(अ) अवसादी शृंगपुच्छ, (आ) सुरक्षित अवसादी शृंगपुच्छ.शृंगपुच्छ : (क्रॅग अँड टेल). एका बाजूस तीव्र उतार व दुसऱ्या बाजूस मंद उतार असलेला एक हिमानीय (ग्लॅसिअल) भूविशेष. याला ‘सुळका व शेपूट’ असेही म्हणतात. कठीण खडकाला लागूनच एका बाजूस क्रमाने मृदू खडकाचा विस्तृत प्रदेश असलेल्या भागातून हिमनद अथवा हिमखंड वाहत गेल्यास अशा प्रकारचा भूआकार तयार होतो. हिमखंडाच्या या वाहण्याने कठीण खडकाची झीज कमी, तर त्यामानाने मृदू खडकाची झीज जास्त प्रमाणात होते. हिमखंडाच्या मंद वहनाने या मृदू खडकाचा पृष्ठभाग खरवडून काढला जातो व वाहून आलेल्या रेती, दगड-धोंड्यांमुळे खाचखळगे भरले जाऊन मंद उताराचा, लांबट शेपटासारखा प्रदेश तयार होतो. त्यालाच जोडून असलेला कठीण खडकाचा भाग मात्र एका बाजूस तीव्र उताराचा, उंच सुळक्यासारखा अथवा शिंगासारखा शिल्लक राहतो. काही भागांत हा आकार साधारणपणे ⇨ ड्रमलिनसारखाही दिसतो. स्कॉटलंडमधील ‘एडिंबर कॅसल रॉक’ हे शृंगपुच्छ भूविशेषाचे उत्तम उदाहरण आहे. हे ज्वालामुखीजन्य बेसाल्ट खडकाचे असून त्याला लागूनच कारबॉनिफेरस काळातील चुनखडक आहेत. झिजेने हा चुनखडकाचा भाग लांबट, मंद उताराचा, शेपटासारखा बनलेला असून खडकावरील किल्ल्यात जाण्यासाठी त्यावरून सु. १ किमी. लांबीचा रस्ता काढलेला आहे.                                        

चौंडे, मा. ल.