खम्मम : आंध्र प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या ५६,९१९ (१९७१). काझीपेठ-विजयवाडा लोहमार्गावर हे वरंगळच्या आग्नेयीस १०४ किमी. आहे. काकतीयांच्या कारकीर्दीत (११६०–१३२६) हे भरभराटलेले शहर व कारभाराचे केंद्र होते. नंतर ते १९५३ पर्यंत वरंगळ जिल्ह्याचा भाग होते. येथील किल्ला, परिसरातील लखनावरम् तलाव व नरसिंहस्वामींचे मंदिर, आजही प्रेक्षणीय आहेत. येथे एक महाविद्यालय आहे. तांदूळ सडणे, तेलघाणे, धातुकाम, कातडी कमावणे वगैरेंचे उद्योग येथे असून जिल्ह्यातील शेतमालीची ही व्यापारपेठ आहे.  

शाह, र. रू.