लूअँडा : (साऊँ, पॉउलू दे लूअँडा). नैर्ॠत्य आफ्रिकेतील अंगोला या देशाची व त्यातील लूअँडा प्रांताची राजधानी. लोकसंख्या १२,००,००० (१९८८). अटलांटिक महासागरापैकी बेंगो उपसागराच्या दोन्ही किनाऱ्यांवर वसलेल्या या शहरास लाटांच्या भरणकार्यामुळे तयार झालेल्या सु. २९ किमी. लांबीच्या वाळूच्या दांड्यापासून संरक्षण मिळते.

पोर्तुगीज वसाहतवाल्यांनी १५७५ मध्ये वसाहतीच्या संरक्षणासाठी ‘साऊँ पॉउलू दे लूअँडा’ नावाने हे शहर वसविले. १६२७ मध्ये हे पोर्तुगालच्या अंगोला वसाहतीचे मुख्य प्रशासकीय केंद्र बनले. १६४१-४८ यांदरम्यान ते डच लोकांच्या ताब्यात होते. १६४८ मध्ये पोर्तुगीजांनी यावर पुन्हा ताबा मिळविल्यानंतर सतराव्या व अठराव्या शतकांत या बंदरातून ब्राझीलकडे मोठ्या प्रमाणावर गुलामांची निर्यात झाली त्यामुळेच त्याची भरभराट झाली. पुढे ही निर्यात थांबल्यानंतर लूअँडाचे महत्त्व कमी झाले. एकोणिसाव्या शतकात व त्यानंतर विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून याच्या नियोजनबद्ध विकासास सुरुवात झाली.

लूअँडा हे देशातील सर्वांत मोठे बंदर तसेच प्रमुख व्यापारी आणि औद्योगिक केंद्र आहे. आफ्रिकेच्या पश्र्चिम किनाऱ्यावरील प्रमुख नैसर्गिक बंदरांपैकी हे एक असून तेथे अलीकडे करण्यात आलेल्या सुधारणांमुळे मोठमोठ्या बोटी येणे शक्य झाले आहे. बंदराच्या पार्श्र्वप्रदेश क्षेत्रात संपूर्ण उत्तर अंगोला येत असून त्याच्याशी हे रस्ते व लोहमार्गाने तसेच उत्तर, ईशान्य व आग्नेयीकडील भागांशी ते रस्त्याने जोडले आहे. पूर्वी अंगोला ही पोर्तुगीजांची वसाहत असल्यामुळे तेथे उत्पन्न होणारा कच्चा माल बंदराकडे आणण्याच्या दृष्टिकोणातून वाहतूकमार्गांचा विकास झाल्याचे जाणवते. लूअँडा आफ्रिकेतील इतर शहरांशी तसेच इतर देशांशी हवाई मार्गे जोडले आहे. व्यापारी केंद्र म्हणून आजही त्याचा लौकिक आहे. बंदरातून सर्वाधिक निर्यात कॉफीची होते. त्याशिवाय हिरे, कापूस, साखर, पामतेल, मीठ, मासे, लाकूड, मँगॅनीज, लोह यांची निर्यात, तर यंत्रसामग्री, वाहने, कापड यांसारख्या पक्क्या मालाची आयात केली जाते. याचे व्यापारी संबंध प्रामुख्याने पोर्तुगालशी आहेत.

 

अलीकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणास प्रारंभ झाला आहे. १९५५ मध्ये शहराजवळ खनिज तेलसाठ्यांचा शोध लागला. सभोवतालच्या प्रदेशातील विहिरींतून काढलेल्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी बंदराजवळ तेलशुद्धीकरण कारखाना उभारण्यात आला असून शहराच्या पूर्व भागात छोटा औद्योगिक विभाग स्थापन करण्यात आला आहे. शहरात रेल्वेकर्मशाळा, ओतशाळा, बीरनिर्मिती, कापड रसायने, अन्नप्रक्रिया, सिमेंट, बांधकामाचे इतर साहित्य, प्लॅस्टिक उत्पादने, धातुसामान, सिगारेटी, साबण, आगपेट्या, पादत्राणे, लाकूड, कापण्याच्या गिरण्या, ट्रक व मोटारजुळणी, स्थानिक बाजारपेठेत विकले जाणारे इतर पदार्थ तयार करणे इत्यादींचे लहानमोठे कारखाने आहेत. शहराच्या आसमंतात कॉफी, कापूस, ऊस, तेलबिया, पामतेल, खोबरे हीशेतीउत्पादने होतात. गुरे पाळण्याच्या व्यवसायाला स्थानिक दृष्ट्या महत्त्व आहे. शहराला वीज पुरविण्यासाठी कुआंझा नदीवर कंबांबे जलविद्युतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे (१९६३). याशिवाय अनेक सरकारी विकास योजनांमुळे ते आता देशातील सर्वांत मोठे शहर बनले आहे.

लूअँडा हे शैक्षणिक केंद्र असून तेथे अंगोला विद्यापीठ (स्थापना १९६२) आहे. येथील साऊँ मीगेल गढी उल्लेखनीय आहे. रोमन कॅथलिक आर्चबिशपचे हे मुख्य ठिकाण आहे. विषुववृत्तीय आफ्रिकेत गोरे लोक मोठ्या प्रमाणावर केंद्रित झालेले शहर म्हणूनही लूअँडा ओळखले जाते.  

फडके, वि. शं.