इंडोनेशिया : आग्नेय आशियामधील अनेक बेटांचे बनलेले प्रजासत्ताक राज्य. क्षेत्रफळ १९,०४,३४५ चौ. किमी. लोकसंख्या १२,४८,९४,००० (१९७१). ६उ. ते ११ द. आणि ९५ पू. ते १४१ पू. याचे जास्तीतजास्त पूर्वपश्चिम अंतर ५,०२९ किमी. व दक्षिणोत्तर अंतर २,०११ किमी. असून याच्या उत्तरेस दक्षिण चिनी समुद्र व पॅसिफिक, पूर्वेस पॅसिफिक आणि दक्षिणेस व पश्चिमेस हिंदी महासागर आहे. मलाया द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे न्यू गिनी बेटांपर्यंत इंडोनेशियाचा प्रदेश पसरला असून त्यामध्ये जावा, सुमात्रा, मादुरा, नुसा तेंगारा (बाली ते तिमोरपर्यंतचा द्वीपसमूह), मोलूकू (मोल्यूकस), सूलावेसी (सेलेबीझ), कालीमांतान (बोर्निओचा भाग), पश्चिम ईरीआन (न्यू गिनीचा पश्चिम भाग), तिमोर बेटाचा काही भाग व सु. ३,००० लहान बेटे यांचा समावेश होतो. आशिया व ऑस्ट्रेलिया ह्यांना सांधणारा पूल समजला जाणाऱ्या या देशात भौगोलिक, समाजिक व आर्थिक विविधता तसेच वैचित्र्य भरपूर आहे. जावा बेटावरील जाकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे.

भूवर्णन : आशिया व ऑस्ट्रेलिया ही खंडे एकमेकांपासून अलग होताना झालेल्या गिरिजनक हालचालींमध्ये मलायापासून न्यू गिनीपर्यंतच्या बेटांची निर्मिती झाली, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सुमात्रा, जावा व बोर्निओ यांमधील प्रदेश पूर्वी आशिया खंडाचाच भाग होता, तर न्यू गिनी ऑस्ट्रेलियाचा भाग होता. ह्या दोन्ही प्रदेशांत प्राचीन प्रतिरोधी खडकांचे अवशेष दिसून येतात तसेच त्यांच्या आसपासचे समुद्रही उथळ आहेत. हिमालय-उत्थापनाच्या वेळी निर्माण झालेल्या पर्वतरांगा सुमात्रा, जावा व छोट्या सूंदा द्वीपसमूहांतून सूलावेसी, मोलूकू ते फिलिपीन्सपर्यंत गेलेल्या आहेत. ह्या शाखोपशाखांची घडण पूर्ण झालेली नसल्याने येथे अद्याप भूकंपाचे धक्के बसतात, तसेच ज्वालामुखी उद्रेकही होतात. दरवर्षी सु. पंधराशेहून अधिक भूकंप होत असल्याची नोंद असून एकूण तीनशेहून जास्त ज्वालामुखी शिखरांपैकी पन्नास अद्याप जागृत आहेत. जावा व सुमात्रा यांच्या दरम्यान असलेल्या क्राकाटाऊ बेटावर १८८३ साली झालेला ज्वालामुखी उद्रेक जगातील मोठ्यात मोठा समजला जातो. ह्या उद्रेकात निम्मे बेट नष्ट झाले. दीडशे किलोमीटर अंतरावर त्याचा आवाज ऐकू गेला, सु. ३०,००० लोक मेले, समुद्रात उत्पन्न झालेल्या लाटा ६,०००–८,००० किमी. पर्यंत जाणवल्या. उद्रेकातून फेकली गेलेली धूळ आकाशात कित्येक किलोमीटर उंच गेली, ती पृथ्वीला तीन दिवस प्रदक्षिणा घालीत होती व त्यामुळे सर्वत्र ढगाळलेले हवामान बनले होते. दुसरे ज्वालामुखी उद्रेक इतके भयानक नव्हते. ज्वालामुखी उद्रेकाने नुकसानी होते खरी, पण कालांतराने जमीन सुपीक बनत असल्याने देशाला फायदाच झालेला आहे याशिवाय ज्वालामुखी विवरांतून साचलेले पाणी शेतीसाठी वापरावयास मिळते. गिरिजनक हालचालींमधून घडीचे पर्वत निर्माण झाले, तसेच खोल डोहही निर्माण झाले त्यांतील विसाच्यावर डोह ४,५७५ मीटरहून खोल आहेत. पूर्व इंडोनेशियामध्ये बरीच प्रवाळद्वीपे व कंकणद्वीपे निर्माण झाली आहेत. इंडोनेशियाची बहुतेक बेटे डोंगराळ आहेत तथापि फार थोडी शिखरे ४,००० मीटरहून जास्त उंच आहेत. विषुववृत्तीय हवामानामुळे भरपूर पाऊस असल्याने तेथील नद्यांचे प्रवाह जोरदार असून भरपूर गाळ आणणारे आहेत. विशेषत: मोठ्या बेटांवर त्यामुळे समृद्ध नदीखोरी निर्माण झाली आहेत.

सुमात्रा (अंडालास) हे सर्वांत पश्चिमेकडील वायव्य-आग्नेय पसरलेले बेट असून ते मलायापासून मलाक्का सामुद्रधुनीने व जावापासून सूंदा सामुद्रधुनीने विभक्त झालेले आहे. सुमात्राची लांबी सु. १,६९६ किमी., जास्तीतजास्त रुंदी ३९७ किमी. व क्षेत्रफळ ४,७३,६०६ चौ. किमी. आहे. सुमात्राच्या पश्चिमेस हिंदी महासागर असून पश्चिम किनाऱ्यास समांतर अशी मेंटावाइ द्वीपसमूहातील अनेक बेटे आहेत पूर्व किनाऱ्यानजीकही अनेक बेटे आहेत. सुमात्राचे चार नैसर्गिक विभाग पडतात. पश्चिमेस अतिशय लहान किनारपट्टी असून त्याच्या पूर्वेस बारिसान ही पर्वतरांग पसरली आहे. ह्याची सर्वसाधारण उंची २,१००–२,४०० मी. असून त्यावर अनेक ज्वालामुखी शिखरे आहेत. मध्यभागातील केरिंतजी शिखर सर्वांत उंच (३,८०५ मी.) असून उत्तरेकडील लूसर ३,३८१ मी. उंच आहे. या डोंगरावरून अनेक नद्या पूर्वेकडे वाहतात. मूसी, जांबी, कांपार, इंदरागिरी या त्यांपैकी काही मोठ्या नद्या होत. या नदीखोऱ्यांनी सखल मैदानी प्रदेश निर्माण केला आहे तथापि पूर्वेकडील किनारपट्टीचा बराच भाग त्यांनी दलदलीचा बनविला आहे.

सुमात्राच्या पूर्वेकडे असलेल्या जावा बेटाची रचनाही बहुतांशी सुमात्रासारखीच आहे. याची पूर्वपश्चिम लांबी १,१२० किमी., जास्तीतजास्त दक्षिणोत्तर रुंदी २०० किमी. व क्षेत्रफळ मादुरा बेटासह १,३२,१७४ चौ. किमी. आहे. जावाचा उत्तर किनारा सखल, गाळाच्या मैदानांनी युक्त व सुपीक आहे. याच्या दक्षिणेस लहान चुनखडीयुक्त टेकड्यांचा प्रदेश असून त्याच्या दक्षिणेस ज्वालामुखी शिखरे, पठारे व द्रोणी यांची मालिका लागते. अगदी दक्षिणेकडील किनारपट्टी अरुंद व कड्यांनी युक्त आहे. जावाच्या ईशान्येस मादुरा बेट आहे. देशाचा सात टक्के भूभाग व्यापणाऱ्या या जावा-मादुरा बेटांवर देशातील साठ टक्क्यांच्यावर लोक राहतात यावरून जावाच्या सुपीक भूमीची कल्पना येते. जावामध्ये शंभरावर ज्वालामुखी असून त्यांतील सतरा जागृत आहेत. जावातील चौदा शिखरांची उंची ३,००० मीटरांहून अधिक असून माहामेरू हे सर्वांत उंच शिखर ३,६७५ मी. उंच आहे. जावामधील ज्वालामुखी उद्रेकाने जमीन सुपीक करण्यास मदतच केली आहे. तसेच ज्वालामुखी विवरांतून साचलेले पाणी शेतीस वापरण्यास मिळाले आहे.

जावाच्या पूर्वेकडील बेटे नुसा तेंगारा (क्षेत्रफळ ६८,०५३ चौ. किमी.) अथवा छोटी सूंदा बेटे म्हणून प्रसिद्ध असून त्यांमधील बाली, लाँबॉक, सूंबावा, फ्लोरेस, सूंबा आणि तिमोर ही महत्त्वाची आहेत. त्यांची भूरचना जावाप्रमाणेच आहे.

जावाच्या उत्तरेस बोर्निओ हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. त्यापैकी ७२% क्षेत्रफळ असलेल्या इंडोनेशियाच्या ताब्यातील कालीमांतानचे क्षेत्रफळ ५,३९,४६० चौ. किमी. आहे. बहुतेक किनारी प्रदेश दलदली आणि मध्यभाग १,०००-२,५०० मी. उंच, डोंगराळ व जंगली असल्याने कालीमांतान मागासलेला राहिला आहे. बारीतो, कापूआस, माहाकाम, मेंटावाइ या नद्यांनी काही सुपीक मैदाने तयार केली असून या नद्यांतून वाहतूकही चालते.

बोर्निओच्या पूर्वेस माकॅसर सामुद्रधुनी व त्यापलीकडे सूलावेसी हे १,८९,०३५ चौ. किमी. क्षेत्रफळाचे विचित्र आकाराचे बेट आहे. याचा किनारा ४,८०० किमी. व अंतर्गत भाग समुद्रापासून ११२ किमी. असला, तरी प्रदेश अतिशय डोंगराळ व अवघड कड्यांनी युक्त असल्याने बेट मागासलेले राहिले आहे. या बेटावर अनेक ज्वालामुखी आहेत. तथापि त्यांपैकी सध्या फक्त तीनच जागृत आहेत. सूलावेसीभोवती अनेक लहानमोठी प्रवाळद्वीपे आहेत. सूलावेसीच्या पूर्वेकडे मोलूकू द्वीपसमूह असून यात अनेक बेटांचा समावेश होतो. मोरोताइ, हॅल्माहेरा, तेर्नाते, तिडॉर, माकियान, ओबी, सूला ही उत्तरेकडील तर बुरू, सेराम, अँबोइना, बांदा, काइ, आरू, तानिंबार वेतार ही दक्षिणेकडील बेटे होत. ही बहुतेक सर्व बेटे डोंगराळ असून त्यांत अनेक जागृत ज्वालामुखी आहेत.

मोलूकूच्या पूर्वेस न्यू गिनी बेटाचा पश्चिम भाग-ईरीआन-हा ४,२१,९५१ चौ. किमी. क्षेत्रफळाचा प्रदेश आहे. हा भाग अतिशय डोंगराळ, जंगली व दलदलींचा आहे. नासो, चार्ल्स लूई, ओरान्ये या काही पर्वतरांगा असून त्या वायव्येकडून आग्नेयीकडे गेल्याने दळणवळण दुर्गम झाले आहे. यांतील काही शिखरे ४,५०० मीटरहून जास्त उंच आहेत. कार्स्टेन्झ (५,०३० मी.) हे जगातील बेटावर असलेल्या पर्वतशिखरांपैकी सर्वांत उंच शिखर समजले जाते. मांबेरामो, सेपिक, फ्लाय, दिगुल इ. नद्यांनी काही गवताळ मैदाने बनविली आहेत.

इंडोनेशियाची बेटे विषुववृत्ताच्या दक्षिणोत्तर ६ उ. ते ११ द. वसल्याने ह्या सर्वच प्रदेशात सर्वसाधारणपणे हवा उष्ण व दमट असून, जून ते ऑक्टोबर व नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशा आठ महिन्यांत, अनुक्रमे मान्सून व ईशान्य वाऱ्यांपासून भरपूर पाऊस मिळतो. येथील हवेतील सरासरी आर्द्रता ८२% असते. समुद्रकिनाऱ्याच्या लगतच्या मैदानी प्रदेशात सरासरी तपमान २७ से. असते. कमाल व किमान तपमानात फार तर ३ से. इतकाच फरक पडतो. त्यामुळे येथे ऋतू नाहीत. ऋतूंऐवजी स्थानाच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर हवामान अवलंबून असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान २०० सेंमी. पेक्षाही जास्त असते. डोंगराळ भागांत पर्जन्यमान समुद्रसपाटीपासूनच्या उंचीच्या मानाने वाढत जाते. काही भागांत ते ६०० सेंमी. पर्यंत असते. दक्षिणेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते.

पर्जन्यमानाप्रमाणे इंडोनेशियातील वनस्पतिजीवन विविध प्रकारचे दिसून येते. आशिया व ऑस्ट्रेलिया या दोन्ही खंडांतील वृक्षप्रकार इंडोनेशियात आढळतात. भरपूर पावसाच्या प्रदेशात सदाहरित वर्षावने, दलदली भागात कच्छवनश्री व कमी पावसाच्या प्रदेशात पानझडी वृक्ष आहेत. इंडोनेशियाचा ६०% प्रदेश जंगलांनी व्याप्त असून जंगलसंपत्तीचा पूर्ण उपयोग अद्याप केला गेलेला नाही. बांबूचे २५० वर प्रकार कच्छवनश्री जातीचे सु. तीस प्रकार नारळ, ताड, माड, इत्यादींचे दीडएकशे प्रकार मॅपल, ओक इ. येथील वनस्पती होत. सूंबा बेटात चंदन आढळते. वानर, ओरांग उटांग, वाघ, अस्वल, हिप्पोपोटॅमस, हत्ती, हरिण, कांगारू, सर्प, सुसर वगैरे प्राणी विविध भागांत आढळतात. पूर्व भागात सुंदर व भरपूर पिसारे असणारे पक्षी आढळतात. इंडोनेशियाच्या समुद्रात विपुल मत्स्यसंपत्ती आहे.

इतिहास : जावामधील उत्खननात कित्येक हजार वर्षांपूर्वींच्या जावामानवाची कवटी मिळाली असली, तरी इंडोनेशियाचा ख्रिस्तपूर्व इतिहास फारसा ज्ञात नाही. इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातून इकडे हिंदू व बौद्ध लोक आले. ह्या वेळी मलायोपॉलिनीशियन वंशाचे लोक येथे राहत होते. भारतीयांचे काही भागांवर राज्यही होते. तथापि हिंदू व बौद्धांचा येथील सामान्य जनतेवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. ते जडप्राणवादीच राहिले. तेथील पुढारलेल्या वर्गावर मात्र संस्कृत भाषा व हिंदू संस्कृती यांचा फार परिणाम झाला व आजतागायत जाणवतो. आठव्या व नवव्या शतकांच्या सुमारास शैलेंद्र नावाच्या जावामधील बौद्ध राज्यात हिंदू व इंडोनेशियन संस्कृतींचा चांगलाच मेळ बसून, बौद्ध वाङ्‌मयाचा व हिंदू संस्कृतीचा तेथे वरचष्मा झाला. ह्याच काळात येथे बोरोबूदुर व इतर मोठे स्तूप उभारले गेले. शैलेंद्र राज्याला अवकळा आल्यावर त्या राज्याची सुमात्रामधील पार्लेबांग ही राजधानी असलेले श्रीविजय व जावामधील माजापाहीत अशी दोन छकले झाली. पुढे माजापाहीत राज्याच्या विघटनेच्या सुमारास मलॅकाच्या बंदरात अरबांनी व्यापारानिमित्त प्रथम प्रवेश केला. व्यापाराबरोबरच अरबांनी इस्लाम धर्माचाही प्रचार चालू केला. माजापाहीतानंतर अनेक छोट्या छोट्या राज्यांना चीनच्या सम्राटाचे मांडलिकत्व मिळाले. तथापि चीनचा पगडा येथे केव्हाच बसू शकला नाही. पंधराव्या शतकाच्या अखेरीस आफांसो द अल्बुकर्क हा एक धाडसी पोर्तुगीज नावाडी ह्या बाजूस येऊन पोहोचला. तोपर्यंत येथे इस्लाम धर्म पूर्ण रुजला होता. पुढे लवकरच तेर्नातेच्या सुलतानाच्या निमंत्रणावरून अल्बुकर्क सुमात्रामध्ये येऊन त्याने मलॅका काबीज केले. तेर्नातेच्या सुलतानाने पोर्तुगीजांस लवंगा व इतर मसाल्याच्या वस्तूंच्या व्यापाराबाबत काही खास सवलती दिल्या. ह्या वेळी मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार जावानीज व अरब व्यापाऱ्यांच्या हाती होता. हळूहळू पोर्तुगीजांनी हा सर्वच व्यापार आपल्या हाती घेऊन त्यांनी अँबोइना बेटावर आपली एक वसाहत स्थापिली (१५३७). इकडे पोर्तुगीज जावामधील बौद्ध धर्मीयांशी मित्रत्वाचे करार करीत असता, अरबांनी जावामध्येच माताराम व बांटम अशी दोन स्वतंत्र मुसलमान राज्ये स्थापन केली. पोर्तुगीजांच्या मागोमाग ब्रिटिश व डच ह्या भागाकडे आकर्षिले जाऊ लागले. ह्यामुळे सतराव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश व डच ईस्ट इंडिया कंपन्यांची स्थापना होऊन पुढे लवकरच त्यांच्यात व्यापारी चढाओढ सुरू झाली. डचांनी अँबोइना व तेर्नातेवर १६०५ मध्ये कबजा मिळविला व १६०९ पर्यंत बहुतेक मसाल्याचा व्यापार डचांच्या हाती आला. फक्त तिमोरवर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. १६२३ मध्ये अँबोइनात ब्रिटिशांची कत्तल झाल्यानंतर संपूर्ण सत्ता डचांकडे आली. सतराव्या शतकाच्या मध्यास कंपनी भरभराटीस आली. अठराव्या शतकात ब्रिटिशांशी झालेली चार युद्धे, कंपनीचा दिवाळखोरपणा ह्यांमुळे इंडोनेशियावरील सत्ता विस्कळीत झाली होती. १७९९ मध्ये डच सरकारने डच ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हाती घेतला. नेपोलियनने हॉलंड जिंकल्यामुळे १८११–१५ पर्यंत येथील कारभार संपुष्टात आला होता. तथापि व्हिएन्ना करारामुळे हा भाग पुन्हा डचांकडे आला. परंतु जावामधील रहिवाशांनी बंड पुकारले. ‘जावा युद्ध’ म्हणून हे प्रसिद्ध असून १८२५–३० दरम्यान ते चालले होते. या युद्धाने व १८३०–३९ पर्यंतच्या बेल्जियमबरोबरच्या युद्धाने डचांची बरीच आर्थिक हानी झाली. आर्थिक दुरवस्था टळावी म्हणून इंडोनेशियातील डचांनी इंडोनेशियन जनतेवर कित्येक आर्थिक व औद्योगिक बंधने घातली. ह्याचा परिणाम डचांना फायदेशीर झाला पण इंडोनेशियन जनता जास्तच दरिद्री बनली. इंडोनेशियातील सरकारने ‘कल्चर सिस्टिम’ ह्या नावाची एक अभिनव योजना कार्यवाहीत आणली. ह्या योजनेप्रमाणे प्रत्येक इंडोनेशियन शेतकऱ्याने आपल्या शेतात तयार होणाऱ्या शेतमालाच्या किंमतीच्या दोन पंचमांश भाग सरकार सारा म्हणून तरी भरावा, अथवा आपल्या जमिनीच्या भाताच्या एकंदर क्षेत्रफळापैकी एक पंचमांश क्षेत्रात कॉफी, ऊस, नीळ वगैरे पदार्थांची तरी पैदास करावी असे बंधन घातले. ह्या योजनेत शेतकऱ्याला जरी कागदोपत्री विकल्प होता, तरी प्रत्यक्षात त्याला दोन्ही गोष्टी सक्तीने कराव्या लागत. ह्या मालाची निर्यात करण्याकरता नेदर्लंड्स ट्रेडिंग कंपनी ह्या नावाची एक नवीन संस्था स्थापन करण्यात येऊन त्या कंपनीने हा माल निरनिराळ्या भागांतून गोळा करून तो बंदरात नेणे व तेथून त्याची आपल्याच मालकीच्या जहाजांतून यूरोपीय देशांस रवानगी करणे, ही कामे आपल्याकडे घेतली. ह्या उलाढालीमुळे देशात अनेक दुष्काळ पडले. तथापि सरकारी खजिन्यात भर पडू लागली. १८६४ पासून इंडोनेशियाचे अंदाजपत्रक हॉलंडमध्ये मंजूर करण्यात येऊ लागले. तेथे आलेल्या उदारमतवादी सभासदांमध्ये कल्चर सिस्टिमवर टीका होऊ लागली व ह्याचा परिणाम म्हणजे १८७० मध्ये इंडोनेशियातील व्यापाराची सरकारी मक्तेदारी रद्द करण्यात येऊन हा व्यापार सर्वांस खुला झाला. ह्याच सुमारास सुएझचा कालवा वाहतुकीस खुला झाल्यामुळे, पूर्वीचा सूंदा सामुद्रधुनीतील आगबोटींचा मार्ग बदलून, त्याऐवजी मलॅकाच्या सामुद्रधुनीतून तो नेणे आवश्यक झाले. ह्यामुळे ठिकठिकाणी ह्या मार्गावर आगबोटींना कोळसा पुरविण्याकरता नवीन नाविक केंद्रांची जरूर भासू लागली. सरकारने जावा, सुमात्रा, कालीमांतान व त्याच्या आसमंतातील इतर लहानमोठी बेटे आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून राज्यकारभारात इंडोनेशियन जनतेचे सहकार्य वाढत्या प्रमाणात घेणे सरकारला जरूर वाटू लागले. १९१८ मध्ये तेथील डच गव्हर्नरजनरलला सल्ला देण्याकरता इंडोनेशियातील प्रातिनिधिक व्यक्तींचे एक सल्लागार मंडळ घोषित करण्यात आले. १९२५ साली संविधान बनविण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यात आल्या व वसाहतीचा दर्जा जाऊन इंडोनेशियास नेदर्लंड्समधील राज्याचा दर्जा प्राप्त झाला. १९२९ मध्ये आलेल्या महामंदीने इंडोनेशियाच्या आर्थिक जीवनावर मोठा आघात झाला. ह्यातून स्थिरस्थावर होईतो दुसरे महायुद्ध सुरू झाले. १४ फेब्रुवारी १९४२ रोजी जपानने प्रथम सुमात्रावर स्वारी केली. इंडोनेशियातील जनतेच्या डच विरोधामुळे, अगदी थोड्या अवधीतच सर्व इंडोनेशिया जपानने पादाक्रांत केला. १९४२ ते १९४५ च्या दरम्यान जपानी अंमलाखाली इंडोनेशियात स्वातंत्र्याचे विचार बळावू लागले. इंडोनेशियन जनतेला मोठमोठ्या सरकारी नोकऱ्या तसेच यंत्रज्ञ, तंत्रज्ञ, लहानमोठे लष्करी अधिकारी वगैरे पदे भराभर मिळू लागली. सूकार्णो, हाट्टा वगैरे इंडोनेशियन पुढाऱ्यांस मोकळे केल्यावर त्यांनी जनतेत जागृती केली. १७ ऑगस्ट १९४५ रोजी सूकार्णो ह्यांनी इंडोनेशियन स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. इंडोनेशियन लोकांचे स्वतंत्र मंत्रिमंडळ बनविण्यात आले व संविधानही तयार करण्यात आले. लवकरच युद्धपरिस्थिती बदलून दोस्तांनी इंडोनेशियामधून जपानी लष्कराला हाकलून देऊन तेथे पुन्हा डच सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला. ह्यामुळे डच सरकार व इंडोनेशियन जनता यांच्यामधील संघर्ष वाढू लागला. स्वातंत्र्यचळवळीचा वाढता जोर पाहून दोस्तांनी डच सरकारला इंडोनेशियन पुढाऱ्यांबरोबर वाटाघाटी करण्यास भाग पाडले. १९ जानेवारी १९४९ रोजी इंडोनेशियाच्या प्रजासत्ताक सरकारने डचांबरोबर रेनव्हिल येथे करार केला. ह्यानंतरही काही काळ इंडोनेशियन जनता व डच सरकार यांच्यामध्ये संघर्ष चालूच राहिला. अखेर २७ डिसेंबर १९४९ रोजी डचांनी इंडोनेशियाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व मान्य केले. न्यू गिनीचा प्रदेश फक्त वादात राहिला. नवीन संघीय तत्त्वावर आधारलेले संविधान तयार करण्यात आले. १९५५ च्या नोव्हेंबर महिन्यात त्या देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. परंतु ह्या निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला निश्चित बहुमत मिळाले नाही. त्यामुळे संमिश्र मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. १९५५ नंतर इंडोनेशियातील पक्षोपक्षांत संघर्ष सुरू झाला. १९५९ मध्ये अध्यक्ष सूकार्णो ह्यांनी घटनासमिती रद्द करून १९४५ च्या संविधानास मान्यता दिली व सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने न्यू गिनीचा प्रदेश इंडोनेशियाकडे आला. साम्यवाद्यांनी १९६५ मध्ये सरकार उलथून पाडण्याचा प्रयत्‍न केला. पण सैन्याने तो हाणून पाडला. ह्याच सुमारास मलेशिया निर्माण झाल्याने त्याविरुद्ध इंडोनेशियन नेत्यानी निदर्शने सुरू केली. ह्या सर्व अनिश्चिततेचा शेवट ११-१२ मार्च १९६६ रोजी जनरल सुहार्तो ह्यांनी आपल्या सैन्याच्या हाती सर्व सत्ता घेण्यात झाला. सूकार्णो हा नामधारी अध्यक्ष म्हणून राहिला. कम्युनिस्ट पक्ष बेकायदा ठरविण्यात आला व सर्व पक्ष रद्द करण्यात आले. २२ फेब्रुवारी १९६७ रोजी सूकार्णो निवृत्त झाले व १९७० मध्ये वारले. १९६८ मध्ये सुहार्तोंची पाच वर्षांकरिता अध्यपक्षपदी नेमणूक झाली. १९७३ च्या निवडणूकीत सुहार्तोंचीच पुन्हा निवड झाली.

राजकीय स्थिती : इंडोनेशिया एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याची घोषणा १९४५ मध्ये करण्यात आली. १९४५ मध्ये त्याचप्रमाणे फेब्रुवारी आणि ऑगस्ट १९४९ मध्ये तात्पुरती संविधानेही तयार करण्यात आली होती. परंतु १९५९ पासून १९४५ मधील तात्पुरते संविधान मान्य करण्यात आले आहे. अध्यक्ष हाच पंतप्रधान असून त्याच्या हाती सत्ता केंद्रित करण्यात आली आहे. लोकनियुक्त सभा अध्यक्षाची निवड करते व राष्ट्रीय धोरणाची दिशा ठरविते. अध्यक्षांच्या मदतीने प्रतिनिधिमंडळ कायद्याचे अंमलबजावणी करते. सरकारला महत्त्वाच्या कामात सल्ला देण्याकरिता एक सर्वोच्च मंडळ असून अध्यक्ष हाच त्याचा प्रमुख आहे. ४ जुलै १९७१ रोजी इंडोनेशियामधील निवडणुका झाल्या संसदेच्या ४६० जागांपैकी १०० जागा संविधानानुसार अध्यक्षानेच भरावयाच्या असून उरलेल्यापैकी ६०% जागा सुहार्तोच्या सेक्‍बेअर गोलकार पक्षास मिळाल्या आहेत. मुस्लीम स्कॉलर्स (नहदतुल उलेमा) पक्ष व नॅशनॅलिस्ट पार्टी यांना बहुमत मिळाले नाही. शासनाच्या सोयीसाठी इंडोनेशियाची वीस प्रांतांत विभागणी करण्यात आली आहे. इंडोनेशियन मंत्रिमंडळातील कायदेमंत्र्याकडे न्यायखाते सोपविलेले आहे. प्राथमिक, जिल्हा व सर्वश्रेष्ठ न्यायालय ह्या न्यायदानातील चढत्या पायऱ्या आहेत. पाश्चात्त्य, पौर्वात्त्य आणि इंडोनेशियन ह्यांना वेगवेगळे दिवाणी कायदे आहेत. फौजदारी कायदा मात्र सर्वांना एकच आहे. ऑक्टोबर १९४५ पासून इंडोनेशियन संरक्षण दलाच्या उभारणीस सुरुवात झाली. १९६९ अखेर संरक्षण दलातील सैन्य, आरमार व हवाई दलाची गणसंख्या अनुक्रमे २,७५,००० ४०,००० व २०,००० इतकी होती. ही सर्व दले अत्याधुनिक सामग्रीने सुसज्‍ज आहेत.

आर्थिक स्थिती : इंडोनेशियातील ७०% लोक शेतीवर उदरनिर्वाह करीत असून राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५२% वाटा कृषिउत्पन्नाचा आहे. नांगरटीखाली असलेल्या एकंदर जमिनीपैकी ५५% जमीन लहान लहान शेतकऱ्यांकडे असली, तरी तिच्यातून तांदूळ, रबर, चहा, कॉफी, नारळ, मिरी, व इतर मसाल्यांचे पदार्थ, काटेसावर, तंबाखू, भुईमूग, ताडतेल, मका, कसावा, ऊस, सोयाबीन वगैरे महत्त्वाची पिके काढली जातात. दुसऱ्या महायुद्धापूर्वी मिरीच्या जागतिक निर्यातीच्या ८६%, कापोकच्या ६५%, रबराच्या ३७%, खोबऱ्याच्या २७%, ताडतेलाच्या २५%, चहाच्या १९%, साखरेच्या ६% वाटा इंडोनेशियाचा होता. दुसरे महायुद्ध, स्वातंत्र्यानंतरचे प्रश्न, वाढती लोकसंख्या व राजकीय अशांतता यांमुळे युद्धपूर्व स्थिती येणे अशक्य झाले आहे.

हस्तव्यवसाय, कुटिरोउद्योग व प्राथमिक प्रक्रियात्मक उद्योगांखेरीज इंडोनेशियात महत्त्वाचे जड उद्योगधंदे १९४५ पूर्वी अस्तित्वातच नव्हते. तेल शुद्धीकरण, भात सडणे, नारळ, ताड, तांदूळ, टॅपिओका, ऊस वगैरे शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करणे, असे लघुउद्योग इंडोनेशियन भांडवलावर उभारले गेले होते. १९४७ च्या डिसेंबर महिन्यात इंडोनेशियन सरकारने सर्व परकीय उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले. १५ ऑगस्ट १९६० रोजी इंडोनेशियाच्या राष्ट्रीय नियोजन समितीने आपला औद्योगिकीकरणासंबंधीचा पहिला आराखडा प्रसिद्ध केला. डिसेंबर १९६८ पर्यंतच्या आठ वर्षांच्या काळात, २४,००० कोटी रूपीयाह भांडवल गुंतवून कित्येक मोठमोठ्या जड उद्योगांना सुरुवात करण्याचे ठरले. ह्या नियोजनामध्ये कापड उद्योग, बाटिक किंवा तलम कापडनिर्मिती, छपाईचा कागद व शाई तयार करणे, रंगनिर्मिती, लोखंड व पोलाद उद्योग वगैरेंस सुरुवात झाली. साबण, मार्गारीन, रबरी वस्तू, चामड्याच्या वस्तू वगैरेंचे उत्पादन भराभर वाढू लागले. १९६९ मध्ये आणखी एक पंचवार्षिक योजना कार्यवाहीत आली आहे. या योजनेद्वारे सूकार्णो ह्यांनी निर्माण केलेले चारएकशे अवजड उद्योगधंदे बंद करून शेती व कृषिसंबद्ध मध्यम उद्योग सरकारने हाती घेतले आहेत.

आग्नेय आशियातील पेट्रोल उत्पादकांपैकी इंडोनेशिया प्रमुख होय. सुमात्रा, कालीमांतान, जावा व मादुरा ह्या चार बेटांवर खनिज तेलाच्या मोठ्या विहिरी आहेत तथापि सुमात्रामधील तेलउत्पादन ७० टक्क्यांवर आहे. ह्या उद्योगात ५०,००० कामगार गुंतलेले आहेत. पूर्वी हा डच-इंग्‍लिश व अमेरिकन मालकीचा धंदा होता. १९६० पासून सरकारने त्यावर नियंत्रणे आणली. १९६१ नंतर तेलप्राप्तीपैकी ६०% वाटा सरकारला मिळू लागला. १९६८ मध्ये येथे २०·२ कोटी बॅरल खनिजतेलाचे उत्पादन झाले होते. कथिलाच्या उत्पादनात इंडोनेशियाचा क्रमांक मलायाच्या खालोखाल लागतो. बांका, बिलीटॉन, सिंगकेप ही कथिलाच्या खाणींची प्रमुख केंद्रे आहेत. ही सर्व सरकारच्या मालकीची आहेत. १९६७ मध्ये कथिलाचे एकूण उत्पादन १३,५९७ टन झाले. बॉक्साइटच्या जागतिक उत्पादनात इंडोनेशियाचा पाचवा क्रमांक लागतो. १९६९ मध्ये ७·६६ लक्ष टन बॉक्साइटचे उत्पादन झाले. याशिवाय १·९२ लक्ष टन कोळसा (१९६९), ७८,७०० टन निकेल (१९६५) व १५,३९० टन मँगेनीज (१९६३) यांचे उत्पादन झाले. येथे लोहधातुक, तांबे, सोने, चांदी इ. खनिजे काही प्रमाणात मिळतात. जावामध्ये जलविद्युत्‌‌निर्मिती होते. १९६७ मध्ये १६·७७ लक्ष किवॉ. तास वीज-उत्पादन झाले याशिवाय २५ लक्ष टन नैसर्गिक वायूची निर्मिती झाली होती. भांडवलाचा अभाव, परकीय कंपन्यांवर बंधने, इंधन व इतर शक्तिसाधनांचा तुटवडा व आयातीबाबत सरकारची जटिल कार्यपद्धती यांमुळे देशातील उद्योग अद्याप प्रगतावस्थेत नाहीत. सिमेंट, खते, कृषिउत्पादने आणि नित्य गरजेच्या वस्तूंचेच कारखाने सध्या देशात आहेत. लाकूडउद्योग व मच्छीमारी हे येथील महत्त्वाचे उद्योग समजले जातात.

इंडोनेशियाच्या निर्यातीमध्ये रबर, चहा, मिरी, सिसल, खोबरे, खनिज तेल, कथिल व ताडतेल आणि त्यांच्या वस्तू यांची गणना होते. १९६९ साली निर्यातीपैकी रबर २२% पेट्रोलियम व त्याचे पदार्थ ४५%, कॉफी ६% व कथील ५% होते. सुमात्रामधून ६०% व जावामधून २०% किंमतीची निर्यात होते. आयात मात्र जावामध्ये ७०% व सुमात्रात २०% होते. आयातीमध्ये प्रामुख्याने कापड, तांदूळ, रसायने, यंत्रे, कागद इ. पदार्थ आहेत. १९६५ साली आयात २,७९७ कोटी व निर्यात ३,२५८·९ कोटी रूपीयाहची होती.

इंडोनेशियाची वैधमुद्रा रूपीयाह ही आहे. एका रूपीयाहचे १०० सारखे भाग असून त्यांस सेन म्हणतात. १९६९ मध्ये एका अमेरिकन डॉलरला २७५ रूपीयाह व एका पौंडाला ६६०·५२ रूपीयाह असा विनिमय दर होता.

इंडोनेशियाचा प्रदेश पुष्कळ बेटांचा मिळून झाला असल्याने येथे जलवाहतूक सर्वांत महत्त्वाची समजली जाते. ह्या निरनिराळ्या बेटांमधील वाहतूक ‘पेलाजरन नॅशनल इंडोनेशिया’ या नावाची एक राष्ट्रीय जलवाहतूक संस्था करते. ह्या संस्थेच्या मालकीच्या १९६१ साली अडीच कोटी टन वजनाच्या २७१ आगबोटी होत्या. इंडोनेशियात १९६९ साली ८४,२६८ किमी. लांबीच्या सडका व १९६७ मध्ये ६,७६५ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. जावा, सुमात्रा, कालीमांतान ह्या तीन बेटांवर लोहमार्ग उपलब्ध असले, तरी त्यांपैकी ७५% जावा बेटावरच आहेत. इंडोनेशियाच्या निरनिराळ्या भागांशी, जाकार्ताच्या मध्यवर्ती विमानतळापासून, निरनिराळे हवाईमार्ग चालू आहेत. पी. एन्. गरूड ही येथील राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी आहे. परदेशी हवाई वाहतूक कंपन्याही आहेत. देशात १९६८ मध्ये १,८१,३७७ दूरध्वनीयंत्रे, सु. १५ लक्ष रेडिओ व ७२,००० दूरचित्रवाणी यंत्रे होती.

लोक व समाजजीवन : इंडोनेशियातील बहुसंख्य लोक मलेशियन ह्या मंगोलॉइड वंशाच्या एका पोटजातीचे आहेत. ते उंचीने खुजे, किंचित कुरळ्या केसांचे व वर्णाने उजळ भुऱ्या रंगाचे आहेत. मूळच्या मंगोलियन वांशिकांचा हिंदू, अरब, चिनी वगैरे लोकांशी संकर झाल्यामुळे इंडोनेशियातील मलेशियन वंशाचे लोक निराळे बनले आहेत. मूळचे मंगोलियन वंशाचे लोक निराळे बनले आहेत. मूळचे मंगोलियन वंशाचे लोक तुरळकरीत्या अजूनही सुमात्रा, तिमोर, मोलूकू, ईरीआन वगैरे भागांत आढळतात. लंकेमधील ‘वेद्दा’ जमातीप्रमाणेच ही इंडोनेशियातील जमात दिसते. इंडोनेशियन लोकांची संस्कृती विविधरंगी दिसते. ह्या संस्कृतीत प्रथमावस्थेतील भटके, शिकारी, कोळी वगैरे लोकांपासून तो थेट अलीकडील पाश्चिमात्य संस्कृतीच्या लोकांपर्यंत निरनिराळ्या प्रमाणातील भेसळ दिसते. ह्यांपैकी काही लोक व संस्कृती अशा आहेत : (१) शिकारी व भटक्या जमातीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे कालीमांतानमधील ‘पूतान’ ह्या नावाने ओळखले जाणारे लोक. ते फार मागासलेले आहेत. अशाच प्रकारचे काही लोक सुमात्रा बेटावरही आहेत. सुमात्रामधील अशा लोकांस ‘कुळू’ असे नाव आहे. हल्ली ह्या कुळू लोकांनी शेतकरी पेशा स्वीकारला आहे. कुळूंच्यापेक्षा थोडे सुधारलेले सुमात्रामधील लोक म्हणजे ओरांग लाऊर किंवा समुद्रा-वरील लोक होत. (२) जावानीज : हे लोक मध्य व पूर्व जावामध्ये आहेत. हे मलायो-पॉलिनीशियन भाषा बोलतात. हिंदू-जावानीज अशी त्यांची मिश्र संस्कृती आहे. ह्यांच्या पैकी ‘बोरोबूदुर’ ही उपजात विशेष पुढारलेली समजतात. हे लोक उत्तम तांदूळ पिकविणारे आहेत. संख्येने हे साडेतीन कोटी असून ह्यांच्या लिपीला ‘कावी’ असे म्हणतात. (३) सूंदनीज : सूंदा बेटावर व पश्चिम जावामध्ये हे लोक राहतात. हे उत्तम शेतकरी असून भात व चहा यांच्या उत्पादनात वाकबगार आहेत. बहुसंख्येने हे मुसलमान आहेत. कावी व अरबी अशा दोन्ही लिप्या ते वापरतात. त्यांची संख्या सु. सव्वा कोटी आहे. (४) बादुई : पश्चिम जावामधील केडेंगच्या डोंगराळ भागात राहणारी ही जमात आहे. अलंकार वापरणे, गादीवर निजणे, वाहनात बसणे ह्या गोष्टी ते निषिद्ध मानतात. इस्लाम धर्म न स्वीकारता, मुसलमानांच्या जावातील आक्रमणांमुळे ह्यांनी वनवास पतकरला असावा. (५) टेंगेरेसे : पूर्व जावामधील टेंगेर जंगलात राहणारी ही लहानशी जमात आहे. हे हिंदू धर्माभिमानी असून ह्यांची संस्कृती हिंदू-इंडोनेशियन अशी मिश्र आहे. (६) मेनांगकाबाऊ : ओरांग मेनांगकाबाऊ ह्या किंवा मेनांगकाबाडा ह्या नावाने ओळखली जाणारी ही जमात सुमात्रात असून ते बहुसंख्य मुसलमान आहेत. हे मध्य व पश्चिम सुमात्रामध्ये असून ह्यांची संख्या अडीच कोटी आहे. भातशेती, पशुपालन व व्यापार ह्यांत हे लोक प्रवीण आहेत. कापड विणणे, लाकडी नक्षीकाम, धातूंच्या भांड्यावरील कलाकुसर ह्यांमध्येही ते वाकबगार आहेत. ह्या लोकांची कुटुंबसंस्था मातृप्रधान आहे. (७) आजिनी : उत्तर सुमात्रात राहणारे हे लोक आहेत. धर्माने ते मुसलमान आहेत. त्यांची भाषा व लिपी अरबी आहे. ह्यांचे वाङ्‌मय विपुल आहे. संख्येने हे सु. दीड कोटी आहेत. (८) बटाक : मध्य सुमात्रात टोबा सरोवराच्या आसमंतात राहणारी ही जमात आहे. हे भातशेतीत वाकबगार आहेत. पशुपालन हा त्यांचा दुय्यम व्यवसाय आहे. मुसलमान व ख्रिश्चन अशा दोन धर्मीयांत यांची विभागणी झाली आहे. (९) लांपाँग : हे इस्लामानुयायी लोक दक्षिण सुमात्रात आढळतात. ह्यांच्यापैकी मैदानात राहणार्‍यांना ओरांग बाबीयान असे नाव असून, डोंगराळ भागत राहणारे ते ओरांग आबोंग होत. तांदूळ व मिरी यांच्या उत्पादनता हे लोक निष्णात आहेत. (१०) कुबू : पालेंबांग व जांबी भागात हे कुबू लोक राहतात. हे लोक बरेच मागासलेले असून शिकार, रानातील फळे गोळा करणे वगैरे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत. काही कुबू शेतकरीही झाले आहेत. काही कुबूंनी मुसलमान धर्म स्वीकारला आहे. (११) गायो : मध्य सुमात्रातील दाट जंगलात राहणारे हे लोक इस्लाम धर्मीय आहेत. पशुपालन व भातशेती यांत ते वाकबगार आहेत. (१२) बुगिनीज : बुगी किंवा बुगिनीज लोक सूलावेसीचे रहिवासी आहेत. ह्यांची वस्ती मुख्यत्वे बोनीच्या आखाताच्या नैर्ऋत्य, पश्चिम व उत्तर किनाऱ्यालगतच्या भागांत विशेष आहे. तांदूळ, मका व कोको ही उत्पादने, पशुपालन, मच्छीमारी, परदेशी व्यापार ह्यांविषयी या लोकांची ख्याती आहे. धर्माने मुसलमान असूनही ह्यांच्यावर हिंदू संस्कृतीची छाप आहे. बुगिनी लोक नावाडी व गलबते बांधणारे म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. काही बुगिनी लोक कालीमांतानमध्ये वसाहतीकरता गेलेले आहेत. (१३) तोडरजा : मध्य सूलोवेसीच्या डोंगराळ भागात राहणारे हे लोक असून ते भात पिकविण्यात निष्णात आहेत. कित्येक तोडरजे ख्रिश्चन धर्मीय झाले आहेत. (१४) मेनाडोनी : उत्तर सूलावेसीमधील मीनाहास प्रदेशात राहणाऱ्या लोकांस मेनाडोनी असे म्हणतात. बहुसंख्य मेनाडोनी ख्रिस्ताचे अनुयायी आहेत. हे विशेषत: इंडोनेशियन संरक्षण दलात भरती होतात. ह्यांची भाषा व बोली पुष्कळशी फिलिपिनी भाषा व बोलीशी जुळणारी आहे. (१५) मकासरी : हे लोक नैर्ऋत्य सूलावेसीत राहतात. हे बहुसंख्य इस्लाम धर्मीय आहेत. ह्यांची व बुगिनी लोकांची संस्कृती सारखीच आहे. (१६) दायाक : कालीमांतानमधील बिगर मुसलमान धर्मीयास दायाक असे म्हणतात. मलायी भाषेत दायाक म्हणजे बिगर मुसलमानी असा अर्थ आहे. ह्यांचे दुसून, मुरून, क्लेमंतान, कलावित, मेलानाडा, हबन किंवा सागरी दायाक, खुष्की दायाक, बाहाऊ, कायन, केन्याह, ओतू-दानोत, ओलो-अंगाडूजू, पूनान असे पोटभाग आहेत. (१७) बालीनीज : बाली व लाँबॉक ह्या बेटांवर हे लोक राहतात. हे बहुसंख्य हिंदू असून त्यांची संस्कृतीही हिंदू आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे हिंदू लोकांमधील चातुर्वर्ण्य बालीनीज समाजातही प्रचलित आहे. हे लोक भातशेती करणारे आहेत. रंगावली, लाकडी व धातूच्या वस्तूंवरील नक्षीकाम, कापड विणणे, संगीत, नृत्य वगैरे कलांत हे लोक फार प्रवीण आहेत. (१८) ससाक : लाँबॉक बेटावर हे राहतात. बहुसंख्य ससाक पैगंबराचे अनुयायी असून उत्तम शेतकरी आहेत. (१९) मादुरी : जावा बेटाच्या ईशान्येकडील मादुरा बेटावर ह्या लोकांची वस्ती आहे. बहुसंख्य मादुरी इस्लाम धर्मीय आहेत. (२०) अंबोयनी : मोलूकू द्वीपसमूहातील अँबोइना व ऊली आसर ह्या बेटांवर हे लोक राहतात. हे इस्लाम धर्मीय व ख्रिश्चन धर्मीय आहेत. इंडोनेशियातील लोकसंख्या १९३० साली ४,१३,००,००० होती ती १९६१ मध्ये ९,६३,१८,८२९ झाली. त्यात न्यू गिनीतील ७ लाख लोकांची भर पडली. या लोकसंख्येतील दोन तृतीयांश लोक जावा, मादुरा बेटांवर राहतात. जगातील जास्तीत जास्त घनदाट लोकवस्तीचा भाग म्हणून जावाचा निर्देश केला जातो. १९६२ मध्ये इंडोनेशियातील ९०% लोक इस्लामधर्मीय, ४% ख्रिश्चन, ३% हिंदू व ३% इतर धर्मांचे होते.

इंडोनेशियाच्या संविधानात कुटुंबसंस्थेचे संरक्षण आणि गरीब व अनाथ व्यक्तीच्या किमान गरजा पुरविण्याची जबाबदारी तेथील सरकारवर सोपविलेली असली, तरी अनेक अडचणींमुळे ह्या कार्याला फारशी गती मिळालेली नाही. प्रथमत: त्या देशात समाजकार्याची दीक्षा घेऊन त्या कार्यासाठी विशिष्ट ज्ञान मिळविलेल्या व्यक्तींचाच मोठा तुटवडा भासत होता. १९४६ मध्ये प्रथमच, सुराकार्ता येथे एका समाजशिक्षण विद्यालयाची स्थापना करण्यात आली. हल्ली बालगुन्हेगारांची देखभाल न्यायमंत्रालयाकडे सोपविण्यात आली आहे, तर शिशुसंगोपन व मातांचे संगोपन हे विषय राष्ट्रीय आरोग्यखात्याच्या कक्षेखाली येतात. कामगारकल्याणासंबंधीचे प्रश्न, कामगारांसंबधी नियम, अधिनियम यांची अंमलबजावणी मजूरमंत्रालयाकडे सोपविण्यात आली आहे. स्त्रिया व मुले यांच्यावर उपजीविका करणारे, वेश्या व्यावसायिक, गांजेकस, रोजगारविरहित– विशेषत: सैन्यातून कमी केल्या गेलेल्या व्यक्ती– यांच्यासंबंधीची कारवाई समाजकल्याणखात्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. ह्याखेरीज इंडोनेशियामध्ये ठिकठिकाणी अनाथाश्रम, युवक संस्था, वृद्धाश्रम व खाजगी धर्मादाय संस्था यांच्यामार्फत निरनिराळ्या तऱ्हेने समाजकल्याण कार्य केले जाते. ह्या निरनिराळ्या संस्थांना काही प्रमाणात सरकारी अनुदानही दिले जाते. सुराकार्ता येथे एक अपंगगृह सुरू करण्यात आले आहे.

इंडोनेशियन भाषा मलायो-पॉलिनीशियन गटात मोडतात. ‘ब्‌‌हाशा इंडोनेशिया’ ही अधिकृत भाषा असली, तरी तद्देशीय लोकांच्या सु. २५ निरनिराळ्या भाषा व २५० बोलीभाषा बोलल्या जातात.

इंडोनेशियाच्या संविधानात व्यक्तीच्या विचार व वाणी स्वातंत्र्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. परकीयांस इंडोनेशियाच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करण्याचे अथवा प्रस्थापित सरकारविरुद्ध कोणत्याही विचारप्रणालीसंबंधी जनतेत प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही. विशेषत: १९५८ पासून चिनी वृत्तपत्रांवर कडक नियंत्रणे बसविण्यात आली आहेत. १९६९ मध्ये जावामध्ये सु. ४२ दैनिके, कालीमांतानमध्ये ६, सुमात्रामध्ये ५, सूलोवेसीमध्ये ३ व बाली, तिमोर व लाँबॉकमध्ये प्रत्येकी एक दैनिक प्रसिद्ध होत होते. याशिवाय कित्येक नियतकालिके प्रसिद्ध होतात.

इंडोनेशियात साक्षरताप्रसाराचे जोराचे प्रयत्‍न सुरू आहेत. १९५८ च्या खानेसुमारीप्रमाणे, निरक्षरतेचे प्रमाण ४५% होते. सर्व देशात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे १९६३ अखेर निरक्षरतेचे प्रमाण १८ टक्क्यांवर आले. एकंदर शिक्षणक्रम ६ वर्षांचा पूर्व प्राथमिक व प्राथमिक, ३ वर्षांचा पूर्व माध्यमिक, ३ वर्षांचा माध्यमिक व ह्या नंतरचा विश्वविद्यालयीन, अशा निरनिराळ्या टप्प्यांत विभागण्यात आला आहे. ह्याशिवाय प्रशिक्षण केंद्रे, विद्यालये, पाठशाळा व निरनिराळ्या प्रकारच्या ज्ञानशाखा विद्यादानाचे कार्य अव्याहत करीत आहेत. १९६७-६८ मध्ये देशात २,८८,१४६ प्राथमिक शिक्षक व १,२५,७४,८२३ विद्यार्थी ६४,५७६ माध्यमिक शिक्षक व ११,४८,५०२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. सरकारी चोवीस आणि कित्येक खाजगी विद्यापीठांतून आणि संस्थांमधून उच्च शिक्षणाची सोय आहे.

पूर्व जावामध्ये मौंटन गार्डन व पुरी बोदादी गार्डन ह्या नावाची दोन, सुमात्रामध्ये सिबोलांगिज गार्डन ह्या नावाचे एक व बोगोर येथील हॉटस बोगोरिएंसिस ह्या नावाचे एक, अशी एकंदर चार वनस्पति-संग्रहालये प्रसिद्ध आहेत. जावा हे उष्णकटिबंधातील वनस्पतिविषयक संशोधनाचे एक जगप्रसिद्ध केंद्र आहे. जाकार्ता येथील मध्यवर्ती ग्रंथालय बरेच मोठे आहे. समाजशिक्षणाच्या प्रसारार्थ १९५४ नंतर जवळजवळ १०,००० ग्रंथालये व वाचनालये देशाच्या निरनिराळ्या भागांत उघडण्यात आली आहेत. जाकार्ता येथील राष्ट्रीय संग्रहालयात इंडोनेशियातील जुने अवशेष मोठ्या संख्येने आढळतात.

लिमये, दि. ह.; शाह, र. रू.

कला व क्रीडा : इंडोनेशियाच्या कलेवर भारतीय आणि चिनी संस्कृतींचा चांगलाच पगडा आहे. जोगजाकार्ता येथील सुलतानाच्या राजवाड्यात लाकडाच्या खांबांवर कोरीव, रंगीत आणि नक्षीदार काम केलेले आढळते. बोरोबूदूर येथील बौद्ध मंदिर भारतीय स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. बालीमधील सर्वांत मोठा पुतळा नातू जेद ओंतजेरिंग जगत ह्या नगररक्षकाचा आहे. बालीमधील बेसाकी येथील मंदिर अतिप्राचीन आहे. बालीतील छत्तीस देवळांचे महोत्सव दरवर्षी होत असतात.

उबूद येथील सोन्याच्या व तांब्याच्या कलाकुसरीचे काम प्रसिद्ध आहे. सूंबा बेटातील तलम सुती कापड आणि सुमात्रामधील किनखाबाचे कापड पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. तसेच बाटिक प्रकारातील व इंकात हे जरीकामाचे कापड जगप्रसिद्ध आहे. जाकार्तामधील गेडूंग आर्ट आणि मर्डेका बारात या दोन संग्रहालयांमध्ये प्राचीन कलावस्तूंचे नमुने ठेवले आहेत.

बांडुंगमधील ॲफन्डी (१९१०–    ) हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पहिला इंडोनेशियन चित्रकार होय. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील ओ. एफेन्डी, झैनी इ. चित्रकार प्रसिद्ध आहेत.

इंडोनेशियाच्या अभिजात नृत्याचे पेंडेट, बेदाया, सेरिम्पी, वायांग, केतजाक, वायांग-टोपेंग आणि लिलिन हे प्रमुख प्रकार होत. पेंडेट नृत्य इंडोनेशियामध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी करण्यात येते. बेदाया नृत्यात नऊ मुली अप्सरांची वेषभूषा करून नाचतात. प्राचीन नायिकांची रूपे घेऊन चार मुली सेरिम्पी नृत्य करतात. वायांग नृत्यामध्ये बाहुल्यांची योजना करतात. केतजाक नृत्यामध्ये सु. दोनशे गावकरी वर्तुळाकार बसून रावणवधाचे दृश्य नृत्यांकित करतात. ह्याच नृत्याला मर्कटनृत्य असेही म्हणतात. मुखवट्यांच्या एका विशिष्ट नृत्यास ‘वायांग-टोपेंग’ अशी संज्ञा आहे. मेणबत्ती-नृत्याला ‘लिलिन’ अशी संज्ञा आहे. ह्यांखेरीज बाली येथील ‘लेगाँग’ हे गूढरम्य आणि सुमात्रा येथील ‘श्लीविद्‌जाजा’ हे नृत्यप्रकारही प्रसिद्ध आहेत. तेथील नृत्याप्रमाणेच संगीतावरही भारतीय प्रभाव पडलेला आहे. रामायणामधील विविध प्रसंगांवरील संगीतिका, कळसूत्र बाहुल्यांचे खेळ आणि नृत्यनाटिका तेथे लोकप्रिय आहेत.

नृत्य, नाट्य, सण आणि धार्मिक विधींच्या प्रसंगी ‌’गेमलन’ हे एक विशिष्ट प्रकारचे संगीत सादर केले जाते.

खेळ व मनोरंजन : इंडोनेशियन लोकांनी बॅडमिंटन आणि फुटबॉल ह्या खेळांत प्रावीण्य मिळविले आहे. इंडोनेशियन खेळाडूंच्या जोडीने बॅडमिंटनच्या टॉमस कप स्पर्धेत १९७० मध्ये आशियाई अजिंक्यपद मिळविले. गोल्फ, टेनिस, कोंबड्यांची झुंज, नौकाविहार, शिकार, पोहणे इ. खेळही तेथे लोकप्रिय आहेत.

महाम्बरे, गंगाधर

प्रेक्षणीय स्थळे : इंडोनेशियाची रजधानी व सर्वांत महत्त्वाचे केंद्र जावामधील जाकार्ता हे शहर असून बांडुंग, सुराबाया, सामारांग, मेडान, पालेंबांग, माकॉसर, मालांग, जोगजाकार्ता ही तीन लाखांवर लोकवस्ती असलेली शहरे आहेत. बांडुंग येथे १९५५ साली आफ्रो-आशियाई राष्ट्रांची पहिली परिषद भरून तीत पंचशील तत्त्वांची घोषणा करण्यात आली. हिरवीगार शेते, निळे पाणी आणि ज्वालामुखी शिखरे असलेली, अशी ही पूर्वीपासूनची प्रसिद्ध मसाल्याची बेटे आजही महत्त्वाची आहेत. भारतीय संस्कृतीचा येथे फार पूर्वीच प्रसार झाल्याने तिला भारतीयांच्या दृष्टीने आगळेच महत्त्व आहे. (चित्रपत्र ३५,३६).

संदर्भ : 1. Coomarswamy, A. K. History of Indian and Indonesian Art, New York, 1965.

2. Cressey, George B. Asia’s Lands and Peoples, New York, 1951.

3. Fisher, Charles A. Sauth-East Asia, London, 1964.

शाह, र. रू.

इंडोनेशिया

 

जाक्रानेगारा (लांबॉक बेट) येथील मंदिर
मच्छीमार
जाकार्ता : एक विहंगम दृश्य
जावामधील नारळ उत्पादन
भात कांडणाऱ्या युवती, बाली
एका धार्मिक नृत्याच्या तयारीत असलेल्या युवकयुवती, बाली