बेंगाझी :लिबियातील एक प्रमुख शहर. लोकसंख्या १,४०,००० (१९७३). ट्रिपोलीच्या पूर्वेस ६४४ किमी. भूमध्य समुद्राच्या सिद्रा आखातावर वसलेले हे उत्कृष्ट बंदरही आहे. देशाचे एक प्रमुख प्रशासकीय, व्यापारी, औद्योगिक व शैक्षणिक केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. शहराच्या पूर्वेस ३२ किमी. वर बेनिन हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

ग्रीकांनी इ.स.पू. सातव्या शतकात हे वसविले. त्यावेही हे ‘हेस्पेरिडीस’ म्हणून ओळखले जाई. मात्र ईजिप्शियन अंमलात तिसऱ्या टॉलेमीच्या कारकीर्दीत (इ.स.पू. तिसरे शतक) त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ ‘बेरनायसी’ असे याचे नामांतर झाले. इ.स.पू. पहिल्या शतकात हे रोमन अंमलाखाली आले, तेव्हा येथे ज्यू वस्ती होती. इ.स. पाचव्या शतकात व्हॅंडालांनी याची बरीच नासधूस केली. अरबांनी यावर सातव्या शतकात ताबा मिळविला. सोळाव्या शतकापासून हे शहर तुर्कांच्या आधिपत्याखाली आले. इटालियन अंमलात (इ.स. १९११ – ४२) शहराची प्रगती झाली. दुसऱ्या महायुद्धात त्याचे अतोनात नुकसान झाले. ब्रिटिश अंमलाखाली (१९४२ नंतर) शहराच्या विकासास पुन्हा चालना मिळाली व ट्रिपोलीखेरीज लिबियाची एक राजधानीही येथे करण्यात आली (१९५१ – ७२).

आसमंतातील शेतमालाची एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून हे प्रसिद्ध होते परंतु १९५० पासून तेलसाठ्याच्या शोधामुळे येथील अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होऊन तेलशुध्दीकरण तत्त्वचतुषअटयीनिर्मितीस महत्त्व आले तसेच बंदराची व शहराची भरभराट झाली. येथे सिमेंट, अन्नप्रक्रिया, मीठ, मासेमारी इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. शहराचे बाह्यरुप पूर्णपणे आधुनिक आहे. येथे लिबियन विद्यापीठ (स्था. १९५५) व त्याच्याशी संलग्न महाविद्यालये त्याचप्रमाणे इतरही शैक्षणिक संस्था आहेत. कॅथीड्रल, सिनॅगॉग यांसारख्या धार्मिक, ऐतिहासिक वास्तू तसेच संग्रहालय व सुंदर पुळणी यांमुळे पर्यटकांची येथे वर्दळ असते.

गाडे, ना. स.