अमूर : पूर्व आशियातील प्रमुख नदी. हिला ‘हेहू’ (काळी नदी), ‘हेलुंग जिआंग’ (कृष्णसर्प नदी) अशी चिनी नावे आहेत. अमूरचे खोरे सु. १९,९४,३०० चौ.किमी. असून लांबी ४,६४० किमी. (पैकी  ३,२१८ किमी. जहाजवाहतुकीस उपयुक्त) आहे. रशिया–चीनमधील ४,३२० किमी. सरहद्द या नदीने बनलेली आहे.

पूर्व सायबीरिया आणि मंगोलिया यांच्या सरहद्दीवर आलेल्या याब्‍लोनाय या सु. १,५२५ मी. उंच असलेल्या पर्वतश्रेणीवर इंगोडा नदी उगम पावते. सु. ८०० किमी. ईशान्येकडे वाहत गेल्यावर हिला मंगोलियात उगम पावलेली आणि सु. ९५० किमी. वाहत आलेली ओनॉन नदी रशियातील चिता प्रांतातील शिल्का शहराजवळ मिळते. संगमानंतर हिला ‘शिल्का’ म्हणतात. ही पूर्वेस सु.५५५ किमी. वाहत गेल्यावर तिला मूळ खिंगन पर्वतात उगम पावलेली आरगून नदी मिळते. तेथून हिला ‘अमूर’ म्हणतात. मग ही आग्नेयवाहिनी होते व मांचुरियाच्या उत्तर सरहद्दीवरून वाहत जाऊन पुनः ईशान्येकडे वाहू लागते. ओखोटस्कचा समुद्र व तातारीचे आखात यांना जोडणाऱ्या सॅकालीन बेटाजवळील तातारीच्या सामुद्रधुनीला ही मिळते. हिने बनविलेली खाडी १६ किमी. रुंद आहे.

अमूरला उत्तरेकडून झेया व बुरेया, दक्षिणेकडून कूमारा, सुंगारी व उसुरी आणि मुखाजवळ पश्चिमेकडून आमगुन या नद्या मिळतात. नदीचा मुखाकडील भाग दलदलीचा आहे. हिवाळ्यात पाणी गोठल्यामुळे सहा महिने ही वाहतुकीस निरुपयोगी ठरते. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे आणि पावसामुळे नदीला पूर येतात. स्प्रू, सीडार, पाईन, एल्म, सफरचंद इ. दीडशे प्रकारचे सूचीपर्णी व पानझडी वृक्ष सफरचंद, पेअर, अक्रोड आदी फळे आणि गहू, ओट, राय, बीट, बटाटे इ. पिके अमूरच्या नदीखोऱ्यात विपुल प्रमाणात होतात. तसेच येथील खनिज संपत्तीही महत्त्वाची आहे. ट्रान्स-सायबीरियन रेल्वेचा फाटा खबारफस्क शहरापर्यंत अमूरला समांतर जातो. या रेल्वेमुळे अमूर खोऱ्यात बरीच औद्योगिक वाढ झाली असून न्यिकलायेफस्क, कोम्‌‌सोमोल्स्क, खबारफस्क, ब्‍लॅगोवेश्चेन्स्क आदी महत्त्वाची शहरे येथे आहेत. पॅसिफिकला मिळणारी नदी म्हणून अमूरला फार महत्त्व आहे आणि म्हणूनच सतराव्या शतकापासून रशिया व चीन, जपान यांच्यामध्ये झालेल्या झगड्यांमध्ये अमूरचा महत्त्वाचा भाग आहे. आजही चीन व रशियातील कुरबुरी याच नदीच्या आसमंतात घडल्याची उदाहरणे आहेत. 

   

  यार्दी, ह. व्यं.