श्रीवर्धन : महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्यालय, इतिहासप्रसिद्ध शहर व बंदर. लोकसंख्या १५,१८७ (२००१). मुंबईच्या दक्षिणेस १९२ किमी. व पुण्याच्या नैऋर्त्येस १९७ किमी.वर समुद्रकाठी निसर्गरम्य परिसरात हे वसले आहे. यूरोपीयांच्या प्रवासवर्णनांत याचा ‘ झिफरदन ‘ असा उल्लेख आढळतो.
महाभारतकाळात पांडवांपैकी अर्जुनाने त्यास भेट दिली होती, अशी आख्यायिका आहे. इतिहासकाळात बहमनी आणि नंतर सोळाव्या व सतराव्या शतकांत निजामशाही व आदिलशाहीच्या काळात उत्कृष्ट व्यापारी बंदर म्हणून याचा वापर होत होता. छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत (कार. १७०८-१७४९) त्यांचे ‘सरखेल’ कान्होजी आंग्रे यांच्या अखत्यारीत हे बंदर होते. पेशव्यांचे मूळ भट घराणे श्रीवर्धनचे असल्यामुळे त्यास पेशवेकाळात महत्त्व प्राप्त झाले. पेशव्यांनी येथे काही मंदिरे बांधली. श्रीवर्धनमध्ये सोमजाईदेवी, कालभैरव, जीवनेश्वर (शंकर), नारायणदेव (लक्ष्मी-नारायण), श्रीराम इ. मंदिरे असून त्यांपैकी श्रीराम मंदिर हे मुख्यत्वे कोळी समाजाचे आहे.
नारायणदेव मंदिरात पेशवे कुटुंबातील मंडळी दर्शनासाठी येत असत. पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ (कार. १७१३२०) याच्याकडे श्रीवर्धन व आजूबाजूची गावे यांची देशमुखी होती. पुढे बाळाजीने कोकणातील तटबंदी असलेली सोळा ठिकाणे कान्होजी आंगे यास दिली. त्यांमध्ये श्रीवर्धन हे एक होते. येथे बाळाजी विश्वनाथाच्या वाड्याचा चौथरा अवशिष्ट असून, तेथे श्रीवर्धन नगरपालिकेने १९८८ मध्ये ‘ श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर ’ उभारले आहे. त्याच्या आतील बाजूस १.५२ मी. उंचीच्या चौथऱ्यावर, तेवढ्याच उंचीचा बाळाजी विश्वनाथाचा ब्राँझचा पूर्णाकृती पुतळा आहे. चौथऱ्याच्या दर्शनी भागावर बाळाजीचा चरित्रवृत्तांत खोदला आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूस ब्रह्मेंद्रस्वामी आणि उजव्या बाजूस छ. शाहू यांचे अर्धपुतळे आहेत. सांप्रत पेशवेवाड्यातील तीन दालनांत बालवाडी, टेबल टेनिस कोर्ट व व्यायामशाळा आहे.
शहरातील मंदिरांपैकी जीवनेश्वर शंकराचे मंदिर उत्तरकालीन हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. येथील सोमजाई देवीचे मंदिर विशेष प्रसिद्ध असून, देवीची स्थापना अगस्ती ऋषींनी केल्याची आख्यायिका सांगतात. या मंदिराच्या चार बाजूंना कंकाली, भद्रकाली, कात्यायनी व चामुंडा यांच्या मूर्ती असून गर्भगृहात सोमजाई देवी शाळिग्राम-रूपात आहे. येथे मार्गशीर्ष (वद्य पक्ष) व आश्विन (नवरात्र) महिन्यांत मोठे उत्सव होतात.
श्रीवर्धनची नगरपालिका १८८७ मध्ये स्थापन झाली असून ती शहराला आरोग्य, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधा पुरविते. येथे शासकीय कार्यालये तसेच न्यायालय असून प्राथमिक, माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षणाची व्यवस्था आहे. एक निसर्गरम्य ठिकाण, समुद्रसान्निध्य, नारळी-पोफळीच्या बागा, पेशव्यांचे मूळग्राम व ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांची येथे वर्दळ असते.
देशपांडे, सु. र.