सॅल्व्हादॉर : ब्राझीलमधील बाहिआ राज्याची राजधानी. तसेच देशातील प्रमुख औद्योगिक व व्यापारी शहर आणि बंदर. लोकसंख्या २६,७६,६०६ (२०१०). ब्राझीलमधील हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बाहिआ या नावानेही ओळखले जाते. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावरील अटलांटिक महासागर व तोदुझ उस सँतुस (ऑल सेंट्स) उपसागर यांदरम्यान असलेल्या निसर्गरम्य द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर हे शहर वसले आहे. शहराचे वरचे व खालचे असे दोन प्रमुख भाग आहेत. वरच्या शहरी भागात प्रमुख बाजारपेठ, शासकीय कार्यालये व निवासी क्षेत्र आहे. कड्याच्या पायथ्याशी सस.लगत शहराचा खालचा भाग असून तेथे बंदर, व्यापारी केंद्र व निवासी भाग आहे. शहराच्या या दोन्ही भागांना केबल कार, सरकते जिने यांनी जोडले असून येथील रस्ते अरुंद व तीव्र उताराचे आहेत.

देशातील सर्वांत जुन्या शहरांपैकी हे एक असून त्याची स्थापना टॉम दी सोझा या ब्राझीलमधील पहिल्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलने १५४९ मध्ये केली आणि त्या ठिकाणी ब्राझीलमधील पोर्तुगीज वसाहतीची राजधानी स्थापन केली. येथील साखरेच्या प्रचंड व्यापारामुळे तेथील उपसागरीय किनाऱ्यास असाधारण महत्त्व आले होते. त्यामुळे चाचे आणि पोर्तुगालचे शत्रू यांची त्यावर वारंवार आक्रमणे होत. डचांच्या नाविक दलाने १६२४ मध्ये ते हस्तगत केले पण पुन्हा ते पोर्तुगीजांनी मिळविले. १८२३ पर्यंत तेथे पोर्तुगीज सत्तेचा अंमल होता. १७६३ पर्यंत ही ब्राझीलची राजधानी होती. ब्राझीलच्या स्वातंत्र्ययुद्घात पोर्तुगीज लष्कराची हकालपट्टी झाली आणि ब्राझील स्वतंत्र देश झाला. वसाहतकाळात हे दक्षिण अमेरिकेतील गुलामांच्या व्यापाराचे प्रमुख ठिकाण होते. आजही येथे निग्रो आणि मुलट्टो लोकांची मोठी वस्ती आहे. त्यांची स्वतंत्र लोकसंस्कृती असून त्यांनी अनेक वेशभूषा, विशिष्ट खाद्यपदार्थ आणि लोकगीते यांचे जतन केले असून सॅल्व्हादॉरच्या स्थानिक जीवनात त्यास स्थान आहे. वसाहतकालीन प्रशासकीय अधिकार रिओ दे जानेरोकडे हस्तांतरित झाल्यापासून सॅल्व्हादॉरचे पूर्वीचे राजकीय व आर्थिक महत्त्व कमी झाले.

दुसऱ्या महायुद्घकाळापासून शहराची वाढ झपाट्याने झाली. बांधकाम व्यवसायाबरोबरच आर्थिक उलाढालींना महत्त्व आले. १९७० च्या दशकात सॅल्व्हादॉरपासून जवळच अरातू औद्योगिक केंद्र आणि कामाकरी पेट्रोरसायन उद्योग समूहाची उभारणी करण्यात आली. ब्राझीलमधील हे एक उत्कृष्ट बंदर आहे. १९७५ मध्ये त्यात अद्ययावत सोयी करण्यात आल्या. त्यामुळे सागरी जहाजे धक्क्याला येऊ लागली. बंदरातून तंबाखू , साखर, साइसल, चामडे, कोको, लोहखनिज, हिरे, ॲल्युमिनियम, लाकूड, खनिज तेल यांची निर्यात केली जाते. शहरात अन्न व तंबाखू प्रक्रिया, साखर व वस्त्रनिर्मिती, मृत्तिकाशिल्प, मोटारीचे सुटे भाग, रसायने, कातडी कमावणे, काष्ठकाम, धातूशोधन, जहाजबांधणी व दुरुस्ती, बंदराशी संलग्न असे अनेक उद्योग व व्यवसाय चालतात. मध्य व दक्षिण ब्राझीलमधील प्रमुख ठिकाणांशी हे शहर रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्ग किंवा जलमार्गांनी जोडले आहे.

सॅल्व्हादॉरमध्ये वसाहतकालीन अनेक वास्तुशिल्पे आढळतात. विशेषतः बराक शैलीतील अनेक चर्च येथे आहेत. त्यांतील साऊँ फान्सिस्को चर्च विशेष प्रसिद्घ आहे. शहर व परिसरात अनेक तत्कालीन किल्ल्यांचे अवशेष असून अद्याप काही वसाहतकालीन जुन्या वास्तू-प्रासाद आहेत. काही वस्तुसंग्रहालये येथे आहेत. फेडरल दा बाहिआ (१९४६) व कॅथॅलिका दो सॅल्व्हादॉर (१९६१) ही विद्यापीठे येथे आहेत. द्वीपकल्पाच्या टोकाशी अटलांटिक किनाऱ्यावर बरा दीपगृह आहे. ऐतिहासिक वास्तू व सुंदर पुळणी यांच्याशी निगडित येथील पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे.

देशपांडे, सु. र.