल्वेच्या रुंदमापी लोहमार्गावरील प्रमुख स्थानक आहे.

या शहराच्या जागी पूर्वी चार लहानलहान गावे होती. काटेर (रोहिलखंडाचा पूर्व भाग) येथील राजा रामसिंग याच्या नावावरून याला रामपूर हे नाव देण्यात आले, असे सांगितले जाते तर काही प्रचलित कथांनुसार नबाब फैझुल्लाखानाने या शहराची १७७५ मध्ये स्थापना केली. पूर्वी हा प्रदेश दाट जंगल व वाघ, चित्त्यांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध होता. नबाबाने हे जंगल तोडून त्या जागी शहर वसविले आणि त्याचे मुस्तफाबाद ऊर्फ रामपूर असे नामकरण केल्याचे म्हणतात. नबाबाने शहराभोवती मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली होती. विसाव्या शतकाच्या पूर्वाधात रामपूर हे संगीताचे केंद्र होते. येथील नबाबाच्या दरबारी थिरकवांसारखे कलाकार होते.

रामपूरचा १९३७ नंतर औद्योगिक विकास खूपच झपाट्याने झाला. या काळात शहरात साखर कारखाना, कापड गिरणी, आसवन्या व रसायन उद्योग, मोटारींचे सुटे भाग, बर्फ, चाकूसुऱ्या, कार्डबोर्ड इ. तयार करण्याचे उद्योग वाढीस लागले. औद्योगिक प्रगतीमुळे शहराचा विस्तार खूपच वाढला असून, बहुतेक कारखाने शहराच्या दक्षिण भागात (सिव्हिल लाइन) दिसून येतात. हा भाग औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याच भागात काही सरकारी कार्यालये, बँका, हॉटेले, पर्यटक निवास यांचाही विस्तार झाला आहे. जुन्या शहराला प्रमुख दहा प्रवेशद्वारे आहेत. शहराच्या मध्यभागी नबाबाचा भव्य राजवाडा असून, त्याच्याभोवती दोन भव्य दरवाजे (हमीद व राइट) असलेला व सहा बुरुजांचा कोट आहे. सांप्रत या राजवाड्याचा उपयोग सरकारी कार्यालये, मुलींचे महाविद्यालय यांसाठी करण्यात आलेला असून या राजवाड्यातच प्रसिद्ध रझा ग्रंथालय आहे. हमीद दरवाज्याजवळील जुन्या इमारतींत पूर्वीच्या संस्थानाचे उच्च न्यायालय होते. त्या इमारतींचा वापर सरकारी कार्यालयांसाठी करण्यात आला आहे.

शहरातील खासबाग राजवाडा, हमीद मंझिल, महल सराई इ. ऐतिहासिक इमारती खासबाग, गांधी पार्क यांसारखी उद्याने तसेच आसमंतातील कोसी नदीवरील धरणे इ. प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

चौंडे, मा. ल.