टास्मानिया : कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलियाचे सर्वांत लहान द्वीपराज्य. क्षेत्रफळ सु. ६८,३३१ चौ. किमी. (सु. ६८,३३,१०८ हे.) लोकसंख्या ३,९९,५९९ (१९७३). व्हिक्टोरिया राज्याच्या दक्षिणेस २४० किमी.वर हे असून बॅस सामुद्रधुनीमुळे अलग झाले आहे. टास्मानिया राज्यात खालील बेटे येतात : टास्मानिया हे प्रमुख बेट, ब्रूनी बेट, किंग व फ्लिंडर्स बेटे (बॅस सामुद्रधुनीमधील), अनेक लहानलहान बेटे. अंटार्क्टिकमधील माक्वॉरी हे टास्मानियाच्या आग्नेयीस सु. १,६०० किमी.वर आहे. टास्मानिया हे प्रमुख बेट जवळजवळ हृदयाकारी असून श्रीलंकेहून ते किंचित मोठे आहे. २८८ किमी. उत्तर-दक्षिण व ३०४ किमी. पूर्व-पश्चिम पसरले आहे. प्रमुख बेटाचे क्षेत्रफळ सु. ६४,४०,८१० हे. आहे. सबंध ऑस्ट्रेलियाच्या एक टक्का क्षेत्र टास्मानियाने व्यापले आहे. होबार्ट हे राज्याच्या राजधानीचे शहर आहे. प्रमुख नागरी क्षेत्रांची लोकसंख्या होबार्ट १,३३,०८० नागरी लॉन्सेस्टन : ६२,७३० नागरी बर्नी-समरसेट : २०,४६० नागरी डेव्हनपोर्ट : १९,२३०.

आबेल टास्मान या पहिल्या यूरोपीय डच मार्गनिर्देशक समन्वेषकाने १६४२ मध्ये या बेटाचा शोध लावल्यावरून बेटास त्याचे नाव देण्यात आले असले, तरीही १८५६ पर्यंत टास्मानिया व्हॅन डीमेन्स लँड या नावानेच ओळखले जात होते कारण ईस्ट इंडीजचा गव्हर्नर व्हॅन डीमेन याने टास्मानला संशोधनार्थ पाठविले होते.

 भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या टास्मानिया हा ‘ग्रेट डिव्हायडिंग रेंज’चाच एक भाग आहे. टास्मानिया मुख्यतः डोंगराळ राज्य आहे. पश्चिम टास्मानियात मौंट ऑस १,६१७ मी. उंच असून, वायव्येस आणि आग्नेयीस उंच कडे व खोरी आहेत. पूर्वेकडे कमीअधिक उंचीची पठारे असून ईशान्येकडील बेन लोमंड हे सर्वांत उंच (१,५७३ मी.) पठार आहे. वायव्य व ईशान्य भागांत आणि साउथ एस्क नदीखोऱ्‍यात विस्तीर्ण मैदाने आढळतात. आग्नेय भागात हिमनदपश्च निमज्जन (हिमानी क्रियेनंतर भूभाग समुद्रात खचून झालेला) किनारा तयार झाला असून सबंध जगात तो एक विशेष किनारा समजला जातो. आग्नेय टास्मानियात डरवेंट, तर ईशान्य भागात साउथ एस्क या राज्यातील प्रमुख नद्या होत. ह्यांशिवाय लहानलहान नद्या बऱ्‍याच असून अगणित सरोवरे आहेत. सर्व सरोवरे उथळ आहेत. सेंट क्लेअर हे देशातील सर्वांत खोल गिरिपाद सरोवर (२१५ मी.) असून किंग विल्यमसारखी इतर अनेक सरोवरे जलविद्युत्‌प्रकल्पासाठी बनविलेली आहेत. राज्यातील मृदा अपक्षालित, अम्लीय, अल्पजलनिकासित, अतिह्युमसयुक्त व कमी सुपीक आहेत. राज्याच्या ईशान्य व पश्चिमी भागांत कमी सुपीक, तर वायव्य भागात सुपीक जमिनी आढळतात. हवामान आर्द्र, सौम्य उन्हाळे सौम्य हिवाळे परंतु पाऊस मात्र वर्षभर असे असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान पश्चिमेकडे २५४ सेंमी.पासून पूर्वेकडे ५० सेंमी.पर्यंत कमी होत जाते. उत्तर किनाऱ्‍यावरील सर्व भागांत ते ७६ सेंमी.च्याही वर जाते. उत्तर व पश्चिम टास्मानियात हिवाळ्यामध्ये, तर दक्षिण व पूर्व भागांत उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक पर्जन्यमान असते. जानेवारीतील सरासरी तपमान उत्तर व पूर्व भागांत सर्वाधिक (१८° से.), तर सर्व किनारीय भागात जुलैमध्ये ते ८° ते ९° से. असते. सामान्यतः भरपूर पाऊस पडणाऱ्‍या प्रदेशांत समशीतोष्ण वर्षावने असून त्यांमध्ये विलायती मेंदीची अथवा बीच वृक्षांची जंगले असतात. ७५–१५० सेंमी.च्या पर्जन्य प्रदेशात उत्तम प्रतीची निलगिरी वृक्षारण्ये आढळतात. यापेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात हलक्या प्रतीची निलगिरीची वृक्षवने अथवा सॅव्हाना तृण प्रदेश आढळतात. डोंगराळ भागाच्या पठारांवरील जंगलांमध्ये उपदक्षिणध्रुवीय तऱ्‍हेचे अनेक वृक्ष आढळतात. त्यांमध्ये मिर्टल, बीच यांसारख्या पानझडी वृक्षांचे आणि कुशन प्लँटसारखे काही वनस्पतिप्रकार आढळतात. मुख्यतः वर्षावनांत प्राणिजीवन जवळजवळ नाहीच म्हटले तरी चालेल निलगिरी वृक्षारण्यांत मात्र ते मोठ्या प्रमाणात आढळते. रानमांजर, टास्मानियन डेव्हिल, टास्मानियातच आढळणारा पट्टेरी लांडगा, वॉम्बट, प्लॅटिपस व एकिड्‌ना यांसारखे प्राणी आणि हनीईटर, ब्लॅक जे, ब्लॅक मॅग्पाय, ब्लॅक कॉकटू, विविध पोपट असे पक्षी यांनी टास्मानिया समृद्ध आहे.

 इतिहास व राज्यव्यवस्था : टास्मानने २४ नोव्हेंबर १६४२ रोजी हे बेट शोधून काढले टास्मानियाच्या जलवेष्टितत्वाची खात्री जॉर्ज बॅस व मॅथ्यू फ्लिंडर्स या ब्रिटिश समन्वेषकांनी १७९८ मध्ये पटविली. डरवेंट व टेमर या नदीखोऱ्‍यांत प्रथम वसती झाली. आदिवासींबरोबर ब्रिटिश वसाहतवाल्यांच्या अनेकवार भीषण लढाया झाल्या. १८७६ मध्ये अखेरचा आदिवासी नामशेष झाला. १८०३ मध्ये न्यू साउथ वेल्स राज्याचा अंकित प्रदेश म्हणून टास्मानियामध्ये ब्रिटिशांची वसाहत झाली. १८२५ मध्ये न्यू साउथ वेल्सबरोबरचे टास्मानियाचे संबंध तुटले १८५१ मध्ये आंशिक निर्वाचनाधिकारी विधान परिषदेची स्थापना झाली. १८५६ मध्ये जबाबदार सरकार अधिकारारूढ झाले. १ जानेवारी १९०१ रोजी इतर राज्यांप्रमाणेच टास्मानिया कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलियाचे एक घटकराज्य म्हणून घोषित करण्यात आले. राज्य संसदेचे विधानसभा व विधानपरिषद असे दोन भाग असून विधानसभेत ३५ व विधानपरिषदेत १९ सभासद असतात. विधानपरिषद ही बव्हंशी पक्षरहित असते. विधानसभा व विधानपरिषद यांच्या निवडणुका अनुक्रमे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती व अधिमान्य पद्धती यांनुसार होतात. विधानसभा व विधानपरिषद यांच्या सदस्यत्वाची मुदत अनुक्रमे पाच व सहा वर्षांची असते. १९०३ पासून स्त्रियांना मतदान हक्क प्राप्त झाला. ऑस्ट्रेलियन लेबर पार्टी, लिबरल पार्टी ऑफ ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियन सेंटर पार्टी हे येथील तीन महत्त्वाचे राजकीय पक्ष. कॅबिनेट पद्धतीने राज्यकारभार चालतो. स्थानिक स्वराज्य शासनाचे कामकाज महानगरपालिका व नगरपालिकांतर्फे चालत असून त्यासाठी राज्याचे ४९ नगरपालिकीय भाग करण्यात आले असून ४६ नगरपालिका आहेत. मार्च १९७४ मध्ये राज्यात निवडणुका होऊन मजूर पक्ष अधिकारारूढ झाला (२२ एप्रिल १९७२ रोजी मजूर पक्षाचे २१ व उदारमतवादी पक्षाचे १४ सदस्य, असे बलाबल होते). १३ ऑक्टोबर १८२३ रोजी टास्मानियाचे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. त्याच्या अधिकारकक्षेत दिवाणी, फौजदारी, धार्मिक, नौअधिकरणविषयक व विवाहविषयक बाबी येतात. त्याची होबार्ट, लॉन्सेस्टन व बर्नी येथे कार्यालये आहेत. १९७३ मध्ये राज्यातील पोलीसदलाची संख्या ८९२ होती. राज्यात एक तुरुंग आहे.

 आर्थिक स्थिती : टास्मानियाची अर्थव्यवस्था खनिज, जल आणि पर्यटक साधनसामग्री ह्यांच्या दृष्टीने तसेच आर्थिक उद्योग व प्रक्रिया यांच्या विविधतेमुळे आणि स्थिर श्रमसंबंधांमुळे अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनली आहे. तथापि मर्यादित साधनसंपत्ती, मर्यादित स्थानीय बाजारपेठा आणि बाह्य प्रदेशांस जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूकसाधनांच्या समस्या या तिच्यातील उणिवा आहेत. १९६६ च्या जनगणनेनुसार एकूण कामकरी लोकांपैकी १४ टक्के प्राथमिक क्षेत्रातील उद्योगांत (कृषिक्षेत्र व खनिज उत्पादन), २३ टक्के द्वितीयक उद्योगांत (निर्मिती व प्रक्रिया उद्योग) आणि ६३ टक्के तृतीयक उद्योगांत (सेवाउद्योग) गुंतलेले होते.  


१९७२–७३ मध्ये ९,७३३ भूधारणक्षेत्रे मिळून २५,९१,५४९ हे. जमीन होती तीपैकी १,३७,६८९ हे. जमीन पिकांसाठी लागवडीस आणण्यात आली. गहू, बार्ली, ओट, वाटाणा, बटाटे, गवत व हॉप फळे असा पिकांचा क्रम आहे. वाढती शेतमजुरी, दूरस्थित अस्थिर बाजारपेठा आणि हवामान व भूमिस्वरूप यांच्या योगे महाशेती (बृहत्‌शेती) करण्यावर पडणाऱ्या मर्यादा ह्या टास्मानियातील शेतीपुढील समस्या आहेत. अरण्यांनी राज्यातील बराच प्रदेश व्यापला असून लाकूड कापण्याच्या गिरण्या पुष्कळच आहेत. १९७३–७४ साली एकूण ४·१४ लक्ष घमी. लाकूड कापण्यात आले. निलगिरीच्या झाडांपासून वृत्तपत्री कागद व साधा कागद यांचे उत्पादन करतात. ३८ लक्ष मेंढ्या, ९ लक्ष गुरे व ८५ हजार डुकरे असे १९७३ मध्ये राज्यातील पशुधन होते. त्याच वर्षी लोकर १८२ लक्ष किग्रॅ., लोणी १२,९४७ मे. टन आणि चीज ७,२१८ मे. टन असे उत्पादन झाले. उत्तर टास्मानियात दुग्धोद्योग व मिश्र शेती, तर पूर्व किनारीय व मध्यभागात मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांसाठी कुरणे आढळतात. आग्नेय भागात सफरचंदे व हॉप फळे यांच्या मोठ्या बागा आहेत. टेमार व मर्सी यांच्या खोऱ्यांतून सफरचंदे व पिअर फळांचे मोठे उत्पादन होते. सर्व किनारीय भागांत मत्स्योद्योग चालत असून महत्त्वाचे मासे क्रेफिश, ॲबॅलोन, शार्क, बॅराक्यूडा व स्कॅलॅप्स हे होत. महत्त्वाच्या खनिजांपैकी लोह खनिज सॅव्हेज रिव्हर येथे जस्त, शिसे व तांबे रोझ्बरी येथे तांबे क्वीन्सटाउन येथे आणि कथिल व टंगस्टन ही ईशान्य टास्मानियात सापडतात. १९७२–७३ चे उत्पादन पुढीलप्रमाणे : जस्त ७२,६५३ मे. टन लोहखनिज १६·९६ लक्ष मे. टन तांबे २६,७५१ मे. टन शिसे २३,०६४ मे. टन कथिल ६,४१८ मे. टन सोने १,७६९ किग्रॅ. चांदी ८६,७४९ किग्रॅ. कोळसा १,२८,४७८ मे. टन. तांबे उत्पादन व लाकूड उत्पादन देशातील एकूण उत्पादनाच्या एकषष्ठांश टास्मानियात होत असून तांबे व लोहखनिज जपानला निर्यात करतात. लोणी, लोकर व फळफळावळ यांची ग्रेट ब्रिटनला निर्यात करतात.

 भरपूर व निश्चित पर्जन्य आणि नैसर्गिक व कृत्रिम जलसंचयाच्या सुविधा यांमुळे राज्यात जलविद्युत्‌निर्मिती प्रचंड आहे. १९७३ मध्ये एकूण उत्पादनशक्यतेच्या १० टक्के १३,२२,४०० किवॉ. वीज उत्पादन होऊ शकेल एवढी यंत्रणा कार्यवाहीत होती. गॉर्डन नदी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला म्हणजे १९७६ च्या सुमारास जलविद्युत्‌उत्पादनक्षमता १७ लक्ष किवॉ. होईल असा अंदाज आहे. गॉर्डन नदी योजना ही देशातील सर्वांत मोठी कृत्रिम जलसंचययोजना असून देशातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक धरण येथे बांधले जात आहे. प्राथमिक उद्योगांच्या दुपटीने महत्त्वाचे असलेले द्वितीयक उद्योग म्हणजे विद्युत्‌धातुवैज्ञानिकीय व विद्युत्-रासायनिक उद्योग होत. रिझ्डन येथे जस्त विद्रावके विद्युत् विश्लेषणाने संस्कारित करण्याचा उद्योग, बेल बे येथे ॲल्युमिनियम व फेरो-मँगॅनीज, बर्नी आणि बॉइअर येथे कागद, पोर्ट ह्यूअन येथे कागदलगदा, रॅल्टन येथे सिमेंट असे महत्त्वाचे उद्योग आहेत. इतर महत्त्वाच्या उद्योगांमध्ये होबार्टजवळील चॉकलेट उद्योग, बर्नी येथील टिटॅनियम रंजक द्रव्यांचा कारखाना, लॉन्सेस्टन व डेव्हनपोर्ट येथे कापडगिरण्या व गालिचे निर्मितिउद्योग आणि ऑर्फर्ड येथे ऑल्गिनेट तयार करण्याचा कारखाना आहे. राज्यसरकार उद्योगांच्या विकासाकडे आस्थेने लक्ष देते. १९७२-७३ मध्ये राज्यात ९१२ उद्योगधंदे, ३०,८०८ कामगार, विक्री ६,८२० लक्ष ऑ. डॉ. आणि वेतन-मजुरी १,३१० लक्ष ऑ. डॉ. होती. जून १९६७ मध्ये मूळ वेतनसंकल्पना रद्द करण्यात येऊन समग्र वेतनाची संकल्पना पुढे मांडण्यात आली. जून १९६९ मध्ये लवाद आयोगाने स्त्री-कामगारांसाठी समान काम–समान दाम (वेतन) हे तत्त्व अंगीकारले.

 राज्यात सहा खाजगी व्यापारी बँका व कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया यांमार्फत सर्व बँकिंग व्यवहार चालतात. कर, केंद्र सरकारकडून अनुदाने व प्रतिपूर्ती रकमा यांपासूनच राजस्व पैदा केला जातो. करांमध्ये वेतनपट कर मोटार, जमीन यांवरील कर आणि मुद्रांकशुल्क व मृत्युशुल्क हे येतात. १९७३-७४ चे अर्थसंकल्पीय राजस्व व खर्च आकडे अनुक्रमे २,०६९·४७ लक्ष ऑ. डॉ. व २,१००·९७ लक्ष ऑ. डॉ. होते. परिष्कृत धातू, वृत्तपत्री कागद व इतर कागदी वस्तू, रंजक द्रव्ये, लोकरी कापड व वस्त्रे, फळफळावळ, मिठाई, लोणी, परिरक्षित व शुष्क पालेभाज्या, कापीव लाकूड, लोहखनिज गुलिका आणि प्रक्रियित मासळी हे निर्यातीमधील प्रमुख पदार्थ. टास्मानियाचे भौगोलिक स्थान व राज्याच्या विकासाची प्रवृत्ती लक्षात घेता, वाहुतकीचे राज्याला मोठेच महत्त्व वाटते. देशाच्या सर्व राज्यांत टास्मानियामध्ये प्रत्येक चौ. किमी. ला रस्त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. लोहमार्गाची लांबी सु. ८३० किमी. आहे. ६० टक्के रस्त्यांनी, ३० टक्के लोहमार्गांनी आणि १० टक्के जलमार्गांद्वारा असे मालवाहतूकप्रमाण आहे. प्रवासीवाहतूक जवळजवळ सडकांनीच आहे. राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी २०,६५० किमी. असून ३० जून १९७३ रोजी १·३७ लक्ष मोटरी, ३४ हजार ट्रक व पाच हजार मोटरसायकली होत्या. होबार्ट हे प्रमुख बंदर असून तेथून ३३% व्यापार चालतो. लॉन्सेस्टन, बर्नी व डेव्हनपोर्ट ही अन्य बंदरे होत. होबार्ट आणि लॉन्सेस्टन येथील विमानतळांवरून अनुक्रमे प्रवासी व मालवाहतूक केली जाते.

 सबंध ऑस्ट्रेलिया खंडात न आढळणारे पर्वतीय, सरोवरीय व किनारीय सृष्टिसौंदर्य टास्मानियात आढळते. १९७२ मध्ये राज्यास २·२० लक्ष पर्यटकांनी भेट दिली व त्यामुळे राज्याला सु. २१० लक्ष ऑ. डॉ. उत्पन्न मिळाले. पर्यटन उद्योगाच्या विकासयोजना शासन कार्यवाहीत आणीत आहे.

 सामाजिक स्थिती : टास्मानियातील मूळचे लोक नेग्रिटोवंशीय होते. सबंध ऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास टास्मानियातील लोकसंख्या ही जन्मस्थान व राष्ट्रीयत्व या दोन्ही दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते. टास्मानियातील ९० टक्के लोक मुळात ऑस्ट्रेलियातच जन्मल्याचे आढळते. अखेरचा शुद्ध रक्ताचा टास्मानियन १८७६ मध्ये मरण पावला. सर्व राज्यांत येथील जननप्रमाण सर्वाधिक आहे. १९७० च्या सुमारास स्थूल जननमान दरहजारी ८·१ एवढे होते. बालमृत्युमानही सर्वांत कमी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आप्रवाशांचे प्रमाण वाढत गेले. १९५९ पासून मात्र राज्याबाहेर जाणाऱ्यांचे प्रमाण फार वाढल्याचे दिसते. कामकरी लोकांच्या बाबतीत टास्मानियन लोकसंख्येचे आणि विकासवाढीचेही अत्यल्प प्रमाण आढळते. येथील बहुसंख्य लोक ख्रिस्ती असून अँग्लिकन व मेथडिस्ट चर्चचे अधिक लोक, तर रोमन कॅथलिक व प्रेसबिटेरियन त्यामानाने कमी आहेत. निर्वाहमान साधारणतः उच्च आहे. सहा ते सोळा वर्षांपर्यंत सक्तीचे शिक्षण असून ते शासननियंत्रित आहे. १९७३ मध्ये शासकीय शाळा व खाजगी शाळा ह्यांमधून अनुक्रमे ७९,७०५ व १४,२३७ विद्यार्थी, त्यांपैकी अनुक्रमे २८,९३५ आणि ६,३४२ विद्यार्थी माध्यमिक शाळांत होते. १८९० मध्ये स्थापन झालेल्या टास्मानिया विद्यापीठात १९७३ मध्ये ३,४१४ विद्यार्थी व २७१ पूर्णवेळ अध्यापक होते. खाजगी शाळांवर बव्हंशी धर्मसंस्थांचे नियंत्रण असते. प्रगत शिक्षण महाविद्यालय (कॉलेज ऑफ अँडव्हान्स्ड एज्युकेशन) या १९७२ साली स्थापन झालेल्या संस्थेतून तांत्रिक व उच्च शिक्षण मिळते, सर्वसाधारण आरोग्य चांगले असले, तरी ग्रामीण भागात द्राक्षार्बुदाचे मोठे प्रमाण आहे. गलगंड हा स्थानिक रोग आहे. होबार्ट, लॉन्सेस्टन, लाट्रोब आणि बर्नी-विन्यार्ड येथे सरकारी दवाखाने असून जिल्हावार इस्पितळे आहेत. न्यू नॉरफोक येथे एक मनोरुग्णालय, होबार्ट व लॉन्सेस्टन येथे प्रसूतिगृहे, न्यू टाउन येथे क्षयरोग चिकित्सा केंद्र होबार्ट, लॉन्सेस्टन व विन्यार्ड येथे वृद्धांकरिता दवाखाने आहेत. प्रौढ माणसांची दरवर्षी क्ष-किरण परीक्षा घेतली जाते. होबार्ट, लॉन्सेस्टन व बीकन्झफील्ड येथे सार्वजनिक जलपुरवठा व्यवस्था आहे. वृद्ध, अपंग, निवृत्त सैनिक तसेच विधवांना केंद्रसरकार निवृत्तिवेतन पुरविते. राज्यात ७५ टक्के घरे राहणाऱ्यांच्या मालकीची असून दालनसदृश घरे दहा टक्के आहेत. केंद्र व राज्य सरकारांचे गृहनिवसन आयोग, तसेच राज्यकृषी बँक आणि सहकारी गृहरचना संस्था घरबांधणीकरिता अर्थप्रबंध करतात. 


राज्यात अनेक संगीत प्रदानसंस्था आहेत. प्रगत शिक्षण महाविद्यालयात संगीत संवर्धनकेंद्र व कलाविद्यालय आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकॉस्टिंग कमिशन हे टास्मानियन सिंफनी ऑर्केस्ट्रा चालविते. ‘द नॅशनल थिएटर अँड फाइन आर्ट्‌स सोसायटी ऑफ टास्मानिया’ हे नाटके व संगीतिका कार्यक्रम सादर करते. होबार्ट येथे देशातील सर्वांत जुने ‘रॉयल थिएटर’ आहे. होबार्ट व लॉन्सेस्टन येथे वस्तुसंग्रहालये व कलावीथी आहेत. टास्मानियात चित्रपटमहोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात. १९७२ मध्ये राज्याने पहिला कलामहोत्सव भरविला. होबार्ट येथे प्रसिद्ध ‘व्हॅन डीमेन्स लँड फोक म्यूझियम’ आहे. राज्यात भरपूर ग्रंथालये असून होबार्ट येथे राज्य संदर्भ ग्रंथालय व राज्य पुराभिलेखागार आहेत. होबार्ट, लॉन्सेस्टन व बर्नी येथून तीन दैनिके, तर क्वीन्सटाउन, स्मिथटन, जॉर्जटाउन, स्कॉट्सडेल, न्यू नॉरफोक व ह्यूअनव्हिल येथून प्रादेशिक माहितीवर भर देणारी साप्ताहिके प्रकाशित होतात. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकॉस्टिंग कमिशन व खाजगी नभोवाणी व दूरचित्रवाणी संस्था नभोवाणी- व दूरचित्रवाणी-सेवा उपलब्ध करतात.

 टास्मानिया हे इतर राज्यांच्या मानाने अर्धविकसित, सुप्त सामर्थ्याच्या बाबतीत मर्यादित, अधिक ग्रामीण छटा असलेले आणि उद्योगदृष्ट्या मागासलेले राज्य आहे. पर्यटन उद्योग हा राज्याचा चेहरामोहरा बदलविणारा उद्योग ठरण्याची शक्यता आहे. विकेंद्रित पण एकजिनसी लोकसंख्या, संख्येने लहान तथापि सांस्कृतिक दृष्ट्या चैतन्यशील, स्थितिवादी पण नवक्लृप्तिशील, अरण्ये व महानगरे या दोहोंपासून दूर तथापि जवळ भासणारे, स्तब्ध खंडामधील सर्वांत शांत राज्य असे टास्मानियाचे यथार्थ वर्णन करता येईल.

 गद्रे, वि. रा.