लीलाँग्वे : आग्नेय आफ्रिकेतील मालावी प्रजासत्ताकाची राजधानी व देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या 2,20,300 (1987 अंदाज). ते झाँबा या जुण्या राजधानीच्या वायव्येस सु. 210 किमी. वर व सालीमा या बंदराच्या पश्र्चिमेस सु. 50 किमी. वर अंतर्गत पठारी प्रदेशात त्याच नावाच्या नदीकाठी वसले आहे. सुरुवातीस लीलाँग्वे जिल्हा व मालावीचा मध्यविभाग यांचे ते शासकीय मुख्यालय होते. हे प्रारंभापासून मारावी अथवा मालावी या नावाने ज्ञात असलेल्या आदिम संस्कृतीचे मूल्यस्थान असून विद्यमान लीलाँग्वेमध्ये मालावी आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. ब्रिटिश वसाहतवाल्यांनी तेथे 1891 मध्ये अधिसत्ता स्थापन केली आणि धर्म प्रसाराबरोबरच लीलाँग्वे  परिसरातील कच्चा माल मायभूमीत पाठविला व पक्क्या मालासाठी बाजारपेठ तयार केली. हा भूभाग न्यासालँड म्हणून ओळखला जाई.

न्यासालँडचे रूपांतर प्रथम संरक्षित प्रदेश (1907), स्वयंशासित प्रदेश (1963) आणि मालावी प्रजासत्ताक (6 जुलै 1966) असे झाले. देशाच्या उत्तर व मध्यवर्ती असलेल्या मोक्याच्या स्थानामुळे हेस्टिंग्ज कामूझू बांडा या पहिल्या राष्ट्राध्यक्षाने 1966 मध्ये आर्थिक वर्धन-बिंदू म्हणून या शहराची निवड केली. मालावीच्या उत्तर व मध्य भागांचा विकास साधणे, ही तीमागील मूळ संकल्पना होती. तीनुसार त्याच्या विकासाच्या योजना कार्यान्वित होऊन दिनांक 1 जानेवारी 1975 रोजी येथे अधिकृत राजधानी बसविण्यात आली. राजधानी अंतर्गत भागात हलविल्यानंतर त्या भागाचा विकास  आपाततः घडेल, अशी राष्ट्रीय नेत्यांची अटकळ होती. सभोवतालच्या सुपीक जमिनीमुळे देशातील हा एक महत्त्वाचा अन्नधान्यपट्टा मानला जातो. धान्य, फळफळावळ व तंबाखू यांची मोठी बाजारपेठ येथे आहे. अन्नधान्य व तंबाखू यांवर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे त्यामुळे शहरात वाढले. सुमारे 4,45,000 हे. सुपीक जमीन लीलाँग्वे भूविकास प्रकल्प या नावाखाली कसण्यात येत आहे. शासनाने खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले असून लीलाँग्वे-झाँबा-ब्लँटायर मार्ग विकसित झाला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील शहरांशी संपर्क साधता येतो. लोहमार्गांनी ते पूर्वेस सालीमा बंदरापर्यंत आणि पश्र्चिमेस झँबिया सीमेपर्यंत जोडलेले आहे. कामूझू आंतरराष्ट्रीय विमानतळ 1983 मध्ये कार्यान्वित झाला. त्यामुळे इतर देशांशी शहराचा संपर्क वाढला.

लीलाँग्वेचे प्राचीन व आधुनिक अशा दोन स्वतंत्र भागांत विभाजन करण्यात आले असून पहिला भाग देशाचे वितरण व सेवाकेंद्र म्हणून विकसित झाला आहे. दुसऱ्या भागास ‘कॅपिटल हिल’ म्हणतात. या भागात प्रामुख्याने शासकीय कार्यालये, दूतावास, वित्तसंथा, बँका, न्यायालये तसेच बांडा कृषी महाविद्यालय या संस्था आढळतात. ‘कॅपिटल हिल’ हा भाग जुन्या शहरापासून 5 किमी.वर स्वतंत्ररीत्या वसला आहे. मधल्या पट्टयातही हळूहळू वसती होत आहे.

संदर्भ : 1. Carlson, L. Africa’s Lands and Nations, New York, 1967.

           2. Jarrett, H. R. Africa, Plymouth, 1974.

फडके, वि. श.