कीटो : दक्षिण अमेरिकेतील एक्वादोर देशाची व त्याच्या पिचिंचा प्रांताची राजधानी व ग्वायाकील खालोखाल मोठे शहर. लोकसंख्या ५,२८,१०० (१९७० अंदाजे) स्पॅनिश आक्रमकांच्या आगमनापूर्वी काही वर्षे कीटो जमातीची ही वसाहत इंकांनी काबीज करून तेथे आपल्या साम्राज्याचे ठाणे बांधले. १५३४ मध्ये ते स्पॅनिशांनी काबीज केले. १६६३ साली स्पॅनिश साम्राज्याच्या एका विभागाचे मुख्य ठाणे येथे आले. १८०९ साली येथे स्पेनविरुद्ध उठाव झाला, परंतु १८२२ पर्यंत ते स्वतंत्र झाले नाही. ४,८४७ मी. उंचीच्या पिचिंच्या ज्वालामुखीच्या पायथ्याशी ग्वायाकीलच्या ईशान्येस २७२ किमी. वर हे वसलेले आहे. कीटो सुपीक खोऱ्यात असल्याने शहराभोवती रम्य वनश्री आहे.

कीटो : एक्वादोरची राजधानी

विषुववृत्ताच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर असूनही शहर समुद्रसपाटीपासून २,८५० मी. उंचीवर असल्याने येथील हवा प्रसन्न व आल्हाददायक असते. यास भूकंपाचे धक्के वारंवार बसतात. वसाहतकालीन इमारती व नगररचना यांमुळे कीटो आकर्षक वाटते. इमारतींत सॅन फ्रॅन्सिस्कोचे भव्य मंदिर प्रेक्षणीय आहे. शहरात इंडियन बहुसंख्य असून त्यांचे पोशाख व चालीरीती यांनी कीटोचे जीवन वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे. येथे दोन विद्यापिठे, तांत्रिक शिक्षणसंस्था, वेधशाळा असून काही कापडगिरण्या, पादत्राणे, औषधे व हस्तव्यवसायादी लघुउद्योग आहेत. देशाच्या आर्थिक व औद्योगिक जीवनात या शहरास फारसे महत्त्व नाही तथापि एक्वादोरच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचा गाभा कीटोतच आढळतो. तसेच हे दळणवळणाचेही मोठे केंद्र आहे.

शहाणे, मो. ज्ञा.