राजभवन ,दार्जिलिंग

दार्जिलिंग : प. बंगाल राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे तसेच निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या ४२,८७३ (१९७१). हे कलकत्त्याच्या उत्तरेस सु. ४९१ किमी. लोअर हिमालयात स. स. पासून सु. २,१०० मी. उंचीवर वसले आहे. येथील कमाल आणि किमान तपमान अनुक्रमे २६·७° से. व –१·१° से. असून वार्षिक सरासरी पर्जन्य ३,१०० मिमी. पडतो. हिवाळ्यात बर्फवृष्टीही होते. हवामान आल्हाददायक असून या शहराला गिरिस्थानांचे नंदनवन असे म्हणतात. १८३५ मध्ये हे सिक्कीमच्या राजाकडून ब्रिटिशांनी घेतले आणि भारतातील बऱ्याचशा गिरिस्थानांप्रमाणे याचाही विकास ब्रिटिशांनीच केला. १८९७ मध्ये भूकंपाने तर १८९९ साली चक्रीवादळामुळे व बर्फवृष्टीमुळे ह्या शहराचे बरेच नुकसान झाले. १८५० पासून येथे नगरपालिका आहे.

चोहोबाजूंनी डोंगरांनी, जंगलांनी आणि जलप्रपातांनी वेढलेले हे निसर्गरम्य ठिकाण भारतातील तसेच जगातील निरनिराळ्या देशांतील पर्यटकांचे एक आकर्षक ठिकाण झाले आहे. येथील लॉइड वनस्पतिउद्यान, व्हिक्टोरिया जलप्रपात, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, हिमालयन प्राणिसंग्रहोद्यान, देशभक्त चित्तरंजनदास यांची वास्तू, लेबाँग शर्यतीचे मैदान, हिंदूंची मंदिरे, ख्रिस्ती चर्च व बुद्धमंदिरे ही प्रवाशांची आकर्षणे आहेत. २,१८२ मी. उंचीचे ‘ऑब्झर्व्हेटरी हिल’ हे य़ेथील सर्वांत उंच ठिकाण असून उत्तरेस ७४ किमी. वरील सदोदित बर्फाने आच्छादित असलेल्या कांचनजंघा शिखराच्या मनोहारी दृश्याची येथून मजा लुटता येते. बर्च टेकडी, सेंन्याल सरोवर, भुतिया बस्तीवरील बुद्धमंदिरे ही येथील सहलीची उत्तम ठिकाणे असून बर्च टेकडीवर नैसर्गिक उद्यान व गिर्यारोहण शिक्षणकेंद्र आहे. वायव्येस १७० किमी. असलेले एव्हरेस्ट आणि कांचनजंघा शिखरांचे नयनमनोहर दृश्य टायगर हिलवरून दिसते.

रस्ते, लोहमार्ग व हवाई मार्गाने हे महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. अगदी अलीकडे बांधलेल्या फराक्का पुलामुळे लोहमार्गाने व सडकेने कलकत्त्यापासून दार्जिलिंगपर्यंत होणारी वाहतूक सुकर झाली आहे. याच्या आसमंतात चहाचे मळे असून चहा, पालेभाज्या, नारिंगे, बटाटे ह्या येथील मुख्य निर्यात वस्तू होत. चिनी मातीची भांडी, माळेचे मणी, पोवळी, पितळी सामान यांचा व्यापार येथे चालतो. येथे दुग्धशाला व वराहालय असून त्यातील उत्पादित पदार्थ कलकत्त्यास पाठविले जातात. प्लायवुडचे कारखानेही येथे आहेत. येथे १९६२ मध्ये स्थापन झालेले ‘नॉर्थ बेंगॉल’ विद्यापीठ असून येथील वैद्यकीय शाखेची सोय असलेली पाच महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. जिल्हा पातळीवरील सर्व शासकीय कार्यालये येथे असून या निसर्गरम्य ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांच्या राहण्याच्या उत्तम सोयींसाठी येथे पाश्चिमात्य पद्धतीची अनेक विश्रांतिगृहे आहेत.

दाते, सु. प्र. चौधरी, वसंत