भोगावती : ही नदी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील ⇨पंचगंगा नदीचा एक शीर्षप्रवाह होय. लांबी सु. ८२ किमी. सर्वसामान्यपणे दक्षिणोत्तर वाहणारी ही नदी सह्याद्रीच्या रांगेत, कोल्हापूर शहराच्या नैर्ऋत्येस सु. ४८ किमी.वर फोंडाघाटाच्या (फोंडा खिंडीच्या) दक्षिणेस उगम पावते. सु. ४० किमी. वाहत गेल्यावर बीड गावाजवळ तिला डाव्या बाजूने तुळशी नदी मिळते. तदनंतर यांच्या संयुक्त प्रवाहास बहिरेश्वर येथे कुंभी व धामणी या नद्यांचा संयुक्त प्रवाह येऊन मिळतो. हा एकत्रित प्रवाह पुढे प्रयागजवळ कासारी नदीस मिळतो व येथून पुढे हा प्रवाह पंचगंगा नदी या नावाने ओळखला जातो.

भोगावती नदीच्या उगमाकडील भागात, ⇨राधानगरी तालुक्यात फेजिवडे येथे १९५४ साली धरण बांधण्यात आले. १,१४३ मी. लांब व ४२.७ मी. उंचीच्या या धरणाच्या जलाशयाला ‘लक्ष्मी तलाव’ असे नाव देण्यात आले आहे. या धरणामुळे वीजनिर्मिती व पाणीपुरवठा हे दोन्ही हेतु साध्य झाले आहेत. धरणामुळे भोगावती नदीखोऱ्यात शेती व औद्योगिक प्रगती होत आहे. या नदीतील पाणी बंधारे बांधून उपसा जलसिंचन पद्धतीने शेतीस पुरविले जाते. नदीखोऱ्यात गहू, भात तसेच तंबाखू, भाजीपाला इ. पिके घेतली जातात. यांशिवाय विड्याच्या पानांचे मळे व ऐन, हिरडा, बांबू यांची बने आहेत. नदीखोऱ्यात गवा, बिबळ्या, चितळ, सांबर, इ. वन्य प्राण्यांचे अभयारण्य (राधानगरी भागात) असल्याने पर्यटनदृष्ट्याही हे खोरे महत्त्वाचे आहे. राधानगरी, राशीवडे, परिते, बीड इ. भोगावती नदीखोऱ्यातील प्रमुख गावे होत.

कुलकर्णी, गो. श्री.