मेकाँग नदीवरील जुना राजवाडा, ल्यांगप्राबांग.ल्वांगप्राबांग : लाओसच्या उत्तर भागाकडील एक शहर व मेकाँग नदीवरील बंदर, लोकसंख्या ४४,२४४ (१९७३). व्ह्यँत्यान या देशाच्या राजधानीपासून उत्तर-वायव्येस २१ किमी. अंतरावर, मेकाँग नदीच्या पूर्व तीरावर हे शहर वसलेले आहे. १३५३ पासून ल्वांगप्राबांग (म्वाँग स्वा) ही लान् झांग राज्याची राजधानी होती. १५६३ च्या दरम्यान येथील राजदरबार व्ह्यँत्यान येथे हलविण्यात आला. तेव्हा १३५३ च्या सुमारास या नगरात आणलेल्या प्र बांग या सिंहली सोनेरी बुद्धमृत्तीच्या स्मरणार्थ ‘म्वाँग स्वा’ चे ल्वांगप्राबांग असे नामकरण करण्यात आले. लान् झांगची १७०७ मध्ये दोन राज्यांत विभागणी झाली तेव्हा ल्वांगप्राबांग ही याच नावाच्या नवीन राज्याची राजधानी बनली, तर दुसऱ्या राज्याची राजधानी व्ह्यँत्यान ही राहिली. १९४६-४७ मध्ये लाओसच्या पुनर्रचनेत ल्वांगप्राबांग राज्याची विभागणी झाली, तरीही ल्वांगप्राबांग शहराचे शाही निवासस्थान व देशातील धार्मिक केंद्र म्हणूनही महत्त्व कायम राहिले व व्ह्यँत्यान ही देशाची प्रशासकीय राजधानी बनली.

ल्वांगप्राबांगला जरी शाही थाटाची पार्श्वभूमी तुलनेने लाभली असली, तरी हे शहर लहानच राहिले. आधुनिक उद्योगधंद्यांचा येथे अभाव आढळतो. १९७५ मध्ये लाओसवर कम्युनिस्ट सत्ता आल्यावर येथील राजेशाही संपुष्टात आली. राजश्रयाखाली असताना शहरात लाख, सोने व चांदी यांची कारागिरी मोठ्या प्रमाणावर चालत होती. शहरात प्रामुख्याने शेतमाल, मासे, लाकूड यांचा व्यापार चालतो. येथील व्यापार मुख्यतः भारतीय व चिनी या अल्पसंख्य लोकांच्या हातात आहे. येथे दोन शिक्षक प्रशिक्षण विद्यालये आहेत. विसांवर बौद्ध पॅगाडे असून त्यांपैकी फू सी पॅगोड्यात बुद्धाचे पदचिन्ह आहे. वंशदृष्ट्या ल्वांगप्रबांगमधील लोक शेजारच्या थायलंडमधील थाई लोकांच्या अगदी जवळचे आहेत.

चौधरी, वसंत