रुद्रप्रयाग : भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या गढवाल जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १,३३१ (१९८१). गंगेच्या शीर्षप्रवाहांवरील पाच प्रमुख प्रयोगांपैकी हे एक असून ते श्रीनगरच्या ईशान्येस २१ किमी. वर अलकनंदा व मंदाकिनी (काली गंगा) या नद्यांच्या संगमावर वसले आहे. सस.पासून सु. ७०१ मी. उंचीवरील या ठिकाणीसूनच ⇨बद्रीनाथ व ⇨केदारनाथ या विख्यात तीर्थक्षेत्रांना रस्ते जातात. येथील अलकनंदेच्या अवखळ प्रवाहामुळे याला रौद्र−रुद−प्रयाग असे नाव पडले असावे. मंदाकिनीचे पाणी हिरव्या रंगाचे असल्याने संगमानंतरही बरेच अंतर या दोन्ही नद्यांचे प्रवाह वेगवेगळे दिसतात.

रुद्रप्रयाग अलकनंदा नदीच्या दोन्ही काठांवर वसलेले असून नदीवर झुलता पूल आहे. संगमाच्या दुबेळक्यात घाट बांधण्यात आला असून त्यावर एक प्रचंड शिळा आहे. ती नारदशिळा म्हणून ओळखली जाते. घाटाच्या वरच्या बाजूस रुद्रनाथ म्हणजे रुद्रेश्वर महादेवाचे एक चिरेबंदी मंदिर आहे. देवळाभोवतीच्या बगिच्यात रुद्राक्षाची झाडे आहेत. रुद्रप्रयाग येथे देवर्षी नारदाने संगीत विद्येच्या प्राप्तीसाठी शिवाची आराधना केली होती, अशी कथा सांगितली जाते. रुद्रनाथाशिवाय या परिसरात गंगा, कोटेश्वर महादेव, उमरानारायण यांची मंदिरे असून कोटेश्वर महादेवाचे शिवलिंग एका गुहेमध्ये आहे. येथे पर्यटकांसाठी काली-कंबली-वाल्यांच्या धर्मशाळा आहेत. येथील घाट, धर्मशाळा यांचा विकास सव्धिदानंद स्वामींच्या प्रयत्नाकने झाला असे सांगितले जाते. भाविक या संगमस्थळी पितरांना पिंडदानादी धार्मिक कृत्ये करतात.

खंडकर, प्रेमलता