नोव्होसिबिर्स्क : सोव्हिएट रशियाच्या रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट रिपब्लिकमधील नोव्होसिबिर्स्क ओब्लास्टची (प्रशासकीय प्रांत) राजधानी आणि सायबीरियाचे औद्योगिक, नागरी व सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या १२,८६,००० (१९७६). हे मॉस्कोच्या पूर्वेस २,८१६ किमी. ट्रान्स–सायबीरियन लोहमार्गावर ओब नदीकाठी वसले आहे.

नोव्होसिबिर्स्क हे ओब नदी जलमार्ग व ट्रान्स–सायबीरियन लोहमार्ग या दोन महामार्गांच्या संगमावर उदयास आले. १८९१ मध्ये ओब नदीवर १,००० मी. लांबीचा लोहमार्गी पूल बांधण्यात आला. त्याच्या परिसरात एक वसाहत निर्माण झाली व हळूहळू वाढत गेली.

१९०३ मध्ये ‘गूसेफ्का’ हे नाव असलेल्या या वसाहतीचे नगरात रूपांतर होऊन त्याचे नाव नोव्होन्यिकलायेफ्‌स्क असे ठेवण्यात आले. प्रथम व्यापारी शहर म्हणून पण नंतर अवजड उद्योगांचे शहर म्हणून त्याची जलद वाढ होत गेली. या वाढीला कोळसा, लोह, सोने व इतर महत्त्वाची खनिजे असलेला समृद्ध कुझनेट्स्क द्रोणीप्रदेश तसेच सायबीरियन ‘तैगा’ हा समृद्ध जंगलप्रदेश या दोहोंचे सान्निध्य कारणीभूत ठरले. एकीकडून सायबीरियन कृषिप्रदेशास कृषियंत्रावजारांची गरज होती, तर ट्रान्स–सायबीरियन रेल्वेसारख्या नव्या वाहतूक यंत्रणेला रेल्वेएंजिन, डबे, जनित्रे, पूल इत्यादींची गरज होती. तथापि हे १९२५ पर्यंत घडू शकले नाही. त्या वर्षी शहराचे नाव ‘नोव्होसिबिर्स्क’ असे ठेवण्यात आले. रशियाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या आरंभकाळापासून शहराची वाढ होत गेली. १९७० च्या सुमारास नोव्होसिबिर्स्क हे क्षेत्रफळ व लोकसंख्या यांचा विचार करता अनुक्रमे मॉस्को व लेनिनग्राड यांनंतरचे तिसऱ्या आणि आठव्या क्रमांकाचे शहर बनले आहे.

शहरामध्ये लांब व रुंद चौक, विस्तीर्ण रस्ते, उद्याने-उपवने, दुतर्फा वृक्षयुक्त पथ, हजारो अनेक मजली इमारती, मोठी संयंत्रे व कारखाने आणि सोळा उच्च शैक्षणिक संस्था आहेत. नोव्होसिबिर्स्क हे लोहमार्गांचे मोठे प्रस्थानक, जलमार्ग व हवाईमार्ग यांचे नाके आणि प्रशासकीय केंद्र आहे. शहरांत सोव्हिएट कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेशीय समिती कार्यालय, पश्चिम सायबीरियाच्या विविध मंत्रालयांची शाखाकार्यालये, सोव्हिएट वृत्तपत्रांची मध्यवर्ती संस्थाकार्यालये, सायबीरियातील अनेक वृत्तपत्रांच्या संपादक मंडळांची कार्यालये, ‘इन्टूरिस्ट’ या सोव्हिएट पर्यटन संस्थेचे शाखाकार्यालय वगैरे महत्त्वाच्या संस्था आहेत.

नोव्होसिबिर्स्क हे सोव्हिएट रशियाच्या सर्वांत मोठ्या औद्योगिक केंद्रांपैकी एक गणले जाते. रशियाच्या पंचवार्षिक योजनांची कार्यवाही चालू असतानाच, येथे अवजड यंत्रसामग्री व हत्यारे यांचा निर्मितिउद्योग, विद्युत्एंजिने, धातुकाम, बांधकाम, रेडिओ व इलेक्ट्रॉनिकी उद्योग उदयास आले. १८० टन क्षमतेच्या पोलाद गाळण्याच्या भट्ट्या निर्माण करणारा औष्णिक विद्युत्‌सामग्रीचा कारखाना, प्रतिवर्षी सु.१ लक्ष पेरणीयंत्रे निर्माण करणारा कृषिअवजारांचा कारखाना, इलेक्ट्रॉनीय साधनसामग्रीयुक्त महाप्रचंड पाणदाबयंत्रे निर्माण करणारा ‘येफ्रेमॉव्ह कारखाना’, जनित्रे व मोठी विद्युत् एंजिने तयार करण्याचा कारखाना असे प्रचंड कारखाने शहरात असून त्यांशिवाय पोलादी नळ्या, विद्युत् व बांधकामयंत्रे, प्लॅस्टिक, पियानो, सूक्ष्म उपकरणे, यांत्रिक हत्यारे, खाणकामसामग्री, स्वयंचलित यंत्रमाग इत्यादींचे उत्पादन होत असते. रशियाच्या सर्व राज्यांना या वस्तूंचा पुरवठा आणि जगातील ६० देशांकडे निर्यात केली जाते. अशा प्रकारच्या औद्योगिकीकरणामुळे नोव्होसिबिर्स्कला सायबीरियाचे शिकागो मानतात.

शहरात २०० च्या वर माध्यमिक शाळा आणि संगीत, नाटक इ. ललित कलांचे प्रशिक्षण देणाऱ्या बारांवर विशेष शाळा आहेत. ‘सोव्हिएट विज्ञान अकादमी’ ची विभागीय शाखा येथे १९५० च्या सुमारास स्थापन झाली. अल्पावधीतच येथे २२ संशोधन संस्थांची व शास्त्रीय ग्रंथालयाची उभारणी झाली. सोव्हिएट कृषिक अकादमी, वैद्यकीय शास्त्र अकादमी यांच्या विभागशाखाही येथे उभारण्यात आल्या. यांशिवाय उद्योगधंद्यांना लागणाऱ्या संशोधन व अभिकल्पसेवाविषयक सु. ८० संशोधनसंस्था शहरात आहेत. उच्च शिक्षण देणाऱ्या सोळा संस्था तसेच भौतिकीपासून संगीतिका (ऑपेरा) आणि बॅले नृत्यापर्यंत विशेष प्रशिक्षण देणाऱ्या ३३ विशेष माध्यमिक शिक्षणसंस्था शहरात आहेत. येथे ६ नाट्यगृहे आहेत. दुसऱ्या महायुद्धात बांधलेल्या ‘ऑपेरा व बॅले थिएटर’ ने जागतिक कीर्ती संपादन केली आहे. सायबीरियन लाइट्स (स्था. १९२२) नावाचे विख्यात नियतकालिक येथून प्रसिद्ध होते. ‘द वेस्टर्न सायबीरियन पब्लिशिंग कंपनी’ ही राज्यातील सर्वांत मोठ्या प्रकाशनसंस्थांपैकी एक असून ती प्रतिवर्षी पाच लक्ष पुस्तकांच्या प्रती प्रकाशित करते. ‘नाउका’ या शास्त्रीय पुस्तके प्रकाशित करणाऱ्या संस्थेचीही येथे शाखा आहे.

नोव्होसिबिर्स्कमध्ये दूरचित्रवाणी व प्रक्षेपण केंद्र असून ते मॉस्कोच्या व ‘इंटरव्हिझन’ या पूर्व-यूरोपीय  देशांतील दूरचित्रवाणी संस्थांशी संदेशवाही उपग्रहामार्फत जोडलेले आहे. याशिवाय शहरात चित्रवीथी, केंद्रीय सायबीरियन वनस्पतिउद्याने, चार संग्रहालये व ५५० ग्रंथालये आहेत. येथील ‘स्टेट पब्लिक लायब्ररी’ सायबीरिया, अतिपूर्व व आग्नेय आशिया या प्रदेशांसाठी निक्षेपस्थान ग्रंथालय म्हणून संयुक्त राष्ट्रांतर्फे नामनिर्देशित करण्यात आले आहे. शहरातील अनेक स्मारकांपैकी एका स्मारकावर दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या ३०,००० नोव्होसिबिर्स्कवासीयांची नावे कोरलेली आहेत.

गद्रे, वि. रा. गाडे, ना. स.