कासाई : मध्य आफ्रिकेतील काँगो (झाईरे) नदीची महत्त्वाची उपनदी. लांबी सु.२,१५० किमी. जलवाहनक्षेत्र ९,०६,५०० चौ. किमी. अंगोलामधील बेंग्वेला पठाराच्या १,१०० मी. उंचीच्या डोंगराळ प्रदेशात कासाईचा उगम होतो. तेथून ती सु.४०० किमी. पूर्वेकडे वाहते व मग उत्तरवाहिनी होते. तिचा दक्षिण-उत्तर ४८० किमी. प्रवाह (काँगो-किन्शासा) झाईरे आणि अंगोला यांमधील सरहद्‌द आहे. झाईरेमधील पोर्ट फ्रांकी शहराजवळील बोसोंगो येथे कासाईस पूर्वेकडून येणारी सांकूरू नदी मिळते व कासाई पश्चिमवाहिनी बनते. पोर्ट फ्रांकी ते केपटाउन हा रेल्वेमार्ग असून बोसोंगोपासून कासाईवर व पुढे झाईरे नदीवर किन्शासापर्यंत मोठ्या जहाजांनी वाहतूक चालते. किन्शासाच्या १६० किमी. ईशान्येस असलेल्या क्वामाउथ शहरी कासाई (मुखाजवळ तिला क्वा नाव आहे) काँगो (झाईरे) नदीस मिळते. येथे कासाईचे पात्र अरूंद (७०० मी.) आहे. कासाईस अनेक मोठ्या नद्या मिळतात म्हणून ती नेहमी वाहती असते. पावसाळ्यात अर्थात तिला भरपूर पाणी असते. लूलूआ (९६० किमी. लांब), सांकूरू (१,२०० किमी.), फिमी (१,०६२ किमी.) या कासाईस उजवीकडून मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या असून चीकापा (६४० किमी.), कांगो (१,१२० किमी.), लोएँँगे (६८० किमी.) या डावीकडून मिळणाऱ्या उपनद्या होत. उत्तरेकडील लिओपोल्ड सरोवराचे पाणी फिमीव्दारा कासाईस मिळते. बेंग्वेला पठारावरून समांतर उत्तरेकडे वाहणाऱ्या आणि कटांगा पठारावरून पश्चिमेकडे वाहणाऱ्या बऱ्याचशा कासाईच्या उपनद्या ६०० ते ९०० मी. उंचीवरून कॉंगोच्या सॅव्हाना गवताळ प्रदेशात द्रुतगतीने येतात, त्यामुळे त्यांवर अनेक प्रपात निर्माण झालेले आहेत क्वीलू नदीवरील स्टेफनी, कासाईवरील वीसमान, लूलूआवरील फ्रांस्वा व सांकूरूवरील वूल्फ हे त्यांपैकी काही महत्त्वाचे आहेत. सोळाव्या शतकात पोर्तुगीज समन्वेषकांना कासाईच्या काही उपनद्यांचा शोध लागला असला, तरी १८५४-५५ साली लिव्हिंगस्टनने कासाई-क्वांगो संहतीचा तपशीलवार अहवाल दिल्यानंतरच कासाईकडे जगाचे लक्ष वेधले. झाईरेच्या खनिजसंपन्न भागातून वाहणारी तसेच जलवाहतुकीस अत्यंत उपयुक्त म्हणून कासाईस महत्त्वाचे स्थान मिळाले.

शाह, र.रू.